Friday, 18 November 2011

अथातो प्राकृत जिज्ञासा। - ४


आत्तापर्यंतच्या विवेचनाचा गोषवारा घेतला तर एक गोष्ट स्पष्ट होतेय, ती ही की, यजुर्वेदही ज्याला प्राचीन म्हणतो, त्या (अति)प्राचीन काळात असलेली अव्यक्त, अव्याकृत, अखण्डित अशी भाषा, वायुच्या साहाय्याने मध्ये धरून व्यक्त, व्याकृत, खण्डित केली आणि त्यामुळे त्या भाषेतून अर्थनिश्चिती होणं सुलभ झालं. इंद्राच्या या कृतीमुळेच त्याला प्रथम व्याकरणकर्ता गणलं गेलं. आता ही, इंद्राने निश्चित केलेली भाषा, हीच भारतीय भाषांची जननी अशी मूळ भाषा मानावी लागते.
आता शंकाच घ्यायची झाली तर कुणी यालाही असहमत होईल. सहाजिकच आहे, कारण इंद्राने निश्चित केलेल्या भाषेपूर्वीची व्याकृत भाषा हीच मूळ मानावी, असा त्यांचा आग्रह होईल. पण वैयक्तिक दृष्ट्या मला ते पटत नाही. कारण सांगतो. शेवटी भाषा म्हणजे काय? हा मूलभूत प्रश्न इथे उपस्थित करावा लागतो. सामान्यतः म्हण्टलं तर भाषा हे संवादाचं माध्यम आहे. तेच भाषेचं प्रमुख कर्म आहे. यजुर्वेदातील पुराकथा आहे तशी मान्य करण्याची खरंच काही गरज नाही. आपल्याला त्यावर विचार करून काही गोष्टी समजावून घेणं आवश्यक ठरतं. पुराकथेनुसार देव एकमेकांशी संवाद साधत होते, पण त्यांच्यात संवाद होत होता का? इथे देव म्हणजे गॉड या अर्थी देव घेण्याचीही आवश्यकता नाही. तत्कालीन देव म्हणून जे कोणी होते, त्यांच्या संवादाचं माध्यम असलेली जी भाषा होती, ती त्यांच्यात मूलभूत संवाद घडवण्यास अपर्याप्त होती अर्थात पुरेशी नव्हती. का? तर तिच्या अव्याकृतत्वामुळे दोन किंवा अधिक देव एकमेकांशी संवाद साधण्यात अयशस्वी व्हायचे. एखादा जे म्हणतोय तेच समोरचा समजून घेईल याची कोणतीही शाश्वती नसल्याने संवादच होऊ शकत नसायचा, असाच या ठिकाणी भाव दिसतो आहे. एखादी भाषा, तिचं मूळ कार्य करण्यात अपयशी ठरत असेल तर तिला मूळ भाषेचं स्थान देणं अगदी चुकीचं होईल असं मला वाटतं आणि म्हणूनच तिच्यापेक्षा इंद्राने व्याकृत बनवलेल्या आणि त्यामुळे 'संवादासाठी' पुरेशा बनलेल्या त्या वाणीला किंवा भाषेलाच मूळ भारतीय भाषेचा दर्जा देणं आवश्यक ठरतं. तेव्हा ही जी मूळ भाषा आहे तिला नाव कोणतं होतं तर त्याबद्दल कुठे काहीच माहिती मिळत नाही. म्हणून या ठिकाणी, मी असं नमूद करू इच्छितो की या मूळ भाषेलाच 'प्रकृति' या नावाने संबोधलं जावं.
या मूळ भाषेला 'प्रकृति' हे नामाभिधान मिळालं की बर्‍याच गोष्टींचा तिढा सुटण्यास मदत होते. ती कशी ते पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो.
प्राकृत आधी की संस्कृत आधी हा वाद हजारो वर्षांपासून भारतात लोकं घालत आलेली आहेत. आधी म्हण्टल्या प्रमाणे
"प्रकृति: संस्कृतम्। तत्र भवं ततः आगतं वा प्राकृतम्। (हेमचंद्र) अर्थात संस्कृत ही प्रकृति आणि तिच्यापासून उद्भवणारी ती प्राकृत आणि
"प्राकृतस्य तु सर्वमेव संस्कृतं योनि:। (प्राकृतसंजीवनी) अर्थात सर्व प्राकृत शब्दांचे संस्कृत (शब्द) मूळ आहेत, अशा प्रकारची वचनं दिसतात तेव्हाच -
नमिसाधु सारखे प्राकृत भाषेची तळी उचलणारे, "सकलजगजन्तुनां व्याकरणादिभि: अनाहितसंस्कारः सहजो वचन्व्यापारः प्रकृति:, तत्र भवं सैव वा प्राकृतम्।" असं म्हणतात. याचा अर्थ हा - सर्वसामान्यांच्या भाषेवर व्याकरणाचे संस्कार झालेले नसतात. ती व्यवहारात सहजगत्या प्रचलित झालेली बोली भाषा असते. नमिसाधु पुढे असंही म्हणतो की प्राकृत म्हणजे 'प्राक् कृतं' अर्थात आधी तयार केलेली भाषा. या भाषेवर व्याकरणाचे संस्कार होऊन संस्कृत तयार झाली. (पाणिन्यादिव्याकरणोदितशब्दलक्षणेन संस्करणात् संस्कृतमुच्यते।")
वाक्पतिराजदेखिल म्हणतो, प्राकृत ही सर्व भाषांची जननी. तिच्यापासूनच संस्कृतादि भाषा तयार झाल्या. प्राकृत अकृत्रिम आणि संस्कृत कृत्रिम.
सम्+कृ धातु = परिशुद्ध करणे (To refine) असाच अर्थ आहे.
या विवेचनावरून असं सांगतात की पाणिनी - पतंजलि या वैयकरणांनी मूळ प्राकृत भाषेला व्याकरणाच्या चौकटीमध्ये बसवून ग्रांथिक (अभिजात) केलं त्यामुळे ती शिष्ट लोकांची भाषा म्हणून मान्यता पावली. समाजातील शिक्षित वर्ग या भाषेत वाङ्मय-व्यवहार करू लागला.
या दोन्ही मतांचा उहापोह करता कोणत्याही एका मतावर ठाम राहणे कठीण होते मग हा तिढा सोडवावा कसा हा महत्त्वाचा प्रश्न पडतो आणि या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी मगाशी जो विचार मांडला त्याचा काही तरी उपयोग होईल अशी माझी धारणा आहे.

No comments:

Post a Comment