Friday 21 May 2021

सीतानवमीच्या निमित्ताने...

 आज सीतानवमी आहे. रामाची जन्मतिथी नवमी आहे म्हणून सीतेचीही जन्मतिथी नवमी असणार का? ठाऊक नाही पण रामासाठी सर्वाधिक पूरक व्यक्ती सीताच आहे. रामायणात जे राम भोगतो, तेच किंवा काकणभर अधिकच सीता भोगते. रामायण रामाचं पौरुष झळाळून सोडतं तर सीतेच्या स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतं. पण तिथेही ती स्वतःला त्रास भोगावा लागूनही रामाच्या कर्तृत्वात आपला आनंद शोधते. पतीवरच्या विश्वासावर ती वनवास पत्करते, त्याच विश्वासाचं लंकेतून सुटका झाल्यावर सार्थक झाल्याचं ती अनुभवते. रामाखेरीज कुणाचाही विचार न केलेली सीता खरं तर जेव्हा रामाकडून परित्याग केल्याचे कळताच क्षणी मृत्यूपंथालाच जायची पण अशा वेळीही उदरातील रामाचा अंश वाढवून त्यास जन्म देण्यासाठी जिवंत राहते. ती लव-कुशांना केवळ जन्मच देत नाही तर रघुकुलाला लायक अशा संस्कारांनी त्यांना वाढवते. दैववशात् अश्वमेध यज्ञासाठीही रामानं सपत्नीचा विचार केलेला नाही, हे जेव्हा ती जाणते, तेव्हा रामाच्या पत्नीनिष्ठेबद्दल तिची खात्री पटते. पुढे परिस्थिती तिला पुन्हा रामासंमुख उभी करते, तेव्हा मात्र ती लव-कुशांना होणा-या पित्याच्या प्राप्तीमध्ये सुखी होते. ज्या प्रजाजनांच्या मतामुळे रामाला सीतात्याग करावा लागतो, त्याच प्रजाजनांकडून जेव्हा तिला तिच्या चारित्र्याचं प्रमाणपत्रं मिळतं, तिथे ती स्वाभिमानी स्त्री रामासहित सर्व सुखाला त्यागून धरणीची कूस स्वीकारते. अशा रामाबरोबर आणि रामाप्रमाणे एकामागून एक त्याग आणि दुःखाच्या प्रसंगांना सामोरं जाणा-या पण तरीही अखेर स्वकर्तृत्वाने झळकून निघणा-या सीतेची जन्मतिथी नवमीच असावी, या लोकविश्वासावर मग आपलाही विश्वास बसू लागतो. 


जय हो सीता मैया की! 🙏🏼