Saturday, 29 October 2011

"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं. असं असूनही 'द जर्नी होम' या नावाचं एक इंग्लिश पुस्तक माझ्या हाती पडलं आणि माझ्या उपरोल्लेखित वैशिष्ठ्याला न जागता मी या पुस्तकाचा अगदी फडशा पाडला.

१९६९-७० साली 'काऊण्टर कल्चर' किंवा ज्याला 'हिप्पी' संकृती असंही म्हटलं जातं, जेव्हा ऐन भरात होतं, तेव्हा 'रिचर्ड स्लेवीन' नावाचा शिकागोला राहणारा, महाविद्यालयात शिकणारा १९ वर्षांचा मुलगा त्यात सामील होतो आणि पूर्ण सत्याच्या शोधात घराबाहेर पडतो, त्याची ही कहाणी आहे. सामान्य गो~या अमेरिकन मुलांपेक्षा वेगळा विचार करणारा रिचर्ड धार्मिक, श्रद्धाळू, पापभीरू तर आहेच पण त्याला संगीत आणि तत्त्वज्ञानाचीही आवड आहे. तो उत्तम 'हार्मोनिका' वादक आहे आणि स्वत: धर्माने ज्यू असूनही त्याची ख्रिस्तावर श्रद्धा आहे. पण तरीही त्याच्या मनात परमेश्वराच्या मूळ स्वरूपाविषयी काही शंका आहेत. तत्कालीन समजुतीनुसार तुमची उत्तरं तुम्हीच शोधायची या विचाराने महाविद्यालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तो तुटपुंजे पैसे गाठीला बांधून युरोपात आपल्या गॅरी नावाच्या बालमित्रासोबत सहलीला जातो. या सहली दरम्यान त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. हिप्पी कल्चरचा भाग झाल्याने प्रवासात त्याला समविचारी-समवयस्क मित्र भेटतात आणि त्यांच्याबरोबर रिचर्ड पुढे आपला प्रवास सुरू ठेवतो. पैशांच्या कमतरतेमुळे येणा~या-जाणा~या वाहनांकडे लिफ्ट मागून पुढल्या शहरात जायचे ही 'हिचहायकिंग' ची पद्धत संपूर्ण प्रवासात रिचर्ड वापरतो. अशा प्रकारे आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत इटाली, इंग्लंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रांस असे देश फिरून तिथल्या धर्म-पंथांचा अभ्यास करून ग्रीस मध्ये आल्यावर त्याच्या मनात आवाज उमटतो, "भारतात जा".
                                   
रिचर्ड स्लेवीन १९७० (पासपोर्टवरील फोटो) --->

आपल्या अंतर्मनाच्या हाकेला ओ देऊन हा अननुभवी १९ वर्षांचा नवयुवक हिचहायकिंग करत ग्रीसहून तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे अत्यंत हालअपेष्टा सोसून, संकटांचा सामना करत भारतात दाखल होतो. भारतातही तो सत्याच्या शोधात परीव्राजकाचं जीवन स्वीकारतो. हिमालयातल्या जंगलांमध्ये नैसर्गिक गुहांमध्ये निवास करून राहणार्‍या रिचर्डला तिथल्या नागाबाबांचा एक गट आपल्यातच सामील करून घेतो. त्यांचे मुख्य त्याला आपल्या पंथाची दीक्षा देऊ इच्छितात पण रिचर्डची स्वतःच्या मनाची खात्री झाल्याखेरिज कुठलाही अशा प्रकारचा समर्पणाचा निर्णय घेण्याची तयारी नसते. पुढे त्यांची साथ सोडून तो एकटाच आपला शोध जारी ठेवतो. दरम्यान त्याला त्याच्यासारखेच एकटे ध्यान करणारे एक साधुबाबा भेटतात आणि ते खर्‍या अर्थाने एका साधुची जीवनी त्याला शिकवतात. त्याच्या पाश्चात्य कपड्यांचा त्याग करवून पूर्ण भारतीय असा कौपिन, उत्तरीय आणि अधरीय असा पोषाख देतात. एकमेकांची भाषा अजिबात न येणारे हे दोघे अनेक दिवस एकत्र ध्यान-धारणा करतात. पुढे त्यांच्या सहवासात पूर्ण साधु बनलेला रिचर्ड आपल्या पुढच्या प्रवासासाठी त्यांचा निरोप घेतो आणि आपलं मार्गक्रमण सुरू ठेवतो. या प्रवासातही अनेक साधुसंतांची तो भेट घेतो, अनेक पंथोपपंथीय साधु त्याला दीक्षा देण्याची तयारी दर्शवतात पण अखेर त्याच्या विचारांचा, मतांचा आदरही करतात.

हिमालयात गंगेच्या किनार्‍यावर वास्तव्य करत असताना त्याच्या हृदयाकाशात मंत्रबोध होतो आणि मंत्राचा अर्थ अजिबात कळत नसतानाही त्याचा सतत जप सुरू होतो. हिवाळ्यात रिचर्ड भारतातील इतर तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो. तो अयोध्येतल्या रामभक्तीचा आस्वाद घेतो, काशी - प्रयागतीर्थाचं दर्शन करतो. तिथून परतीच्या प्रवासात दिल्लीला जाणार्‍या गाडीतून पाणी पिण्यासाठी खाली उतरलेल्या रिचर्डला पुन्हा गाडीत शिरायलाच मिळत नाही आणि त्या स्टेशनवरच राहतो. ते स्टेशन असतं मथुरा आणि तिथूनच त्याला त्याच्या पत्ता लागतो वृन्दावनाचा. वृन्दावनात पोहोचल्यावर त्याला त्याच्या आयुष्यभराच्या एकेका प्रश्नाचं उत्तर मिळून त्याच्यावर श्रीकृष्णाचं गारुड पडत जातं आणि श्रीकृष्ण-भक्तीची कवाडं त्याच्यासाठी उघडली जातात. याचाच एक भाग म्हणून पुढे मुंबई मुक्कामी क्रॉस मैदानातील एका कार्यक्रमात त्याची भेट 'आंतरराष्ट्रिय श्रीकृष्णभावनामृत संघा'च्या (इस्कॉन) संस्थापक आचार्यांशी, भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपादांशी होते. यांच्या साहित्याच्या वाचनानंतर, अभ्यासानंतर तो त्यांचं शिष्यत्व पत्करतो.

रिचर्ड स्लेवीनचे राधानाथ स्वामी बनण्याची कथा आहे "द जर्नी होम". परमेश्वराला जाणण्याची उत्कट इच्छा असणार्‍या तरुणाच्या भावनिक आणि अध्यात्मिक अनुभवांची शिदोरी हे पुस्तक आपल्यापाशी उघडतं आणि स्वत: राधानाथ स्वामींच्या निर्मळ कथनातून आपण त्यांचे सहप्रवासी बनून त्यांच्या या जाणीव - नेणीवांचाच एक भाग बनतो.

जरूर वाचा! 

राधानाथ स्वामी 

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

Thursday, 13 October 2011

कावळा, कडी आणि कॅमेरा

मुंबईसारख्या महानगरात राहिल्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणजे इथे मानव प्राण्याखेरिज इतर प्राणी आणि पक्षी सृष्टी अगदीच मर्यादित प्रमाणात बघायला मिळते. शेवटी खरी प्राणी-पक्षी सृष्टी सिमेंटच्या जंगलात थोडीच पहायला मिळणार आहे? पण असं असलं तरी थोडासाच का होईना, इथे आपल्याही भोवताली, छोट्यासा निसर्गाचा एखादा तुकडा उपलब्ध असतोच. गरज असते फक्त तो शोधण्याची. काही वेळेला असंही होतं, हा निसर्ग, त्याच्या एखाद्या घटकाच्या माध्यमातून अगदी आपल्या घरापर्यंत येऊन बसतो आणि एक प्रकारे आपल्याला त्याची दखल घ्यायला भाग पाडतो.
 
गेल्या रविवारी अशाच एका गोष्टीचा मी साक्षीदार झालो. 

आता असं आहे की मुंबईत आमचं घर अगदी मध्यवर्ती भागात आहे. जवळपासच्या इमारतींपेक्षा जराशी अधिक उंची आमच्या इमारतीची असल्याने आणि त्यातही वरच्या मजल्यावरचं घर असल्याने आमच्या गॅलरीमध्ये सकाळच्या वेळेला काही पक्षांचा राबता असतो. आता आमच्या इथे काही भारद्वाज, तांबट, पोपट आणि कोकिळ प्रकारचे सुंदर दिसणारे, सुंदर आवाजाचे पक्षी काही येत नाहीत. आमचं मैत्र आपलं कावळे-कबुतरं-चिमण्यांशीच आणि त्यातही कावळ्यांशी जास्तच. 

आमच्या आईची एक पद्धत आहे. सकाळी स्वयंपाक झाला की आधी त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर त्यातले पदार्थ आमच्या रोजच्या डब्यात पडता पडता एक पान गॅलरीत कावळ्यांसाठी ठेवलं जातं. आता हे बघायला आपण कशाला घरात थांबतोय? डबा भरलेला दिसला की आपल्याला ताबडतोब पळावं लागतं ना लोकल गाठायला. असो. पण गेले काही दिवस आई सांगत होती की कधी बाहेर पान ठेवायला उशीर झाला तर एक कावळा चक्क आईचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्या दाराची कडी ठोकतो. मी काही एकदम विश्वास ठेवला नाही कारण मला वाटलं की आईला काहीतरी भास होत असावा. 

मग गेल्या रविवारी अस्मादिक (दर रविवारप्रमाणे) घरात लोळत पडलो असताना (भल्या पहाटे) साडे नवाच्या सुमारास आमच्या मागच्या दाराची कडी वाजल्याचा आवाज आला. कोण आलंय हे बघण्यासाठी उठलो तर (खरंच) माझ्या आश्चर्याला पारच उरला नाही. एक कावळेबुवा आमच्या मागच्या दाराची कडी वाजवत होते आणि एक वेगळाच कण्ठरव करत होते. कावळ्याचा आवाज असा कधी ऐकू येईल यावर यापूर्वी माझा कधीच विश्वास बसला नसता पण मी स्वतःच्या कानानेच तो ऐकत होतो. थोड्या कबुतराच्या घुमण्यासारख्या वाटणार्‍या त्या आवाजात खूप अजिजी होती. आईने लगेच बोलून दाखवलं, "आता बसतोय ना विश्वास? भूक लागलीय तर कसा नरमाईने खायला मागतोय बघ! आवाजही ऐक! नाही तर तू, शिक जरा याच्याकडून!"
आता ऐकत थांबलो असतो तर आईचं उपदेशामृत थांबलंच नसतं म्हणून मग लगेच मोबाईलवर त्या कावळेबुवांचे फोटो घेऊ लागलो. एक दोन पोझेस दिल्यावर मी जरा जास्तच जवळून फोटो काढायला गेलो तर बुवा दाराच्या कडीवरून कठड्यावर जाऊन बसले आणि तिथूनच पुन्हा आईला त्यांच्या भोजनाची वेळ झाल्याची आठवण करू देऊ लागले. 

पुढल्या पाच मिनिटांत आईच्या हातचे भोजन जेवून कावळेबुवा आपल्या मार्गाने उडून गेले. 

मोबाईल कॅमेर्‍यातले फोटोही ठीकच आलेले तेव्हा म्हण्टलं भूकेच्या वेळेनुसार आमची कडी वाजवून भोजन मागवणारी आमच्या घराजवळची पक्षी-सृष्टी आपल्या मित्रांनाही दाखवावी म्हणून हा लेखन-प्रपंच!
Wednesday, 12 October 2011

विश्वासाचं सार्थक

मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही. केवळ एवढंच नाही तर आजकाल अनोळखी लोकांच्या सुखाचीही अ‍ॅलर्जी व्हायला लागलेली आहे.

आता इतरांच्या दु:खाबद्दल ठीक आहे पण सुखाच्या अ‍ॅलर्जीचं हे कशावरून म्हणू शकतोय मी? तर बघा, मी आत्ता इथे बोर्डिंग पास घेऊन विमानात बसण्यासाठी रांगेत उभा आहे. म्हणजे तसं हे माझ्यासाठी नवीन नाही. फिरतीचंच काम माझं! शिक्षकाचं! पूर्वीच्या काळी लोकं शिक्षण घेण्यासाठी गुरूकडे गुरूगृही यायचे. पण आता शिक्षणाची क्षितिजं विस्तारली तशी गुरूची विद्यालयंही. आमच्या कंपनीची ही ढीगानं औषधं! प्रत्येक औषध हे आमचं प्रॉडक्ट. त्याची माहिती, अपेक्षित काम करण्याची पद्धती, कुणाला द्यायचं आणि कुणाला देणं टाळायचं, कधी द्यायचं, कोणत्या वेळी, कशा बरोबर द्यायचं, किती द्यायचं हे सगळं आमच्या सेल्स आणि मार्केटिंगच्या लोकांना शिकवावं लागतं. माझ्याकडून शिकून ते मग त्यांच्या त्यांच्या विभागातल्या डॉक्टरांना शिकवतात आणि मग ते डॉक्टर आमच्या औषधांची ऑर्डर देतात. अशी एकूण आमची पद्धत. त्यात आमची ऑपरेशन्स दुनियाभरातल्या दहा-बारा देशात. मग सध्या या कामासाठी सगळीकडेच फिरावं लागतं. पूर्वीच्या खलाशांसारखं, आज या तर चार दिवसांनी त्या बंदरावर नव्हे पण शहरात. कधी कधी ही शहरं एकमेकांपासून आंतरराष्ट्रिय सीमांनीही वेगळी केलेली असतात. आता अजून तरी त्या खलाशांसारखी माझी, प्रत्येक बंदरात घरं झालेली नाहीत पण तरी.....

...बघा, इथे उपटतो माझ्यातला शिक्षक! सांगत काय होतो आणि मध्येच शिकवूच काय लागलो. तर आत्ताही अशी चार देशांतली 'शैक्षणिक' सहल पूर्ण करून माझ्या मायदेशी परततोय. चांगला नऊ तासांचा प्रवास आहे. नेहमीप्रमाणे पोहोचेपर्यंत उत्तररात्र उजाडणार आहे. विमानाच्या वेळेपूर्वी चार तास येऊन थांबलोय. सामान चेक इन करून, बोर्डिंग पास घेऊन विमानात जाऊन झोपण्यासाठी उत्सुक होऊन गेल्या बावीस दिवसांच्या फिरतीचा परीणाम असलेल्या आंबल्या शरीराने गेली वीस-पंचवीस मिनिटं उभा आहे पण रांग सोडण्याऐवजी बोर्डिंग क्रू त्या मुलीला एकटीलाच आत घेऊन गेले होते. आठ-नऊ वर्षाच्या या मुलीचा मला प्रचंड हेवा वाटत होता. मला आत जायला अजून दहा मिनिटं नक्कीच लागणार होती आणि अकराव्या मिनिटाला मी झोपणार होतो. पण ही पठ्ठी मात्र दहा मिनिटं आधीच आत जाऊन झोपू शकणार होती. दुसर्‍याच्या सुखाचा मत्सर वाटतो असं मगाशी जे म्हण्टलं ना ते यासाठी!

असो. असतं काही जणांचं नशीब चांगलं, त्याला काय करणार? असा समस्त पुरुषी जगतात मान्य झालेला विचार करून पुढल्या बाराव्या मिनिटाला मी माझ्या खुर्चीत स्थानापन्न झालो. आजुबाजुला प्रवासी त्यांच्या त्यांच्या जागी विराजमान होत होते. काही वेळातच आमच्या पायलट शिरीष सावरगांवकरने आमचं विमानात औपचारीक स्वागत करून नऊ तासांच्या प्रवासाची पुन्हा एकदा सूचना दिली. त्या परीस्थितीतही आपल्या विमानाचा सारथी मराठी आहे हे ऐकून जरा बरंच वाटलं. हवामानाची माहिती देवून त्यांनी चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. हवाई सुंदरींनी त्यांची नेहमीची प्रात्यक्षिकं करून दाखवताच 'खुर्सीकी पेटी' बांधायची आज्ञा झाली आणि विमानानं धावपट्टीकडे कूच केलं. एक वळसा घेऊन विमानानं धाव घेतली आणि अलगद हवेत झेप घेऊन थोड्या वेळातच ढगांच्या दुलईत विसावलं. म्हणजे मला आपलं तसं वाटलं, कारण विमान हवेत स्थिर होतंय तोच माझ्या नेहमीच्या सवयीनुसार मी निद्रादेवीच्या कुशीत विसावलो होतो.
अचानक कुणी धक्का दिल्यासारखं होऊन मला जाग आली. मला झोपून किती वेळ झालेला ते पहिल्यांदा कळलंच नाही. घड्याळ बघितलं तर चांगले चार तास उलटलेले! थोडासा चक्रावलोच मी, कारण हवाई सुंदरी(?)नेही मला गेल्या चार तासात उठवलं नव्हतं. ना बेवरेजेससाठी, ना नट्ससाठी, ना नाश्त्यासाठी! तसाही मी विमानात फारसा खात नाही, आपल्या आवडीचं ते काही देतंच नाहीत आणि जे देतात ते आपल्याला आवडत नाही. त्यातही मी यावेळी आपल्या मायदेशाच्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होतो. या आमच्या देश-भगिनींकडून आगत-स्वागत करून घेण्याचा चांगला पूर्वानुभव असल्याने त्यात काही विशेष वाटलं नाही उलट माझी झोपमोड न करणार्‍या तिला मी धन्यवादच दिले.

माझ्या डोक्याच्यावर दिव्याजवळची कळ दाबून मी माझ्यासाठीच्या हवाई-सुंदरीला हाळी दिली. ती आल्यावर मी तिच्याकडे फळांच्या रसाची मागणी केली. पण काही काळासाठी ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आणि पाण्याची छोटी बाटली मला आणून दिली. इतक्यात उद्घोषणा झाली, "मी आपल्या विमानाचा पायलट शिरीष बोलतोय. अपरिहार्य कारणांमुळे काही काळासाठी कोणतीही ड्रिंक्स सर्व्ह होणार नाहीत. प्रवाशांनी कृपया सहकार्य करावं."

बाकी कोणत्याही ड्रिंक्ससाठी मी कधीच आसुसलेला नसतो आणि सुंदरीने पाणी दिलेलंच असल्याने मला फारशी अडचणच आली नाही. साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरून शिरीषचा आवाज ऐकू आला, "माझ्या सहप्रवाशांनो, मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आपल्या विमानाच्या मार्गामध्ये इथपासून सुमारे दहा मिनिटांच्या अंतरावर वादळी वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. हे असं वातावरण किती काळ असेल याची निश्चित कल्पना येत नाही पण या मार्गातून प्रवास करत असताना आपल्या विमानाला छोटे-मोठे धक्के बसण्याचा संभव आहे. कदाचित विमानातील हवेच्या दबावावरही परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व काही सुरळीत होईस्तोवर आपापल्या जागेवरच पट्टे बांधून बसावं. यामुळेच पुढला काही काळ जेवण सर्व्ह केलं जाणार नाही. कृपया सहकार्य करा."

त्याबरोबरच विमानातले दिवे थोडे मंद करण्यात आले आणि सुंदर्‍यांनीही आपापल्या जागा पकडल्या. साधारण दहा मिनिटांतच वातावरण बदलून गेलं. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आणि विमानाच्या खिडक्यांमधूनही विजांचा लखलखाट दिसू लागला. विजेच्या कडकडाटात विमानाचा आवाजही ऐकू येईनासा झाला. बाहेर फारच जोराने वारे वाहत असावेत कारण आमचं विमान जोराने हेलखावे खाऊ लागलं. क्षणात वर, क्षणात खाली, कधी डावीकडे तर अचानक उजवीकडे कलंडायला लागलं. सुरूवातीला पायलटचं बोलणं कुणीच मनावर घेतल्यासारखं वाटत नव्हतं पण खिडकीतून दिसणारं निसर्गाचं रौद्र रूप बघून प्रवाशांना परीस्थितीची जाणीव झाली आणि विमानात एक भीतीची लहर सरसरत गेली. एका जोरदार धडाक्यासहित आमचं विमान वेगाने खाली जाऊ लागलं आणि आतला हवेचा दाब झपाट्याने कमी होऊन अलार्म वाजू लागला. त्यासरशी डोक्यावरून प्राणवायूचे मास्क खाली आले. आता विमानातली परीस्थिती अगदी बदलली. लोकांनी भीतीच्या अमलाखाली रडारड करायला सुरूवात केली. काही जण तर अगदी शॉक बसल्यासारखे झाले. विमानात अगदी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खरंतर इतका विमानप्रवास करणारा मी ही चांगलाच हादरलेलो, थरथरायलाच लागलेलो. केवळ कठीण परीस्थितीत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे यंत्रवत मी ऑक्सिजन मास्क चढवला आणि शरीरातला तणाव कमी करण्यासाठी मोठे मोठे श्वास घेऊ लागलो. लोकं ओरडत होती, रडत होती, आपापल्या सुहृदांची नावं घेत होती, त्यांची आठवण काढत होती. जे आपल्या सुहृदांबरोबर होते, ते एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेला समोर मृत्यु उभा असल्याच्या भावनेने रडत होते. काही जण हात वर करून देवाची प्रार्थना करत होते तर काही जण या परीस्थितीतून सुटका होण्यासाठी नवसही करत होते. हे सर्व होत असताना विमान हवेत भेलकांडतच होतं. वादळी वारे त्याला खेळणं असल्यागत वर-खाली उडवत होते. सगळीकडे हाहाक्कार उडालेला. काही हवाई सुंदर्‍या त्यातही लोकांना मास्क चढवून देण्यात मदत करत होत्या. आपापल्या परीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या पण विमान इतकं भेलकांडत होतं की सर्वांना याचा परिणाम काय होऊ शकतो याची जाणीव झालेली आणि त्यामुळे सर्वजण अगदी आतंकित झालेले होते.

हे सर्व बघत असताना माझं लक्ष अचानक मला समांतर असलेल्या पलिकडच्या रांगेतल्या खिडकीजवळच्या खुर्चीकडे गेलं. तिथे एक छोटीशी मुलगी शांत बसलेली दिसली. तिने मास्क चढवलेला, अंगात लाईफ-जॅकेटही चढवलेलं, भोवती विमानातल्या थंडीपासून बचावासाठी देतात ती चादर घेतलेली पण ती अगदी आरामात खुरमांडी घालून बसलेली. तिच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्या बिकट परीस्थितीतही ती ते पुस्तक वाचत होती. आजूबाजूला काय चाललंय आणि विमान कुठल्या अवस्थेतून जातंय याची तिला जाणीवच नव्हती असं नाही कारण त्याशिवाय ती जॅकेट आणि मास्क घालते ना! मधूनच ती पुस्तकातून डोकं वर करून विमानातल्या परीस्थितीचा अंदाज घेई आणि पुन्हा वाचनात दंग होई. तिने पुस्तकातून डोकं वर काढताच मी तिला ओळखलं. बोर्डिंग पास घेऊन विमानात शिरण्याच्या रांगेत सर्वांच्या आधी आत सोडलेली तीच ही चिमुरडी होती. तिला तसं शांत बघून मलाच खूप धीर आला आणि मीही हळू हळू शांत होऊ लागलो. जेव्हा जेव्हा विमानातली परीस्थिती अजूनच बिघडल्यासारखी व्हायला लागली तेव्हा तेव्हा मी तिच्याकडे बघून स्वतःवर नियंत्रण मिळवू लागलो. जणू तिच्या तशा स्थितीतल्याही धीर-गंभीर आचरणाने ती मला सावरण्यासाठी शक्ती देत होती.

वादळाचं तांडव सुमारे तासभर चाललं आणि यातल्या बहुतांशी वेळात तिच्यामुळेच मी स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकलो. सगळं शांत झाल्यावरही खूप वेळ कुणालाच काही सुधरत नव्हतं. पायलट शिरीषच्या धो़का टळल्याच्या घोषणेनंतरही तो टळल्याची जाणीव भीतीग्रस्त मनांना व्हायला वेळ लागत होता. काही वेळातच हवाई-सुंदरी आपापल्या कामाला लागल्या आणि खान-पान देऊ लागल्या पण कुणालाही त्यात स्वारस्य नव्हतं. शॉक मधून बाहेर पडायला प्रवाशांना खूपच वेळ लागत होता आणि ते सहाजिकच होतं, आपल्या भीतीचा सामना करत असताना त्यांना माझ्याप्रमाणे शांत शक्तीचा स्रोत गवसला नव्हता.

पुढच्या तीन-साडेतीन तासांत आमचं विमान मुंबईच्या आकाशावर घिरट्या घालत होतं आणि थोड्याच वेळात धावपट्टीवर उतरलं. पायलट शिरीषने उद्घोषकावर आम्हाला शुभेच्छा देऊन प्रवासातील अडचणींबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण हे ऐकायला कुणीच जागेवर बसून राहिलं नाही. विमान उतरताच प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेतली, जणू ते लवकर उतरले नाहीत तर पुन्हा वादळाचा धोका होता. इतर सर्व प्रवासी उतरेपर्यंत मी मागेच थांबलो. इतक्यात मला माझी शक्तीदायिनी तिच्या खुर्चीवर आधीच्याच शांतपणे बसलेली दिसली. मी तिच्या जवळ जाऊन तिला म्हणालो, "बाळ, काय नाव तुझं? कुठे फिरायला गेलेलीस का? घर कुठे आहे तुझं?"

तशी बरीच धीट होती ती! माझ्यासारखा अनोळखी समोर असतानाही हसून मला म्हणाली, "मी शर्वरी. माझं घर मुंबईतच आहे. शाळेच्या सुट्या आहेत ना म्हणून जरा बाबांबरोबर तिथे फिरायला गेलेले."

मला तिचं इतकं कौतुक वाटत होतं की मी तिला पुन्हा विचारलं, "अगं मग अशी इथे एकटी प्रवास करताना आणि मगाशी विमान वादळात गेलं असताना इतकी शांत कशी राहिलीस? मला स्वतःला इतकी भीती वाटत होती पण तू तर अगदी आरामात होतीस. हे कसं काय?"

यावर ती गोड शर्वरी उत्तरली, "अहो, मला कशाला भीती वाटेल? कारण मी एकटी थोडीच प्रवास करतेय? माझ्याबरोबर बाबा आहेत. माझे बाबा खूप स्ट्राँग आहेत, मग मी पण स्ट्राँगच असणार ना! या विमानाचे पायलट शिरीषच तर माझे बाबा आहेत आणि त्यांनी आईला सांगितलंय की काळजी करू नको, आपल्या शरूला मी नीट घरी घेऊन येईन. मला माहित होतं की माझे बाबा मला नक्की घरी नेणार आहेत."

तिने हे बोलल्या क्षणी मला तिच्या शांतपणाचं रहस्य समजलं. आपल्या माणसावरचा विश्वासच आपल्याला बिकट प्रसंगात धीर देण्यास आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रेरित करण्यास समर्थ असतो.
======================================================================
डिस्क्लेमर - ढकलपत्रातून आलेल्या कथाबीजावर आधारीत.

Monday, 10 October 2011

नियतीचा खेळ

यापूर्वी इथे प्रकाशित झालेली कथा, 'करतं कोण आणि भोगतं कोण?' लिहून झाल्यावर मनात एक विचार आला. आपण काही वेळा वस्तुस्थितीला फारच गृहीत धरतो. अनेक वेळा गोष्ट जशी आहे तशीच आपल्याला दिसते असं नसतं. मग तीच कथा वेगळ्या वस्तुस्थितीमध्ये कशी घडेल, या अनुषंगाने ही पुढची कथा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

"डॉक्टर, नेमकं काय झालंय हो? मला तर काहीच सुचत नाही आहे. पंधरा दिवसांपूर्वीच्या रविवारपर्यंतपर्यंत हे असं काहीच नव्हतं हो! त्यादिवशी रात्रीच तर आम्ही ट्रेकिंगहून परतलो. गेल्या तीन वर्षांत या माणसाला कधी गप्प म्हणून बसलेलं पाहिलेलं नाही. अगदी उत्साहाचा धबधबाच जणू. सतत काही ना काही सुरूच असायचं. मित्रांच्या गराड्यात तर नेहमीच. येवढं करून एक पैशाचं व्यसन नाही. दारू नाही, विडीकाडी नाही, अगदी सुपारीच्या खांडाचंही नाही. कुठल्या कुठल्याशा गोष्टीत भयानक रस घेऊन अगदी जीव तोडून ती गोष्ट समजून घेणार, आत्मसात करणार असा स्वभाव. दर आठ-पंधरा दिवसांनी कुठे ट्रेकिंग, कुठे रॅपलिंग तर कुठे जंगल दर्शनाचा कार्यक्रम करायचाच करायचा आणि आता हे असं. कशातच लक्ष नाही. माझ्याशीही धड बोलणं नाही, रात्र रात्र झोपणं नाही, पाच - दहा मिनिटं डोळे मिटलेत असं वाटतंय तोच दचकून उठून एकटक शून्यात नजर लावून बघत बसतो. मला तर आता फारच काळजी वाटायला लागलीय. तसं अजून कुणाला कळवलेलंही नाही. आणि आता माझ्याही अशा परिस्थितीमुळे मला फारच भीती वाटायला लागलीय. आईसुद्धा घरी बोलावतेय पण याला अशा स्थितीत सोडून कशी जाऊ मी?"

"कुमारला शारीरिक दृष्ट्या काहीच अडचण नाहीये पण त्याला कसला तरी धक्का बसलाय असं वाटतंय. दुखणं मानसिक आहे. त्याच्या मनावर कसलं तरी प्रचंड दडपण असल्याचं वाटतंय. मी पुन्हा काही नवीन औषधं देतो. आपण बघू याचा काय परिणाम होतो आणि दोन दिवसांनी ठरवू पुढे चिकित्सेची काय दिशा ठरवायची ते."

करुणा, माझी बायको, आमच्या डॉक्टरांशी बोलत होती. तिची अवस्था मला समजत होतीही आणि नाहीही. गेले दहा-बारा दिवस डॉक्टर कुठलं ना कुठलं औषध देत आहेत पण उपयोग शून्य आहे. कुठेतरी धक्का बसलाय हेच खरं होतं पण तो सहन करायचं सामर्थ्य मात्र मी गमावून बसलो होतो. माझ्या चित्तवृत्ती बधीर झालेल्या, डोकं सुन्न झालं होतं आणि आजुबाजुचे आवाजही पार दूरून आल्यासारखं वाटत होतं. कोणत्याही क्रियांना प्रतिक्रिया देण्याचंच मी विसरून गेलो होतो, किंबहुना कोणतीही प्रतिक्रिया देण्याला माझं मन धजावतच नव्हतं. मला ओरडावसं वाटत होतं, रडावसं वाटत होतं, कुणालातरी माझ्या हृदयावरच्या दडपणाबद्दल सांगावसं वाटत होतं, करुणाला तर खासच. तिच्याशिवाय आहे तरी कोण मला माझं मन मोकळं करण्यासाठी? पण माझ्या या मनाने जणु माझं काही ऐकायचच नाही असंच ठरवलेलं. गेल्या पंधरा दिवसात काय काय घडलं हे मला अजिबात आठवत नाहीये पण तो शनिवारचा ट्रेक मात्र मला स्पष्ट आठवत होता.
आमचं शहर तसं छोटसंच. अजूनही थोडं शहराबाहेर पडलं की शेतं सुरू होतात. ना कुठे फार गर्दी ना कुठे घाई. आमच्या कंपनीनं अशा छोट्या शहरात ऑफिस केलं ते स्वस्तात जागा मिळत होती म्हणून. तसं इथे यायला लोकं नाखूषच होती पण मी मात्र आनंदाने इथे आलो. एक तर नुकतंच करुणाशी माझं लग्न झालेलं. नवलाईनं नव्या संसाराची उभारणी आम्हा दोघांनाही करायची होती. ती अशा नव्या शहरात करण्याची कल्पना आम्हाला दोघांनाही आवडली आणि आम्ही इथे आलो. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे इथपासून ८०-८५ किलोमीटरवर असलेलं हिल-स्टेशन आणि त्याच्या भोवतीचं जंगल. दर आठ-पंधरा दिवसांनी आमची तिथेच चक्कर व्हायची. आम्ही म्हणजे मी आणि माझे कंपनीतले सहकारी मित्र. सुरूवातीला बाकीचे सगळेच सडे होते पण हळू हळू त्यांची लग्नं होऊन आमचा एक छानसा ग्रूपच झालेला. आम्ही तर पहिल्यापासून एकत्र होतो पण आता आमच्या बायकाही एकमेकींच्या मैत्रिणी झालेल्या. एक छानसं कुटुंबच तयार झालेलं आमचं. त्यातच गेल्या महिन्यात करुणाच्या गुडन्यूजची मोठ्ठी पार्टीही झालेली.

चार महिने पूर्ण झाल्याशिवाय डॉक्टरनेही कुठे सांगायला मनाई केलेली. ते पूर्ण झाल्यावर रक्त, सोनोग्राफी वगैरे चाचण्या समाधानकारक आल्यावरच आम्ही आमचं गुपित सर्वांना सांगितलेलं आणि त्याचीच पार्टी माझ्या मित्रांनी आयोजित केलेली. आमच्या ग्रूपमध्ये आमचं बाळ हे पहिलंच असणार होतं. त्या पार्टीतच तर शनिवारचा ट्रेक ठरला. खरं तर आम्ही मित्रंच जाणार होतो पण मग अर्चनाने, अरुणच्या बायकोने म्हण्टलं की करुणाला नंतर काही कुठे जाता येणार नाही तर आपण सगळेच जाऊ. तुम्ही एक गाडी घेऊन पुढे जा आणि आम्ही बाकीच्या तीन गाड्या घेऊन मागावून रविवारी येऊन थांबू. संध्याकाळी आपापल्या गाड्या घेऊन बॅक होम. प्लान वाईट नव्हता. अरुण-अर्चनाची गाडी आरामदायक आणि अर्चनाचं ड्रायविंग स्मूथ असल्याने मलाही करुणाची काळजी नव्हती आणि येताना आम्ही बरोबरच येणार होतो.

शनिवारी पहाटेच आम्ही माझी गाडी घेऊन निघालो. एरवी सुनसान रस्त्यावरून जातानाही मी फार वेगाने गाडी चालवत नसे. माझं ड्रायविंगही तसं सेफच समजलं जात असे, सेफ कसलं अरुण तर मला कासवच म्हणायचा. तरी त्या शनिवारी, सकाळच्या वार्‍याने मला अगदी ताजंतवानं वाटत असल्याने मीही एक्सिलेटरवर जरा जोरातच पाय दाबलेला. हा हा म्हणता आम्ही शहराच्या वेशीपर्यंत आलो. आमच्या या छोट्याशा शहराच्या सीमेवर असलेल्या वस्तीपर्यंत गेलो तर नुकतंच झुंजुमुंजु झालेलं. वस्तीमध्ये हळू हळू जाग येताना दिसू लागलेली. सुट्टी आम्हाला होती पण त्या वस्तीतील कित्येक जणं सुट्टीच्या नावानेही घाबरून थरथरंत असतील. कारण तिथे एक सुट्टी म्हणजे एक खाडा आणि एक खाडा म्हणजे एक दिवसाचा पगार नाही. त्यांना रोजच्याप्रमाणे उठून रोजगारासाठी बाहेर पडणं आवश्यकच होतं. संपूर्ण वस्ती पार होईपर्यंत माझे विचार चालूच होते. इतकी गच्च वस्ती असूनही रस्ता खूपच मोकळा होता, एरवी तिथे कुणी रस्त्यावर येत नाही आणि त्या दिवशीही कुणीच रस्त्यावर नव्हतं. मला लगेच आमच्या महानगराची आठवण झाली. तिथे अशा वस्तींमध्ये जवळ जवळ सगळा संसार झोपडीबाहेरच वाढतो. इथे सहसा तसं दिसत नसल्याने मीही निश्चिंत होतो. माझ्या नेहमीच्या वेगाने सुमारे २ तासातंच आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो.

हिल स्टेशनवरच्या होटेलमध्ये सामन ठेऊन गाडी घेऊनच आमच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजे जोगताई देवीच्या हेमाडपंती देवळाजवळ पोहोचलो. गाडी तिथेच लाऊन आम्ही पाचही मित्र देवळामागच्या देवराईत घुसलो. देवराईतून पुढे बारमाही कातकडी धबधब्यातून गेलो. मनसोक्त भिजून वर एको पॉईण्टवर चढून तिथे पोटपाणी केलं. एको पॉईण्ट वरून सनसेट पॉईण्टला डोंगरांच्या माथ्या-माथ्यावरूनच पोहोचलो. तिथेच थोडावेळ फिरून झाल्यावर सूर्यास्त बघितला आणि घाईने डाव्या अंगाने पुन्हा देवराईत उतरून जोगताईच्या देवळात येईतो साडेसात झालेले. दमायला तर झालं होतं पण पोटात कावळेही कोकलंत होते. तेव्हा सगळ्यांना तसंच गाडीत ढकलून हॉटेलवर आलो आणि फ्रेश होऊन तिथल्या जेवणावर ताव मारला.

जेवणं झाल्यावर मी हॉटेलच्या छज्ज्यावर बसून रात्रीचं जंगल बघत होतो तर साईने रम प्यायचा बूट काढला. त्याला अरुण आणि नितीनने ताबडतोब अनुमोदन दिलं. माझी नापसंती फाट्यावर मारून हे तिघे साईच्या मामाने त्याला पाठवलेल्या कडक रमचा फडशा पाडायला बाहेर पडले. साईने त्याचा स्टॉक आधीच गाडीत ठेवला असल्याने माझ्याकडून चावी घेऊन हे वीर गेले. मी नेहमी प्रमाणे झोपलो तर पार उत्तररात्री हे तिघे परतल्याचं मला समजलं. त्यांची विमानं पार चंद्रावर पोहोचलेली कारण मर्चण्ट नेव्हीतली रम सॉलिड स्ट्राँग असते असं रात्रीच साईने नितीनला सांगितल्याचं ऐकलेलं. त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या कडक वासाने माझी झोप जी उडवली ती मी उरलेला वेळ बालकनीतल्या वार्‍यात बसल्यानेच थोडीफार परत मिळाली.
दुसर्‍या दिवशी मी लवकरच तयार झालो पण बाकी तिघे काही उठण्याच्या मूड मध्ये नव्हते. त्यांना तसं सोडून मी थोडा वेळ बाहेर फिरून आलो आणि लॉबीमध्येच बसलेलो की करुणा, अर्चना, लक्ष्मी आणि नीला आल्याच. लक्ष्मी साईची तर नीला नितीनची बायको. आल्या आल्या करुणा माझ्याजवळ बसली आणि बाकी तिघी आपापल्या नवर्‍यांना जागं करायला गेल्या त्या उगवल्या चांगल्या तासा-दिड तासाने. तोपर्यंत माझी नि करुणाची कॉफीची एक राऊण्ड झालीही होती. आल्या आल्या अरुण, साई आणि नितीनसाठी कडक काळ्या कॉफीची फर्मानं गेली कारण तसाही त्यांचा हँग-ओव्हर उतरायला त्याची फारच गरज होती. त्यांच्याबरोबरच आम्ही ब्रंच घेऊन फिरायला बाहेर पडलो. करुणाला जास्त फिरणं कठीण असल्याने जवळपासच थोडा फेरफटका मारून आम्ही रूमवर परतायचं ठरवलं. बाकी तिघांना मात्र आपापल्या बायकांच्या आज्ञेने मोठा पिट्टा पडला. परतताना मर्केटमधल्या एकमेव थिएटर मध्ये अमिताभचा शराबी लागलेला पाहिला आणि मी करुणाला म्हणालो, "आज हा पिक्चर बघूनच जाऊ, काय म्हणतेस?" अमिताभ तिचा आवडता नट, त्यामुळे ती नाही म्हणणं शक्यच नव्हतं. सहाच्या खेळाची तिकिटं मिळाली. विचार केला ९ वाजता पिक्चर संपला की लगेच निघू की २ तासांत परत घरी पोहोचू. आमच्याखेरीज कुणालाच त्या पिक्चरसाठी थांबायचा मूड नव्हता मग हॉटेलमधून चेक आऊट करून बाकी मंडळी साडेपाचलाच परतली आणि मी नि करुणा सिनेमा बघायला गेलो.

सिनेमा संपताच आम्ही गाडीकडे गेलो. गाडी उघडली मात्र आणि घात झाला. बहुतेक रात्रीची पार्टी त्या तिघांनीही गाडीत बसूनच साजरी केली होती याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. दिवसभर गाडी बंदच राहिल्यामुळे सगळीकडेच तो रमचा कडक वास भरून राहिलेला. गाडीच्या सर्व खिडक्या मी उघडून दिल्या तरी वास काही कमी झाला नाही. करुणाला तर उमासेच यायला लागले. गाडी मधलं एअर फ्रेशनरही कुचकामी झालं. रात्री नऊ नंतर नवीन एअरफ्रेशनर तरी मला कुठे मिळणार होतं? मार्केट तासाभरापूर्वीच बंद झालेलं. काय करावं सुचतंच नव्हतं मला! शेवटी दहाच्या सुमारास करुणा गाडीमध्ये बसू शकली आणि मी घराच्या दिशेने गाडी भरधाव सोडली. एव्हाना साडे दहा वाजून गेल्यामुळे रस्त्यावर वाहतुक नव्हती आणि खिडक्या उघडून ठेवलेल्या असल्याने वेगामुळे गाडीतला वास जाण्यासही हातभार लागत होता. उमाशांनी बेजार झालेली करुणा माझ्याशेजारी डोळे मिटून पडलेली. थोडाजरी रमचा वास आला तर तिचे उमासे पुन्हा ट्रिगर-ऑन होतील की काय अशी शंका मला वाटत होती. जितक्या लवकर घरी पोहोचता येईल तितक्या लवकर मला पोहोचायचं होतं. पहिल्या चार महिन्यांतही करुणाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास झाला नव्हता आणि ती चांगली गोष्ट होती. करुणाही मूळची नाजुक प्रकृतीची असल्याने डॉक्टरांनी तिला कोणते त्रास होणं टाळावं याची उत्तम माहिती आम्हाला दिलेली. पहिल्या महिन्यापासून तिचा रक्तदाब वर-खाली होत असल्यामुळे आणि तिचं हृदयही जरा कमजोर असल्यामुळेच त्यांनी पाचव्या महिन्यातच ही माहिती लोकांना सांगावी, तो पर्यंत नाही असा सल्ला दिलेला. मला आपलं उगाचंच वाटायला लागलेलं की या उमाशांनी तिला त्रास तर होणार नाही ना, आमच्या बाळाला तर त्रास होणार नाही ना? याच धुंदीत मी गाडी चालवत होतो. आमचं शहर जवळ येत होतं. थोड्या वेळातच आम्ही शहरात प्रवेश करणार होतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात घरी. माझ्या एक्सिलेटरवरच्या पायातला जोर आणखी वाढला. एव्हाना एक वाजत आलेला. तीस-पस्तीस फुटांवर एक मिणमिणता दिवा असणारा तो रस्ता सुनसानच होता. आता थोड्याच वेळात शहराची वेस येणार होती. तिथली ती वस्ती पार केली की झालं, आलंच मग घर, माझे विचार चालूच होते. इतक्यात मला पुन्हा रमचा थोडा वास आला. करुणाही डोळे मिटल्या अवस्थेत चुळबुळ करायला लागली. माझी नजर इकडे तिकडे शोधू लागली आणि अचानक माझ्या आणि तिच्या सीटच्या मध्ये गाडीच्या तळाशी मला एक रमची बाटली दिसली. मी पटकन खाली वाकलो ती उचलायला. त्याचवेळेला माझ्या पायाचं एक्सिलेटरवरचं प्रेशरही वाढलं. रस्त्यावरचं लक्ष उडून बाटली काढण्याकडे केन्द्रित झाल्याने गाडी हेलकावे खाऊ लागली, रस्ता सोडून जाऊ लागली. सुनसान रस्ता असणार या विचाराने मी ही निश्चिन्त होतो. मी खाली झुकून बाटली उचलली आणि प्रतिक्षिप्त क्रियेने उजव्या हाताने बाहेरच फेकून दिली. डाव्या हाताने बाटली उचलून उजव्या हाताने बाहेर फेकण्याइतक्या छोट्या काळासाठी माझ्या हातात गाडीचे काहीच कंट्रोल नव्हते. रस्ता सोडून सरकणार्‍या गाडीला सांभाळण्यासाठी मी समोर पाहिलं तर गाडीच्या हेड लाईट्स मध्ये अगदी वीस-बावीस हातांच्या अंतरावर मला एक बाई चालत येत असल्याचं दिसलं. तिला मी आधी पाहिलंच नव्हतं आणि तिचंही लक्षच नव्हतं बहुतेक गाडीकडे, तिच्या हातात काहीतरी गाठोडं असल्यासारखं वाटतंय तोच तिच्या अंगावर जाणार्‍या गाडीची दिशा मी जोराने बदलण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या गाडीचा वेग इतका होता की मी ब्रेक्सवर जोराने पाय मारला पण माझ्या या प्रयत्नांमुळे गाडी गर्कन् फिरली आणि डाव्या बाजुच्या मागच्या दरवाज्याच्या भागाचा ओझरता धक्का त्या बाईला बसला. तिच्या हातातलं गाठोडं निसटलं आणि माझ्या गाडी मागच्या बाजूला उडाल्यासारखं वाटलं. गाडीला बसलेल्या हिसक्यांमुळे आणि ब्रेकच्या आवाजामुळे करुणा एकदम जागी झाली. तिने बघितलं की मी प्रयत्नाने गाडी सरळ ठेवतोय पण गाडीने कशाला तरी धक्का दिलाय. माझा वेग त्या स्थितीतही फार कमी झाला नव्हता. मी थांबायचा विचार करत होतो तितक्यात धडक बसलेली बाई उठलेली मला रिअर ग्लासमध्ये दिसली. तिने गाठोडं उचलून घेतलेलंही मी पाहिलं. करुणाही वळून बघत म्हणाली की तिला फार जोराने लागल्यासारखं दिसत नाहीये. मग मीही थांबण्याचा विचार बदलला आणि पुढे निघून आलो. शहरातही रात्रीची वेळ असल्याने रहदारी नव्हतीच त्यामुळे पुढच्या पंधरा-वीस मिनिटांत घरी पोहोचलो. गाडी घराशेजारच्या आड-रस्त्यावरच पार्क करून ठेवली. येवढं सगळं होऊनही सव्वा वाजेपर्यंत घरी पोहोचल्याने आणि करुणाही आता नॉर्मल झाल्याने माझाही जीव भांड्यात पडला.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मी पहाटे जॉगिंगसाठी उठून जाऊ शकलो नाही. झोपायलाच इतका उशीर झालेला की लवकर उठणंच शक्य झालं नाही. एरवी ६ वाजता जॉगिंगला जाणारा मी आज आठ वाजता निघालो. तासाभराच्या जॉगिंग नंतर नेहमीच्या वर्तमानपत्राच्या टपरीवर एक्स्प्रेस आणि ईटी घेऊन निघतंच होतो की सकाळी नऊलाच येणार्‍या एका दुपारच्या दैनिकातील छोट्याशा बातमीकडे माझं लक्ष गेलं. शहराबाहेरच्या वस्तीमधल्या हमरस्त्यावर झालेल्या अपघाताची ती बातमी होती. त्यात एका तान्ह्या बालकाचा मृत्यु झाल्याचं म्हण्टलेलं.

माझ्या डोळ्यासमोरून झर्कन् आदल्या दिवशीचा प्रसंग सरकला. माझ्या पाठीतून एक शिरशिरी गेली. हाता-पायांना कापरं भरल्यासारखं वाटायला लागलं. मी त्याच अवस्थेत तिथून निघून घराकडे येऊ लागलो. माझी पावलं कशी पडत होती ते माझं मलाच कळत नव्हतं. कसा बसा चालत घराजवळ पोहोचलो तर माझं आधी लक्ष गाडीकडे गेलं. मी गाडीच्या मागच्या डाव्याबाजूला बघू लागलो. आदल्या दिवशी रात्रीच्या अंधारात मला काहीही दिसणं अशक्यच होतं. तेव्हा जे दिसत नव्हतं ते मला दिसलं. डाव्या बाजूला मागच्या दरवाज्यावर पत्र्यावर एक छोटासा पोचा आलेला. जरा मागच्या दिशेने गेलो तर टेल-लाईटच्या जवळही एक पोचा होता पण त्याबरोबरच तिथे खाली मागच्या गार्डमध्ये काहीतरी अडकलेलं दिसलं. ते काय आहे ते बघायला मी वाकलो मात्र तर माझ्या पायाखालची जमीनच निसटली. तो एका लहान बाळाच्या झबल्याचा तुकडा होता. काल काय घडलेलं त्याची तेव्हा मला नेमकी कल्पना आली. माझ्या सर्वांगाला घाम आला. डोक्यात घणांचे घाव बसू लागले. घशाला कोरड पडली, डोळ्यासमोर अंधारी येऊन चक्कर येतेय की काय असं वाटू लागलं. मला तिथे उभा बघून करुणाने हाक मारली. मी तिच्याकडे पाहिलं तिच्या दिशेने जाण्यास सुरूवात केली. ती हसून काहीतरी बोलत होती पण मला ते काहीच समजत नव्हतं.

मी स्वतःवर ताबा ठेऊ शकलो नाही आणि तेव्हापासूनच कुठेतरी काहीतरी प्रचंड बिघडून गेलं. माझ्या संवेदनाच थिजून गेल्या. माझी झोप उडून गेली. सतत डोळ्यासमोर त्या रात्रीचा प्रसंगच येऊ लागला. जे घडलं त्यात कुणा कुणाला दोष द्यायचा याचा विचार करून करून माझ्या डोक्याचा भुगा होत होता. मला येवढंच कळत होतं की जी नियती करुणाच्या उदरात माझं बाळ वाढवत होती त्याच नियतीने माझ्याच हातून एका बाळाची जीवनयात्रा संपवलेली.

Sunday, 9 October 2011

फ्रॅगल्सची दुनिया - फ्रॅगल रॉक

माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकात कधीतरी टीव्हीवर मला एका नव्या दुनियेचा शोध लागला. टीव्हीतल्या डॉक नावाच्या एका सुतार काकांच्या घरात असलेल्या एका बिळात एक अनोखी दुनिया वसल्याचं मला समजलं जिचं नाव होतं "Fraggle Rock". तिथे राहत होते फ्रॅगल्स. डॉक काकांना फ्रॅगल्सचं अस्तित्त्व माहितच नव्हतं पण त्यांचा पाळीव कुत्रा स्प्रॉकेट सतत त्यांना ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा.

या फ्रॅगल्स पैकी गोबो, मॉकी, रेड, बूबर आणि विम्ब्ली मला आमच्यापैकीच एक वाटायची. ते आनंदात गाणी म्हणायचे, दु:खात गाणी म्हणायचे, गोष्टीत गाणी म्हणायचे आणि शिकताना-शिकवतानाही गाणी म्हणायचे. आपला विचार गाण्यातून जास्त चांगला व्यक्त करायचे. यांची आणखी मजा अशी की गोबोचा एक काका 'आऊटर स्पेस' मध्ये म्हणजे माणसांच्या जगात फिरायला गेलेला होता, तो अंकल ट्रॅव्हलिंग मॅट. तो गोबोला तिथली माहिती ट्रॅव्हलिंग पोस्ट-कार्डने पाठवायचा आणि गोबोला डॉक आणि विशेषतः स्प्रॉकेटच्या दृष्टीला न पडता त्यांच्याकडे आलेलं पोस्ट्-कार्ड हस्तगत करायला लागायचं.

यांच्याशिवाय तिथे अनेक इतर फ्रॅगल्स होतेच पण त्यातही त्यांचे डूझर्स मला जास्त आवडायचे. हिरव्या रंगाचे, हेल्मेट घातलेले ते दिसायचे क्यूट आणि सतत काही ना काही इंजिनियरींगची - कंस्ट्रक्शनची कामं करत असायचे, ते ही साखरेपासून बनवलेल्या काड्यांपासून.

त्यांच्या जगातून डॉक काकांच्या विरुद्ध टोकाला राहायचे गॉर्ग्स. त्यात एक राजा, एक राणी आणि एक राजपुत्र होता. हा राजपुत्र एकटा असायचा, त्याला कुणी मित्रच नव्हते, मग तो दिवसभर फ्रॅगल्सच्या मागे पडून जमेल तेव्हा त्यांना पकडायचा आणि पाळीव प्राण्यांप्रमाणे पिंजर्‍यात ठेवायचा. सर्व फ्रॅगल्स या ज्युनियर नावाच्या राजपुत्रापासून दूर पळायचे. या छोट्या ज्युनिअरचे कुणीच मित्र नव्हते कदाचित म्हणूनच तो फ्रॅगल्स बरोबर मस्ती करायचा. तिथेच एक कचरा पण्डिता असायची, ऑरॅकल, अडी-अडचणीत ती फ्रॅगल्सना सल्ले द्यायची.

टीव्हीवरच्या या दुनियेत मी तरी फार समरस झालेलो. मला तेव्हा वाटायचं की आमच्या घरातही कुठेतरी अशीच एक दुनिया वसलेली असणारच फक्त मला अजून ती दिसलेली नाही आहे.

या दुनियेतली अनेक गाणी आठवतायत. पण तेव्हा इंग्लीशचा गंध नसल्याने आम्ही तेव्हा ती गाणी आम्हाला वाटेल ते शब्द कोंबून म्हणत असू. सर्वाधिक आवडलेलं आठवतंय ते याचं थीम साँग - "Fraggle Rock" आज याच रॉकिंग गाण्याचा आनंद घेऊ या!

http://www.televisiontunes.com/Fraggle_Rock.html

आणि

http://www.youtube.com/watch?v=22VgGVdtD7o&feature=related


आज फारा वर्षांनी हे गाणं आठवलं आणि एक छोटसं मुक्तक सांडलं....


Saturday, 8 October 2011

करतं कोण आणि भोगतं कोण?

आज या वेळेला त्या माऊलीचा आक्रोश ऐकायला तिथे कुणीच हजर नव्हतं. तशी ती जागा एरवीही निर्मनुष्य म्हणूनच ओळखली जायची. एका छोट्याश्याच शहराच्या बाहेरचा तो भाग. तिथलाच हमरस्ता पण रस्त्यावर चिटपाखरू दिसणंही मुष्किल. रस्त्यावर असावेत म्हणून दोन-चार मिणमिणते दिवे होते पण त्यांच्यामुळे रस्तातरी दिसत होता की नाही अशीच शंका यावी.

पण मग अशा या निर्जन रस्त्यावर राधाक्का काय करत होती? राधाक्काचं घर जवळ जवळ शहराबाहेरच्या वस्तीमध्ये होतं. शहराने शहराबाहेर ठेवलेल्यांची ती वस्ती. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपड्या आणि त्या झोपड्यांमध्ये दाटीवाटीने राहिलेली माणसे. राधाक्काला वाटायचं, यापेक्षा गोठ्यातल्या म्हशी बर्‍या राहत असतील. तिला तिच्या गावाकडच्या घराची सवय. तिथे घर लहानच होतं पण आजूबाजूचं मोकळं आवार तिला जास्त आवडायचं. बहुदा ती तिथेच असायची. का नसावी? घरात तिला धरून बारा चिल्लीपिल्ली, त्याशिवाय तीन काका, तीन काकू, तिचे आई-वडिल, आजी-आजोबा मोठ्ठं प्रकरण होतं. वाढत्या वयात तिच्या घरच्यांनी शहरातला एक मुलगा बघून घरातलं एक खातं तोंड कमी केलं नि ती घनश्यामबरोबर, आपल्या नवर्‍याबरोबर या वस्तीच्या आश्रयाला आली.

वस्तीतलं घर बघून आणि तिथली दाटी बघून तिला धक्काच बसला आणि आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव झाली. हळू हळू सगळ्याची सवय होत राधाक्का संसारात रमली. घनश्याम गरीब होता पण वस्तीमधल्या इतर पुरुषांपेक्षा बरा होता हीच तिची त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. तरीही खूपदा तिला वस्तीवर कोंदटल्यासारखं होऊन तिथं राहणं कठीण होई मग घनश्याम तिला बरोबर घेऊन मोकळ्या रस्त्यावर फिरायला जाई. तिचंही मन तेव्हढ्या फिरण्याने जरा मोकळं होई. वर्षभरातच राधाक्काला आर्यन झाला आणि तिचा खूपसा वेळ त्याच्या सरबराईत जाऊ लागला. खूप लहान असला तरी ती आंगडं टोपडं चढवून त्यालाही आपल्या नि घनश्याम बरोबर फिरायला नेई.

त्यादिवशीही ती दोघं अशीच बाहेर पडली. शिळोप्याचं बोलत बोलत मोकळ्या रस्त्यावरून चालत होती. इतक्यात घनश्यामला त्याच्या गावाकडचे पाहुणे भेटले नि तो त्यांच्याशी बोलत थांबला. राधाक्का आपल्याच विचारात होती. तिला तिच्या आर्यनमध्ये तिच्या भावी भविष्याची स्वप्न दिसत होती. आपला आर्यन मोठा होईल, शाळेत जायला लागेल, शिकेल, शिकून मोठ्ठा ऑफिसर होईल, तो शहरात कामाला लागेल मग वस्तीमधलं घर सोडून आपण त्याच्याबरोबर मुख्य शहरातच राहायला जावू अशी अनेक स्वप्न ती उघड्या डोळ्याने पहात होती. आपल्याच विचारात, आपल्याच नादात, घनश्यामला पार मागे सोडून ती त्या वळणदार रस्त्यावर खूपच पुढे निघून आली. आणि त्यात तरी काय अडचण होणार? तसा तिचाही तो रोजचाच रस्ता होता ना!

पण एरवी निर्मनुष्य असणार्‍या त्या रस्त्याने आज काही आक्रितच होताना पाहिलं. रात्रीच्या अंधारात आपल्याच नादात लेकाला छातीशी धरून चालणार्‍या राधाक्काला समोरून भरधाव येणारी काळी गाडी दिसूनही दिसलीच नाही. दारु पिऊन झोकांड्या देणार्‍या माणसासारखी झुलत येणारी गाडी चालवणार्‍याच्या ताब्यात वाटत नव्हती आणि वाटेल तरी कशी कारण ती चालवणाराही स्वतःच्या ताब्यात कुठे होता? त्याचा ताबा तर अंगूरकी बेटीने केव्हाच घेतलेला. काही अंतरावर खिडकीतून फेकलेल्या बाटलीने मोठ्ठा आवाज करूनही राधाक्काच्या उघड्या डोळ्यांत उलगडणार्‍या स्वप्नांच्या लडीमुळे तिने ते काहीच पाहिलं नाही की ऐकलं नाही.

अचानक पुढे आलेल्या दिव्याच्या प्रकाशात राधाक्काल पहिल्यांदा समोरून येणार्‍या गाडीची जाणीव झाली. ती आर्यनल घेऊन थोडं बाजूला सरकणार तोच ती गाडी गिरकी घेऊन तिला जोरदार धक्का देऊन पुढे निघून गेली. बसलेल्या धक्क्यानिशी राधाक्का एका बाजूला फेकली गेली. तिला वाटत होतं की तिने तिच्या आर्यनला छातीशी घट्ट धरून ठेवलेलं. यातून ती जरा सावरत असताना तिच्या लक्षात आलं की आर्यन तिच्या हातात नाही आहे. तिने आजुबाजुला पाहिलं. तिला स्वतःला साधं खरचटलंही नव्हतं. आर्यनचं दुपटं तिच्या हातात होतं पण आर्यन कुठे होता? तिच्या छातीत धस्सं झालं. ती तिरमिरीत उठून आर्यनच्या नावाने हाका मारू लागली जणू ते छोटंसं बाळ तिच्या हाकांना प्रतिसाद देणार होतं. इकडे तिकडे बघताना तिला रक्ताचा एक ओहोळ दिसला.  

त्या ओहोळाचा माग काढत राधाक्का सरकली आणि तिच्या पयाखालची जमिनच निसटली. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला. तिच्या आर्यनचा गाडीखाली पार चोळामोळा झालेला, त्याचा श्वास तर केव्हाच थांबलेला. आर्यनचं कलेवर उराशी घेऊन ती माऊली प्रचंड आक्रोश करत होती पण तो ऐकायला त्यावेळीतरी जवळपास कुणीच नव्हतं.

कुणाच्या तरी मद्यपानाच्या आनंदाने एक जीव लोळागोळा झालेला, अनेक स्वप्नांची राख झालेली आणि एक आई उध्वस्त झालेली! घनश्यामला कळेपर्यंत तरी राधाक्काला एकटीलाच हे सहन करायला लागणार होतं.

जीवनाचंही कसं असतं बघा, करतं कोण आणि भोगतं कोण?

Friday, 7 October 2011

पंगा

पुलाखालून खूप पाणी वाहून गेलय आता तरी विद्यार्थीदशेत पंगेगिरी अशी ब~याचदा केलीय. तसं त्यातलं काही अंगलट आलं नाही पण अनुभव-समृद्ध मात्र नक्की करून गेलं.

आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असतानाची गोष्ट. परिक्षा महिन्याभरावर आलेली, जर्नल्स लिहीणं, ती तपासून घेणं, परीक्षेत काय विचारलं जाईल याचा माग काढणं वगैरे वगैरे सगळे उद्योग चालू होते. एरवी मी शिक्षकांच्या फार गुड बुकात नसलो तरी बॅड बुकातही नसायचो (असं तेव्हा मला वाटायचं.) शिक्षकांना सतावणे वगैरे व्हायचं ते त्यांना सोडवायला त्रास होईल अशा शंका विचारण्याने किंवा चालू वर्गात थोडी भंकस करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणणं असंच. त्यात काही वैयक्तिक नसायचं. अर्थात लोकांशी पंगे घेण्याची रगही काही कमी नव्हती.

पण तो शनिवार काही वेगळाच होता. दिवसभर निरनिराळ्या शिक्षकांकडून जर्नल्स तपासून घेत होतो. प्रिपरेशन लीव्ह असल्याने शिक्षकही जागेवर सापडायचे नाहीत तेव्हा एका दिवशी जास्तीतजास्त जर्नल्स ताब्यात घ्यायच्या विचाराने मी आणि माझे मित्र प्रयत्न करत होतो. याच विचारात आमच्या 'शरीर रचना' विभागात मी प्रवेश केला.

इथे आमचे २ ग्रूप असायचे आणि प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे शिक्षक असायचे. माझ्या ग्रुपचे शिक्षक त्या दिवशी नव्हते पण त्यांनी जर्नल्स तपासून ठेवल्याचा निरोप मिळालेला. विभागात दुस~या ग्रुपचे शिक्षक असल्याने मी त्यांना या संदर्भात विचारलं. त्या दिवशी त्यांचं काय बिनसलेलं ठावूक नाही पण माझा प्रश्न ऐकताच त्यांचा पारा एकदम चढला. त्यांनी माझ्यावरच आगपाखड करायला सुरुवात केली. तुम्हा मुलांना वेळेचं महत्त्व कळत नाही, तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळेला तुमची कामं घेऊन आमच्याकडे येता. आम्ही काय इथे फक्त याच कामासाठी बसलोयत का वगैरे वगैरे. मी आपलं त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की आमच्या ग्रुपची जर्नल्स आमच्या शिक्षकांनी तपासून ठेवली आहेत आणि ती विभागातून घेऊन जायला परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही फक्त त्यांची जागा सांगा, जर्नल्स नेल्याची नोंद करून आमची आम्ही ती घेऊन जाऊ पण त्यांची माझं कोणतंही बोलण ऐकायची तयारी नव्हती.

पुढे त्यांचं बोलण वैयक्तिक झालं. ते ओरडून म्हणायला लागले की तुला जर्नल्स चा काय उपयोग? तुझा काय अभ्यास वगैरेशी काहीच संबंध नाहीये आणि तू परीक्षेत तरी काय दिवे लावणार आहेस? आता तर मी बघतो की तू या परीक्षेत पासच कसा होतोस ते. नाही तुझ्या एक्झामिनरला भेटून तुला फेल करायला लावलं तर बघ!
इतका वेळ त्यांच्याशी शांतपणे बोलून त्यांचं सगळ ऐकून नि माझं काम आटोपून निघायचा विचार करणारं माझं डोकं त्यांच्या तू पासच कसा होतो ते मी बघतो या बोलण्याने एकदम सटकलं. मीही त्यांना तेव्हढच जोरात ओरडून म्हंटल की तुम्ही तुम्हाला हवंय त्या प्रकारे मला नापास करायचा प्रयत्न करा आणि मी बघतो की मला नापास कोण करतय ते. मी काय नि किती अभ्यास केलाय तो माझा प्रश्न आहे पण हिम्मत असेल तर १० नोव्हेंबर १९९३ ला सकाळी ११ वाजता माझी परीक्षा आहे. या दिवशी माझ्या सेंटर वर या, मी वाट बघेन तुमची तिथे. मीही बघतो की तुमचा कोणता एक्झामिनर मला फेल करतोय ते.

यानंतर मी माझं जर्नल घेऊन तिथून निघून गेलो. तोपर्यंत ही हकीगत सगळ्या कॉलेजभर कळलेली.
सिनियर मित्रांनी तेव्हा पहिल्यांदा मी कसा मोठा पंगा घेतलाय ते सांगितलं. २० वर्षांपूर्वी, खार खाऊन असलेल्या शिक्षकाने आपल्या नावडत्या विद्यार्थ्याला परीक्षेत एक्झामिनरकडून फेल करवण ही अत्यंत मामुली आणि सहज शक्य गोष्ट होती आणि तसे प्रकार झालेलेही होते. पण मग मीही याचा फार विचार केला नाही. शब्दाला शब्द मिळून वाद झाला होता आणि घडायचं ते घडून गेलेलं. माझ्यापरीने मी अभ्यास केला आणि जे होईल ते होवो या विचाराने त्या दिवशी परीक्षा दिली. अर्थात मधून मधून ते शिक्षक येतायत का ते ही बघत होतो. तसे ते सेंटरला आलेही पण माझ्या परीक्षेच्या ठिकाणी फिरकले नाहीत. यथावकाश निकाल लागला. मी ब~यापैकी गुणांनी उत्तीर्ण झालो.

बहुदा त्या शिक्षकांनीच माझ्याशी पंगा घेतला नसणार.......