Tuesday, 17 September 2013

'लोकायत' विचारचर्चा(पडदा उघडतो.)
माधव                                   :  असे आश्रय ज्ञानाचा।  
                                                   निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा
                                                  धनी माझ्या नमस्काराचा ।
 शिव सृष्टीकर्ता।। १

 पावले जे दर्शनसागरापार।
 करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार।
 असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर ।
 मम आश्रयदाता।।

 विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर ।
 गहन, दुस्तर तरी आनंद देई फार।
 अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर ।
 होई आल्हाददाता।

पुरूष क्र. १ :                   नमस्कार माधवराव!
माधव     :                   नमस्कार बुवा! काय म्हणता?
पुरूष क्र. १ :                   माधवराव, मी सुरूवातीपासून तुमचं भाषण ऐकतोय. अहो, तुम्ही तो शिव मोक्ष देणारा आहे, असं कसं म्हणता?
माधव     :                   का हो त्यात काय चूक आहे ?
पुरूष क्र. १ :                   माधवराव, बृहस्पतीमतानुसारी, नास्तिक शिरोमणी चार्वाकाने हे विधान सर्वथा त्याज्य ठरवले आहे आणि त्यावरचा त्याचा युक्तिवाद खोडून काढणं महाकठीण आहे.
माधव     :                   काय सांगता? म्हणतो काय नास्तिक शिरोमणी चार्वाक यावर?
पुरूष क्र. १ :                   कसं आहे बघा, ते म्हणतात ना,
यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचरः।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।  
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?


माधव     :      असं कसं म्हणता? धर्म तर असे काही सांगत नाही ?
पुरूष क्र. १ :      धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.  
माधव     :      हे जरा स्पष्ट करून सांगा बरं!
पुरूष क्र. १ :     माधवराव, आता जरा इथे या आणि सांगा तिथे त्या कोपर्‍यावर काय दिसतंय?
माधव     :      कुठे? तिथे? त्या शिंदीच्या झाडांजवळ ?
पुरूष क्र.१  :      हो! हो! तिथेच, तिथेच. काय आहे सांगा जरा!
माधव     :      अहो, ते तर त्रैलोक्य मदिरालय आहे.
पुरूष क्र. १ :      बरोबर. आता आपलं मदिरालयाशी काही सोयर - सूतक नाही. पण त्यातल्या मदकारी वारूणीचा आपण विचार करू.
माधव     :      आता इथे वारूणीचा काय संबंध ?
पुरूष क्र. १ :      सांगतो. शिंदीसारख्या फळांचा रस, साळी- सातुसारखी धान्यं, गूळ आणि किण्व या चार द्रव्यांच्या संयोगातून तयार होणार्‍या वारूणीत मद निर्माण करण्याची शक्ती उत्पन्न होते. बरोबर?
माधव     :     बरोबर. या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला
                    मद चढतो. तो झिंगतो.

पुरूष क्र. १ :      अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
माधव     :      अच्छा असा संबंध आहे होय ?
पुरूष क्र. १ :      मग तर काय! तसंच तर आहे.
माधव :          म्हणजे ही चार तत्त्वं देहामध्ये एकत्र आली की त्यांच्यात चैतन्य निर्माण
                                होतंय आणि देहाकार झालेली ही महाभूत नष्ट झाली की चैतन्य आपोआपच
                                 नष्ट होतंय की काय?

पुरूष क्र.१ :       मग काय तर ! आता माधवराव, त्या बृहदारण्यक उपनिषदातच नाही का
                                    म्हण्टलंय.
विज्ञानयन एवैतेभ्यो भूतेभ्य: समुत्थाय तान्येवानुविनश्यति | न प्रेत्य ज्ञास्ति |”

जाणवणारा जीव महाभूतांमधून उत्पन्न होतो आणि ती महाभूते नष्ट झाल्यावर त्यांच्या सोबतच तो ही नष्ट होतो. मेल्यावर कुठे कसली जाणीव उरते?
माधव :                बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण
                                    नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
पुरूष क्र.१ :       मग काय तर ! आमच्या मते प्रत्यक्ष हे एकच प्रमाण आहे. इतर
                                    अनुमानादि प्रमाणांना प्रत्यक्षाची जोड नसेल तर त्यांचा स्विकारच
                                    करता येणार नाही.
माधव :           हे कसं मान्य करावं? अनुमान इत्यादींना प्रमाण म्हणून मान्यता द्यायलाच पाहिजे. कारण त्याशिवाय, धूर दिसल्यावर जनसामान्यांना आगीच्या असण्याबद्दलची जाणीव होते, ती कशी होईल?  
पुरूष क्र.१ :       माधवराव, हा सगळा मनाचा खेळ आहे हो ! अनुमान हे प्रमाण असल्याचं मानणार्‍यांनी व्याप्ती आणि पक्ष यांनी युक्त असणारा हेतु हेच निर्दोष अनुमानाचे गमक म्हणून सांगितले आहे. व्याप्ती म्हणजे अनिश्चितता आणि संदिग्धता विरहीत हेतु आणि साध्यामधील संबंध. हा संबंध चक्षु आदी इंद्रियांच्याद्वारे झालेल्या ज्ञानानेच अनुमानाला साहाय्यक होतो.
माधव :           बुवाजी, काही उदाहरण देऊन समजवा ना !
पुरूष क्र.१ :       माधवराव, तुमच्या सारख्या विद्वानालाही आमच्यासारख्यांची टर खेचावीशी वाटते, असं दिसतंय !
माधव :           नाही हो, बुवाजी ! या आजुबाजूला ऐकणार्‍या लोकांनाही कळावं म्हणून विचारतोय.
पुरूष क्र.१ :       असं म्हणताय? बरं करतो प्रयत्न. माधवराव, मला सांगा, ते अनुमानप्रमाणाचं नेहमीचं उदाहरण कोणतं?


माधव :           ते ना, पर्वतो वह्निमान्, धूमवत्त्वात् !” म्हणजे पर्वतावर आग आहे कारण तिथे धूर दिसतोय.
पुरूष क्र.१ :       बरोबर. आता इथे पर्वत हा पक्ष, त्यावरची आग हे साध्य आणि तिथला धूर हे लिंग म्हणजेच हेतु.
माधव :           खरं आहे, या उदाहरणातलं यत्र धूम : तत्र वह्नि:” म्हणजे जिथे धूर तिथे आग ही व्याप्ती म्हणजेच लिंग (हेतु) आणि साध्य यांच्यातला निर्दोष संबंध.
पुरूष क्र.१ :     माधवराव, हा संबंध म्हणजेच व्याप्ती, तेव्हाच निर्दोष असेल जेव्हा हेतु, लिंग किंवा खूण ही पक्षाच्या ठिकाणी, साध्याच्या उपाधि संबंधानेच उपस्थित असावी. म्हणजे धूर हा आगीच्या उपाधि संबंधानेच पर्वतावर दिसत असल्यास व्याप्ती निर्दोष होऊन अनुमान प्रमाण म्हणून मान्य होऊ शकते अन्यथा तसं मानता येणार नाही.
माधव :       बरं! बरं! म्हणजे यत्र हिंसा तत्र अधर्मसाधनम् अर्थात जिथे हिंसा तिथे अधर्माचरण इथे हिंसा हे लिंग निषिध्दत्व या उपाधिनेयुक्त आहे हे अधर्मसाधनम् या शब्दातून समजते. पण असं असलं तरी यज्ञातली हिंसा निषिध्द नसल्याने ती मात्र अधर्मसाधन होऊ शकत नाही. मग म्हणूनच, यत्र हिंसा तत्र अधर्मसाधनम् मधली उपाधि संदिग्धतेमुळे दूषित बनल्याने या परिस्थितीतले अनुमानही दूषित बनते नि प्रमाण म्हणून वापरता येत नाही.
पुरूष क्र.१ :      साधु, माधवराव साधु ! अगदी योग्य तेच बोललात. आता पहा, प्रत्यक्षज्ञानाच्या समयी, या ज्ञानाची साधनं असलेली चक्षुरादि इंद्रिये उपस्थित असायला हवीत आणि त्यांद्वारे ज्ञान व्हायला हवं. यावेळी त्या इंद्रियांचंच ज्ञान होण्याची गरजच नाही. अनुमानाच्या संबंधाने अशी परिस्थिती नाही ना ! अनुमानाचे साधन नुसते आस्तित्त्वात असून चालत नाही तर त्याचं ज्ञान आणि ते ही पुन्हा इंद्रियांद्वारेच व्हांव लागतं. या अशा सगळ्या प्रकारामुळेच प्रत्यक्ष हेच आपलं प्रमाण !
माधव :           मग बुवाजी, वेद वाक्याला प्रमाण मानणारं शब्द प्रमाण, त्याचं काय?


पुरूष क्र.१ :        माधवराव, त्याचंही असंच आहे की ! प्रत्यक्ष न ऐकलेल्या आणि न जाणे कुणी लिहिलेल्या ग्रंथातल्या शब्दांचे काय ते प्रमाण?   
माधव :           तुम्ही मगाशी म्हणालात की अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. याचं प्रत्यक्ष स्पष्टीकरण कसं कराल?
पुरूष क्र.१ :        खरं म्हणजे स्त्रियांच्या आलिंगनादिंपासून मिळणारं सुख हाच एक पुरूषार्थ आहे. हे सुख दु:खमिश्रित असलं तरी टाळता येण्यासारखं नसल्यामुळे त्याला बाजूला सारून फक्त सुखाचा तेवढाच उपयोग घ्यावा.
माधव :           म्हणजे बाजारातून आणलेल्या धान्यांतून तूस वगैरे दूर करून निवडलेले धान्यच तेवढं मनुष्य ग्रहण करेल, तसंच ना?
पुरूष क्र.१ :        किंवा मासे खायची इच्छा करून मनुष्य खवले आणि काटे यांनी युक्त मासे आणतो आणि त्यातला खाण्यायोग्य भागच निवडून खवले काट्यांचा त्याग करतो. अशाचप्रकारे दु:खाला दूर लोटून केवळ सुखाचाच तेवढा उपभोग घ्यावा.
माधव :           अहो, दु:खाची भीती वाटते.
पुरूष क्र. १ :     माधवराव, दुखाःच्या भीतीने आल्हाददायक सुखाचा त्याग का चांगला मानायचा! हे चूकच आहे. असं बघा, गुरं तोंड घालतात, पाखरं टिपतात म्हणून कुणी अन्न शिजवायचं थांबतो का ? असं वागणारा भित्रा मनुष्य सर्वथैव मूर्ख ठरेल.
माधव :          पण मग असं असेल तर समाजातील विद्वान मंडळी पुष्कळ द्रव्य खर्च करून शारीरिक कष्टाने साध्य होणारे अग्निक्षेत्र इत्यादि यज्ञयाग करण्यासाठी कसे काय प्रवृत्त होतात?
पुरूष क्र. १ :    बरा विषय काढलात माधवराव ! पारलौकीक सुखप्राप्ती स्वर्गारोहणाच्या माध्यमातून करवण्याचं आश्वासन देणारे यज्ञयाग आदि कर्मकाण्डांचे प्रयोग हा काही प्रमाण मानता येईल असा युक्तिवाद होऊ शकत नाही.
माधव :           का बरं?
पुरूष क्र. १ :      कारण असं आहे की ज्याच्या संदर्भाने या गोष्टी केल्या जातात, ते, असत्य विधानं, परस्पर विरूध्द वचनं आणि पुनरूक्ती अशा दोषांनी दूषित आहे.


माधव :          बुवाजी, असं आडून आडून बोलू नका. स्पष्ट काय ते बोला. नको, मीच तुम्हाला स्पष्टपणे विचारतो. वेदवाक्ये प्रमाण का मानू नयेत.?
पुरूष क्र. १ :      आता तुम्ही स्पष्टच विचारलंय तर मी ही स्पष्टच उत्तर देतो. स्वतःला वेदशास्त्रसंपन्न मानणार्‍या बगळ्यासारख्या धूर्त लोकांनी वेदवाक्यांच्या प्रमाणत्वाचे परस्परच खंडन केलेय. असं असताना त्यांना प्रमाण मानण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो?
माधव :                असं कसं म्हणता बुवाजी तुम्ही? हे कसं शक्य आहे?
पुरूष क्र १ :       असं बघा माधवराव, वेदप्रामाण्य मानणार्‍या कर्मकाण्डी मीमांसकांनी वेदांतील ज्ञानकाण्डाचे पूर्णतः खण्डन केले आहे आणि ज्ञानकाण्ड प्रमाण मानणार्‍या वेदान्त्यांनी कर्मकाणडाचे पूर्णतः खण्डन केले आहे. वेदशास्त्राची दोन्ही अंगे परस्परच खण्डीत झाली असताना त्याचं प्रामाण्य कसं मानायचं? म्हणून या संदर्भात लोकायत प्रवर्तक बृहस्पतींचे मतच ग्राह्य व्हावं.
माधव :                असं? काय म्हणतात याबद्दल बृहस्पती?
पुरूष क्र. १        अहो, ते म्हण्टलंच आहे ना,
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्।
                   बुध्दिपौरूषाहीनानां जीविकेति बृहस्पतिः ।।

अर्थात, अग्निहोत्रादि यज्ञयाग, तिन्ही वेद, संन्यासी होऊन तीन दण्ड धारण करणं, अंगाला भस्म चोपडून साधू बनणं या सार्‍या गोष्टी म्हणजे बुध्दी आणि पौरूष यांचा अभाव असणार्‍या व्यक्तींच्या उपजीविकेची साधनं आहेत असंच बृहस्पती मानतात.
माधव :          बुवाजी, शब्दार्थात हे सारं सिध्द होण्याचा प्रसंग येत असला तरी समाजाच्या श्रध्दास्थानांचा असा विध्वंस योग्य नव्हे. श्रध्देवर समाज टिकलेला असतो. समाजाच्या श्रध्दांचा विध्वंस सामाजिक विध्वंसाला कारणीभूत ठरतो. निःश्रध्द समाज, निर्नायकी अवस्थेत कोणत्याही इष्ट लक्ष्याच्या अभावी नष्ट होऊन जाईल. हे होणे योग्य नाही पण तुमची मतं तसाच परिणाम करवण्याची शक्यता आहे. हे कसं टाळावं?पुरूष क्र. १ :       माधवराव, तुम्ही खरोखरच सायणकुलभूषण आहात. तुमच्या मूलगामी बुध्दीचा त्रिवार जयजयकार आहे. चार्वाकांच्या भूमिकेचा समाजावर होणार्‍या परिणामांचा तुम्ही केलेला विचार हा प्रत्यक्ष चार्वाकांनाही विचारप्रवण करायला लावणारा आहे हे निश्चित !
माधव :                बुवाजी पण यावर उपाय कसा होणार ?
पुरूष क्र. १:       सामाजिकांच्या अलौकिक श्रध्दांना लौकीक पातळीवर पर्याय उभा केल्यास तुमची अडचण दूर होते असं म्हणू शकतो.
माधव :                हे उलगडून सांगा बरं जरा.....
पुरूष क्र. १ :      कसं आहे माधवराव स्वर्ग – नरक प्रत्यक्षात कुणी पाहिलाय? वरती आकाशाच्यावर कुठे स्वर्ग आणि जमिनीच्या खाली कुठे नरक असं आपलं मानायचं याला काय अर्थ आहे?
माधव :                मग ? पुढे त्याचं काय?
पुरूष क्र १ :       सांगतो. यामुळे काटे, दगड- धोंडे इत्यादि तापदायक गोष्टींनी उत्पन्न होणारे दुःख म्हणजेच नरक आणि त्यांच्या अभावाने साधणारे सुख हाच स्वर्ग. लोकांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झालेला राजा हाच परमेश्वर तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा आणि त्या देहाचा विनाश हीच मोक्षप्राप्ती हे समजून घेणं हाच उत्तम उपाय आहे.
माधव :          म्हणजे बुवाजी, सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि आचारणामध्ये कोणत्याही प्रकराचा आधात्मिक पसारा न मांडता लोकायत दर्शन सहज आत्मसात होण्यासारखं आहे, असं दिसतयं. स्त्री – पुरूषांना आलिंगनादिंच्याद्वारे मिळणारं सुख हाच काम अर्थात एक पुरूषार्थ, कोणत्याही वेदनेपासून उत्पन्न होणारे दुःख हाच नरक, लोकांमध्ये प्रतिष्ठित राजा म्हणजेच परमेश्वर होय. चैतन्ययुक्त देहाचा विनाश हाच मोक्ष तेव्हा ज्ञानाने मोक्षप्राप्ती हा सिध्दान्त अमान्य. जगात पृथ्वी, जल, तेज आणि वायू हीच चार महाभूते असून त्यांच्या संयोगातूनच चैतन्योत्पती होते, येवढ्यातच जनसामान्यांना सहजी आकळणार्‍या लोकायत दर्शनाचं सार सामावल्याचं दिसतंय.
पुरूष क्र. १ :      साधु माधवराव, साधु लोकायत दर्शन सारांशरूपाने मांडणार्‍या तुमच्या बुध्दीला माझे त्रिवार प्रणाम !


(पडदा पडतो.)