Monday, 30 January 2012

माझी खादाडी - २ : 'मखमलाबाद'स्पेशल मिसळ

आम्ही ज्यांना आमचे आंतरजालिय मित्र मानतो, त्या श्रीमान् पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांनी मिसळपाववर कोणत्यातरी धाग्यात प्रतिसादादरम्यान मखमलाबादच्या स्वादिष्ट मिसळीचा उल्लेख केलेला होता, तो आमच्या जन्मजात खादाडी वृत्तीमुळे कुठेतरी डोक्यात फिट्ट झालेला. त्यामुळेच की काय, आत्ताच्या २६ जानेवारीला कामानिमित्त नाशिकच्या पेठ रस्त्यावरून जाताना मखमलाबाद फाटा आणि मखमलाबादची दिशादर्शक खूण दिसताच त्या मिसळीच्या उल्लेखाने उचल खाल्ली आणि नकळतच आम्ही त्या दिशेने वळलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाली नव्हती पण मिसळ खायला वेळेचं बंधन थोडीच असतंय?
 
पेठ रस्त्यावरच्या मखमलाबाद फाट्यावरून साधारण २ - ३ किलोमीटरवर मखमलाबाद गाव आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात खूप गजबज होती. जागोजागी पांढर्‍या गणवेशातले विद्यार्थी होतेच पण त्याबरोबरच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही झुंबड होती. मखमलाबादमध्ये शाळा, ज्युनिअर कॉलेज असल्याने झेंडावंदनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला होता आणि बहुतेक म्हणूनच अनेकांनी आपला मोर्चा 'हॉटेल सुदर्शन'कडे वळवलेला. किमान १५ - २० मिनिटांचं वेटिंग होतं. 

रामभाऊ पिंगळ्यांच्या घरातच त्यांचं 'हॉटेल सुदर्शन' आहे आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांसह ते सगळी व्यवस्था बघतात. पडवीमध्ये त्यांनी टेबलं टाकली आहेत आणि बाहेरच्या खोलीतही. जागा कमी पडू लागली तर आतल्या खोलीमध्ये भारतीय बैठकीत मिसळ-पार्टी रंगते. त्र्यंबक रोडवरून पेठ रोडकडे येणार्‍या जोड-रस्त्यावर मखमलाबाद आहे. हा जोड-रस्ता अनेकांच्या मॉर्निंग वॉकचा नेहमीचा मार्ग आहे. मग वॉकत, आपलं चालत, मखमलाबादपर्यंत आल्यावर भूक लागल्याने सकाळी सकाळी रामभाऊंची मिसळ 'मस्ट' होऊन जाते असं सांगून वेटिंग दरम्यान भेटलेल्या (आणि बहुदा स्वतःही तसंच करणार्‍या) रोजच्या मॉर्निंग वॉकराने माझ्या ज्ञानात भर घातली. 

रामभाऊंचा अंदाज पक्का होता आणि साधारण २०व्या मिनिटाला मला टेबल मिळालं. भरपूर गर्दी असल्याने मिसळ समोर यायला आणखी थोडा उशीर झाला पण जेव्हा ती समोर आली तेव्हा डोळ्यांची भूक मात्र लगेच भागली. मिसळ, कांदा-कोशिंबीर, गरम गरम कट (रस्सा), पाव आणि तळलेले पापड असा सगळा जामानिमा एकसाथच रामभाऊंच्या मुलाने माझ्यापुढे ठेवला. 

मिसळ चवीला छान होती. ना जास्त तिखट, ना अतिमसालेदार. सगळं कसं आवश्यक तेवढंच. मला आवडली. नाशिकच्या सकाळच्या थंडीत मिसळीवर गरम गरम कट घेऊन खाणं हे काय सुख असतं ते फक्त तसं खाणार्‍यालाच कळेल. आपण तर बाबा त्यावेळी दोन मिसळींसोबत ४ - ६ पाव आणि फोटोत दिसतोय तो अख्खा मग भरून कटाचा फडशा पाडला. 

जाता-येता जेव्हा शक्य होईल तेव्हा रामभाऊंच्या हॉटेल सुदर्शनची मखमलाबाद स्पेशल मिसळ आपण नक्की रेकमन्ड करू!

माझी बल्लवगिरी - १ : 'फोडणीची पोडली'

गेले वर्षभर मी स्वत:हून एक उपक्रम हाती घेतलेला आहे. फार काही मोठा वगैरे नाही पण माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. लहानपणापासूनच तसा मी खाण्या-पिण्याचा शौकीन पण माझे सारे चोचले आई-बहिणीच्या जीवावर पोसले गेले होते. मला स्वत:ला पूर्वी साधा चहादेखील बनवता यायचा नाही. पुढे असे काही प्रसंग घडले की मला प्रकर्षाने वाटू लागले की मला माझ्यापुरता तरी स्वयंपाक करता आला पाहिजे. म्हणून मग जेव्हा शक्य होईल तेव्हा मी स्वत:साठी स्वत:च काहीतरी बनवून खाऊ लागलो. सारं काही सुरळीत करता येऊ लागलं असं काही नाही, किंबहुना सुरुवातीला चुकाच जास्त झाल्या. पण आता हळू हळू मला स्वत:लाच माझ्यातला 'महाराज' (पक्षी: स्वयंपाकी) ओळखता येऊ लागला आहे हे मी आनंदाने इथे नमूद करू इच्छितो.

याचा प्रत्यय घेण्याचा मौका नुकताच मला मिळाला. एकटाच होतो आणि संध्याकाळच्या खाण्यासाठी तसं काहीच तयार नव्हतं. कालच्या इडल्या ८-९ आणि पोळ्या (कालच्याच) २ हाताशी होत्या. विचार केला काहीतरी बॅचलर्स डीश बनवावी. मग इतर आवश्यक साहित्याचीही जुळवाजुळव सुरू केली. मी घेतलेल्या गोष्टी -  

पोळ्या - २ 
इडल्या - ९ 
भुईमुगाचं तेल - ४ चमचे 
मोहरी - ४ (छोटे) चमचे 
जिरं - २ (छोटे) चमचे 
हळद - ३ (छोटे) चमचे 
तिखट - ३ (छोटे) चमचे 
हिंग - १/२ (छोटा) चमचा 
मीठ - चवीनुसार 
साखर - २ चमचे 

आता कृती -

पहिल्यांदा पोळी आणि इडल्यांचे तुकडे करून घेतले. पोळीचे थोडे बारीक आणि इडल्यांचे काहीसे मोठे तुकडे केले.
गॅसवर चढवलेल्या कढईमध्ये सोडलेलं भुईमुगाचं तेल गरम झाल्यावर त्यात आधी मोहरी टाकली. ती तडतडायला लागल्यावर त्यात जिरं, हळद, हिंग आणि तिखट टाकलं. फोडणी व्यवस्थित तयार झाल्यावर त्यात पोळी आणि इडलीचे तुकडे सोडले. हलक्या हाताने कालथ्याने हलवून ते फ्राय करून घेतले. व्यवस्थित फ्राय होतायत तोवर त्यात चवीनुसार मीठ आणि साखर पेरली. सर्व नीट मिश्रित करून घेतलं.

फोडणीची पोळी आणि फोडणीची इडली याचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेल्या या डिशचं मी 'फोडणीची पोडली' असं नामकरण केलं. तयार झालेली 'फोडणीची पोडली' दिसायला तरी चांगली होती. तुम्हाला दाखवण्यासाठी बाऊलमध्ये घेऊन फोटो काढले. नंतर चवही घेतली. मला तरी चांगली वाटली. आधी आईसाठी ठेवायचा विचार होता पण थोडी थोडी करून सगळी मी एकट्यानेच खाऊन टाकली. आता एकदा केलीय तर आईसाठी पुन्हा करण्यात काहीच अडचण येणार नाही, नाही का? 


फोडणीची पोडली


फोटो माझ्या मोबाईल कॅमेर्‍यातून
(व्यंगचित्रातला माझ्यासारखा दिसणारा शेफ आंतरजालावरून साभार)

Wednesday, 25 January 2012

पहिली मिपा-ओरिगामी कार्यशाळा (२२ जानेवारी २०१२, देनावाडी, गिरगाव) - वृत्तांत

कोणत्याही मिपा-इव्हेन्टच्या वेळचे नारायण (किसन शिंदे) यांच्या पुढाकाराने आणि 'मु. पो. ब्राझील' फेम विलासरावांच्या सहकार्याने गेल्या रविवारी म्हणजे दिनांक २२ जानेवारी २०१२ रोजी मिपा सदस्यांची पहिली ओरिगामी कार्यशाळा देनावाडी गिरगाव इथे संपन्न झाली. कार्यशाळेमध्ये मिपावर ओरिगामीकलेचा ध्वज फडकत ठेवणार्‍या सदस्य सुधांशू नूलकर यांनी मार्गदर्शन केलं. सुधांशू नूलकरांनी आपल्या भूमिकेला साजेसा ओरिगामी मित्र असं लिहिलेला टी-शर्ट परिधान केलेला. तसले टी-शर्टस् पुढच्या वेळी कार्यशाळेमध्ये भाग घेणार्‍यांसाठी उपलब्ध करून देण्याची (तेव्हा न केलेली) विनंती आम्ही इथे करून ठेवत आहोत. या पहिल्या कार्यशाळेमध्ये उपरोल्लेखित तीन सदस्यांव्यतिरिक्त श्री. विश्वनाथ मेहेंदळेकाका आपला पेटंट झब्बा-लेंगा-शबनम पिशवीचा युनिफॉर्म न घालता जीन्स-टीशर्टाच्या बॅचलरी कपड्यात (इस अधोरेखित शब्दसे निर्माण होनेवाले पॉइन्टको नोट किया जाय, मिलॉर्ड!) हजर होते. शिवाय ठाणेकर जोशी'ले', प्रास यांच्यासह सदेह उपस्थित होते. सदेह येवढ्यासाठी की आधी कार्यशाळेला येणार असं घोषित केलेले दुसरे ठाणेकर रामदासकाका विदेहावस्थेत उपस्थित आहेत असं तिसरा ठाणेकर असलेल्या किसनद्येवांचं म्हणणं होतं.

नमनाला घडाभर तेल पुरे करून आता प्रत्यक्ष कार्यशाळेच्या वृत्तांतावर येतो. सुधांशु गुरूजींनी ओरिगामी कलेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगून प्रत्यक्ष शिकवण्यास सुरूवात केली. त्यांनी शिकवल्याप्रमाणे घातलेल्या पहिल्या काही घड्यांचा असा काही परिणाम झाला की त्यातून अनपेक्षितपणे कागदी कप तयार झाला. असा कप की ज्यातून पाणी, चहा, कॉफीही सहज पिता येईल. (अर्थात त्यासाठी वापरलेला कागदही दर्जेदार होता.) पहिल्याच प्रयत्नात कार्यशाळेतील विद्यार्थी यशस्वी झाल्यामुळे उत्साहाला उधाण आलं. मग ते कोणतेही चिकटवण्याची साधन न वापरता कागदातंच सेल्फ लॉकिंग पद्धत वापरून करता येणारे कागदी फूल आणि आपल्या ए-फोर कागदावर लिहिलेल्या पत्राचंच इन्व्हलप बनवायला शिकले. यानंतरचा क्रमांक जमिनीवर सोडताच कोलांटी घेणार्‍या कागदी खेळण्याचा आला. कार्यशाळेतील प्रत्येकाच्या खेळण्याने कोलांटी मारून शाबासकी मिळवली. याच खेळण्याचा मोठा भाऊ मानावा, असा उडी मारणारा बेडूक बनवून मिपाकर विद्यार्थ्यांनी आपापल्या बेडकाला भरपूर उड्या मारायला लावल्या.

आपापल्या बेडकांना उड्या मारण्यास लाऊन दमलेल्या मिपाकरांच्या श्रमपरिहारासाठी विलासरावांनी ब्रेक घ्यायला लावला आणि समोर सामोसे, फरसाण आणि पेढ्यांच्या न्याहरीची व्यवस्था केली. दरम्यान मिपाकरांनी मिपावरच्या विविध सदस्यांचा, धाग्यांचा आणि घटनांचा मागोवा घेऊन आपला 'अभ्यास वाढवला'.

ब्रेकनंतर गुरूजींनी बेसिक ओरिगामी तंत्राची माहिती दिली. यामध्ये सुरूवातीच्या दोन प्रकारच्या घड्यांची माहिती करून देण्यात आली. मग त्यापैकी एका घडीने सुरूवात करून विद्यार्थ्यांनी फूल बनवलं तर दुसर्‍या घडीने सुरूवात करून (चुकत माकत का होईना पण चक्क) क्रेन पक्षी बनवला. कागदापासून क्रेन पक्षी निर्माण होणं हा आमच्या ओरिगामी कार्यशाळेचा हायपॉईन्ट होता. यानंतर मात्र वेळेच्या अनुपलब्धीमुळे कार्यशाळा आवरती घेण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान नेहमीप्रमाणेच मिपाकरांनी विलासरावांचं ऑफिस तथा अख्खी देनावाडीच दणाणून सोडली होती कारण सुधांशू गुरूजींनी अगोदरच मुभा दिलेली की गप्पा करा कारण हाताने ओरिगामी सुरू असताना त्यात कसलीही अडचण येत नाही. हे सांगण्यात आपण फार घाई केली असंच त्यांना नंतर वाटलं असेल इतका दंगा मोजक्या लोकांनी घातला. एकूणच ओरिगामी हा प्रकार इतका मस्त आहे की जाता जाता (इतरांना चुकवून) किसनद्येव आणि विमेकाका सुधांशू गुरूजींकडून गुपचूप कागदाचा बॉक्स बनवायला शिकले (हे इथे नोंदवून ठेवत आहे).

एरवी 'श्री' समर्थ होतेच तरीही वेळात वेळ काढून ओरिगामी कार्यशाळेच्या सिद्धीसाठी आलेले सुधांशू गुरूजी, कार्यशाळेचे प्रणेते (नारायणराव) किसनद्येव, कार्यशाळेसाठी जागा आणि न्याहरी उपलब्ध करणारे विलासराव आणि दोन वेळा वाफाळत्या चहाची व्यवस्था करणारे त्यांचे पुतणे पंडितराव यांच्या एकत्रित श्रमाचा परिणाम म्हणून पहिल्या मिपाकर ओरिगामी कार्यशाळेची सुफळ आणि यशस्वी सांगता झाली असं म्हणण्यात काहीही प्रत्यवाय नाही.

पहिल्या मिपा-ओरिगामी कार्यशाळेतले विद्यार्थी आणि त्यांचे काही कलाविष्कार


 मिपा-ओरिगामी कार्यशाळेत शिकवताना डाव्या हाताला सुधांशू गुरूजी आणि त्यांच्यासमोर बसून शिकत असलेले मिपाकर (डाव्या बाजूने) प्रास, किसनद्येव, जोशी'ले', विमेकाका आणि विलासराव. कार्यशाळेत मार्गदर्शक सुधांशू गुरूजी (ओरिगामी मित्र लिहिलेला टी-शर्ट नोट करावा) आणि पण्डितराव.


 कागदी कप सेल्फ लॉकिंग पद्धतीने बनवलेली कागदी फुलं


 वेगळ्या प्रकारची रंगीत कागदी फुलं उड्या मारून दमलेला (कागदी) बेडूक


 विमेकाका आणि किसनद्येवांनी गुपचुप शिकून घेतलेला कागदी बॉक्स, विमेंच्या कलाकृती पोटात घेतल्या अवस्थेत कार्यशाळेचा हायपॉइण्ट - उडते क्रेन पक्षी


 पण्डितरावांच्या हातच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेताना (डावीकडून) प्रास, विलासराव, विमे आणि जोशी'ले'
अशाप्रकारे संपन्न झालेल्या पहिल्या मिपा-ओरिगामी कार्यशाळेमध्ये पुढच्या तशाच कार्यशाळेच्या आयोजनाची बीजे रोवली गेली हे नक्की!

Wednesday, 11 January 2012

एका कल्पनेतलं जग

त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं. 
 
मला अत्यंत आवडणार्‍या चित्रपटांपैकी असलेला तो चित्रपट संपला तरीही ते गाणं माझ्याभोवती रुंजी घालतच होतं. चित्रपटात त्याचं एखादं कडवंच ऐकू आलं असलं तरी आता माझ्या मन:पटलावर अथपासून इतिपर्यंत पुन्हा पुन्हा ते वाजत होतं आणि गाण्याच्या प्रत्येक आवर्तनानंतर त्याचा परिणाम अधिकाधिक गडद होत राहिला. 

का होऊ नये तसं? ते गाणं माझ्या अत्यंत आवडत्या संगीतकार - गायकाचं होतं. ते लिहिलंही त्यानेच होतं. त्याचे स्वतःचे विचार त्यात टोकदारपणे व्यक्त झालेले. तो अगदी भावविभोर होऊन गात होता. त्याचे त्या गीतातले शब्द एका अशा जगाचं वर्णन करत होते जे त्याने कल्पलं होतं. कसं होतं त्याच्या मनातलं जग? 

एक असं जग, जिथे स्वर्ग नाही,
पायाखाली नाही पाताळ आणि डोईवर केवळ आकाश,
जगतोय प्रत्येक माणूस फक्त आजच्या दृष्टीने, आजच्यासाठीच खास. 

जिथे कोणतेही देश नाहीत,
जिथे मरण नाही नि मारणंही, आणि नाही धर्म,
कल्पा असं जग जिथे माणसाने शांततापूर्वक जगणं हेच कर्म. 

तुम्ही म्हणाल की मी स्वप्नाळू आहे,
पण मी एकटा नाही, केव्हातरी तुम्हीही माझ्यात सामील व्हाल,
आणि सार्‍या जगाचा एक विशाल देशच बनलेला पहाल. 

बघा, जिथे नसेल कुणाचं स्वामित्व,
नसेल कशाची गरज आणि भूक, नसेल कशाचा लोभ,
बंधुभावाने हे सारे जगच, वाटून घेतील लोक. 

तुम्ही म्हणाल की मी स्वप्नाळू आहे,
पण मी एकटा नाही, केव्हातरी तुम्हीही माझ्यात सामील व्हाल,
आणि सार्‍या जगाचा एक विशाल देशच बनलेला पहाल. 

गाणं - 'Imagine'
गीतकार - संगीतकार - गायक - सादरकर्ता - जॉन लेनन