Friday 19 June 2020

पाणी पिणे - आयुर्वेदिक दृष्टीकोन

आयुर्वेदामध्ये आहाराच्या अनुषंगाने पाणी पिण्याबद्दलही काही निश्चित मार्गदर्शन केलं आहे. पाणी ही शरीराला आवश्यक गोष्ट आहे कारण आपलं शरीर हे पाण्यातच निर्माण झालेलं आहे, पाण्यावरच पोसलेलं आहे. शरीरात सुमारे 70% जलीय घटकच आहेत. असं असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अन्नाप्रमाणे पाणीही तितकंच आवश्यक असतं.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम् |
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषापहम् ||

अजीर्णासारख्या अग्नी आणि अन्नाच्या अपचनाशी संबंधीत व्याधीमध्ये सामान्य अन्नग्रहण हे अयोग्य असताना, पाणी हाच शरीराचा आधार होतो. त्यामुळे अशा अवस्थांमध्ये पाणी हे औषधाप्रमाणे आरोग्यकारी होऊन उपयोगी पडतं. 

आपण ग्रहण केलेल्या आहाराचं पचन झाल्यावर व्यवस्थित पाणी प्यावं. त्यामुळे शरीराच्या जलविषयक गरजा पूर्ण होतात आणि शरीर बलवान होतं.

अन्नपचनाची प्रक्रिया सुरू असताना म्हणजे जेवणानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी प्याल्यास पाचक-अग्नीवर परिणाम होऊन पचनप्रक्रियेमध्ये अडथळा येतो. त्यातून अन्नपचन आणि पर्यायाने शरीर-पोषण व्यवस्थित होत नाही. आहारापासून शरीरपोषक असा आहाररस बनण्याऐवजी आम हा विषासमान विकृत रस तयार होऊन शरीरात रोगनिर्मिती होऊ शकत असल्यामुळे जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिणे विषासमान मानले आहे.

आता प्रश्न असा पडतो की मग जेवताना पाणी केव्हा प्यावे, तर ते जेवणाच्या दरम्यान अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे दोन-तीन छोट्या घोटांच्या प्रमाणात घ्यावे. अशाप्रकारे प्यालेले पाणी हे अमृतासमान काम करते, असं मानलेलं आहे. जेवणाच्या दरम्यान अगदी थोडं थोडं गरमसर पाणी प्यायल्याने अन्नाचा जिभेवरील चिकटा दूर होतो. अन्नाची योग्य ती चव कळते, भूक वाढते, यामुळे जेवणादरम्यान थोडं थोडं पाणी पिणं योग्य मानलेलं दिसतं.

यावरून आपण पाणी केव्हा प्यावं, याबद्दल आपला आपण निर्णय घेऊ शकू...

Monday 15 June 2020

सूर्यास्तानंतर अन्नप्राशन करावे का?

सूर्यास्तानंतर अन्नप्राशन करावे का करू नये, या प्रश्नाचा आयुर्वेद प्रत्यक्ष विचार करत नाही. कारण आज ज्याप्रमाणे तांत्रिक उपलब्धीमुळे रात्र सुरू होणं लांबलं आहे त्या स्थितीचा प्राचीन काळी अभाव असल्यामुळे अंधार पडण्याच्या आधी जेवणे साहजिकच असावे. तेव्हा त्या काळात हा प्रश्नच उद्भवला नसावा.

दिवसाची सुरूवात ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे दोन तास सांगितलेली असल्यामुळे झोपण्याची वेळ सामान्यपणे सूर्यास्तानंतर दोन तासाची मानता येते. जेवणानंतर ताबडतोब झोपू नये, सुमारे तासा-दिडतासाचा अवकाश घ्यावा, अशाप्रकारची सूचना आयुर्वेदात असल्यामुळे सूर्यास्तानंतरच्या साधारण तासाभराच्या काळात रात्रीचं भोजन घेतलेलं योग्य व्हावं, असं अनुमान काढता येतं.

Saturday 13 June 2020

लङ्घन-आयुर्वेदोक्त इण्टरमिटण्ट फास्टींग

सध्या निरनिराळ्या प्रकारच्या भोजनपद्धती लोक वापरात आणत आहेत. यामध्ये कोणती चांगली, कोणती वाईट, याचा निष्कर्ष ज्याने-त्याने स्वतः काढणं उत्तम पण एक आयुर्वैद्यकाचा अभ्यासक म्हणून माझी भूमिका मांडण्याचा प्रसंग आल्यामुळे या विषयीचं माझं चिंतन व्यक्त करतो.

आयुर्वेदाने जीवनातल्या आहार आणि विहार या दोन्ही गोष्टींचा प्राधान्याने विचार केला आहे. आयुर्वेदाचा असा विश्वास आहे की योग्य आहार-विहारामुळे व्यक्तीला रोग होण्याची शक्यता फारच कमी होते. अशा योग्य आहार-विहार-पालनानंतरही नैसर्गिक कारणांमुळे किंवा आघातादि बाह्य कारणांमुळे व्यक्तीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्या रोगावस्थेला दूर करण्यासाठी त्यावरील चिकित्सेचा विचारही आयुर्वेदामध्ये केलेला आहे.

आयुर्वेद शरीरातील अग्नीला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व देतो. किंबहुना शरीर रोगग्रस्त होण्यापाठी या अग्नीची विकृतावस्था कारणीभूत असते अशीच त्याची मान्यता आहे. शरीरात अनेक प्रकारचे अग्नी असले तरी मुख्य आणि आपल्या सद्य विषयाशी संबंधीत अग्नी म्हणजे पाचकाग्नीचा आपण विचार करू.

या पाचकाग्नीचं मुख्य कार्य म्हणजे अन्नाचं पचन करणं, या प्रक्रियेपासून अन्नरस तयार करणं आणि त्याद्वारे शरीराचं पोषण करणं. हा पाचकाग्नी जितका साम्यावस्थेत असतो, तितकं पाचनकार्य योग्य होतं आणि शरीराचं योग्य त्या प्रमाणात पोषण होतं. यामध्ये महत्त्वाचा भाग असा की या पाचकाग्नीचं स्वतःचं पोषण आपण खाल्लेल्या अन्नातून होत असतं, आणि आपण जे अन्न खातो, त्यातून हा अग्नी पोषित होत असल्यामुळे, त्या अग्नीमध्ये आपण सामान्यपणे जे अन्न खातो ते सहजपणे पचवण्याची क्षमता निर्माण होते. असं असल्यामुळे आपल्या सवयीच्या अन्नापेक्षा वेगळं अन्न खाल्यावर (जोवर आपल्या अग्नीला त्या प्रकारच्या अन्नाची सवय होत नाही तोवर) काही वेळा काहींना पोट बिघडल्याचा अनुभव येतो. एकदा का आपला अग्नी त्या नव्या प्रकारच्या अन्नाशी सामायिक झाला की तो त्या अन्नाचं पचन करण्यासही सक्षम होतो मात्र त्यासाठी काही काळ द्यावा लागतो. तो काळ व्यक्तीसापेक्ष असेल. त्यास निश्चित गणित नाही.

या अग्नीमध्ये नियमित अन्नपदार्थ पडत असल्यामुळे या अन्नपदार्थांतील घटकांचा त्यावर परिणाम होतो. हा परिणाम म्हणजे अग्नीची प्राकृत साम्यावस्था बदलून तो मन्द, तीक्ष्ण, विषम असा विकृतीयुक्त होतो आणि पुढे रोगास कारणीभूत होतो. साधारणपणे तेलकट, जड, अन्नामुळे अग्नी मन्द होतो आणि परिणामी पचनक्रिया बिघडून कफादि दोष वाढून निरनिराळे व्याधी निर्माण होतात.

बिघडलेल्या अग्नीला साम्यावस्थेत आणण्याच्या दृष्टीने आयुर्वेदोक्त लङ्घन कर्म हा चिकित्सेचा एक भाग आहे. अर्थात यासाठी व्यक्ती लङ्घन-कर्मासाठी योग्य अशी सुदृढ आणि लङ्घन सहन करण्याची शक्ती असलेली असावी लागते. लङ्घन कर्म म्हणजे एका अर्थी उपास. हा उपास करत असताना काही काळजी घ्यावी लागते. तो एकदम मोठ्याप्रमाणावर करू नये. उपवासासाठी शरीराला तयार करावं लागतं. सुरूवातीला हलक्या आहारातून अग्नीला लङ्घनासाठी तयार करावं लागतं, लङ्घन करत असतानाही त्याचं रक्षण करावं लागतं, तो फार कमी होणार नाही, विझणार नाही, हे बघावं लागतं. आवश्यक किंवा अपेक्षित काळ लङ्घन केल्यानंतरही अग्नीतील विकृती दूर झाल्याचं निश्चित करून अग्नी  सामान्य अन्नपदार्थांसाठी पुन्हा संधुक्षित करावा लागतो.

लङ्घन करताना आणि त्यानंतर अग्नी संधुक्षित करत असताना, चेतवत असताना, दोष विकृत होऊ नयेत, त्यांच्यावर नियंत्रण रहावं म्हणून गरम पाणी प्यावं. यामुळे कफ-पित्त नियंत्रणात राहून वाताचं अनुलोमन होतं. अग्नीच्या संपर्कात आलेले अपाचित, अर्धपाचित घटक या पद्धतीने चेतवलेल्या अग्नीसाठी इन्धनाचं काम करू लागतात आणि अग्नीची शक्ती वाढू लागते. हे पदार्थ पाचित झाल्यानंतर लङ्घन कर्म सुरू असलेला हा अग्नी आपल्याच शरीराच्या अयोग्य प्रमाणात वाढलेल्या धातूंकडे वळतो. अग्निमान्द्याचा परिणाम म्हणून शरीरात प्राधान्याने मेद धातू निर्मिती होत असल्यामुळे अग्नीची शक्ती वाढत असताना त्यासाठी इन्धन म्हणून अतिरिक्त प्रमाणात असलेला मेद धातू कार्यकारी होऊन त्यातून पुढल्या धातूंची निर्मिती किंवा पोषणव्यवस्था कार्यकारी होऊ लागते. परिणामी योग्य लङ्घन कर्मामधून अग्नीची साम्यावस्था, शरीराचं लाघव, पुढच्या धातूंची पुष्टी, शारीरिक बलवृद्धी आणि रोगनाशन असे प्रत्यक्ष उपयोग दिसतात.

लङ्घनकर्माने अग्नीची शक्ती वाढवून त्यास साम्यावस्थेत आणल्यानंतर वर उल्लेखल्याप्रमाणे तत्काळ सामान्य आहार घेऊ नये असं आयुर्वेद सुचवतो. मोठ्या काळाच्या लङ्घनानंतर अग्नीला अन्नरूपी इन्धन मिळालेलं नाहीये, याची जाणीव ठेवणं फार आवश्यक असतं. यासाठी या चेतवलेल्या अग्नीला आपल्या नेहमीच्या अन्नासाठी, ते पचवण्यासाठी सक्षम करावं लागतं. या प्रक्रियेला संसर्जन क्रम असं म्हणतात. संसर्जन क्रमामध्ये या संधुक्षित अग्नीला थोड्या थोड्या प्रमाणात अन्नरूपी इन्धन द्यावं लागतं. फळांचा रस, फळं, वरण, कढीसारखे पातळ, पचायला हलके, तूप टाकलेले मूगाच्या डाळीच्या खिचडीसारखे पदार्थ देत देत त्या अग्नीला द्रव अन्नापासून सुरू करून घन अन्नद्रव्यांसाठी तयार करावं लागतं, हाच संसर्जन क्रम होय.

हे काहीसं सामान्य वर्णन आहे. यातून सध्याच्या इण्टरमिटण्ट फास्टींग या पद्धतीचं मूळ असलेल्या लङ्घन कर्माची थोडीफार तोंडओळखच होईल. उपरोल्लेखिताप्रमाणे योग्य ती काळजी घेऊन आपल्या शक्तीचा विचार करून योग्य त्या संसर्जन क्रमाचा अंगिकार करून लङ्घन कर्माचा अवलंब करण्यात आयुर्वेद शास्त्राचा नक्कीच प्रत्यवाय नाही मात्र कोणत्याही प्रकारचा अतिरेक करू नये कारण अति सर्वत्र वर्जयेत्। हे सूत्रही आरोग्याच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं आहे.

Sunday 7 June 2020

पृथ्विराजरासो काव्यातील पोस्टच्या निमित्ताने...

चंद बरदाई या पृथ्वीराज चौहानाच्या भाटाने पृथ्वीराजाच्या मृत्यूनंतर पृथ्वीराजरासो नावाचं काव्य रचलं. या काव्यात त्याने पृथ्वीराजाला काव्यगत न्याय देण्यासाठी उपरोल्लेखित प्रसंग रचला. इतिहासाच्या कसोटीवर तो सत्य ठरत नाही पण पराभूत मनाला सावरायला मदत करतो. त्याचं तितकंच प्रयोजन! पृथ्विराजाकडे असलेलं शब्दवेधी बाण मारण्याचं कौशल्य आणि त्याआधारे त्याने महंमद घोरीचा केलेला वध, हा या काव्यातील प्रसंग, सध्या कायप्पावर फिरतोय आणि काही लोकं तो सत्य मानतायत. यासंबंधी मनात आलेले विचार इथे उधृत करतोय - 

चंद बरदाईच्या पृथ्विराजरासोमधल्या या प्रसंगात अडचण ही वाटते की अशा काव्यगत न्यायातून युद्धातल्या पराभवानंतर वाटेला आलेल्या परिणामांची योग्य चिकित्सा होत नाही. स्वतःच्या मूर्खपणामुळे पत्कराव्या लागलेल्या मृत्यूला गौरवल्यामुळे केलेल्या मूर्खपणावर पडदा पडतो. माझ्या मते हेच टाळणं आवश्यक असतं.

पहिल्या वेळी पराभव झाल्यानंतर क्षमा करून सोडून दिलेला महंमद घोरी पुन्हा सैन्य घेऊन येतो हे बघताच पृथ्वीराजाने त्याला क्षमेसाठी नालायक ठरवून दुस-या वेळच्या पराभवानंतर आततायी ठरवून त्याचा वध करणं अपेक्षित होतं. त्याऐवजी पृथ्वीराज घोरीला सोळा वेळा क्षमा करत असेल तर ती त्याची सद्गुणविकृतीच होती. कल्पना करा, सोळा वेळा पराभवाच्या अपमानात होरपळलेल्या घोरीला जेव्हा सतराव्या प्रयत्नात पृथ्वीराजाचा पराभव करता आला तेव्हा त्याने मारूनच टाकलंय, कारण हाती आलेल्या शत्रूला क्षमा केल्यावर तो कसा उलटू शकतो, हे त्याने स्वतःच्या उदाहरणातूनच पाहिलंय. त्याने पृथ्वीराजाने केलेली चूक स्वतः करण्याचा विचारही केलेला नाही. पण ही क्षमा करण्याची, अभयदानाची सद्गुणविकृती आपण पुढेही दर्शवतंच राहिलो. मग ते प्रतापराव गुजर असो किंवा महात्मा गांधी. 

इतिहासातून योग्य तो धडा न घेता आपण या सद्गुणविकृतीने आपलाच घात करून घेत आहोत, हेच वास्तव आहे.