Friday, 25 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (१)

'तो' आणि 'ती'
------------------
प्रथितयश आणि दिडशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असणार्‍या विद्यापीठाचा परिसर आणि त्यातला तितक्याच वर्षांची परंपरा असणारा विभाग. विभागान्तर्गत सुरू असलेले अनेक विषयांचे पाठ्यक्रम आणि त्यांचे त्यांचे वर्ग. गजबजलेला माहौल आणि अशा गजबजलेल्या ठिकाणी असतात ती दोघं, 'तो' आणि 'ती'.
ती, विभागामधली टॉपर, आधीच्या सगळ्याच परीक्षांमध्ये अव्वल! एक्स्ट्राकरिक्युलर्स मध्येही आघाडीवर, वक्तृत्व-स्पर्धा, नाट्य-स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा यात बक्षीसं मिळवणारी. कुशाग्र बुद्धी असलेली, त्या बुद्धीचा योग्य उपयोग जाणणारी आणि तो तसा नेहमीच करणारी. स्वतंत्र विचारांची आणि ते विचार योग्य शब्दात आणि कृतीत व्यक्त करणारी. अत्यंत देखणी, विभागातच नाही तर विद्यापीठातही उठून दिसणारी. मैत्रिणींच्या गराड्यात वावरणारी ती होती मनस्वी कलाकार, पण कलेलाही शास्त्राच्या काटेकोरपणे जोपासणारी.
तो, तसा विभागात नवखाच. विभागाच्या विषयाशी संबंधित पण स्वतंत्र शास्त्राचा पदवीधर व्यावसायिक. स्वतःचा खाजगी व्यवसाय सांभाळून आवडत्या विषयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी छोटा, वार्षिक अभ्यासक्रम घेऊन विभागात दाखल झालेला. बहु आयामी व्यक्तिमत्त्व असलेला, व्यासंगी, वाद-विवादपटु आणि वक्ता. देखणा नाही म्हणता येणार पण सुदृढ आणि वर्षानुवर्षांच्या व्यामायाने कणखर, रफ-टफ बनलेला. सृजनशील, अगदी आपल्या शास्त्रालाही कलेप्रमाणे व्यवसायात योजणारा.

ती दोघं वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असल्याने एकत्र शिकायला नव्हते, त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष ओळख असायचेही कारण नव्हते पण एकाच विभागामध्ये विद्यार्थी असल्याने काहीशी तोंड-ओळख होती. त्यातही इतर विद्यार्थ्यांपेक्षा वयाने सिनिअर असल्याने 'तो' तसा कुणाच्याही लक्षात यायचाच. तिच्याबद्दल माहिती नसणारा विद्यापीठातही विरळाच!

..............................
ती - भाग १
----------------

असाच एक रविवार. विभागिय सेमिनारचा दिवस. विद्यापीठात शुकशुकाट पण विभागात भारी वर्दळ. दोन दिवसांच्या सेमिनारचा समारोपाचा दिवस. आज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सेमिनारमध्ये 'ती' मनोगत सादर करणार होती मग फारशी सवय नसतानाही 'ती' साडी नेसून आलेली. अधीच उशीर झालेला आणि विद्यापीठात येणार्‍या बसेस रविवारच्या बंद. गेट पासून चालत येताना साडी सांभाळून भरभर चालणं कठीण होत असताना तिची चिडचिड होत होती आणि त्यातच मनोगत सादरीकरणाचं दडपण होतंच. इतक्यात शेजारी बाईक येऊन थांबली. निर्मनुष्य परिसरामुळे तिची थोडी घबराटच उडाली पण तेवढ्यात हेल्मेटची काच वर उचलली गेली आणि तिला 'तो' दिसला. त्याने हसून विचारलं, "उशीर झालाय ना, चल बस, जाऊ पटकन!"

एरवीही पंधरा-वीस मिनिटं चालायला लागणार्‍या अंतराला आज साडीमुळे जास्तीच वेळ लागला असता म्हणून तिने त्याला होकार तर दिला पण साडीमुळे ती एका बाजुला पाय घेऊन बसली. एरवीची दोन्ही बाजूंना पाय सोडून बसण्यातली सुविधा तिला आज मिळाली नाही. मग तिला सतत पडण्याची भीती वाटत राहिली. ती पुरेशी व्यवस्थित बसल्याचं समजल्यावर त्याने सफाईदारपणे बाईक विभागाच्या दिशेने सोडली. वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताना मधूनच तिला तिचा बॅलन्स जातोय की काय असं वाटलं. आधारासाठी तिने त्याचा खांदा धरला. पण लगेच सोडला. बाईक वेगात पुढे जात होती. तिच्या मनात येऊ लागलं, आता पुढच्या वळणापासून स्पीड ब्रेकर्स आहेत. आत्ताच सावरून बसायला हवं. कुणास ठाऊक याच्या मनात काय आहे. स्पीड ब्रेकर आला आणि त्याने बाईकची गति हळूवारपणे नियंत्रित केली आणि पार झाला. पुढचे तिन्ही स्पीड ब्रेकर्स असे पार झाले जणु नव्हतेच ते तिथे. मग तिचा बाईकच्या मागे हँडलला धरलेला हातही सैलावला. आता तिला स्वतःलाही सैलावल्यासारखं वाटू लागलं. पुढच्या तीन-चार मिनिटात विभागाच्या सेमिनार हॉलच्या बाहेर बाईक थांबली आणि त्याच्या खांद्यांचा आधार घेत ती खाली उतरली.

साडी सावरून त्याच्याकडे बघत ती थँक्स म्हणतेच आहे की त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडताना तिने ऐकलं, छान दिसतेयस तू आज साडीत! पळ लवकर वाट बघत असतील तुझी. मी येतो स्टँडवर बाईक लाऊन, आणि झटक्यात एक वळण घेऊन तो गेला. तिला आलेलं बघताच तिच्या मैत्रिणींनी तिला गराडा घातला आणि सगळ्यांबरोबर ती सेमिनार हॉल मध्ये गेली. सेमिनार दरम्यान तिने दोन-तीनदा मागे वळून तो कुठे दिसतोय का ते पाहिलं पण गर्दीत तिला तो कुठे दिसलाच नाही. ती ही नंतर विविध संशोधन विषयांच्या प्रेझेंटेशन्समध्ये बुडून गेली.

प्रत्येक पेपरच्या प्रेझेन्टेशनदरम्यान अभ्यासूपणे तिने स्वतःचे असे मुद्दे काढले होते, तशी सवयच होती तिला. कुठलीही कृती करण्यापूर्वी तिच्या डोक्यात तिचा अ‍ॅक्शन-प्लान तयार असायचा. आज तर अख्ख्या विभागाच्या विद्यार्थ्यांना ती देशभरातील मातब्बर संशोधकांसमोर रीप्रेझेण्ट करत होती. त्यामुळे मनोगतात व्यक्त करण्याची वाक्यच्या वाक्य तयार करण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. आज चुकूनही चुकून चालणार नव्हतं. विभागप्रमुखांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या तिच्याकडून. या सगळ्यांचंच काहीसं दडपण आलं होतं तिला आणि ती ते कुणाशी शेअर करण्याच्या परिस्थितीतच नव्हती. तिच्या मैत्रिणी समारोपाच्या समारंभाची तयारी करण्यात व्यस्त असल्याने तिला या दडपणाला स्वतःच तोंड देणं भाग होतं.

क्रमशः

No comments:

Post a Comment