Tuesday 27 December 2011

पुस्तक परिचय - ३: रान-> जी.ए. कुलकर्णी

पुस्तक परिचय - ३ : द ट्रीज (रान) - कॉनरॉड रिक्टर (अनु. जी.ए. कुलकर्णी)

आज जी.ए. कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं 'रान' वाचलं. 'कॉनरॉड रिक्टर' यांच्या १९४० सालच्या 'द ट्रीज' या कादंबरीचा हा अनुवाद आपल्याकडे साधारण ७०च्या दशकात मराठीत प्रसिद्ध झाला.

पेनसिल्व्हानिया मधून दुष्काळामुळे स्थलांतरीत झालेल्या ल्युकेट कुटुंबाची गोष्ट म्हणजे 'द ट्रीज' किंवा 'रान'! पुस्तकात सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, काही माणसं खा
र्‍या वार्‍याचा वेध घेत समुद्राच्या दिशेने सरकतात तर काही झाडा-झुडपांच्या ओढीने जंगलाकडे जातात. ल्युकेट कुटुंबीय दुसर्‍या प्रकारामध्ये मोडतात. हे संपूर्ण कथानक हे जंगलामध्ये, नव्या वसाहती उभारल्या जाण्याच्या सुमारास घडतं. जंगलामध्ये वसाहती करणार्‍यांच्या वाटेला येणारे खडतर जीवन चित्र आपल्यासमोर उलगडले जाते. इथे निसर्ग माणसांवर संकटे आणतो आणि निसर्गच त्यांना मायेची उब देतो.

संपूर्ण कादंबरीत जी. ए. कुलकर्णी यांना साजेसा एक गूढ अंत:प्रवाह आहे. पुढे काय होईल याची उत्कंठा ही आहे. रानात, झाडाझुडपात राहणा
र्‍या ल्युकेटस कुटुंबामधल्या प्रत्येकाचा स्वभाव या अनुवादात उत्तम प्रकारे व्यक्त झाला असंला तरीही लक्षात राहते ते अदम्य इच्छाशक्ती आणि स्वाभाविक कणखरता यांचं प्रतिक असलेली ल्युकेट कुटुंबामधली थोरली मुलगी, सेर्ड! स्वत: लहान असूनही आईविना पोरक्या झालेल्या आपल्या सर्व भावन्डान्चा ती ज्या पद्धतीने सांभाळ करते आणि वडिलांच्या परागंदा होण्यानंतरही ज्या तडफेने संसार चालवते त्याचे चित्रण वाखाणण्यासारखे झाले आहे. कथेच्या अखेरीस तोपर्यंत आपल्या आई-वडिलांचा संसार चालवणारी सेर्ड स्वत:चा संसार ज्या पद्धतीने करताना दिसते त्यावरून आपणही तिच्या भावी उज्ज्वल भविष्यकाळाची कामना करत पुस्तक संपवतो. 
 
कॉनरॉड रिक्टर यांनी लिहिलेल्या त्यांच्या 'अवेकनिंग लँड' नावाच्या ट्रायलॉजीतलं 'द ट्रीज' हे पहिलं पुष्प होतं आणि ते मूळातंच फार टोकदारपणे सादर झालेलं होतं. मराठी वाचकांसाठी यातला टोकदारपणा जी. ए. तितक्याच समर्थपणे दर्शवण्यात यशस्वी झाले होते असं नक्कीच म्हणता येतं. मला कल्पना नाही की या ट्रायलॉजीमधली पुढची 'द फिल्ड्स' आणि 'द टाऊन' यांची भाषांतरं जी. ए. कुलकर्णींनी किंवा कुणीही केलेली आहेत का पण असो अगर नसो, भाषांतरीत अथवा मूळात या मालिकेतील पुढली पुष्पं जरूर मिळवून वाचण्यासारखी असतील यात शंकाच नाही. 

Sunday 25 December 2011

पुस्तक परिचय - २: 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' - प्रतिभा रानडे

मला असं वाटायचं की भारतात आणि विशेषत: मराठीत जागतिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण असं लेखन वृत्तपत्रांतील सदरापुरतंच मर्यादित असल्याचं जाणवतं पण याला छेद गेला प्रतिभा रानड्यांच्या 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' या पुस्तकाच्या वाचनातून!


आपल्याच देशाच्या जमिनीच्या एका तुकड्यातून जन्मलेल्या पाकिस्तानची ही गोष्ट! पाकिस्तान, ही भारताला चुकवावी लागलेली स्वातंत्र्याची किंमत आहे. आधी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान या स्वरूपात आणि नंतर त्यांच्यातून फुटून निघालेल्या बांगला देश या स्वरूपात. भारताबद्दल पराकोटीचा द्वेष असलेला हा देश आपल्याशी नेहमीच शत्रुत्व ठेवून वागलेला आहे. ४ वेळा प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग त्याने भारतावर लादलेला आहेच पण भारताशी पुढची हजारो वर्ष प्रत्यक्ष वा छुपे युद्ध करण्याची आत्यंतिक इच्छा त्याच्याकडून जाहीरपणे व्यक्त झालेली आहे. असं असूनही आपल्या या आक्रमक शेजार्‍याविषयी आपल्याकडे राजनैतिक माहितीची वानवा असते.


आपल्याला काही अंशी ऐतिहासिक ज्ञान असते पण सद्य परिस्थितीच्या आकलनासाठी ज्या राजकीय परिस्थितीची आपल्याला कल्पना असणे आवश्यक असते ती आपल्या कोणत्याही माध्यमातून एकत्रितरीत्या आपल्याला मिळत नाही आणि मग त्यामुळे ही राजकीय, सामाजिक आणि वैचारिक समस्या किती खोल रुजलीय हेच आपण निश्चित करू शकत नाही. यामुळे या समस्येचे समाधान शोधणे तितकेच कठीण बनते.


अशा महत्त्वाच्या विषयावरील पुस्तकासाठी प्रतिभा रानड्यांसारख्या लेखिकाच योग्य ठरतात. त्यांचा अशा राजनैतिक विषयांचा अभ्यास आहेच पण त्या बरोबरच त्या स्वत: अनेक वर्ष अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा देशात राहिलेल्या आहेत. तेथील समाज जीवनाचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केलेला आहे, तिथल्या लोकांशी त्यांचा गेली अनेक वर्ष संवाद आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून जवळपास २००९ पर्यंतच्या कालाचा आढावा त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. अनेक पुस्तके आणि वृत्तांकनांचा वापर करून, मुलाखतींचा आणि राजकीय व्यक्तिंच्या चरित्रांचा अभ्यास करून, त्यात स्वत:च्या संशोधनाची जोड देवून प्रतिभा रानडे यांनी पाकिस्तान ची ऐतिहासिक, राजनैतिक आणि सामाजिक कहाणी आपल्यासमोर उलगडलेली आहे.


पाकिस्तानची ही कहाणी आपल्या समोर येते ती तिथल्या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या माध्यमातून! झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक़, मोहम्मद खान जुनेजो, बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ, परवेझ मुशर्रफ आणि आसिफ झरदारी यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत प्रतिभाताई आपल्याला 'पाकिस्तान' शिकवतात. पाकिस्तानात न रुजलेली लोकशाही, सतत पाठपुरावा करणारी लष्करशाही, पाकिस्तानात रुजलेला कट्टर इस्लाम आणि त्याचा तिथल्या समाजावर झालेला परिणाम या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीतून आपल्याला समजतो.


हिंदूंच्या द्वेषातून निर्माण झालेल्या देशाला स्वत:ची अस्मिता शोधण्यासाठी घ्यावा लागलेला इस्लामचा सहारा यातूनच आपल्याला स्पष्ट होतो. यामधून कोणताही राजकीय नेता सुटू शकलेला नाही. कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीत पाकिस्तानात तीनच हुकुमाचे पत्ते खेळले गेले आहेत.... Allah, Army आणि America! या तीन A's मुळे पाकिस्तानला जाणण्यासाठी परिस्थितीचा तीन स्तरांवर विचार करावा लागतो हे प्रतिभाताईंनी फारच वेचक आणि वेधकपणे या पुस्तकातून आपल्याला समजावले आहे.


आर्य चाणक्यांनी सांगितलेच आहे की शत्रूवर मात करण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. भारताच्या या परंपरागत शत्रू विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर प्रतिभा रानडे यांच्या 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' या पुस्तकाला पर्याय नाही. 

Tuesday 20 December 2011

खवय्यांची सोय - १

"आज जग हे 'ग्लोबल व्हिलेज' झालेलं आहे", असं एक पेटंट वाक्य सध्या सगळीकडेच ऐकू येतंय. जगाचं माहित नाही पण दळणवळणातल्या क्रान्तिमुळे महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतात गावोगावी एकमेकांशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. किंबहुना मुंबईपुरता विचार केला तर महाराष्ट्रच नाही तर अख्खा भारत मुंबईशी जोडला गेला आहे. कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने कानाकोपर्‍यातून माणसं मुंबईत येतात, दोन-चार दिवस राहतात, आपली कामं उरकतात आणि परततात. राहण्याची सोय कुठेही होऊ शकते पण अडचण नेहमीच खाण्याची होते असं मला वाटतं. आपल्याला साजेहा, आवडणारा आहार आपल्याला कुठे मिळेल हे कुणी आधी सांगितल्याशिवाय अचानक आपल्याला कळूच शकत नाही. म्हणून म्हंटलं, आपल्या जगभरातील मित्रांसाठी इथे माझ्या आवडत्या काही ठिकाणांची माहिती देऊ या!

मी जन्मापासून निरामिष आहार ग्रहण करणारा आणि त्यामुळे माझ्या आवडीही तशाच तेव्हा त्याच प्रकारच्या खानावळीची माहिती तुमच्याबरोबर वाटतोय. या जागेची माहिती कदाचित अनेकांना आधीच असेल पण तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

मी प्रामुख्याने मुंबई इथे आहे आणि माझ्या लहानपणी ४-६ महिन्यातून एकदा हॉटेलिंगसाठी घराबाहेर जेवायचे प्रसंग यायचे. त्यातही माझ्या खाण्याचे प्रमाण पाहून माझ्या घरच्यांनी घरच्या घरीच माझी सोय लावणे किती उपयुक्त ठरते ते खूप आधीच जाणले होते. असं असतानाही अनेक वर्षांपूर्वी काही कारणाने एका खानावळीत जाण्याचा योग आला. त्याकाळी बाहेर खायचं म्हणजे उडप्याकडेच खायचं असंच असायचं आणि एकूणच एक डोसा, २ इडल्या एवढ्याने माझी भूक कधीच शमायची नाही नि माझा तिथेच त्रागा सुरु व्हायचा. तरीही या उडप्याकडेच जाऊया असं तीर्थरूपांचं म्हणण पडलं आणि अस्मादिक तिथे स्थानापन्न झालो. जरा घुश्श्यातच असल्याने आजूबाजूला न बघता मी तडक दिसेल त्या पहिल्या खुर्चीत मान खाली घालून बसलो.

आजूबाजूला प्रचंड गडबड उडालेली आणि अनेक मुले इकडे तिकडे फिरत होती पण मी मात्र मान वर करून कुठे बघतच नव्हतो. मला या उडप्याकडे घेऊन येण्याबद्दल वडिलांवर चिडून मी तसाच फुरगंटून बसलेलो असताना माझ्यासमोर मोठ्ठ केळीच पान अंथरलं गेलं. मुंजीचं जेवण तेव्हढ केळीच्या पानावर जेवलेल्या मला ते अचंबित करणारं होतं. तेव्हा पहिल्यांदा आजूबाजूला बघितल्यावर सगळ्यांच्याच समोर वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं केळीच्या पानाचं ताट दिसलं. वडिलांनी हसून माझ्या पानावर पाणी ओतलं आणि ते पुन्हा एकदा धुतलं. मला हे सारं नवीन होतं. अचानक त्या स्वच्छ पानावर मीठ, लोणचं, तीन प्रकारच्या भाज्या, रस्सम, सांबार, दही, ताक आणि पापड या व्यंजनांनी आपापलं स्थान ग्रहण केलं. एक वाटी पायसम (खीर) ची आली नि पुढच्याच क्षणाला छान तूप लावलेली गरम गरम पोळी माझ्या ताटात पडली आणि माझा राग कुठल्याकुठे विरघळून गेला. हव्या असतील तर तिथे
टमटमीत  फुगलेल्या पुर्‍याही उपलब्ध होत्या. माझ्या चेहर्‍यावर "अजि म्या ब्रह्म पाहिले"से भाव उमटले असावेत कारण वडील माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसून म्हणाले काळजी करू नकोस ही अमर्यादित भोजन थाळी आहे. 

या घटनेला आज २५ वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे पण माझ्या आठवणीतली ही खानावळ अजूनही तशीच आहे. तसंच केळीचं पान, तसेच रस्सम - सांबार, तशाच भाज्या, गरम गरम पोळ्या नि भात आणि त्याच क्वालिटीचा पापड..... आता गोडाचा पदार्थ मात्र एकदाच मिळतो किंवा अतिरिक्त पैसे देऊन घ्यावा लागतो.

तेव्हा मित्रानो, असा तृप्तीदायक अनुभव घ्यायचा असेल तर जरूर भेट द्या -
"रामा नायक यांचे उडुपी श्री कृष्ण बोर्डिंग हाऊस"
माटुंगा (सेन्ट्रल) स्टेशन समोर, माटुंगा (पूर्व), मुंबई.

स्टेशन समोरच्या या इमारतीत शिरताच स्वच्छता राखल्याचे दिसते. भिंतींवर गीता - गीताई चे श्लोक लिहिलेले आढळतात. मराठी, कोकणी आणि कानडी मुले आपापली नेमून दिलेली कामे झटपट करताना दिसतात. खूप गर्दी - गोंधळातही बर्‍यापैकी सौजन्याने व्यवहार होतो.


इथे मर्यादित थाळी - रु. ४५/- (अधिक तुम्हाला हवी असल्यास एक्स्ट्रा व्यंजने त्यांच्या किमती प्रमाणे) आणि अमर्यादित थाळी - रु. १२०/- अशा आपल्याला परवडणार्‍या दरात अप्रतिम तृप्ती होते. 

टीप -
  • छायाचित्रे आंतरजालावरून साभार
  • उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग व्यवस्थापनाने दरांमध्ये बदल केला असू शकतो.
  • ही जाहिरात नाही. 

Sunday 18 December 2011

पुस्तक परिचय : 'कोल्ड स्टील' - टीम बुके, बायरन उसी


राम राम दोस्तहो!

मागच्या वेळेप्रमाणे आणखी एका भन्नाट पुस्तकाची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे.

सध्या जमाना ग्लोबलायझेशनचा आहे. आपली समज, आपला व्यवहार, व्यवसाय आणि अगदी आपलं साहित्यही गेली अनेक वर्ष या ग्लोबलायझेशन पासून अस्पर्श्य राहिलेलं नाही. असं असूनही आत्ता कुठे मराठीत हे वारं शिरू लागलंय. सातासमुद्रापार होणारी मराठी सम्मेलनं कदाचित याचीच द्योतकं असतील.

तसं म्हटलं तर मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांच्या कॉर्पोरेटस, त्यांचे व्यवहार या संदर्भात अच्युत गोडबोले, गीता पिरामल (अनुवादित) इ. लेखकांनी मराठीत लिखाण सुरु केलेलं आढळतं पण जागतिक स्तरावर ज्या ताज्या घडामोडींबद्दल, गोष्टींबद्दल चर्चा आणि ती ही हिरहिरीने होते, त्याबद्दल मराठी भाषेत काही फारसं आलेलं दिसत नाही, असा जो माझा एक समज होता, त्याला नुकताच छेद दिला, सुभाष जोशी यांनी मराठीत अनुवादित केलेल्या टीम बुके आणि बायरन उसी या लेखक द्वयीने लिहिलेल्या "कोल्ड स्टील" या पुस्तकाच्या वाचनाने!
लक्ष्मी मित्तल आणि जोसेफ किंश्च (आर्सेलरचे चेअरमन)

काही वर्षांपूर्वी भारतीय वंशाच्या लक्ष्मी मित्तल या लंडन स्थित अग्रगण्य पोलाद व्यावसायिकाने आपल्या मित्तल स्टील या कंपनीतर्फे युरोपातील सर्वाधिक पोलाद निर्मिती आणि विक्री करणारी आर्सेलर ही कंपनी विकत घेण्यासाठी बाजारात आक्रमकपणे बोली लावली होती. खरं तर ही मुक्त बाजारपेठेतील एक सर्वसामान्य घटना होती पण हे एखादं आक्रीतच घडलेलं आहे या सारखी प्रतिक्रिया तेव्हा जगभरात उमटली. आर्सेलर ने या प्रस्तावाला सर्व स्तरावर विरोध केला पण हा विरोध वंशवाद आणि अहंभाव यावर आधारित होता. युरोपियानांची पोलाद व्यवसायातील अग्रणी कंपनी, कोण कुठला भारतीय मित्तल विकत घ्यायला बघतोय हे आर्सेलर च्या सिईओ गी डोल आणि संचालक मंडळातील युरोपियन सभासदांना सहनच झालं नाही. मित्तल च्या प्रस्तावावर साधक बाधक चर्चा न करताच आर्सेलर ने त्याच्या विरुद्ध (कॉर्पोरेट) युद्ध पुकारले. 


या युद्धात दोन्ही गटांनी जी खलबतं केली, एकमेकांविरुद्ध जे डाव-प्रतिडाव टाकले, त्यात कोण कोण सहभागी झाले, त्यात धोरणांची आखणी कशी झाली, कुणी आणि कशी त्याची अंमलबजावणी केली, त्यासाठी मोठ्याप्रमाणात पैसा कसा गोळा केला आणि तो कसा, कोणावर खर्च केला, आपल्याला हवा तो परिणाम साधण्यासाठी गोष्टी कोणत्या थरावर गेल्या, दोन कंपन्यांच्या 'मर्जर' ची घटना अनेक देशांच्या एकमेकान्बरोबरच्या राजनैतिक संबंधांवर कसे परिणाम करून गेली या आणि अशा अनेक गोष्टींचा लेखाझोका म्हणजे "कोल्ड स्टील" होय!

या कॉर्पोरेट लढाईची रम्य नि उत्कंठावर्धक कथा वाचत असतानाच लेखक आपल्याला कॉर्पोरेट गव्हरनन्स , जागतिक शेअर मार्केट व्यवहार, मर्जर आणि एक्विझिशन प्रक्रिया, त्यातील आर्थिक गुंतागुंत इ. आजपर्यंत अनभिज्ञ अशा विषयांमध्येही सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतात.

असं म्हटलं जातं की मराठी माणूस नुकताच कुठे भारतीय शेअर बाजारात उतरू लागला आहे. त्याच वेळी लक्ष्मी निवास मित्तल या भारतीय पास-पोर्ट बाळगणा~या उद्योजकाने जागतिक बाजार-पेठेतल्या दिग्गज पोलाद व्यावसायिकांशी लढा देवून आर्सेलर या जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपनीला विकत घेण्याची "कोल्ड स्टील" मध्ये वर्णन केलेली सत्य-घटना ऊर अभिमानाने भरून टाकते.

सुभाष जोशी यांनी केलेलं या पुस्तकाचा मराठी अनुवाद हा सगळा इतिहास कुठेही अडखळून न जाता आपल्यासमोर मांडतो.


तेव्हा "कोल्ड स्टील" वाचाच!

Friday 16 December 2011

पुस्तक-परिचय : 'द काईट रनर' - खालेद हुसैनी

एक फारच सुंदर पुस्तक!

आपल्या भारताप्रमाणेच हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला शेजारी देश म्हणजे 'अफगाणिस्तान'! आज प्रचंड अंतर्गत कलह आणि यादवीने होरपळून जात असलेल्या या देशाची म्हणावी तशी आपल्याला माहिती नसते. आज केवळ धर्माच्या नावाने आपण दूर सारलेला हा आपला शेजारी पारंपारिक दृष्ट्या आपल्या खूप जवळचा आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आपण त्या संबंधी माहिती घेण्याचंच टाळतो. देश पुस्तकी धर्माने बनत नाही तर जित्या-जागत्या माणसांनी बनतो हेच आपण विसरून गेलो आहोत आणि खालेद हुसैनींचा 'द काईट रनर' आपल्याला अशाच एका जित्या-जागत्या अफगाणी मुलाची, आमीरची कहाणी सांगतो.

आमीर हा एक उच्चभ्रू पश्तून मुलगा आणि 'द काईट रनर' ही त्याचीच गोष्ट! काळ अफगाणिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू व्हायच्या जरा आधीचा आणि आपल्यासमोर उलगडते आमीर आणि त्याचा हाजरा नोकर हसन यांची कहाणी! या कहाणीत पुढे आमीरचे वडील, त्याचा एक काका, हसनचे वडील आदि अनेक पात्रं येतात पण काही काळाने ही एकट्या आमीरची कहाणी न राहता अख्ख्या अफगाणिस्तानची कहाणी बनते आणि आपण अफगाणी लोकांच्या आणि पर्यायाने अख्ख्या अफगाणिस्तानच्या दु:खाचा अनुभव घेऊ लागतो.

कथानकात पतंगाच्या काटा-काटीचा प्रसंग फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. भारतातल्या गुजराती समाजाप्रमाणेच अफगाणिस्तान मध्येही पतंग उडवण्याच्या चढाओढीला सामाजिक स्थान आहे. या चढाओढीत जितके महत्त्व शेवटी उरणार्‍या विजेत्या पतंगाला आहे तितकेच सर्वात शेवटी कापल्या जाणार्‍या पतंगालाही आहे. विजेता आणि उपविजेता पतंग तिथे एखाद्या ट्रॉफी प्रमाणे घरी ठेवला जातो.

पतंग धावत जाउन उडवणार्‍या आणि या काटा-काटी मध्ये काटल्या गेलेल्या पतंगाच्या मागे तो पकडण्यासाठी धावणार्‍या मुलांना 'काईट रनर' म्हटलंय. अशाच एका 'काईट रनिंग'च्या प्रसंगी लहानग्या आमीरचं भावविश्व उध्वस्त होतं आणि पुढे ३०-३२ वर्षांनी एका 'काईट रनिंग'च्याच प्रसंगाने काही अंशी सांधलं जातं.


सुख किंवा आनंद नावाच्या पतंगाच्या मागे धावणार्‍या आयुष्य नावाच्या 'काईट रनर'ची खालेद हुसैनी यांची गोष्ट वैजयंती पेंडसे यांच्या सकस मराठी अनुवादाद्वारे सगळ्या मराठी भाषिकांना आवडेल अशीच आहे.

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

Thursday 15 December 2011

अखेरचा पाठ


शाळेत जायला नेहमीपेक्षा जरा उशीरच झालेला. तरी मी पाय ओढतंच चाललेलो. आज शाळेत मला मास्तरांची बोलणी खायला लागणार हे त्रिकालाबाधित सत्य होतं. कारण काल हॅमेल मास्तरांनी सांगितलेलंच होतं की उद्या ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत नि मला कृदन्तातलं ओ की ठो येत नव्हतं. आता चांगलंच उजाडलेलं. पक्षी बाजूच्या झाडींमधून चिवचिवत होते आणि पलिकडच्या मैदानात प्रशियाचं सैन्य संचलन करत होते. व्याकरणातील कृदन्तांच्या माहितीपेक्षा संचलनाचं ते दृश्य जास्त मनमोहक होतं पण मी माझ्या मनावर ताबा ठेऊन शाळेच्या दिशेने जाऊ लागलो.
शाळेच्या रस्त्यावर शहर सभागृहावरून जाताना मला तिथल्या फळ्यावरची बातमी वाचणारी गर्दी दिसली. गेल्या दोन वर्षांपासून हा फळा आम्हाला वाईट बातम्या पुरवत होता - हरलेल्या लढाया, जेत्यांचे जाहिरनामे, मुख्य सैन्याधिकार्‍यांच्या नागरिकांसाठीच्या आज्ञा वगैरे वगैरे. मग मी चालता चालताच विचार करू लागलो, आज कोणती वाईट बातमी देतोय हा? याच विचारात जातच होतो की तिथे आपल्या मदतनिसांबरोबर उभ्या असलेल्या शिकलगार आणि घड्याळचीने मला हाक मारून म्हण्टलं, "अरे मुला, का इतका घाईने चालला आहेस? आता शाळेत अगदी आरामातच पोहोचशील की तू!"
मला वाटलं ते माझी मस्करी करत आहेत म्हणून मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला आणि हॅमेल मास्तरांची वाडी येईतो मला चांगलाच दम लागला.
एरवी शाळा सुरू असताना इथे एक प्रकारचा गोंधळ असतो. त्याचा आवाज पार दोन आळी पलिकडे पर्यंत ऐकू येतो. कधी पाढे म्हणण्याचा आवाज,  कधी कविता म्हणण्याचा आवाज तर  कधी संथा घोकतानाचा आवाज, अगदी जोरजोराने अभ्यास सुरू असतो. परिस्थिती अशी की आपले कान झाकून घेतल्याखेरिज तुम्हाला कधी कधी स्वतःचा आवाजही ऐकू येत नाही. त्यातच मास्तरांच्या हातची वेताची छडीही आवाज करत असते. कधी याच्या पाठीवर तर कधी त्याच्या. पण आज वातावरण काही वेगळंच होतं. मी कुणाच्याही लक्षात न येता आपल्या जागेवर जायच्या प्रयत्नात होतो पण त्या दिवशी अगदी सुट्टीचा दिवस असल्यासारखी शांतता होती. खिडकीतून मला माझे सहपाठी मित्र आपापल्या जागा पकडून बसलेले दिसले. हॅमेल मास्तर आपली छडी घेऊन त्यांच्या मधल्या जागेतून फिरताना दिसले. मग सगळ्यांसमोर मला वर्गात जाऊन बसावं लागलं. तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी किती घाबरलेलो असणार तेव्हा ते!
पण माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. हॅमेल मास्तरांनी माझ्याकडे बघितलं आणि मृदू स्वरात म्हणाले, "फ्रांजबाळा, आम्ही तुझ्याशिवायच वर्ग सुरू करत होतो. जा बस तुझ्या जागी."
मी उडी मारून माझ्या बाकड्यावर बसलो तेव्हा कुठे माझा थोडा जीवात जीव आला. मी पाहिलं की गुरूजींनी त्यांचा आवडता शेवाळी रंगाचा कोट चढवलाय, त्याखाली फ्रीलवाला शर्ट घातलाय आणि त्यांची काळी, कलाबुत केलेली छोटीशी टोपीही घातलीय. पण हे सारं तर ते फक्त शाळा तपासणीच्या दिवशी किंवा बक्षीस समारंभाच्या वेळेसच घालायचे! आज वेगळेपण केवळ यातच नव्हतं, ते जणू अख्ख्या शाळेतंच दाटून आलेलं. पण मला सगळ्यात जास्त आश्चर्याचा धक्का, जेव्हा एरवी रिकामी असलेली आमच्या वर्गातली पार मागची बाकडी काही गावकर्‍यांनी बसल्यामुळे भरलेली पाहिली, तेव्हा बसला. गावातील ती प्रतिष्ठीत मंडळी अगदी आमच्या सारखीच वर्गात बसलेली. आपल्या त्रिकोणी टोपीसह म्हातारबा हाऊजर, आमच्या गावचे माजी सरपंच, माजी पोस्ट मास्तर आणि इतर अशी अनेक जणं. सगळेच जण दु:खी वाटत होते. म्हातारबा हाऊजरने आपल्या समोर एक जुना स्वाध्याय उघडून ठेवलेला. त्यावर त्याचा तो पुराणकाळचा चष्मा ठेवला होता.
मी या सगळ्याबद्दल विचारच करत होतो की हॅमेल मास्तर आपल्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या नेहमीच्या गंभीर पण काहीशा मायाळू आवाजात म्हणाले, "मुलांनो, आज तुम्हाला माझा हा शेवटचा वर्ग असेल. बर्लिनहून आदेश आलाय अल्साक नि लॉरेनच्या शाळांमध्ये आता केवळ जर्मन भाषाच शिकवली जाईल. नवीन मास्तर उद्यापासून शिकवायला येईल. आपल्या फ्रेंच भाषेची ही शेवटची शिकवणी असेल. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका.
मला ते शब्द जणू तडिताघातासारखेच वाटले.
अच्छा! म्हणजे शहर सभागृहावर हीच बातमी लावली असणार!
फ्रेंच भाषेचा माझा शेवटचा वर्ग, पण का? मला तर जुजबी फ्रेंचही लिहिता येत नव्हतं अजून! आता मला ते कधीच शिकता येणार नाही! ते शिक्षण इथेच थांबणार? अरेरे! मला कितीतरी दु:ख होत होतं, मी माझा फ्रेंच भाषेचा पाठ वेळच्या वेळी शिकलो नव्हतो, त्यावेळी मी पक्षांची अंडी मिळवण्यासाठी, घसरगुंडीवर खेळण्यासाठी म्हणून वेळ वाया घालवला होता. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत मला माझी अभ्यासाची पुस्तकं मूर्खपणा वाटत होती, उचलून शाळेत आणण्यासाठी मोठा भार वाटत होती पण आता माझं व्याकरणाचं पुस्तक, माझं इतिहासाचं पुस्तक हे सर्व माझे जुने मित्र वाटत होते. त्यांची साथ सोडणं मला जीवावर येत होतं. हेच हॅमेल मास्तरांच्या बाबतीतही वाटत होतं. ते आता आम्हाला सोडून दूर जाणार आणि पुन्हा आम्हाला कधीच भेटणार नाहीत ही भावना मला त्यांचे नियम, त्यांच्या छड्या आणि त्यांचं वेळोवेळी आमच्यावर करवादणं विसरायला लावत होती.
बिचारे हॅमेल मास्तर, आज त्यांचा शिकवण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपले ठेवणीतले कपडे त्यांनी घातलेले. आता माझ्या लक्षात आलं की गावची थोर मंडळी आज शाळेत का आली आहेत ते! कारण या बातमीने ते देखिल दु:खी झालेले. तेही जास्ती शाळा शिकले नव्हते. ती बहुतेक त्यांची हॅमेल मास्तरांच्या चाळीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत होती, ही सेवा सुद्धा अशा देशाच्या भाषेची की जो देशच आता त्यांचा उरला नव्हता.
मी हा सगळा विचार करत असतानाच माझं नाव पुकारलं गेलेलं मी ऐकलं. आता वाचण्याची माझी पाळी होती. तो कृदन्ताचा नियम मला मोठ्याने, व्यवस्थितपणे आणि न चुकता म्हणता यावा म्हणून तेव्हा माझी काहीही द्यायची तयारी होती पण मी पहिल्याच शब्दावर अडखळलो आणि तसाच धडधडत्या हृदयाने, खालमानेने उभा राहिलो. हॅमेल मास्तर मला म्हणाले,
"मी तुला ओरडणार नाही, फ्रांज बाळा, तुला तुझंच वाईट वाटलं पाहिजे. बघ कसं असतं, आपण रोज स्वतःला म्हणतो, ह्या! माझ्याकडे खूप वेळ आहे, मी उद्या शिकेन! आणि आता पहा आपल्यासमोर काय मांडून ठेवलंय. हं, अल्साकची हीच सर्वात मोठी अडचण आहे, इथे सगळे जणच शिकायचं उद्यावर टाकतात. मग बाहेरची लोकं म्हणतात, हे असं कसं? तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता अणि तुमची स्वतःची भाषा तुम्ही लिहू तर शकत नाहीतच पण धड बोलूही शकत नाहीत. पण फ्राज बाळा, तू काही फार वाईट मुलगा नाहीस, या सगळ्याचा दोष आमच्यावरच लागणार आहे."
“तुमच्या पालकांचीच तुम्ही शिकावं अशी इच्छा नाही. ते तुम्हाला शेतात किंवा गिरणीत काम करायला प्रोत्साहन देतात कारण त्यामुळे थोडे जास्त पैसे मिळतात. आणि मी? मीसुद्धा काहीसा दोषी आहेच. मी तर तुमच्यापैकी कित्येकांना शाळेच्या अभ्यासाच्या वेळात माझ्या बागेला पाणी घालण्यासाठी पाठवलंय आणि कित्येक वेळा मला मासेमारीचा आनंद घ्यावासा वाटला म्हणून तुम्हाला सुट्टी नाही दिलीय?"
मग एकातून दुसरं असं करत करत हॅमेल मास्तर आपल्या फ्रेंच भाषेबद्दल बोलू लागले. त्यांनी सांगितलं की फ्रेंच भाषा जगातली सगळ्यात गोड भाषा आहे. सगळ्यात सुस्पष्ट आणि तर्कदृष्ट्या अचूक, आपल्याला आपल्या जीवाच्या आकांताने तिचं रक्षण करायला पाहिजे आणि कधीही तिचा विसर पडू देता कामा नये कारण जो पर्यंत आपण आपली भाषा उराशी जपून ठेवतो तोपर्यंत गुलामगिरीतून सुटण्याची किल्लीच जणू आपल्याजवळ बाळगतो. मग त्यांनी व्याकरणाचं पुस्तक उघडलं आणि तो धडा वाचायला सुरूवात केली. मला आश्चर्यच वाटायला लागलेलं कारण आता तोच धडा मास्तर वाचत असताना मला चांगल्यापैकी समजत होता. ते जे काही शिकवत होते ते सोप्पं वाटत होतं, फारच सोप्पं. मी विचार केला, मी इतक्या काळजीपूर्वक कधी पाठ ऐकलाच नव्हता आणि मास्तरांनीही त्यापूर्वी इतक्या संयमाने कधी शिकवला नव्हता. मला असं वाटू लागलेलं की जायच्या आधी हॅमेल मास्तरांना जितकं शक्य होईल तितकं जास्त शिकवायचं होतं, जणू सगळंच्या सगळंच, एकाच फटक्यात!
व्याकरणानंतर आमचा लिखाणाचा तास होता. त्या दिवशी हॅमेल मास्तरांनी आमच्यासाठी सुंदर, बाळबोध अक्षरात फ्रान्स, अल्साक, फ्रान्स, अल्साक असं लिहिलेले नवे कागद आणलेले. आमच्या वर्गात छोट्या छोट्या झेंड्यांप्रमाणे ते सगळीकडे अडकवले, आमच्या बाकड्यांवर छोट्या काठीवर लावले. तुम्ही त्यावेळी सगळ्यांना लेखन सराव करताना बघायला हवं होतं, किती शांतपणे तो सराव सुरू होता! जर कुठला आवाज होत होता तर तो केवळ लेखणीचा कागदावर होणारा! मधूनच काही फुलपाखरं नि भुंगे उडत उडत वर्गात आले पण एरवी अशावेळी दंगा करणारे आज एकदम शांत होते. कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. सगळे जण अक्षरं गिरवत होते. अगदी लहान बच्चेकंपनीनेही तिथे लक्ष दिलं नाही. ते देखिल आपला चित्रातला माशाचा गळ गिरवत होते जणू तो गळ म्हणजे फ्रेंच मूळाक्षरंच होती. आमच्या वर्गाच्या छतावर काही पारवे घुमत होते. माझ्या मनात विचार आला, आता या पारव्यांनाही ते जर्मन भाषेमध्ये घुमायला लावणार की काय?
जेव्हा जेव्हा मी मधूनच मान वर करून पाहिलं तेव्हा तेव्हा हॅमेल मास्तर मला स्तब्धपणे त्यांच्या खुर्चीवर बसून कधी इथे तर कधी तिथे असं बघताना दिसले, जणू मनात इथल्या वर्गातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची छबी टिपून घेत होते. बापरे! या एकाच जागी ते चाळीस वर्ष होते. बाहेरचा बगिचा आणि पुढ्यात सगळी मुलं, असंच, सलग चाळीस वर्ष! आता वर्गातली बाकडी वापरून वापरून गुळगुळीत झालेली, बगिच्यातली अक्रोडाची झाडं उचीने खूप वाढलेली आणि त्यांनी स्वतः रुजवलेली चमेली खिडकीवरून पार छतावर पसरलेली. त्यांच्या हृदयाला किती यातना होत असतील हे सारं सोडून जाताना? वरच्या मजल्यावरच्या खोलीत त्यांच्या बहिणीचा सामानाची बांधाबांध करतानाचा आवाज येत होता. नंतरच्याच दिवशी त्यांना देश सोडून जायचं होतं. पण मास्तरांमध्ये येवढा संयम होता की त्यांनी आमचा संपूर्ण पाठ आमच्याकडून शेवटपर्यंत म्हणून घेतला, मग लेखन करून घेतलं, इतिहासाचा धडा शिकवला मग लहान मुलांकडून बा बे बि बो बु वगैरे म्हणून घेतलं.
आमच्या वर्गात मागे बसलेला म्हातारबा हाऊजरही आपला चष्मा लाऊन आणि पुस्तक दोन्ही हातात धरून त्यातून अक्षरं वाचत होता. आम्ही बघत होतो की तो रडत देखिल होता, भावनावेगाने त्याचा आवाज चिरकत होता. तो इतका विनोदी वाचत होता की आम्हाला त्यावर हसावसं नि त्याचवेळी त्याच्यासारखं रडावसंही वाटत होतं. हं, तो अखेरचा पाठ मला किती व्यवस्थित कळलाय!!
त्याचवेळी अचानक चर्चच्या घड्याळाचे बारा वाजल्याचे टोले पडले आणि मग प्रार्थनेची घोषणा झाली. मागोमाग प्रशियन सैन्याच्या कवायतीच्या समाप्तीची धून वाजवणारी ट्रंपेट्स वाजली. हॅमेल मास्तर उदासपणे खुर्चीतून उठून उभे राहिले, तेव्हा इतके उंच ते मला आधी कधीच वाटले नव्हते.
"माझ्या मित्रांनो," ते बोलू लागले, "मी - मी -" पण त्यांचे शब्द घशातच अडकले. ते पुढे काही बोलूच शकले नाहीत. मग ते फळ्याकडे वळले, हातात खडू घेऊन त्यांच्या संपूर्ण आवाक्याने, मोठ्यात मोठ्या अक्षरात त्यांनी तिथे लिहिलं -
"फ्रान्स चिरायु होवो!"
आणि मग ते थांबले, भिंतीला रेलून उभे राहिले आणि एकही शब्द न बोलता आम्हाला आपल्या हाताने इशारा केला -
"शाळा सुटली, तुम्ही आता जाऊ शकता." 
---------------------------------------------------------------------------------------------------------------


(अल्फॉन्स दूदे यांच्या "द लास्ट लेसन" या कथेचा स्वैर अनुवाद)
छायाचित्रे आंतरजालावरून साभार