Wednesday 22 February 2012

माझी बल्लवगिरी : सडाफटिंग पाकसिद्धी - भाग २

रात्री साडे तीनापर्यंत गप्पा मारत बसल्यामुळे दुसर्‍या दिवशी अंमळ उशीराच म्हणजे साडे सातला जाग आली. गवि आधीच उठून आपल्या माळीबुवांना वेतन प्रदान करत होते. काल सर्वात आधी टपकलेले विमे मात्र अजूनही दुलईत पहुडलेले. नेहमी प्रमाणे आटोपून मी आपला तयार होतोय तर गविंनी गावातून मागवलेला चहा आणि न्याहरीचा वडापाव घेऊन माणूस आला. विमेंना बहुतेक झोपेतच वडापावाचा गंध आला असावा कारण तोपर्यंत त्यांना चांगलीच जाग आलेली. मग व्हरांड्यातच यथावकाश गरम गरम चहा घेऊन वडापावाचा नाश्ता केला गेला. वड्याच्या तिखटाने तोंड चांगलेच पोळले पण मजा आली. चहा पिता पिता आमच्या गप्पांचा पार्ट टू सुरू झाला, जणू काही आदल्या रात्री त्या थांबल्याच नव्हत्या.

बाहेर ओट्यावरच बसल्यामुळे गविंच्या घराच्या कंपाऊण्डमध्ये माझं लक्षं गेलं. आता घासफूसचाच सतत संबंध आलेला असल्याने आमचा वनस्पती सृष्टीवर भारी जीव! त्यात त्या निर्मनुष्य जागी विविध प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या दिसत होत्या. मग काय, गवि आणि विमेंची एक वनौषधी आकलन कार्यशाळाच घेतली गेली. गविंच्या घराजवळच एक नाही दोन नाही तब्बल दहा - बारा वनौषधी मिळाल्या. मग आमच्या वाक्गङ्गेला पूर आला. हातासरशी आयुर्वेदावरही एक व्याख्यान देण्यात आलं. एकूण कार्यशाळेमध्ये घडलेल्या चर्चेचा परिणाम असा झाला की बोलून बोलून माझे आणि ऐकून ऐकून गवि-विमेंचे खाल्लेले वडापाव पचून गेले.

कार्यशाळेदरम्यान सारिवाच्या मूळापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात

मग आता दुपारच्या जेवणासाठी काय बेत करावा यावर विचार सुरू झाला (आणि गवि-विमेंना हुश्श झालं कारण माझी आयुर्वेदिक बडबड बंद झाली.) आधी गविंच्या मनात आता बाहेरच कुठेतरी चांगल्या ठिकाणी खाऊ असं आलं पण विमेंनी त्याला कडाडून विरोध केला आणि घरातंच आदल्या दिवशीप्रमाणे काही तरी बनवून, ते खाऊन दुपारनंतर मुंबईकडे निघू असं त्यांनी ठासून प्रतिपादन केलं. विमे जिंकले हे वेगळं सांगायला नकोच!

मग आता आमच्याकडे जे जिन्नस होते त्यावरून गविंची त्यांच्या बॅचलरहूडमधली पेटंट डीश 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी' बनवायची ठरली. अर्थात माझीही त्या प्रकारची डिश आवडतीच असल्याने मी तात्काळ अनुमोदन दिलं. विमेंकडे पर्यायच नव्हता. आमच्याकडच्या वाणसामानाच्या आणि भाज्यांच्या पोतडीतून जिन्नस बाहेर काढले -

१. तांदूळ - साधारण २०० ग्रॅम
२. मुगाची डाळ - साधारण १०० ग्रॅम
३. तूरीची डाळ - साधारण १०० ग्रॅम
४. टॉमॅटो - ४ मध्यम आकार
५. भोपळी मिरची - २ मोठी (साधारण २०० ग्रॅम)
६. फ्लॉवर - १ छोटा (साधारण २५० ग्रॅम)
७. बटाटे - ३ मध्यम आकार
८. हिरवी मिरची - ३ मध्यम आकार
९. आलं - अर्धा इंच
१०. कडीपत्ता - आवडीनुसार
११. कोथिंबीर - आवडीनुसार
१२. मीठ - आवडीनुसार
१३. साखर - आवडीनुसार
१४. एवरेस्ट बिर्याणी मसाला - ४ चहाचे चमचे
१५. हळद - ३ चहाचे चमचे
१६. मोहरी - ३ चहाचे चमचे
१७. जिरं - ३ चहाचे चमचे
१८. हिंग - अर्धा चहाचा चमचा

आज वरकामाला मी आणि विमे होतो आणि मास्टर शेफ गवि होते. मग (नेहमीप्रमाणे गुरूवर्यांना वंदन करून) मी आणि विमेंनी पटापट बटाटे, भोपळी मिरच्या, टॉमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतले. फ्लॉवर मोकळा करून मिठाच्या पाण्यात घेतला आणि 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी'ची जय्यत तयारी केली.

गविंच्या मास्टर मार्गदर्शनाखाली केलेली कृती अशी होती -

एक स्वच्छ कुकर मंद विस्तवावर चढवून त्यात शेंगदाण्याचं तेल तापत ठेवलं. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, आलं आणि हिरव्या मिरच्या टाकून फोडणी तयार केली. तयार फोडणीमध्ये कापलेले टॉमॅटो टाकून परतले. टॉमॅटोंना पाणी सुटायला लागल्यावर त्यात भोपळी मिरची, फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे सोडून परतून घेतले. दरम्यान गविंनी डाळी आणि तांदूळ धुवून घेतले होते, ते ही त्यात टाकून परतून घेतले. त्यात आवश्यक त्या प्रमाणात साखर-मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आणि त्यामध्ये खिचडी शिजायला लागेल तितके पाणी घातले. या मिश्रणामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर भुरभुरवून त्यातलं पाणी जरा गरम होताच कुकरचं झाकण लावून टाकलं. कुकरच्या तीन शिट्ट्या काढल्या आणि नंतर गॅस बंद करून तो निववंत ठेवला.

'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी'ची फोडणी

रंगीबेरंगी वेजिटेबल कंटेन्ट्स

ते रंगीत कंटेन्ट्स फोडणीत परतले जात असताना

रंगीत कंटेन्ट्समध्ये एक पांढरी अ‍ॅडिशन (फ्लॉवर)

डाळ-तांदळासकट जिन्नस परतल्यावर मिश्रणात मीठ घालताना मास्टरशेफ

पाणी, कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला टाकल्यावर

एका बाजूने खिचडी तयार होत आली असतानाच तिच्याबरोबर तोंडी लावायला गविस्पेशल 'बेडेकरी अचारी वांगी-काप' बनवण्याचं गविंनी ठरवलं. मग आमच्या पोतडीतून आम्ही आणखी काही जिन्नस बाहेर काढले -

१. भरताची वांगी - ३ मोठी
२. डाळीचं पीठ - १०० ग्रॅम
३. बेडेकर लोणच्याचा मसाला - १०० ग्रॅम
४. मीठ - चवीनुसार
५. शेंगदाण्याचं तेल - आवश्यकतेनुसार

पुन्हा मास्टर शेफ गवि आणि मी त्यांचा असिस्टंट. आम्ही केलेली कृती पुढीलप्रमाणे -

आधी तीनपैकी एक भरताचं वांग घेतलं आणि सुरीने त्याचे काप करून घेतले. काप साधारण १ सेमी रुंदीचे कापण्याचा प्रयत्न केला गेला. एकाच वांग्यापासून मिळालेल्या कापांची संख्या बघता बाकीची वांगी बाजूला ठेवून दिली. मग डाळीचं पीठ आणि बेडेकर लोणच्याचा मसाला यांचं २:१ प्रमाणात मिश्रण करून घेतलं. लोणच्याच्या मसाल्यात थोड्याप्रमाणात मीठ असल्याने त्या हिशोबाने त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालून ते एकत्र केलं. त्यानंतर वांग्यांच्या कापांना हे मिश्रण चोपडलं. वांग्याला पाणी सुटल्यामुळे थोड्याच वेळात मिश्रणाचा कापांवर एक थर बसला. अशाप्रकारे पीठात लडबडलेल्या वांग्याच्या सर्व कापांना तव्यावर शेंगदाण्याचं तेल सोडून ते तापल्यावर त्यात शॅलो फ्राय करून घेतलं.

'बेडेकरी अचारी मसाला' बनवताना आमचे 'मुख्य आचारी'

वांग्याचे काप सुरीनेच केलेले आहेत

मसाला आणि वांगी-काप यांच्या दिलजमाईच्या प्रयत्नात

दिलजमाई झालेल्या कापांची अशी तव्यावरच्या गरम तेलावर रवानगी झाली

वांग्याचे काप बनत होते तोवर आमचा कुकर पडला आणि आम्हाला दिसलं की आम्ही बनवलेली सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ३ - तांदळाची खिचडी आणि आता सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ - वांग्याचे काप व्यवस्थित तयार झालेले होते. मग विमेंनी या दोन्ही पाकसिद्धींची एकाच प्लेटमध्ये कलात्मक मांडणी करून त्यांचे फोटो काढले. आम्ही मात्र तोपर्यंत प्रचंड भूक लागल्याने मिळेल त्या प्लेटमध्ये पटापट व्यंजनं घेतली. एकूणच दोन्ही डिशेस् इतक्या मस्त दिसत होत्या की तोंड भाजत असूनही आमचे खाण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यावर गविंनी फार सुंदर मखलाशी केली, "शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही.." पण तरीही हे दोन्ही पदार्थ चवीला अप्रतिम झालेले आणि व्यक्तिशः मी खिचडी उरणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली.

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ३ - 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी' आणि सोबत सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ - 'बेडेकरी अचारी वांगी-काप' (कलात्मक मांडणी सौजन्य - वि मे)

'बेडेकरी अचारी वांगी-काप' खाताना विमे आणि गवि, कुठल्याशा घोळू का काय माशाचे काप चवीला डिट्टो असेच लागतात असं सारखं म्हणत होते. गविंनी त्यांच्या वडिलांचा एक किस्सा सुनावला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या एका शुद्ध शाकाहारी मित्राला असेच वांगी-काप खिलवले. त्या मित्राने ते वांगी-काप समजूनच फार आवडीने खाल्ले पण थोड्यावेळाने खाता खाता गविंचे वडिल त्या मित्राला म्हणाले, "काय, घोळूचे काप अगदी वांग्याच्या कापांसारखे लागतात नाही?" हे ऐकताच त्यांचा तो मित्र एकदम स्टन् झाला आणि त्याच्या पोटात ढवळून येऊ लागले. शेवटी स्वयंपाक घरात मासे नाहीत आणि काप वांग्याचेच होते हे जेव्हा त्या मित्राला त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा कुठे त्यांच्या मित्राची खात्री पटली. यावेळी पाकसिद्धीच्या वेळेसच मी असिस्टंटकी केलेली असल्याने बिनघोर बेडेकरी अचारी वांगी-कापांचं सेवन केलं. खरंतर ते इतके चविष्ट झाले होते की आणखी एखादं वांगं कापलं असतं तरी त्याचे कापही स्वाहा झाले असते, हे निश्चित!

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ 'बेडेकरी अचारी वांगी-काप'

जेवून होतंच आहे तर आता परतीचे वेध लागले. गविंचा मुलगा त्यांना फोन करून परतण्याची जणू आठवणच करून देत होता. विमेंनी झपाट्याने पुन्हा एकदा भांडी-प्रक्षालनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि पूर्णतेला नेला. त्या बरोबरच मी आणि गविंनी आणलेल्या वाण सामान आणि भाज्यांची योग्य ती वाटणी पुन्हा आमच्या आमच्या पिशव्यांमध्ये करण्यातही त्यांनी हातभार लावला. आम्ही घर व्यवस्थित आवरून घेतलं, जेणे करून पुढच्या वेळेला सहकुटुंब तिथे आल्यावर आमच्या सडाफटिंग पाककौशल्याबद्दल आणि नंतरच्या कचर्‍याबद्दल गविंना बोल लागणार नाही, याची खबरदारी घेतली.

शेवटी घराच्या दाराला कुलूप लावताना मनात खूप समाधान दाटलं होतं. समाधान एका स्वयंपाकी कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाचं होतं, समाधान सडाफटिंग पाकसिद्धींचं होतं, समाधान एका नव्या मैत्रीच्या नात्याच्या जन्माचं होतं, समाधान नव्या जिव्हाळ्याच्या निर्मितीचं होतं आणि समाधान इतक्या वर्षात जे गमावल्याची भावना झालेली ते काही प्रमाणात नक्कीच कमावल्याचंही होतं.

परतीच्या वाटेत पुढचा सडाफटिंग कट्टा कुठे करता येईल याची जोरदार चर्चा झाली. थोडं लांबचं ठिकाण ठरवण्याचा विचार होत आहे, कोकण, कदाचित गोवादेखिल! कुणी सांगावं, नव्याने तयार झालेल्या या मैत्रीच्या नात्याला इतका विश्वास तर नक्की वाटतोय की जगाच्या पाठीवर कुठेही जायला सांगा, आता जिथे जाऊ तिथे स्वतःची आनंदाची खाण निर्माण करू.

अशा प्रकारे मिपाकरांच्या सडाफटिंग पाकसिद्धी कट्ट्याच्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

सडाफटिंग पाकसिद्धी करणारे थ्री मस्केटीयर्स (गवि, मी नि विमे)



Tuesday 21 February 2012

माझी बल्लवगिरी : सडाफटिंग पाकसिद्धी - भाग १

या फेब्रुवारीच्या १८ तारखेला दुपारी बरोब्बर एकच्या सुमारास माझा भ्रमणध्वनि किरकिरला. उचलताच पलिकडून आवाज आला, "तयार?" मी एक दीर्घ श्वास घेऊन उत्तर दिलं, "तयार". दुसरं कुठलं उत्तर मी देऊच शकत नव्हतो, म्हणजे तसं करणं मला शक्यच होणार नव्हतं. माझ्यावर अशी वेळ माझ्या स्वतःच्याच कर्माने आलेली होती. दुसर्‍या कुणालाही मी त्यासाठी जबाबदार ठरवू शकलो नसतो. फोनवरच्या प्रश्नाला मी हे असं उत्तर देतोच आहे की माझं पूर्वायुष्य माझ्या डोळ्यापुढून सरकून गेलं अगदी चित्रपतात दाखवतात तसं फ्रेम बाय फ्रेम. तोपर्यंत तसं चांगल्यापैकी आयुष्य जगलेलो मी. डोकं बर्‍यापैकी चालणारं असल्याने वागण्या-बोलण्यात चटपटीत होतो. मित्र-मैत्रिणींचा गराडा सतत आजूबाजूला असायचा. काव्य-शास्त्र-विनोदामध्ये महाविद्यालयीन आयुष्य कसं झकास गेलेलं. यथावकाश पदवी मिळाली आणि माझ्या आयुष्याने आपले रंग बदलायला सुरूवात केलेली. त्याला तरी मी कसा दोष देणार? ते जिच्यामध्ये अस्तित्त्व दाखवत होतं ती दुनियाच आपले खरे रंग दाखवू लागल्याने तिच्या रंगात रंगण्यासाठी, स्वत:चं संरक्षण करण्यासाठी, एक कॅमोफ्लाज् म्हणून का होईना, माझ्या आयुष्याला बदलावंच लागलं होतं. पोटाची खळगी भरण्यासाठी ना ना तर्‍हेच्या उस्तवार्‍या आणि कामधंद्यासाठी केलेल्या मिनतवार्‍या यामुळे जीवनातल्या काव्य-शास्त्र-विनोदाची जागा नित्य-अत्र-विषादाने घेतली होती. पूर्वी एका हाकेसरशी धाऊन येणारे सुहृद् देखिल त्यांच्या त्यांच्या कामधंद्यामुळे दशदिशांना पांगले होते. जीवन भकास होऊ लागलं होतं. प्रकर्षाने जुन्या आठवणी दाटून येत होत्या पण त्यांच्या पुन:प्रत्ययासाठी कोणताही मार्ग दिसत नव्हता, अर्थात मला प्रयत्न सोडून चालणारच नव्हतं.

जीवनाच्या एकसुरी रहाटगाडग्यापासून काही क्षणांच्या विसाव्यासाठी, मैत्रीच्या नव्या नात्याची गुंफण करण्यासाठी आणि स्वतःलाच पुन्हा शोधण्यासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणजे म्हणजे तो उपरोल्लेखित फोन होता. अनेक दिवसांच्या व्यनिचर्चेनंतर मी, गवि आणि विमे तिघांनी एका आडबाजूच्या गावात एक रात्र, दोन दिवसांचा सडाफटिंग कट्टा करण्याचा प्लान केलेला होता. एकूण हा कट्टा यावेळी होतोय की नाही की पुढल्या आठवड्यात जातोय याबाबत अनिश्चितता होती पण ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी विमेंचा फोन आला आणि आम्ही दोघे दादरहून त्या अगदी इंटिरिअरला असणार्‍या गावाच्या दिशेने निघालो.

असा सडाफटिंग कट्टा मिपाकरांमध्ये पूर्वी झालाय की नाही याची आम्हाला कुणालाच कल्पना नव्हती. आत्तापर्यंतचे कट्टे कोणत्या ना कोणत्या हॉटेलच्या भरवशावर संपन्न झालेले होते. हा कट्टा मात्र याला अपवाद होता. यावेळी स्वतःला स्वयंपाकी बनवूनच उदरभरणाचा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी मग सकाळी सकाळी मी कोरडा शिधा आणि जामानिमा जमवला होता. पहिल्यांदाच तिथे जात असल्याने खुद्द गावात कोणत्या गोष्टी मिळतील आणि कोणत्या नाही याचा काहीच अंदाज मला तर नव्हताच पण अगदी गविंनाही नव्हता. मग पार साखर-मीठ, तेल, जिरं, मोहरी, हळद-तिखट यापासून ते डाळ-तांदूळ आणि भाज्या इ. इ. सर्व बरोबरच घेऊन प्रस्थान करावं लागलं. त्या सगळ्या वाणसामानाची भली थोरली पिशवी घेऊन शनिवार दुपारच्या गर्दीने ओथंबणार्‍या ट्रेनमध्ये मी आणि विमेंनी स्वतःला झोकून दिलं आणि मार्गक्रमणा सुरू केली. माझ्याकडच्या पिशवीमधलं सामान बघून कित्येकांच्या चेहर्‍यावर किराणामाल आणि भाज्यांचे व्यापारी वाटणारे हे दोघे लगेज् डब्यातून का प्रवास करत नाही आहेत असा प्रश्न स्पष्ट दिसत होता पण माझ्या मूर्तीमंत खूख्वार चेहर्‍याकडे आणि विमेंच्या जन्मजात सोफिस्टिकेटेड नि जंटलमन चेहर्‍याकडे बघून कुणी तो प्रश्न प्रकट विचारायचं धाडस केलं नाही.

थोड्याच वेळात श्रीस्थानक अर्थात ठाणे आल्यावर लोकांच्या गर्दीने आम्हा दोघांनाही हळूवारपणे खाली उतरवलं. श्रीस्थानकाच्या पूर्वेला गविंनी आम्हाला 'उचलून' (मग? अख्खं विमान स्वतःसह उडवू शकणार्‍या प्रतिहनुमानच जणू अशा गविंना आम्हा पामरांना उचलायला काय ते औघड?) आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांच्या वाहनातून आमची तिघांची त्या जागेकडे मार्गक्रमणा सुरू झाली. गविसुद्धा माझ्याइतकेच तयारीने आले होते, कांकणभर जास्तच! त्यांच्या गाडीची मागची बाजू पुन्हा एकदा वाणसामान आणि भाज्यांनी भरलेली होती. तेलापासून कांदे-बटाटे, मिरच्या-कोथिंबीरीच्या मसाल्यापर्यंत त्यांनी बरोबर घेतलं होतं आणि त्याबरोबरच कमी पडू नयेत म्हणून तीन - चार भांडी, सुरी, चमचे, प्लेट्स असा बहुतेक आवश्यक तो संपूर्ण संसार बरोबर घेतला होता. अगदी भांडी घासायचा साबण आणि स्क्रबदेखिल त्यांनी बरोबर घेतलेला. पाण्याच्या व्यवस्थेची तिथली माहिती नसल्याने ५ लिटर पिण्याचं पाणीही त्यांनी बरोबर घेतलेलं. यामुळे मागची सीट जवळ जवळ भरूनच गेलेली. मग मी थोडं बुलींग करून विमेंना तिथेच अ‍ॅडजेस्ट करायला लावून बसवलं आणि स्वतः गविंच्या शेजारी पुढे आरामात बसलो. (आपले विमे खूप को-ऑपरेटिव्हही आहेत बरं का!)

वेगाने आम्ही आमच्या इच्छित स्थळी निघालो खरे पण हाय रे कर्मा, एरवी १०-१२ मिनिटात संपणार्‍या हाय-वेने वाहतुक मुरंब्यामुळे तब्बल दीड तास घेतला. त्यानंतर विमेकाकांना भूक लागल्यामुळे रस्त्यात एका ठिकाणी ढाबे वजा हॉटेलात न्याहरी करून घेतली. सिंगचाचांच्या छपराखाली आल्यामुळे विमेकाकांनी छोले-भटुर्‍यांना उपकृत केलं. पण गविंनी आपला दाक्षिणात्य बाणा दाखवून डोसा प्रकाराचा आनंद घेतला. अस्मादिकांची एकादशी असल्याने मला केवळ प्लेटभर फिंगरचिप्स आणि अर्ध्या लीटरभर पंजाबी लस्सीतच भागवावं लागलं.

अशाप्रकारे भरल्या पोटाने आम्ही साधारण तीनच्या सुमारास आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो. सदर स्थळ हे बर्‍यापैकी आतल्या भागात स्थित असलेल्या एका गावात, गावठाणाच्या टोकाशी असलेलं, सध्या वापरात नसलेलं गविंचं एक घरकुल होतं. मग गेल्या गेल्या गविंनी साग्रसंगीत स्थळदर्शनाचा कार्यक्रम ठेवला. आम्हीही नवीन जागा असल्याने आजूबाजूचं छान आलोकन केलं. गविंनी शोधलेली जागाही भन्नाट होती. आजूबाजूला चिटपाखरूदेखिल नव्हतं पण निरनिराळ्या झाडं-वेली-झुडपांनी ती वेढलेली होती. दूरवरून कुठून तरी रेल्वे-इंजिनाची शिट्टी अधून मधून ऐकू येत होती. (हो, जवळपास कुठे तरी रेल्वेट्रॅक होता, नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुक निकालांचा रेल्वे-इंजिनाच्या शिट्टीशी काही संबंध नव्हता याची चाणाक्ष मिपाकरांनी नोंद घ्यावी.) तिथे आम्ही आमच्या पथारी पसरायचं ठरवलं पण विमेंनी तेवढ्यातच आम्हाला थांबवलं.

काय आहे की आम्हा तिघांपैकी विमें कामाला एकदम वाघ माणूस बघा! शेवटी तरूण, सळसळतं 'बॅचलरी' रक्त आहे त्यांचं! उत्साहात त्यांनी जागेच्या साफसफाईचा धडक कार्यक्रम हाती घेतला आणि तो फटाफट तडीस नेला. आम्ही (पक्षी: मी आणि गवि) मात्र विमेंच्या खंबीर हाताला हात लाऊन मम तेवढं म्हणून घेतलं. विमेंचा हात (नि हातातला झाडू) फिरल्याबरोबर जागेचा कायापालट झाला आणि ती जागा रात्रीच्या मुक्कामासाठी एकदम तैय्यार झाली. अशा तैय्यार जागीच मग विमेंनी आम्हाला पथारी पसरू दिल्या.

आता प्रश्न स्वयंपाकाचा होता. दिवस कलू लागलेला आणि थोड्याच वेळात अंधार पडणार होता. त्याआधीच पाकसिद्धी करून घेणं अगत्याचं होतं म्हणून मग आम्ही त्यामागे लागलो. आम्ही म्हणजे मीच. इतर कोण? मीच का? तर आता उपास होता माझा, त्यामुळे उपासाची व्यंजनं बनवण्याची जबाबदारी माझी होती. अन्यथा मला अंगठा दाखवत उपवासाला न चालणारे चमचमीत पदार्थ बनवले जाण्याची आणि ते माझ्यासमोर मिटक्या मारत गवि नि विमेंनी खाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. मी ते नक्कीच होऊ देणं शक्यच नव्हतं.

स्वयंपाक सुरू करण्यापूर्वीही काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था करणं आवश्यक होतं. गविंच्या घरातला गॅस वर्षभर बंदच होता. शेगडी, गॅसची टाकी आणि दोहोंना जोडणारा पाईप यांचा एकमेकांबरोबर योग्य संपर्क साधून दिल्यावर आणि शेगडीचे तारेच्या ब्रशने आंजारून गोंजारून थोडे लाड करताच स्वयंपाकसिद्धीचा प्राण-सखा, तो अग्नि-नारायण आमच्यावर प्रसन्न झाला.

अर्थात शनिवारी रात्रीच्या मेन्युचा विचार* मी आधीच करून ठेवलेला. मग काय, समस्त मिपाकर पाकृस्पेशालिस्ट ताई-माईंना दंडवत नमन करून, घेतलं गुरूवर्य गणपाभाऊंचं नाव आणि पाकसिद्धीस तयार झालो.

मी आणलेल्या शिधा नि वाणसामानामध्ये पुढील जिन्नस होते -

१. भिजवलेला साबुदाणा - ५०० ग्रॅम
२. दाण्याचं कूट - १०० ग्रॅम
३. हिरव्या मिरच्या - २ (मध्यम आकाराच्या)
४. जिरं - २ चहाचे चमचे
५. मीठ - चवीनुसार
६. साखर - आवडीनुसार
७. (घराबाहेर करत असल्याने) शेंगदाण्याचं तेल - पाच चमचे

आता विचार केला की खिचडी बनवावी. साबुदाण्याची खिचडी आवडतेच सगळ्यांना! गवि नि विमेसुद्धा याला अपवाद नसतील. मग मी खिचडीसाठी पुढील प्रमाणे कृती केली -

एका भांड्यात भिजवलेला सगळा साबुदाणा घेतला. त्यात सगळं दाण्याचं कूट घातलं. त्यातच चवीनुसार मीठ आणि साखर टाकली. सर्व जिन्नस त्या भांड्यातच एकत्र करून घेतले. हिरव्या मिरच्या मोठ्या आकारात कापून घेतल्या.

स्वच्छ कढई गॅसवर चढवली. त्यात शेंगदाण्याचं तेल सोडलं. खालच्या गॅसच्या मध्यम ज्योतीमुळे तेल तापल्यावर त्यात जिरं आणि मिरच्या सोडून फोडणी बनवली. पाठोपाठ त्यात आधी भांड्यात तयार केलेलं मिश्रण टाकून व्यवस्थित परतून घेतलं. आवश्यक तेवढं झार्‍याने वर-खाली करून घेतलं आणि जसे मिश्रणातले साबुदाणे पांढर्‍या रंगावरून पारदर्शकतेकडे झुकले, ती साबुदाण्याची खिचडी बनल्याची खूण मानून गॅस बंद केला.

ती खिचडी अशी दिसत होती.

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. १ - साबुदाण्याची खिचडी

माझे गुरूवर्य बल्लवाचार्य गणपाभाऊ आणि समस्त मिपाकर पाकृस्पेशालिस्ट माता-भगिनींच्या कृपाशीर्वादाने माझं ५०% काम झालेलं. पण अजून ५०% बाकी होतं. एव्हाना गवि नि विमेंच्या पोटात बहुदा कावळे कोकलू लागलेले पण काय करणार आणखी थोडा वेळ त्यांना थांबावंच लागणार होतं.

पोटातल्या कावळ्यांशी तडजोड करतानाच्या भावमुद्रेत विमे

 मग पुन्हा गुरूवर्यांना मनोमन नमन करून मी माझा मोर्चा माझ्या त्या दिवशीच्या पुढल्या व्यंजनाकडे वळवला. आता माझ्या समोर जिन्नस होते -

१. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी कूकरमध्ये २-३ शिट्ट्या देऊन चिंचेच्या कोळात उकडवलेले शेंगदाणे - २५० ग्रॅम
२. उकडलेले बटाटे - ३ (छोट्या आकाराचे)
३. उकडलेली (कच्ची) केळी - २
४. जिरं - ३ चहाचे चमचे
५. शेंगदाण्याचं कूट - २ चहाचे चमचे
६. गूळ - चवीनुसार
७. हिरव्या मिरच्या - ३ (मध्यम आकाराच्या)
८. शेंगदाण्याचं तेल - आठ चमचे

यांचा वापर करून मी शेंगदाण्याची उसळ बनवण्याचा घाट घातलेला होता. मी केलेली कृती अशी -

पुन्हा (दुसरी) स्वच्छ कढई गॅसवर चढवली आणि त्यात शेंगदाण्याचं तेल सोडलं. खालच्या मध्यम काकड्यामुळे तेल तापल्यावर मी आधी सारखंच यात जिरं - मिरचीची फोडणी बनवली. मग त्यात सगळे शेंगदाणे टाकले आणि व्यवस्थित परतून घेतले. 

जिर्‍याच्या फोडणीत उकडलेले शेंगदाणे परतले जात असताना

मागोमाग त्यात उकडलेली केळी आणि बटाटे, छोटे छोटे तुकडे करून सोडले (या बटाट्याच्या नि केळ्यांच्या चिरण्यात विमेंनी सहर्ष हातभार लावला होता, मुलगा गृहकृत्यदक्ष आहे हो!) आणि ते ही शेंगदाण्याबरोबर पुन्हा परतले. मिश्रण व्यवस्थित परतलं गेलंय हे पाहिल्यावर त्यात जवळचं पिण्याचं स्वच्छ पाणी टाकलं, (साधारण आपल्याला उसळीत किती रस्सा हवाय या अंदाजाने पाण्याचं प्रमाण ठरवलं जावं.)

उकडलेले बटाटे नि केळी टाकताना

शेंगदाणे, बटाटे नि केळी फोडणीत व्यवस्थित परतताना

उसळीचा रस्सा बनवण्यासाठी त्यात पाणी घालताना

आता हे सगळं मिश्रण गॅसच्या मोठ्या ज्योतीवर रटरटवत ठेवलं. मिश्रणाला चांगली उकळी फुटून त्यातलं पाणी थोडसं आटल्यासारखं वाटल्याबरोबर त्यात दाण्याचं कूट टाकून चवीनुसार गूळ चिरून घातला. आणखी थोडा वेळ हे मिश्रण रटरटू दिलं आणि पुरेसा रस्सा उरल्यानंतर खालची ज्योत विझवली.

उसळीत गूळ चिरून टाकताना

आता पाकसिद्धी पूर्ण झाली होती. माझ्याकडच्या पोतडीतून मी उपवासाचा बटाट्याचा चिवडा आणि बटाट्याच्या सळ्या काढल्या. एका प्लेटमध्ये खिचडी, तिच्यावर शेंगदाण्याची आमटी घेऊन त्यांच्यावर बटाट्याचा चिवडा आणि बटाट्याच्या सळ्या भुरभुरवल्या आणि गवि नि विमेंना पेश केली 'प्रास'मेड 'फराळी मिसळ'.

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. २ - शेंगदाण्याची उसळ आणि क्र. १ नि क्र. २ यांच्यापासून बनलेली पाकसिद्धी क्र. ३ - फराळी मिसळ

चवीला फराळी मिसळ कशी होती ते गवि आणि विमे जातीने सांगतीलच पण मला स्वतःला बल्लवाचार्यांच्या कृपेने सुयश लाभलं असंच मी मानतो. मिसळीची चव मला आवडली आणि मी तर बुवा ती भरपूर चापली. कारण दुप्पट खाल्ल्याशिवाय माझी एकादशी साजरीच होऊ शकली नसती.

साधारण साडे नवाच्या सुमारास आमचे खाऊन झाल्यावर पुन्हा विमेंनी उत्साहाने भांडी-प्रक्षालनाची मोहिम हाती घेऊन ती तडिस नेली आणि वरची ओळ पुन्हा सार्थ केली. यानंतर आपापल्या गिर्द्यांवर स्थानापन्न होऊन गप्पांना ऊत आला. भरल्या पोटाने विविध विषयांवर कडकडीत चर्चा घडल्या. अर्थात मिपावरच्या जुन्या कहाण्यांची उजळणी होऊन अनेक आयड्यांच्या कुंडल्या मांडल्या गेल्या. मला खात्री आहे की अनेक मिपाकरांना शनिवारी रात्री वारंवार ठसक्याच्या उबळींचा त्रास झाला असणार. माफ करा मित्रांनो, त्याला आम्हीच कारण होतो.

साधारण बाराच्या सुमारास बोलताबोलता अचानक विमे आम्हाला सोडून निद्रादेवीच्या कुशीत टपकले. त्यानंतर गवि आणि मी साधारण साडे तीनापर्यंत लढत होतो. आमच्या विषयांना काही धरबंध नव्हता. संगीत, चित्रपट, टिव्ही, वैद्यक, जंगल भ्रमण, गोवा, कोकण यादी भरपूर वाढू शकेल. सरते शेवटी उद्या परतीच्या प्रवासासाठी ताजंतवानं राहण्यासाठी थोडीशी का होईना झोप घेणं आवश्यक आहे असं वाटून त्या निर्मनुष्य स्थानी दूर वरून येणार्‍या लांब पल्ल्याच्या रेल्वे-गाड्यांचे आवाज ऐकत आम्हीदेखिल अखेर निद्राधीन झालो.

क्रमशः
--------------------------------------------------------------------------------------------------------------
* खाण्याचा विषय निघाला की माझा मेंदू काँप्युटरपेक्षाही जोरात चालू लागतो - सौजन्य: चाचा चौधरी