Thursday, 31 December 2015

कवी मंगेश पाडगावकरांना आठवताना....

मला आजही कविता फारशी कळत नाही. 27 वर्षांपूर्वी तर अजिबात कळायची नाही. यांत्रिकपणे घोकंपट्टी करायची आणि परिक्षेत कवितांवरच्या निर्बुद्ध प्रश्नांची उत्तरं लिहायची, इतकाच माझा आणि कवितेचा संबंध. कवीला कवितेत काय म्हणायचंय हे शिक्षकांनी सांगितलं ते आणि तेवढंच लिहून काढायचो. सांगितलं असेल कधीतरी कवीने शिक्षकांना त्याचं वा तिचं मनोगत, आपून को क्या? असंच असायचं माझं! मग कधीतरी असं कळलं की शिकलेलं कवीचं मत हे शिक्षकांइतकंच गाइडांचंही असतं. या सा-यामुळे कविता उमजणं तर सोडा समजणंही दुरास्पद होत गेलं. या काळात आमच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेने आमच्या भेटीला कवी मंगेश पाडगावकरांना बोलावलं.

शाळेच्या सभागृहात आमची अख्खी बॅच बसलेली आणि समोर पाडगावकर. शाळेच्या क्रमिक पुस्तकात ज्यांच्या कविता असतात अशा कवींना बघण्याचा तो तसा माझा पहिलाच प्रसंग. स्वतःची ओळख करून देत, त्या दिवशी पाडगावकरांनी माईकचा आणि त्याचवेळी सभेसहित सभागृहाचा ताबा घेतला. त्यानंतर बोलगाणी, उदासबोध, कबीरवाणी, जिप्सी अशा त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांच्या ठाशीव आणि नाट्यपूर्ण सादरीकरणात पुढचे दोन तास आम्ही सगळे डुंबत होतो. यात कवितेचं कवीच्या दृष्टीकोनातलं अंतरंगच मला दिसतंय की काय असं वाटायला लागलं.

कविता आजही मला नीटशी उमजत नाही पण कवितेचं सामर्थ्य मला निश्चितपणे दाखवलं पाडगावकरांनी. आज पाडगावकरांच्या देहावसानाची बातमी ऐकली आणि डोळ्यासमोर त्या दिवशीचे, आम्हा मुलांकडे त्यांच्या जाड भिंगांच्या चष्म्यातून मिष्किल डोळ्यांनी बघत, 

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं'

म्हणणारे पाडगावकर उभे राहिले.

माझ्यासारख्या कविता समजण्यात 'ढ' असणा-याला काव्यानंदाचा आणि कविता-सामर्थ्याचा अनुभव देणा-या मंगेश पाडगावकर या मनस्वी कवीला माझ्याकडून ही भावपूर्ण शब्दाञ्जली....

Wednesday, 16 December 2015

कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका)

काळ - वर्ष १९९२

(ट्रींग ट्रींग! ट्रींग ट्रींग!!)
"हॅलो! नमस्कार!"
"अरे मी भाई बोलतोय. काय म्हणतायत चिरंजीव? काल बारावीचा रिझल्ट लागला ना?"
"हो ना! रिझल्ट चांगला आहे पण नेहमीप्रमाणे अडनिडा आहे..."
"अडनिडा? का रे? पास झालाय ना? किती टक्के मिळालेत?"
"पास झालाय रे. टक्केही चांगलेच आहेत, पण मेडिकलची अॅडमिशन हुकतेय. त्यासाठी थोडे टक्के कमी पडतायत."
"मग आता विचार काय आहे?"
"तशी त्याला नाशिकच्या फार्मसी कॉलेजात अॅडमिशन मिळालीय. उद्या सकाळी तो आणि मी निघतोय नाशिकला जायला."
"अच्छा, पण मला सांग, त्याला मेडिकलला जायचंय ना?"
"त्याला जायचं असून काय उपयोग? आता फार्मसी करेल."
"बघ, माझ्या मित्राने गेल्या वर्षी मुंबईतच आयुर्वेदाचं कॉलेज काढलंय. आयुर्वेदही शेवटी मेडिकलच. इथे नि तिथे दोन्हीकडे साडेपाच वर्षांचाच कोर्स. आयुर्वेदाला अॅडमिशन मिळण्याइतके मार्क चांगले आहेतच, तर तू नाशिकला जायच्या आधी एकदा तिथे का जाऊन बघून येत नाहीस?"
"असं म्हणतोस? अरे, पण ह्याने आयुर्वेदाचा कधी विचारच केलेला नाही. आयुर्वेदाच्या कॉलेजांचा फॉर्मही शुंभाने भरलेला नाही. जरा समजावतो. बरं म्हणाला तर उद्या आम्ही आधी तिथेच जाऊ. बघतो काय म्हणतायत चिरंजीव..."

-१-

काळ - वर्ष १९९६

"सर, एक विचारायचं आहे?"
"सर? काय बाबा, आज आमच्या नावाचा असा उद्धार का करतोयस? काय हवंय?"
"नाही म्हणजे आता तुम्ही फायनलचे विद्यार्थी, आम्ही ज्युनियर आणि हे हॉस्पिटल, इथे तुम्हीच सर, आम्ही पामर..."
"आता काय हवंय सांगतोस की...."
"सांगतो, सांगतो. डोक्याचा पार भुगा झालाय आपल्या! हे आयुर्वेदाचं गणित काही सुटत नाही आमच्याच्याने..."
"का बुवा? आयुर्वेद कोणतं गणित घालतोय तुला?"
"पहिल्या वर्षी ते वात-पित्त-कफ घोकलं, त्या अस्थी-सिरा-धमन्या पाहिल्या. सुश्रुत-चरक-वाग्भटाची हच्चिसन-चौरसिया-ग्रेंशी सांगड घालता मारामार झाली. ते पार पडलं पण आता दुसर्‍या वर्षाला हे निदानाचं लफडं लागलं. ते रोगाच्या संप्राप्तिचं, दोष-दूष्य संमूर्च्छनेचं गणित काही सुटेना गड्या!"
"तू म्हणतोयस ते खरं आहे. गणित नको म्हणून आपण मेडिकल लाईन घेतो, पण प्रत्येक शास्त्र स्वतःचं एक गणित बाळगून असतंच. मला काय वाटतं माहितेय, शास्त्रं जसं जसं आपल्या अंगात भिनतं ना, तसं तसं ते स्वतःच आपल्याला ते गणित उलगडून दाखवतं. ही अशी अडलेली गणितं सुटतात, पण त्यासाठी अभ्यास क्रमप्राप्तच बाबा..."
"कमी का करतोय अभ्यास? कधी केली नाही येवढी घोकंपट्टी करतोय आयुर्वेदात आल्यावर! वर्गात नुसतंच सांगतात, हे पाठ करा, ते पाठ करा, प्रश्नांच्या उत्तरात श्लोक नसतील तर निम्मे मार्क्स कट्. ते एक टेन्शन. पाठ केलेलं परीक्षेत कसं लिहायचं? अरे तुला सांगतो, मी काहीही पाठ म्हणायला लागताच हल्ली आजीचं पालुपद सुरू होतं - 'व्यर्थ भाराभर केले पाठांतर....', वगैरे वगैरे. ते आणिक एक वेगळं टेन्शन...."
"अरे, तुझा घोळ आला माझ्या लक्षात. तुझी विचारप्रक्रिया चुकीची नाही, कारण आपण मुळात सायन्सचे विद्यार्थी, आपल्याला तसाच विचार करायला शिकवतात."
"मग घोळ काय आहे?"
"आता तू आयुर्वेदाच्या शास्त्राची विचारप्रक्रिया वापर. गेल्या वर्षी तू तंत्रयुक्ती शिकलास, प्रमाणं शिकलास, आठवतंय?"
"शप्पत! पदार्थविज्ञानासारख्या बोरिंग विषयाची आठवण काढून माझं डिप्रेशन वाढवतोयस तू..."
"हॅ हॅ हॅ! तसं नाही रे, कोणत्याही शास्त्राच्या स्वतंत्र तंत्रयुक्ती आणि प्रमाणं असतात आणि त्यांच्या साहाय्याने आपण त्या शास्त्रांचा अभ्यास करत असतो. फक्त आपल्याला ती या नावांनी माहीत नसतात. आयुर्वेदाच्या अभ्यासाची गुरुकिल्ली आहेत या दोन्ही. आता असं बघ, आयुर्वेदाच्या स्वतःच्या काही संकल्पना आहेत, थिअरीज् आहेत. त्यांची सिद्धता व्हावी यासाठी काही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियांचं माध्यम आहेत, तंत्रयुक्ती आणि प्रमाणं. आयुर्वेदाचं एक लॉजिक आहे. या लॉजिकचा उपयोग आयुर्वेद शास्त्राच्या जीवनातल्या अॅप्लिकेशनमध्ये होत असतो. अ‍ॅप्लाईड सायन्स शिकतोच की आपण! प्रश्न इतकाच आहे की हे लॉजिक तुम्हाला किती कळलंय आणि त्याचा वापर तुम्ही किती खुबीने करून घेताय."
"अरे कळतंय, पण वळत नाहीये. थिअरी समजली पण ते अॅप्लिकेशन, अप्लाईड सायन्सची बोंब होतेय ना...."
"अरे बाबा, तीच तर गंमत आहे आयुर्वेदाची! पहिल्या वर्षात दोष-धातु-मल शिकायचे, दुसर्‍या वर्षात त्यांच्यापासून उत्पन्न होणारी विकृती शिकायची आणि तिसर्‍या वर्षाला त्याची ट्रीटमेन्ट समजून घ्यायची आणि करून बघायची."
"पण कशी? हे शिकलेलं सगळं एकत्र कसं आणायचं?"
"त्यासाठीच तर आयुर्वेदाचं लॉजिक वापरायचं, तंत्रयुक्ती वापरायची, प्रमाणं वापरायची."
"हे महान आयुर्वेदलॉजिकज्ञा! आमचा बेसिक प्रश्न हाच आहे, हे सारं करावं कसं?"
"वत्सा, तुजप्रत कल्याण असो. माझी आयपीडी राऊंड घ्यायची वेळ झालेलीच आहे, तेव्हा चल, मी हे तुला एक पेशन्टसाईड क्लिनिक घेऊनच दाखवतो."

-२-

काळ - वर्ष १९९८

"डॉक्टर, एमो नाहीयेत आणि एक पेशन्ट आलाय, तर तुम्ही घ्याल का?"
"अहो सिस्टर, त्यासाठीच तर आम्ही इन्टर्नशीपला इथे येतो ना? पाठवा पाठवा, बघतो मी."
"पाठवते, पण बघा हं, म्हातारा जाम खट आहे. कधी कधी एमोसाहेबांचंही ऐकत नाही."
"पाठवा तर खरं!"
................
"या आजोबा, काय म्हणताय, काय झालंय?"
"तू नवा दिसतोयस इथं. डाक्टरसायेब कुठं गेले इथले?"
"ते नसले तर काय झालं, मी आहे ना आज इथे. बोला काय होतंय?"
"चार दिसामागं गुरं घेऊन रानात गेलोवतो. तो तिथं दगुडावरून पाय घसरला नि पडाया झालं. कंबर लई दुखतीय आनी पायही धरल्यात. गुरं घेऊन जायालाही जमंना झालंय."
"अच्छा, असं झालं तर! चला तपासतो, या इथे झोपा पाहू. हं, श्वास घ्या जोराने, हं, रक्तदाब बघू. हं, कंबर कुठे दुखतीये? इथे? इथे? इथे दाबल्यावर दुखतंय? पाय कुठे त्रास देतोय?"
"हां, आत्ता जिथं दाबतोय तिथं दुखतंय.... तिथं नाई, ते जरा वरल्या बाजूला.... हां तिथंच तिथंच, लई दुखतंय."
"आजोबा, चार दिवस झाले तर काही तेल लाऊन शेकून वगैरे घेतलं की नाही?"
"लावलं ना, तेल लावलं, विटेने शेकलं, कंबरेवर निगडीपाल्याचा लेप लावला, पण गुण नाई आला. मग पोरगा बोलला, डाक्टरला दाखीव म्हणून आलो कसं बसं इथवर...."
"काय आहे, हाडं पिचल्यागत झालंय पडल्यामुळे. पण इथे काही आपल्याला हाडांचा फोटो काढता येणार नाही, आत काही झालंय का ते बघायला, त्यासाठी तालुक्याच्या गावाला जावं लागेल. जाणार का? पण तोवर दुखणं तसंच राहणार."
"आरं, लई त्रास हाय. तू दवा दे जरा."
"लवकर बरं व्हायचंय, दुखणं थांबवायचंय तर सुई टोचावी लागेल."
"आरं, सुई नको. मी सुई घेनार नाई. आधीच कंबर दुखतीय त्यात आनिक् सुई, नको मला. मी सुई घेनार नाई."
"असं काय करता आजोबा, कंबरेचं दुखणं इतकं आहे त्याच्यासमोर सुई कितीशी दुखणार? सुईने दिलेल्या औषधाने कंबर दुखायचीही थांबेल."
"मी सुई घेनार नाई."
"तुम्हाला कंबर आणि पायांच्या दुखण्यातून लौकर बरं व्हायचंय ना? तर मी सांगतो तसं औषध घ्या म्हणजे बरं वाटेल."
"ती सुई दुखती...."
"आजोबा, आता मी देतोय ना, दुखलं तर मला सांगा, मी लगेच थांबवेन. मग ठीक?"
"बरं, बघतो घिऊन, टोच सुई...."
"हां, आता कसं! आता आजोबा, तुम्ही तिथे झोपा मी औषध घेऊन येतो.... हां, आता हे एक थंड औषध लावतो हं.... आता नाही दुखणार.... हां, उठा आता."
"उठू कशाला, सुई टोचनार हायेस ना?"
"आजोबा, सुई टोचून झाली की! आता बघा तासा-दोन तासात तुमची कंबरदुखी कमी होतेय की नाही ते...."
"सुई टोचलीस पन! मला कळालंच नाई. पोरा, तुजा हात लई हालका हाय बग, मला जराबी दुखलं नाई, सुई टोचल्याचं कळलंबी नाई...."
"अरे, अरे, आजोबा, असं आपल्याहून लहान माणसाच्या पाया का पडतात? उठा बरं, एक सुई तर टोचलीय, त्यात काय, दुखणं गेलं की खरं, उठा बरं."
"तसं नाई, पाया तुज्या नाई तर तुला डाक्टर बनवनार्‍या द्येवाच्या पडलोय. त्यानं बरोबर केलंय. आजपरंत सुई दुखली नाई आसं कदीच झालेलं नाई. तू गुनाचा हाईस. द्येव तुजं भलं करेल, लेकरा...."

-३-

काळ - वर्ष १९९९

"डाक्टर साहब, अंदर आयें क्या?"
"आईये. बताईये क्या तकलिफ हैं?"
"वो तीन-चार दिन से सर्दी-खाँसी चल रही हैं. गलें में दर्द होता हैं. निगलने में तकलिफ हैं और बलगम बहोत निकलता हैं अब आज सुबह से बुखार जैसा लग रहा है..."
"आईये, चेक करते है.... मुह खोलिये, जबान दिखाईये.... अच्छा, अब लेट जाईये. साँस लिजिये.... जोर से.... जरा पेट के बल हो जाईये और फिर से साँस लिजिये.... सीधे हो जाई ये.... ब्लड प्रेशर देखते है.... प्रेशर बढा हुवा है.... कुछ गोलियाँ चालू हैं प्रेशर के लिये?"
"नही डाक्टर साहब, अब जो भी हैं आप ही दे दिजियें..."
"ठीक है, देखिये, तकलिफ कई दिनों से चली आ रही हैं. दवाई तीन महिना लेनी पडेगी. कुछ दिन के लिये परहेज रखना पडेगा. बाहर की खाने की चिजें बंद करनी पडेगी. दही, टमाटर, बैंगन, बटाटा बंद किजिये, घर में ही पालक, लौकी सब्जियों का गरम गरम सूप बनाकर पियें, हलदीवाला दूध पिजिये. अभी के लिये, ये दवाई दे रहा हूं, चार दिनों बाद दिखाना...."
"डाक्टर साहब, आपकी फीस?"
"नया केस पेपर बनवाने के और चार दिन की दवाई के सौ रूपये हुए."
"डाक्टर साहब, अब घासफूस की दवाई का इतना क्या दाम? आप यह दस रूपये ले लिजिये."
"मतलब? चेक अप और दवाई फ्री में तो नहीं आती...."
"वो आप दस रुपये में ये काम कर दिजिये. इससे ज्यादा तो हमसे देना होगा नही...."
"तो आप यह दवाई मुफ्त में ही ले जाना पसंद करेंगे?"
"अगर आप कहते हो तो वैसे करेंगे...."
..................
डॉक्टरला सदर पेशन्ट त्याच संध्याकाळी रस्त्याच्या कडेला भेळ आणि दही-बटाटा-पुरीवर ताव मारताना दिसला.

-४-

काळ - वर्ष २००७

"आत येऊ का?"
"अरे ये, ये. बस. काय म्हणतायत तुझे पेशन्ट्स?"
"आत्ताच शेवटचा पेशन्ट औषध घेऊन गेला; तेवढ्यात वॉर्डबॉयने तुम्ही बोलावल्याचं सांगितलं नि लगेच आलो."
"हो, शेवटचा पेशन्ट गेला की माझा निरोप द्यायला मीच त्याला सांगितलेलं."
"बोला, काही काम होतं का?"
"काम असं नाही रे, पण मला सांग, सध्या कसं काय चाललंय? शेड्यूल कसं चाललंय तुझं?"
"सर, सकाळी शहरातलं क्लिनिक, दुपारी इथे आणि संध्याकाळी उपनगरातला दवाखाना, सध्या असं व्यवस्थित सुरू आहे. दोनेक विद्यार्थीही येतात अधून मधून शिकायला."
"मी गेली दोन-तीन वर्षं तुला इथे बघतोय, तू सिस्टिमॅटिकली पेशन्ट्स बघतोस. ते आयुर्वेदात सांगितलंय ना, दर्शन-स्पर्शन-प्रश्न परीक्षा का काय, तसं. आणि बरोबरच तू त्यांना पथ्यापथ्य सांगतोस, काही विशिष्ट पदार्थ त्यांनी खावे, असं असेल तर तुला त्याची रेसिपीही सांगतोस असंही ऐकलंय मी, बरोबर ना?"
"आहे खरं तसं. शुद्ध आयुर्वेदाचा विचार करायचा तर तसं होणारंच ना! पण सर, मला आता असं वाटतंय की तुम्ही माझ्या डिपार्टमेन्टमध्ये, तुमचे हेर पेरलेत की काय?"
"अरे बाबा, मोठ्या हॉस्पिटलच्या सीएमओ आणि अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरला येवढी बातमी न कळायला काय झालंय? पण मुद्दा तो नाहीये. मला तुला दुसरंच काही सांगायचंय."
"बोला की सर, काय म्हणताय?"
"तू एका पेशन्टला सरासरी किती वेळ देतोस?"
"तसं गणित करणं कठीण आहे सर. जुनाट रोग असेल तर वेळ जास्त लागतो, रोगी वयस्कर असेल तरही वेळ जास्त लागतो. काही बायकांना औषधाच्या प्रक्रिया समजायला वेळ लागतो, तर कधी दहा मिनिटांच्या आतच पेशन्ट औषधं घेऊन बाहेर पडलेला असतो. तरी सरासरी ३०-३५ मिनिटे धरायला हरकत नाही. आयुर्वेदासाठी इतकं करणं म्हणजे काही फार नाही, नाही का, कारण शेवटी पेशन्टचा आयुर्वेदावरचा विश्वास वाढणं महत्त्वाचं आहे."
"मी ही तेच गणित केलेलं. हे असं तू गेले आठ वर्षं करतोयस, बरोबर?"
"होय सर, १९९९ पासून."
"म्हणजे अर्ध्या तासात तू एका पेशन्टला त्याच्या रोगाच्या बाबतीत आयुर्वेद शिकवतोस, होय ना?"
"सर, एका अर्थाने बरोबरच आहे तुमचं! एकप्रकारे आयुर्वेदाचं शिक्षण देण्याचीच ही प्रक्रिया होईल."
"म्हणून माझं तुला असं सांगणं आहे की आता तू वेगळा विचार करावास."
"वेगळा म्हणजे?"
"अरे, वेगळा म्हणजे वेगळ्या दृष्टीकोनातून. अर्ध्या तासात तू जितके श्रम करतोस आणि एका पेशन्टला आयुर्वेदात साक्षर करतोस, तितक्याच वेळात शंभर लोकांपर्यंत कसा पोहोचू शकशील याचा आता विचार कर. एका पेशन्टपायी तुझी जितकी एनर्जी वापरली जाते तितक्या एनर्जीच्या वापराने शंभर पट परिणाम कसा घडवता येईल याचा विचार कर. तुझं आयुर्वेदावरचं प्रेम आणि त्याच्या प्रसाराची ऊर्मी बघून मला हे तुला सुचवावसं वाटलं."
"तत्त्व म्हणून हे योग्य वाटतंय. पटतंय खरं. पण हे करावं कसं?"
"ते मात्र मी तुझ्यावर सोडेन. शोधून काढ एखादा शुद्ध आयुर्वेदिक उपाय, याच्यावरही...."
"मी नक्की विचार करतो सर, यावर..."

-५-

वर्ष २००७ नंतर, 'मंजिलें और भी हैं...’वर निष्ठा असलेल्या डॉक्टरांनी नव्या वाटा धुंडाळण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना काही मार्ग अल्पयशदायी ठरले, तर काही चांगल्यापैकी यशदायक ठरले. असं असलं तरीही या तत्त्वानुसारच डॉक्टरांची आयुर्वेदाच्या प्रचाराची आणि प्रसाराची वाटचाल नवनव्या वाटांवर सुरूच आहे.

(समाप्त किंवा पुढे चालू....)