Saturday, 21 June 2014

संवादिका - ३"आहेस का रे?"
"आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे."
"तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?"
"व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?"
"माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला."
"असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D"
"नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..."
"असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनी पडेंगी ना...?"
"तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?"
"काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?"
"चेष्टा नकोय रे! तुला कळणार नाही माझे हाल..."
"काय झालं बेबी? तू मला सांगणार नाहीस का?"
"तुला नाही तर कुणाला सांगू? मन मोकळं करण्यासाठी तुझ्याशिवाय आहे कोण मला?"
"मग सांग तर काय झालं?"
"का नेहमीच्या खपल्या काढायच्या? त्रास होतो रे फार आता..."
"कुछ लेते क्यों नही? :-D"
"ने. ने. तू सगळं चेष्टेवारीच ने."
"बेबी चेष्टा नाही गं. बरं वाटत नसेल तर तू व्यवस्थित औषधं घे ना..."
"देणाराच जवळ नसेल तर....?"
"आता हे काय आणिक्?"
"काय म्हणणार मी दुसरं? तुझ्याशिवाय झुरतेय रे मी नुसती..."
"मग मी का फार आनंदात आहे?"
"असशीलच. म्हणूनच इतका लांब आहेस नं माझ्यापासून?"
"काय म्हणतेयस बेबी? कंपनीच्या दौर्‍यावर गेलो नाही तर ठेवतील का मला नोकरीवर? आणि आता परततोच आहे ना..."
"मिळालीय का गाडी व्यवस्थित? बसायला जागा? की उभ्यानेच प्रवास?"
"रिझर्वेशन मिळालं. छान बसून गप्पा मारतोय की तुझ्याशी..."
"किती छळशील रे?"
"आँ? आता काय झालं?"
"किती दिवस झाले आपल्याला भेटून? तुझी खूप आठवण येतेय..."
"बेबी आजच परततोय की मी..."
"हो, पण मला लगेच थोडाच भेटणार आहेस?"
"विरहाने प्रेम वाढतं म्हणे... ;-)"
"अगदी दुष्ट आहेस तू. इथे मी विरहाने जळतेय नि तुला विनोद सूचतायत."
"अगं, उद्या भेटू की मग आपण."
"उद्यापर्यंतचा वेळ कसा काढू रे मी?"
"अगं, आता हा हा म्हणता उद्या उजाडेल..."
"माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठलाय. मी कुणाकडे मन मोकळं करु रे?"
"बेबी, आपण काहीही झालं तरी उद्या भेटतोय."
"मी रात्र कशी काढू?"
"आपण उद्या नक्कीच भेटतोय बेबी."
"मला तुझा आधार हवाय. तुझ्याशिवाय मी कशी जगतेय माझं मलाच माहिती."
"माझी अवस्था काही वेगळी आहे का गं?"
"कुणास ठाऊक. तुझी लोकं, तुझी व्यवधानं...."
"काय बोलतेयस बेबी? मी तुझ्यापासून फक्त एक फोन-कॉल दूर आहे."
"हो नं. एक फोन-कॉल. तो ही मी मला हवा तेव्हा करू शकत नाही कारण तुझी व्यवधानं....."
"बेबी, तुझ्यासाठी कधीतरी मी त्यांचा विचार केलाय का?"
"ती मला तुझ्यापासून दूर ठेवतात रे..."
"आपण भेटतोय ना उद्या?"
"अरे ते उद्या. मला आज, आत्ता तुझ्या खांद्यावर डोकं ठेवायचंय आणि मनसोक्त रडायचंय."
"बेबी, आपण आत्ता इतके छान गप्पा मारतोय, उद्या भेटायचं ठरवतोय आणि तुला रडू का येतंय?"
"आता सहन होत नाही रे. किती दिवस....? मला आता कठीण होतंय रे..."
"उद्या भेटतोय ना आपण... तेव्हा बोलू."
"तुझ्याशिवाय माझी अवस्था बोलण्याच्या पलिकडे गेलीय, त्याचं काय?"
"बेबी....."
"भीती वाटते, मी माझं काही बरं वाईट....."
"बेबी, काहीतरी बोलू नकोस. मी आहे ना? उद्याच्या आपल्या भेटीचा विचार कर...."
"सहन नाही होत रे आता...."
"एक रात्रच फक्त बेबी, उद्या दुपारी आपल्या नेहमीच्या जागीच भेटतोय आपण...."
"नक्की नं? माझ्या त्रासात भर पाडू नकोस आता आणखी. मला खरंच सहन होणार नाही...."
"बेबी, तुला कधी ताटकळत ठेवलंय?"
"नाही रे, आता कशाचीच शाश्वती वाटेनाशी झालीय..."
"बेबी, अभद्र बोलू नकोस. जेवलीस का?"
"तुझ्याविना अन्न गोड लागत नाही रे..."
"वेडेपणा करू नकोस. जेवून घे थोडं तरी. रात्रीची औषधं विसरू नकोस."
"कशाला घ्यायची आता ती मेली औषधं...? जगायचंय कशासाठी? कुणासाठी?"
"माझ्यासाठी बेबी. तुझ्याशिवाय आहे कोण मला...?"
"आहेत की ती तुझी व्यवधानं...."
"का टोमणे मारतेयस? मी का सुखी आहे या सगळ्यात? तुझ्या आठवणीत जीव तुटतो गं...."
"मग सोडून का देत नाहीस....?"
"इतकं सोपं का आहे सारं...? जगण्यासाठी पैसा लागतो, बेबी..."
"माझं काय?"
"बेबी, तूच माझं सर्वस्व..."
"सर्वस्वाचं सर्वस्व नकोसं झालंय नं तुला...."
"बेबी, आता तू जेव. रात्रीचा औषधाचा डोस घे. गाडी स्टेशनात येतेय. आता बोलता येणार नाही. उतरायला गर्दी आहे."
"नक्की भेटशील ना रे उद्या?"
"हो बेबी, आपण उद्या दुपारी नक्की भेटतोय."
"राजा, तुला उद्या कडकडून भेटायचंय रे..."
"होय बेबी. तुझी आज्ञा शिरसावंद्य. आठवणीने औषधं घे. आता उतरेन. गाडी आली स्टेशनात...."
.
.
.
ट्रिइइइइंग ट्रिइइइइंग! ट्रिइइइइंग ट्रिइइइइंग!
"हां बोल राणी! अगं आत्ताच पोहोचतेय गाडी."
".........................................."
"स्टेशनवर आलीयेस? अरे वा! प्लेझन्ट सरप्राइजच की!"
"............................................."
मनूपण आलीय? फारच छान!"
" ……………………………."
"राणी, माझा इंजिनापासून सातवा डबा आहे बघ! तिथेच थांब. उतरतोच आहे. चल थोडी गर्दी आहे उतरायला. ठेवतो."
______________________________________
त्याने 'वॉट्सॅप'वरचा 'तो' मेसेज बॉक्स उघडला आणि त्यातले नुकतेच झालेले संभाषण एक एक करून डिलीट करून टाकले. क्षणापूर्वीच्या भावनांच्या आवेगांचा आता त्या मेसेजबॉक्समध्ये मागमूसही उरला नाही. जणू काही त्यातलं सारं काही अगदी स्वच्छ आणि टापटीपित होतं. गाडीने स्टेशन गाठलं आणि उतरणार्‍यांच्या गडबडीत तो मिसळून गेला. लोकं उतरली. मी ही उतरलो. माझ्यापासून काही अंतरावर तो आपल्या बायको-मुलीसोबत जाताना दिसला. मुलगी त्याला सारखी बिलगत होती नि बायकोही काहीशी त्याला खेटूनच चालत होती. सारं काही आलबेल होतं.
रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच....