Saturday, 26 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (३)

तो
-----

नुकतीच कामं त्याने हातावेगळी केलेली आणि थोडा रिलॅक्स बसलेला तर दारात चक्क तिला बघितलं. थोडा गडबडलाच होता तो! काहीसं अनपेक्षितंच होतं तिचं येणं त्याच्यासाठी. तरी सावरून उभं राहत त्याने तिचं स्वागत केलं. तिने येताना पिवळ्या जर्बेराच्या फुलांचा गुच्छा आणलेला. त्याने प्रश्नार्थक नजरेने, तिने आणलेल्या फुलांच्या बुकेकडे नि तिच्याकडे पाहिलं. त्यावर तिने हसून म्हण्टलं, "सेमिनारच्या दिवशी तुमचं कार्ड देऊन ऑफिसात यायचं आमंत्रण दिलेलं तुम्ही, ते विसरलात तर नाही ना? त्या दिवशी तुम्ही सकाळपासून इतकी मदत केलीत मला, पण एका शब्दाने साधं थँक्यूही म्हणू शकले नाही मी, त्याच्या थोड्याफार भरपाईचा प्रयत्न आहे हा." असं म्हणत तिने तो फुलांचा बुके त्याच्या हातात दिला. त्याने हसून ती फुलं फुलदाणीत नीट लावली आणि तिला म्हणाला, "अगं, फार कुठे काय मदत वगैरे केली? तुझं आपलं उगाच काहीतरी."

त्यानंतर चांगले तास-दिड तास ते दोघेही गप्पा मारत बसलेले. विषय तसे साधेच होते. त्याने स्वतःची पार्श्वभूमी सांगितली आणि तिने तिची. थोडीफार करीअरची चर्चा, थोडीफार त्यांचे अभ्यासाचे आणि इतर आवडीचे विषय आणि अर्थातच विद्यापीठाचा विभाग नि विभागातील शिक्षक. वेळ कसा गेला दोघांनाही कळलं नाही. अगदी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी भावना दोघांच्याही मनात आली. त्यामुळे तिची ही ऑफिस भेट पहिली आणि अखेरची ठरली नाही. जेव्हा जेव्हा ती त्या परिसरात यायची तेव्हा तेव्हा आधी फोन करून तो कामात नसेल तर ऑफिसात यायची. थोडा वेळ थांबायची. तो कामात असेल तर बरेचदा तो कामातून मोकळा होईपर्यंत काही पुस्तक वगैरे वाचत बसायची. मग त्याची भेट घेऊन निघायची. हळू हळू त्यांच्या ऑफिसबाहेरही भेटी होऊ लागलेल्या. कधी दुपारच्या जेवणासाठी तर कधी संध्याकाळच्या फुटकळ खाबुगिरीसाठीही त्यांचं भेटणं होऊ लागलं. आवडती नाटकं, आवडते चित्रपटही ते एकत्र बघायला जाऊ लागलेले. त्यांच्या मैत्रीची वीण जशी घट्ट होऊ लागल्याची जाणीव त्याला येऊ लागली कारण ती अहो-जाहो वरून अरे-तुरे वर उतरली होती आणि त्याच्याशी अनेकदा हक्काने काही गोष्टी बोलायची, सांगायची. आता त्याला जाणवू लागलेलं की त्याच्यात आणि तिच्यात केवळ मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक घट्ट नातं निर्माण झालंय. पण त्याचवेळी त्याला भीतीही वाटायची. त्याला जे तिच्याबद्दल वाटतंय ते तिला वाटत नसेल तर त्याच्या कोणत्याही आतेतायी कृतीमुळे, या क्षणाला जे एक सुंदर नातं तयार झालंय त्याचाच विध्वंस होईल.

गेले काही दिवस तो याच विचारात होता. एका कार्यक्रमामुळे आदला आठवडा ती खूपच व्यस्त होती आणि त्याआधी कार्यक्रमाची तयारी म्हणूनही ती व्यग्र होती. जवळपास पंधरा दिवसांनी ते भेटणार होते. त्याचं एक मन त्याला कृती करायला सांगत होतं तर एक मन संयमाने वागायला सांगत होतं. या द्वंद्वात जणु तोच धारातीर्थी पडत होता. त्याचा असा विचार चालू असतानाच ती आली. नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसातल्या सोफ्यावर पर्स टाकून पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. त्याने तिच्या कार्यक्रमाबद्दल विचारलं आणि मग बराच वेळ ती त्याबद्दल सांगत राहिली. अगदी डिटेलमध्ये, प्रत्येक बाबींचा व्यवस्थित विचार करून, अगदी अमूक एक निर्णय का घेतला त्याच्या पार्श्वभूमी आणि कारणमीमांसेसकट. त्या दिवशी तिने घरून दोघांनाही पुरेल असा डबा आणला होता. मग त्यांनी दुपारचं जेवण ऑफिसातच घ्यायचा निर्णय घेतला.

जेवता जेवता त्यांचं बोलणं अनाहूतपणे दोघांच्या आवडत्या विषयाकडे गेलं. संगीत. बोलता बोलता संदर्भ जॅझ आणि तत्कालीन स्विंग संगीताकडे आला आणि त्यातल्या कृष्णवर्णीयांच्या योगदानाकडे गेला. ती हिरहिरीने ते संगीत कृष्णवर्णीयांचच आहे आणि त्यात गौरवर्णीयांचं योगदान गेल्या ५० वर्षांपूर्वीपर्यंत अगदी कमी आहे, असं प्रतिपादन करू लागली. तिच्या सवयीने ती वेगवेगळ्या संगीतकारांचे संदर्भ देत होती, त्यांची गाणी सांगत होती, त्यांच्या कारकिर्दीची वर्ष सांगत होती. नेहमीप्रमाणेच तो तिचा अगदी शांतपणे प्रतिवाद करू लागला. जॅझ संगीत कृष्णवर्णीयांच्या अभिव्यक्तिचा स्रोत असलेलं हे संगीत असलं तरी त्यात कृष्णेतरांनीही योगदान दिलेलं आहे हे तो अनेक प्रकारे तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचं जेवण संपलं तरी चर्चा सुरूच राहिली.

या विषयावरच्या सगळ्या मुद्द्यांवर उहापोह झाल्यावर त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि एक एक कृष्णेतर संगीतकाराचं नाव घेऊन त्यांच्या जॅझ रचना तिला ऐकवू लागला. त्यातल्या काही तिला माहित होत्या तर काही नव्यानेच समजत होत्या. तरी तिचा मुद्दा ती मागे घेत नव्हती कारण तिच्यामते सिनात्रा जॅझपेक्षा पॉप संगीत जास्त गायला होता. मग त्याने त्याचा हुकुमाचा पत्ता टाकला. त्याने तिला फ्रँक सिनात्राची गाणी ऐकवायला सुरूवात केली. त्याबरोबर पूर्ण चर्चेचा नूरच पालटायला लागला आणि दोघेही जॅझ संगीताचा आनंद घेऊ लागले. पुढे जॅझच्या रसग्रहणाकडेच ते वळले. तासभर यातच गेला तेव्हा त्याने तिला म्हण्टलं, "बघ, हे सिनात्राचं गाणं काही जॅझ नाही पॉपच आहे पण गेले काही दिवस तुला ऐकवायचा विचार करत होतो. हे ऐकून तुला काय वाटतं ते मला अगदी स्पष्ट सांगायचं बरं का, सांगशील?" त्यावर ती म्हणाली, "अरे, आधी ऐकवशील तर खरं मग सांगते, ठीक?" "ठीक," असं म्हणून त्याने ते गाणं सुरू केलं आणि तो तिच्या प्रतिक्रिया बघू लागला.

क्रमश: 

No comments:

Post a Comment