Sunday 27 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (६)

तो - अंतिम भाग
......................

"Something Stupid" सुरू झालं आणि त्याच्या केबीन मधलं वातावरणच बदललं. जसे जसे या गाण्याचे सूर घुमू लागले तसे तसे तिथले बाकी आवाज एकदम शांत झाले. आता तिथे ना कुठले वाद होत होते, ना कुठले विवाद आणि ना कसल्या चर्चा! तो डोळ्यात प्राण आणून तिच्याकडे बघत होता पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. त्याला इतक्या दिवसात कळलंच होतं की ती खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तिला जे बोलायचं असतं ते ती नेहमीच आधी तिच्या डोळ्याने आणि तिच्या चेहर्‍याने बोलते. तिला एखाद्या गोष्टीचा प्रतिवाद करायचा असेल तर तिची नजर तीक्ष्णपणे समोरच्यावर केन्द्रित होते, एकदम फोकस्ड, तिच्या ओठांना एक वेगळाच बाक येतो, दातांनी खालचा ओठ थोडासा चावला जातो आणि समोरच्याचं बोलणं संपल्या संपल्या ती एक खोल श्वास घेऊन त्या व्यक्तीवरची नजर जराही न हलवता आपल्या बोलण्याला सुरूवात करते. बोलते कसली, जणु समोरच्या व्यक्तीच्या युक्तिवादाच्या चिंधड्याच करते. संदर्भ, उदाहरणं, प्रयोग आणि त्यांचे निष्कर्ष अशांनी युक्त तिची अमोघ वाणी जेव्हा थांबते तेव्हा समोरचा पार नामोहरम झालेला असतो. तर जेव्हा एखाद्या विचाराशी ती सहमत असते तेव्हा तिचे डोळे मोठ्ठे होतात, अगदी काहीसे लकाकूही लागतात, चेहर्‍यावर एक वेगळंच हास्य पसरतं. जणू ती समोरच्याला सांगत असते की होय, खरंय, माझाही अगदी हाच विचार आहे. समोरच्या व्यक्तीच्या निष्कर्षाशी सहमती दर्शवतानाही ती स्वतःचे त्या निष्कर्षाप्रति येण्यामागचे विचार स्पष्ट करते, उत्फुल्ल चेहर्‍याने त्याची मीमांसा करते आणि ती हे करत असताना समोरच्या व्यक्तीलाही जाणवतं की तिच्या या विचारांनीही त्याच्याच निष्कर्षांचं अधोरेखन होतंय. एखादी गोष्ट तिला नव्याने कळत असेल तर तिचे डोळे खूप गंभीर होतात, चेहराही तसाच बनतो, ओठ जरासे मुडपले जातात आणि उजवा पंजा हनुवटीखाली येऊन समोरच्या व्यक्तीकडे बघता बघता तिची तर्जनी तिच्या गालावर टिचक्या मारू लागते, हे तिचं त्या नव्या माहितीची मेंदूत पडताळणी होत असल्याचं लक्षणच तो मानायचा. पण आजचं लक्षण काही वेगळंच होतं.

तो त्याच्या टेबलामागच्या खुर्चीवरून समोर बसून ते गाणं ऐकणार्‍या तिच्या हावभावांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटायचं की आता तो तिच्या डोक्यात काय चालू आहे ते तिच्या चेहर्‍याकडे बघताच समजू शकतो पण आता त्याला काहीच अंदाज येत नव्हता. तो एकटक तिच्याकडे बघत होता पण त्याला तिच्या मनातल्या गोष्टींचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. फ्रँक आणि नॅन्सी सिनात्रांनी त्यांच्या गाण्याची दोन्ही कडवी म्हणून झाली आणि गाणं शेवटाला येण्यापूर्वीची व्हायोलिन, पियानो, गिटार, सॅक्सोफोन आणि ट्रंपेटवरची ती धुंद धून सुरू झाली. त्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागली. त्याला त्याच्या टेबलावर तिच्या समोर फिरवून ठेवलेला लॅपटॉपचा स्क्रीन तिचा चेहरा वाचण्याच्या प्रयत्नातला अडथळा नसतानाही तसा वाटायला लागला. आपल्या जागेवरून उठून तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. आता फ्रँक आणि नॅन्सी पुन्हा एकदा दुसरं कडवं गात होते. ते सुरू झाल्या झाल्या इतका वेळ स्तब्धतेने ऐकणार्‍या तिने स्क्रीनवरची नजर जराही न हटवता आपल्या उजव्या हातावर हनुवटी टेकवली. त्याने पाहिलं की ती अजूनही ते गाणं गंभीरपणे ऐकतेय आणि जसं शेवटचं कडवं पुन्हा सुरू झालं तसा तिच्या तर्जनीने गालावर ताल धरला होता.

गाण्याच्या ध्रुवपदातल्या शेवटच्या तीन शब्दांचा पुन्हा पुन्हा उच्चार करून फ्रँक आणि नॅन्सीने गाणं संपवलं आणि त्याची केबीन एकदम शांत झाली. तो तिच्याचकडे बघत होता पण तिची लॅपटॉपच्या स्क्रीनवरची नजर अजूनही हलली नव्हती. त्याच्या मनावर आता प्रचंड दडपण आल्याची जाणीव झाली. तो काहीच बोलू शकला नाही. तीही काहीच बोलत नव्हती. केबीनमध्ये तणावग्रस्त शांतता निर्माण झाली. अचानक त्याने बघितलं की ती डाव्या हाताची तर्जनी लॅपटॉपच्या कर्सरपॅड वरून फिरवत आहे. त्याला कसलाच अंदाज येत नव्हता. कसंबसं त्याने तिला विचारलं, "कसं काय वाटलं गाणं?" त्यावर आपली कर्सरपॅडवरची हालचाल जराही न थांबवता तिने प्रत्युत्तरादाखल नुसताच हुंकार दिला.

त्याला कळेचना की पुढे काय करावं. बाण तर सुटलेला कारण तो सोडणं त्याच्या हातात होतं पण त्यामुळे होणारा परिणाम मात्र त्याच्या हाती नव्हता. त्याने केलेले तिच्या प्रतिसादाचे सगळे अंदाज आता कोसळून पडलेले. गाणं संपल्यावरही तिने एका हुंकाराखेरीज काहीच म्हण्टलेलं नव्हतं आणि आपली स्क्रीनवरची नजरही हटवली नव्हती. त्याच्याकडे पाहिलेलंही नव्हतं. त्याने खूप प्रयत्नाने तिला विचारलं, "काय झालं? काही चुकलं का?" यावर तिनेही काहीच उत्तर दिलं नाही. ना तिची स्क्रीनवरची नजर ढळली ना तिची कर्सरपॅडवरची डाव्या तर्जनीची हालचाल. त्याचा अगदी तिच्याकडे व्याकुळतेने बघणारा पुतळाच झाला होता. अचानक ती खुर्चीवर ताठ बसली आणि स्क्रीन वरची नजर उचलून अत्यंत थंडपणे त्याच्यावर रोखली. त्यानेही तिच्या नजरेला नजर दिली. तिच्या त्या नजरेतले भाव जाणण्याचा तो प्रयत्न करू लागला पण त्याचा कोणताही निर्णय होत नव्हता. त्याला इतकंच समजत होतं की तिचा चेहरा काहीसा कठोर, काहीसा भावनाहीन असा वाटतोय. आता त्याला आपण जे समजतोय त्याच्यावरही शंका येऊ लागली होती.

हाताची घडी घालून ती आता त्याच्याकडे बघत होती, इतक्यात लॅपटॉपमधून हलकेच ड्रमचे बीट्स ऐकू यायला लागले. त्याला कळेचना की हा कसला आवाज येऊ लागला ते आणि अचानक त्याच्या कानावर गाण्याचे शब्द आले. फ्रँक सिनात्राच गात होता -


Fly me to the moon
Let me play up there among the stars
Let me see what life is like On jupiter and mars

तो एकदम आश्चर्याने थक्क झाला. ती इतका वेळ त्याच्या गाण्यांची यादी बघत होती हे याला समजलं. कर्सरपॅडवरची हालचाल त्याचंच द्योतक होती. गाणं जसं जसं पुढे जात होतं तसे तसे तिच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. गाणं जसं पहिल्या कडव्याच्या शेवटाला आलं आणि फ्रँक गाऊ लागला -

In other words, hold my hand
In other words, baby kiss me


तेव्हा त्याने पाहिलं की तिचे डोळे चमकत आहेत आणि चेहर्‍यावर एक खट्याळ हसू आहे. त्याने हे ही पाहिलं की जसं फ्रँकने baby kiss me म्हंटलं तसं तिने हसून त्याच्या दिशेने एक उडतं चुंबन फेकलं.
आता त्याचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. तिने त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं आणि ते ही त्याच्या इतक्याच कल्पकतेने. जे त्याच्या मनात होतं तेच जणु अगदी तिच्याही मनात होतं.

फ्रँक गातच होता -

Fill my heart with song
Let me sing for ever more
You are all I long for
All I worship and adore
In other words, please be true
In other words, I love you

जसा तो दुसर्‍या कडव्याच्या शेवटाला आला तशी तिची नजर खाली गेली. त्याच्या लक्षात आलं की तिच्या गालांची लाली वाढली आहे. डोळ्याच्या कोपर्‍यातून ती त्याच्याचकडे बघत आहे. गाण्याचं दुसरं कडवं संपल्यावर ड्रम्स, ट्रंपेट, व्हायोलिन, बासरी, पियानो आणि सॅक्सोफोनवरची जीवघेणी धून सुरू झाली. ती संपता संपता फ्रँकने दुसर्‍या कडव्यातले शब्द पुन्हा गायला सुरूवात केली. आता त्याला त्या आधी ऐकलेल्या शब्दांचा नव्याने अर्थ लागत होता. त्या प्रसंगासाठी या शब्दांइतकं अधिक काहीच चपखल बसणं त्याला अशक्य वाटत होतं. आता त्याच्या हृदयात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद भरून राहिला होता. तो हसर्‍या चेहर्‍याने एकटक तिच्याकडे बघत होता आणि फ्रँक गाणं पुन्हा एकदा शेवटाला नेत होता. ध्रुवपदाची आळवणी करताना त्याने नेहमीप्रमाणे In other words ची द्विरुक्ती केली आणि तो जसा पुढचे शब्द गाऊ लागला तसं त्याने पाहिलं की तीही लिपसिंक करत त्याला म्हणत होती,

"I... Love….. You!"

(समाप्त)

1 comment:

  1. Liked it a lot.. The relation between "ti" and "to" is interestingly woven and one is forced to think what next..

    Keep such stories coming!!

    ReplyDelete