Saturday, 26 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (४)

ती - (पुन्हा) भाग १
........................

आज पंधरा दिवसांच्या अवकाशानंतर ती त्याच्या ऑफिसमध्ये जाणार होती. अवकाशानंतर असं म्हणणं खरं तर चुकीचंच होतं कारण खरंच त्या दोघांत काही अवकाश निर्माण झालेलं का? तर त्याचं उत्तर, नाहीच, असं द्यायला लागलं असतं. सेमिनारच्या दोन दिवसांनंतर ती पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये आली आणि त्या दिवसानंतर तसा काहीसा सिलसिलाच सुरू झाला. ती जेव्हा त्या भागात यायची तेव्हा हक्काने त्याच्याकडे यायची. तो कामात असेल तर थांबायची आणि त्याला वेळ होईल तसं थोड्या गप्पा मारून निघायची. पण ही अवस्था फार काळ टिकायचीच नाही. पहिल्याच दिवशी तिने त्याला आपला मोबाईल नंबर दिला आणि त्याचा नंबर तर तिला त्याच्या कार्डावरच मिळालेला होता. दिवसभरातून त्यांचे एकमेकांना आठ ते दहा फोन व्हायचे. पण तेव्हाही कधी वायफळ गप्पा झाल्या नाहीत. नेहमीच त्यांचं बोलणं कोणत्या ना कोणत्या विषयावरच्या चर्चेचंच व्हायचं. मग हिरहिरीने दोघेही आपापला मुद्दा मांडायचे, त्यांचं विवेचन करायचे, त्यांची उदाहरणं आणि अवतरणं द्यायचे. त्यांचं अगदी म्हणतात तसं, 'काव्यशास्त्रविनोदेन' काळाचं गमन व्हायचं. कुठेही उच्छृंखलता नाही, सूचक बोलणं नाही, अगदी निखळ मैत्रीच्या पातळीवर त्यांचं प्रत्येक संभाषण असायचं. पण यातही हळू हळू फरक पडत चाललेला तिच्या लक्षात येऊ लागला.

ती फारच मानी आणि हुशार मुलगी होती. बदलत्या परिस्थितीचा अंदाज तिला चटकन् यायचा आणि त्यातही तिचा स्वभाव सेल्फ क्रिटीसिझम करण्यात प्रवीण होता, किंबहुना ती स्वतःला अधिकाधिक चौकशीच्या पिंजर्‍यात उभी करत होती. कारण तिचं तिलाच कळत होतं की त्याला फोन केल्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं. दिवसाची सुरूवात त्याच्याशी बोलून झाली की तिचा दिवस फार प्रसन्नपणे सुरू व्हायचा आणि ती प्रसन्नता टिकून रहावी म्हणून दिवसभरातून स्वतः त्याला तीन - चार फोन करायची. आता त्याचेही तिला फोन येऊ लागले होते. कधी तो बिझी असेल तर काही वेळाने फोन करायचा किंवा ती बिझी असेल तर काही वेळाने ती फोन करायची. मग कॉल्सची संख्या वाढायची. आता रात्री झोपण्यापूर्वी दहा - बारा मेसेजेस करून दोन दोनदा गूड नाईट म्हणूनच ती झोपत असे. दिवसभरातल्या घडामोडी त्याच्याशी शेअर केल्याशिवाय तिला रहावतंच नसे. मग एखाद्या वेळी विशिष्ट परिस्थितीत ती त्याचा सल्लाही घेई, कधी आपला निर्णय आणि त्यामागचा विचार सांगायची. त्यांच्या चर्चांच्या विषयांनाही धरबंध उरला नव्हता. त्यात कला आणि संगीत यांचे दोघेही दर्दी रसिक असल्याने त्यांच्या इतर ठीकाणच्या गाठीभेटीही वाढल्याचं तिला लगेच जाणवलं होतं.

तिच्या इतक्या तिच्या मैत्रिणींच्या आवडी प्रगल्भ नव्हत्या, त्यामुळे जेव्हा त्याची ओळख झाली तेव्हा तिला समान शीलाच्या मित्राची प्राप्ती झालेली. त्याच्याबरोबर ती आवडीचे, उत्तमोत्तम चित्रपट आणि नाटकं बघायला जायला लागलेलीच पण त्याबरोबर ते दोघेच अनेक आर्ट गॅलर्‍यांमध्ये एकत्र चित्र-प्रदर्शनालाही जाऊ लागले. बर्‍याचदा तिला एखादे प्रदर्शन बघायचे असे तेव्हा ती त्याला हक्काने ऑफिसातून बाहेर काढायची आणि तिथे घेऊन जायची. मग उरलेला सगळा दिवस त्या प्रदर्शनातील चित्रांच्या रसग्रहणात आणि त्याच्या चर्चेत जायचा. कधी त्याला एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जायचे असेल तर तो तिचं तिकिट काढून तिला आमंत्रण द्यायचा. अर्थात तिला आता हे ही जाणवायला लागलेलं की हा सगळा प्रकार तिला आवडतोय आणि तशा वागण्याचं एक निराळंच आकर्षण तिला वाटतंय.

तिला तिच्यातला बदल कळत होता पण झालेला बदल तिला हवाहवासाही वाटत होता. त्याचवेळेला तिला असंही जाणवत होतं की झालेल्या बदलांवर आता तिला स्वतःला कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राखता येत नाही आहे. तिला सगळ्या बदलांचा संगतवार विचार करायचा होता पण भावनांच्या प्रवाहात ती इतकी वाहात चाललेली की ही अनियंत्रित परिस्थिती तिला घाबरवून टाकत होती. तिची हुशारीच तिला भावनांमध्ये वाहून जाण्यापासून अडवत होती. रात्री उशीरा कधी कधी ती जागी होई आणि मग या संबंधीच्या विचारांनी तिची झोप उडे. ती विचार करायची, तिच्या शिक्षणाचा, तिच्या कलोपासनेचा, तिच्या करिअरचा आणि तिच्या भविष्याचा. ती तिच्या आणि त्याच्या संबंधीही विचार करायची. त्यांच्या नात्याला कोणत्यातरी नावाचं कोंदण द्यायचा प्रयत्न करायची. तिच्या इतर मैत्रिणी आणि मित्रांची त्याच्याशी तुलना करून बघायची. त्यांच्या बरोबर असताना आणि त्याच्या बरोबर असताना, तिला काय फरक वाटतोय याविषयी विचार करूनही डोकं शिणवायची. तिला निश्चित करता येत नव्हतं की त्यांचं नातं केवळ मैत्रीचं आहे की त्यापलिकडचं काही, पण रात्रीच्या काही तासांचा विचार तिला पुरेसा होत नव्हता. तिला अधिक वेळ हवा होता आणि त्या परिस्थितीमध्ये तिला तो कसा काढावा हे सुचत नव्हतं.

मग त्या बाबतीत काही निर्णय घेण्याची संधी तिला मिळाली. तिच्या परात्पर गुरूंवरचा एक कार्यक्रम करण्याची तिला संधी मिळाली. त्या कार्यक्रमाची संकल्पना तिच्या गुरूंची असली तरी तो सादर करण्याची जबाबदारी तिच्याचकडे होती. या कार्यक्रमच्या तयारीसाठी तिने तिचे सगळे कार्यक्रम गुंडाळून ठेवले आणि सगळा वेळ या कार्यक्रमालाच दिला. तसं नसतं केलं तर हा कार्यक्रम सादरच करता आला नसता. याची तयारी करण्यासाठी म्हणून ती पूर्णवेळ त्याच कामात गढली आणि त्यामुळेच तिच्या बदलेल्या दिनचर्येतून तिने पंधरा दिवस विश्राम घेतला. कार्यक्रम ती एकटीच करणार असल्यामुळे तेव्हढा वेळ ती विद्यापीठातूनही सुट्टीवर होती आणि त्यालाही तिने याची कल्पना दिली होती. असं नव्हतं की तो तिच्याकडे काही स्पष्टीकरण मागत होता पण तिलाच ते दिलेलं योग्य वाटलेलं आणि त्यालाही तिचा कार्यक्रम यशस्वी व्हावा असंच वाटत होतं म्हणून याने त्या काळात त्याच्याकडून कोणतीही आडकाठी येणार नाही याची काळजी घेतलेली. यामुळे आता तिचं एकाच वेळी दोन आघाड्यंवर युद्ध चालू झालं होतं. एक म्हणजे तिच्या गुरूंचा विश्वास तिला सार्थ करायचा होता आणि तिच्या स्वतःच्या भावनांचा तिला अभ्यास करायचा होता.

आता तिचा अख्खा दिवस तिने व्यवस्थित मॅनेज करायला सुरूवात केली. सर्वप्रथम आपल्या गुरूंकडून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून घेतली आणि कार्यक्रमाच्या प्रेझेण्टेशनचा जुजबी आराखडा तयार केला. तो तिच्या गुरूंनी मान्य केल्याबरोबर तिचं जवळपास पन्नास टक्के काम पूर्णच झालं, ते ही अगदी दोन दिवसात! आता तिच्याकडे पुरे बारा दिवस होते. या बारा दिवसांचा तिने व्यवस्थित प्लान तयार केला. तिने ठरवल्याप्रमाणे दिवसभरातला आठ ते दहा तासांचा वेळ ती कार्यक्रमाच्या तयारीसाठी देत होती पण उरलेल्यातला खूपसा वेळ तिने स्वतःसाठी राखून ठेवलेला. तिचं स्वतःचं मन तिला स्वतःला समजून घ्यायचं होतं. तिनं ठरवलं होतं की या दिवसांत त्याच्याशी कितीही वाटलं तरी स्वतःहून संपर्क साधायचा नाही.

आता ती तिच्या स्वतःच्या खाजगी वेळात स्वतःलाच पारखून घेऊ लागली. तिला आठवत होती तिची त्याच्या ऑफिसातली पहिली भेट. त्याच्या स्वभावाची झालेली ओळख, कोसळून पडलेल्या तिच्या अहो-जाहोच्या भिंती, तिचं त्याच्याशी सुरू झालेलं मनमोकळं बोलणं आणि त्याच्या बरोबर हजेरी लावलेले वेगवेगळे कार्यक्रम. तिला आश्चर्य वाटत होतं की हा सगळा काळ उण्यापुर्‍या चार-सहा महिन्यांचा आहे. येवढ्या कमी काळात त्यांच्यात खूपच दाट मैत्री निर्माण झाली होती. सहाजिकच होतं, कारण तिला भरपूर मित्र-मैत्रिणी असले तरी एकूणच ती बरीच चूझी होती. तिच्या डोक्याने व्यवस्थित पारख केलेली व्यक्तीच तिच्या जवळ येऊ शकायची आणि त्याला बराच वेळ लागायचा. मग या चार-सहा महिन्यांच्या काळात काय झालं असावं याचा ती विचार करू लागली. तिने प्रत्येक भेटीचा माग काढायचा प्रयत्न सुरू केला.

तिला आठवलं, तिची त्याच्या ऑफिसातली दुसरीच भेट, पहिल्या भेटीनंतर आठवड्याने. तिने काहीशी अचानकच पूर्वसूचना दिलेली नसूनही ती ऑफिसमध्ये आल्यावर थोड्या वेळातच त्याने त्याची कामं हातावेगळी केली आणि तिच्यासोबत बोलायला लागला. बोलताबोलता तिने त्याला तिला हवं असलेल्या एका पुस्तकाची माहिती दिली जे सध्या बाजारात उपलब्ध नव्हतं. त्याने तिला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि तो बाहेर गेला. साधारण पंधरा मिनिटात तो परतला ते तिला हवं असलेलं पुस्तक घेऊनच. तिला कळलंच नाही की त्याच्याकडे ते पुस्तक आलं कसं? तेव्हा तिला पहिल्यांदा समजलं की त्याच्याकडे स्वतःचं चांगल्या चांगल्या विषयांच्या पुस्तकांचं कलेक्शन आहे आणि ते पुस्तक त्याचं स्वतःचं होतं.

तिची त्या नंतरची त्याच्याशी भेट नंतरच्या रविवारीच त्याच्या घरी झाली. त्याच्या ऑफिसपासून पाचच मिनिटांवर त्याचं घर होतं आणि ती त्याची पुस्तकं पहायला त्याच्या घरी आली होती. तिला त्याचं पुस्तकांचं कलेक्शन खूपच आवडलं. त्याने पुस्तकंही एखाद्या लायब्ररीतल्यासारखी व्यवस्थित ठेवलेली, अगदी विषयवार. त्यातही तिला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याने स्वतः ती पुस्तकं वाचलेलीही होती. त्याला खूपसे संदर्भ खुलासेवार माहित होते आणि हे तिच्या दृष्टीने जास्त अचंबित करणारं होतं कारण बरेचदा पुस्तक कलेक्टर्स सगळी पुस्तकं वाचतातच असं तिला जाणवलं नव्हतं. मग त्याने तिला संध्याकाळी त्याच्या आवडत्या पुस्तकांच्या दुकानात नेलं. अशा ठिकाणी ती त्या आधी कधीच गेलेली नव्हती. तिथे तिला खूप चांगली चांगली पुस्तकं हाताळायला मिळाली. त्यानेही पुस्तकांविषयी, वेगवेगळ्या लेखकांविषयी, त्याच्या आवडींविषयी, आवडत्या पुस्तकांविषयी बरीच माहिती दिली. त्यानंतर तो तिला जवळच्या चांगल्या उपहारगृहात घेऊन गेला. थोडी न्याहरी आणि गरम गरम वाफाळत्या कॉफीच्या कपाबरोबर तिथेही त्यांच्या गप्पा रंगल्या. तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात संस्मरणीय अशी ती संध्याकाळ होती आणि ती त्याने घडवून आणली होती. त्या रात्री तो तिला तिच्या घरापर्यंत सोडायला आला होता. त्या वेळी तिला पहिल्याने असं वाटलं होतं की तिच्या कुठल्याही अडचणीसाठी यापुढे अशी एक व्यक्ती निश्चित आहे जी काहीतरी तोड नक्की काढू शकेल.

त्यानंतरची त्यांची भेट एका नाटकाच्या निमित्ताने झाली. सकाळी सकाळी तिने फोन केला असताना त्याने एका चांगल्या नाटकाबद्दल सांगितलं आणि त्याचा प्रयोग त्याच दिवशी असल्याचंही कळवलं. मग विद्यापीठातले तिचे सकाळचे वर्ग आटोपून ती परस्पर नाट्यगृहात पोहोचली. तोपर्यंत त्याने तिकिटं काढून ठेवलेली होती. मग त्यांनी ते नाटक बघितलं. तिने आधीही नाटकं पाहिलेली, पूर्वी नाटकांमधूनही तिने स्वतः कामं केलेली पण तिचा तो अनुभव किती तोकडा होता याची तिला ते नाटक पाहिल्यावर जाणीव झाली. नाटकाची संहिता, संवाद, दिग्दर्शन आणि त्यातल्या नटांची कामं तिचं अनुभव विश्व फार व्यापक करून गेले होते. नाट्य या कलाप्रकारातल्या एका वेगळ्याच आयामाची, ताकदीची तिला त्या दिवशी ओळख झाली होती. तिला अशाप्रकारचा नाट्यानुभव देण्याचं संपूर्ण श्रेय तिने तेव्हा त्याला दिलेलं होतं. तिला पूर्ण कल्पना होती की हे केवळ त्याच्यामुळेच आज ती अधिक अनुभवसंपन्न झाली आहे.

नाटकाचा तो अनुभव घेतल्यानंतर ते दोघे जवळच्या रस्त्यावरून चालत जात असताना तीच बोलत होती. आपल्या मनामध्ये ते नाटक पाहिल्यानंतर निर्माण झालेल्या सगळ्या भावना ती त्याच्याकडे बोलून दाखवत होती. तिला त्या विषयावर काय बोलू आणि काय नको झालेलं. मग त्याने शक्य तेवढा तिच्या भावनांचा निचरा होऊ दिला आणि तिला तिच्या घरापर्यंत सोडलं होतं.

त्यापुढली त्यांची भेट तिनेच ठरवलेली. जवळच्या चित्रपटगृहात तिचा ज्या कलाप्रकाराशी संबंध होता त्यातील एका कलाकाराच्या जीवनावरचा चित्रपट लागला होता आणि तिला तो त्याला दाखवायचा होता. त्याप्रमाणे तिनेच ति़किटं काढून त्याला चित्रपटगृहाशी बोलावलं. पण तो चित्रपट इतका फालतू निघाला की त्यानंतर खूप वेळ ती आणि तो दोघेही त्या चित्रपटाच्या लेखन, संवाद, दिग्दर्शन आणि नटांच्या कामाची लक्तरं काढत बसले. तेव्हाही तिला त्याच्यातल्या कलाकाराची जाणीव झाली. एखादा साधा प्रसंगही तो अशा तर्‍हेने खुलवून सांगायचा की तिला त्यातलं नाट्य अगदी सहज समजून यायचं.

अशा सगळ्या भेटींचा गोषवारा तिने आपल्या मनाशी केला. तिला या कार्यक्रमाच्या नावाने मिळालेल्या वेळेचा तिने स्वतःच्या भावना समजून घेण्यात सदुपयोग करून घेतला. ती एका निश्चित मतापर्यंत येऊन पोहोचली होती की तिला त्याचा सहवास आवडत होता, तिच्या इतर मित्र-मैत्रिणींपेक्षा आता तो तिला जास्त जवळचा वाटत होता आणि दिवसभरातल्या गोष्टी त्याच्याशी शेअर केल्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं, त्याच्याशी मैत्र जुळल्यानंतर तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता, त्याच्यामुळे तिचं अनुभवविश्व अधिक समृद्ध झालं होतं आणि ज्याप्रकारचं आयुष्य तिला भविष्यात अपेक्षित होतं त्याचा काहीसा अनुभव तिला त्याच्याबरोबर आलेला होता. अखेर तिच्या मनाने कौल दिला ज्याची तिला भीती होती. तिला त्या दिवसांत पहिल्याने जाणवलं की तिला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटतंय. आपलं त्याच्यावर प्रेम जडलंय या कल्पनेने तिला अगदी मोहरून गेल्यासारखं वाटलं. आतमध्ये कुठेतरी काहीतरी वेगळंच झाल्यासारखं वाटत होतं. एक अवर्णनीय असा आनंद तिला झाला होता. ही जाणीव जेव्हा पहिल्याने तिला झाली तेव्हापासून दोन दिवस ती एका वेगळ्याच जगात वावरत होती.

इतकं सगळं होत असूनही तिने त्यावेळेला स्वतःवर व्यवस्थित नियंत्रण राखलं होतं. तिने केलेल्या निश्चयापासून ती ढळली नव्हती. तिने त्याच्याशी संपर्क साधला नव्हता. तिने स्वतःला शांत करून एकच प्रश्न विचारला. आज आपली जी ही भावना आहे, तशीच त्याची आहे का? त्याने कधी आपल्याला तशी एखादी तरी खूण दाखवलीय का? अजूनपर्यंत तरी त्याची भावना निखळ मैत्रीचीच आहे. इतक्या दिवसात त्याने कुठेही असभ्य वर्तन केलेलं नाही. मग आपल्याबद्दल त्याची काय भावना आहे हे आपल्याला कसं समजावं? तो स्वतः सगळ्यांशीच चांगलंच बोलतो. तसाच आपल्याशीही बोलत असेल तर? त्याप्रकारे तिने आपल्या मनाला चांगल्याप्रकारे आवर घातला. दरम्यान कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्याने तिला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. एकूणच ती वेळ गडबडीची असल्याने शुभेच्छांचा स्वीकार करून तिने चटकन् फोन बंद केला होता मात्र तत्पूर्वी कार्यक्रमानंतरच्या दिवशी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटण्याचं ठरल्याचं त्याला कळवलंच होतं. तिचा कार्यक्रम तिच्या गुरूंनी चांगल्यापैकी नावाजला. तिच्या कला-सर्कल मध्ये तिचं खूप कौतुक झालं. कार्यक्रमाचं स्वरूप काहीसं खाजगी असल्याने तिने इतर कुणालाच बोलवलं नव्हतं, पण त्याचा गोषवारा त्याला सांगावा असं मात्र तिला नक्की वाटत होतं.

आपल्या मनाची उत्फुल्लित अवस्था, मेहनतीने सादर केलेला आणि यशस्वी झालेला कार्यक्रम आणि त्याचं मन जाणण्याची जिज्ञासा अशा पार्श्वभूमीवर आज ती त्याच्या ऑफिसात त्याला भेटायला जात होती.

क्रमश:

No comments:

Post a Comment