Tuesday, 29 May 2012

...... तेथे तुझी मी वाट पहातो!


आज खूप दिवसांनंतर जाणं झालं. तिथेच जिथे दोन दादरांची भेट होते. तिथे पोहोचल्यावर मनात लगेच तुझं गुणगुणणं गुंजन घालू लागलं. तू म्हणायचीस, "जिथे दादरा दादर मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते," आणि तसंच कानात शिरल्यासारखं वाटलं त्यानंतरचं तुझं खळाळतं हसू. किती दिवस होतील आता ते हसणं ऐकून. कल्पना नाही. शेवटचं ते ऐकल्यालाही बहुदा खूप कॅलेंडरं मागे जावं लागेल. तू असंच सांगायचीस आणि मी माझ्या सवयीप्रमाणे तू सांगितलेल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच जाऊन उभा असायचो. तुला ते माहितही असायचं. म्हणून मग बर्‍याचदा तू उशीराची वेळ सांगायचीस मला. किती विश्वास होता तुला भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाबद्दल, नाही? आपल्या जन्मजात गुणांना साजेसा वेळ लावत आणि तुझं व्यवस्थित मांडलेलं वेळेचं गणित चुकवून गाडी तिच्याच ठरल्या वेळी यायची. मग तुझ्या डोळ्यात, मला उगाच जास्त वेळ ताटकळत राहायला लागल्याबद्दलची काळजी बघावी लागायची. किती तरी वेळा मी तुला अशा वेळी सांगितलंय, "अगं, मला काही ताटकळावं लागत नाही. माझा वेळ तुझी वाट बघण्यात मस्त जातो." पण तुला ते कधीच पटायचं नाही. तशी हळवीच होतीस तू! खरंच असायचं पण ते, तुझी वाट बघत घालवलेला तो वेळ कधीही फुकट गेल्याची भावना नव्हती माझ्यात. आपण भेटण्याची जागाच तशी होती ना!

एक जिना डावीकडून आणि एक जिना उजवीकडून येत असताना त्यांची सामायिक असलेली जागा. कुणालाही कधी सांगितली तर ती सापडणार नाही असं होणारच नाही. इतका राबता असलेली जागा पण आपण भेटण्यासाठी तीच ठरवली. तुझीच आयडिया ती! त्या दादराहून उतरणारा माणूस त्यावेळी आपल्या कामाच्या ठिकाणी जायच्या गडबडीत आणि दादरावर चढणारा, आपली नेहमीची गाडी चुकू नये या घाईत. मग एका बाजुला उभे असणार्‍या आपल्याला बघायला कुणाकडे वेळ असणार आहे? हा तुझा युक्तिवाद प्रथम श्रवणी मला मान्य झाला नाही पण प्रथम दर्शनी तुझ्या चाणाक्षपणाला दाद द्यावीच लागली मला!

खरंच सांगतो, मला कधीच तुझी वाट बघण्याचा कंटाळा आला नाही. तू ज्या बाजूच्या दादरावरून येशील त्याच्या एका कोपर्‍यात उभं रहायचं. उतरणार्‍यांचं दर्शन तिथून अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्हायचं. आधी त्यांची पावलं दिसायची, मग त्यांचे कपडे आणि नंतर स्वतः ती व्यक्ती. किती प्रकार पहायला मिळायचे तेव्हा. रंगवलेली - बिनरंगवलेली पावलं आणि नखं, किती तर्‍हेची पादत्राणं, किती प्रकारची चाल, किती प्रकारचे कपडे आणि किती तर्‍हेची परिधान शैली. एक  छंदच  लागलेला तेव्हा मला, व्यक्तिची पादत्राणं, त्यावरची रंगरंगोटी, तिची चाल आणि वस्त्र-प्रावरणं, त्यांची परिधानशैली, इत्यांदिंवरून त्या व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही कल्पना करण्याचा! अनेकदा अंदाज चुकायचा मग लक्षात आलं, मी समोर आलेल्या माणसाचं व्यक्तिमत्त्वं शोधत नव्हतो तर समोर दिसणार्‍यांपैकी काहींमध्ये तुलाच शोधत असायचो. मग अंदाज चुकायचाच होता पण यात वेळ चांगला जायचा, कंटाळा यायचा नाही. तेव्हा नव्यानेच तुला जाणण्याच्या प्रयत्नात होतो ना! मग अचानक जिन्यावर ओळखीची पावलं दिसायची. लहानखुरी, सुबक, स्वच्छ आणि नितळ. माझ्या आवडीने घेतलेल्या पादत्राणांनी नटलेली, माझ्या आवडत्या मरून रंगात रंगलेली नखं असलेली. ती पावलं दिसली की उरात काही तरी लक्कन् व्हायचं आणि मग तू दिसायचीस. डोळ्यात काळजी आणि चेहर्‍यावर कसनुसं हसू ल्यालेली. तुझी ती सुडौल मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर तशीच आहे.

मग त्याच धुंदीत मी आताही माझी तीच जागा पकडली. जणु इतक्या वर्षांनंतर तू पुन्हा त्या दादरावरून उतरणार होतीस. मी तशीच पुन्हा ओळखीची पावलं शोधू लागलो. किती वेळ गेला कुणास ठाऊक, अचानक ताळ्यावर आलो. तू थोडीच येणार होतीस? सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. वीस मिनिटं कशी सरलेली ते कळलंच नव्हतं. मधली इतकी वर्षं गेल्यानंतरही तुझी वाट बघताना अजूनही मला कंटाळा न येणं पुन्हा अधोरेखित झालं.