Tuesday 25 September 2012

कोकणसफरीतील विसाव्याचं स्थान - 'उत्तम फार्म'

सिमेंट कॉंक्रिटच्‍या जंगलामध्‍ये राहणा-या प्रत्‍येकालाच नैसर्गिक जंगलांची एक ओढ असते. शहरापासून दूर निसर्गाच्‍या सानिध्‍यात काही काळ व्‍यतित करुन स्‍वतःसाठी नवी उर्जा मिळवून पुन्‍हा आपपल्‍या कामांना जुंपून घेणारी जनता आजकाल प्रत्‍येक शहरात आढळते. कदाचित यामुळेच काही तरुणांमध्‍ये डोगर-द-यामंधून, जंगलांमधून, नदीच्‍या खो-यांमधून फिरवणारी ट्रेकींगची आवड वाढीला लागल्‍याचे आढळून येते. असं असलं तरी अनेकांना अशा ट्रेकींग प्रकारात होणा-या श्रमाची जाणीवच हतोत्‍साही करते. अशा लोकांना निसर्गाच्‍या सानिध्‍याचं आकर्षण असतं पण त्‍यासाठी अतिरिक्‍त श्रम करणं नको असतं. निसर्ग त्‍यांना त्‍यांच्‍या रिक्रीयेशनसाठी हवा असतो. चार दिवस आपल्‍या धावपळीच्‍या – धकाधकीच्‍या जीवनापासून दूर, नदीकाठच्‍या जंगल प्रदेशात, झाडाखाली पहडून विश्रांती घेत आजूबाजूचा निसर्ग अनुभवत श्रमपरिहारातून पुढच्‍या धावपळीच्‍या आयुष्‍यासाठी उर्जा मिळवणं असा त्‍यांचा विशुध्‍द हेतू असतो. त्‍यांच्‍या अपेक्षा अगदी साध्‍या असतात. त्‍यांना निसर्ग सान्निध्‍य देणारी, मूलभूत सोयींनी युक्‍त असणारी, मानवी गजबटापासून दूर असणारी आणि त्‍यांना अपेक्षित असलेला श्रमपरिहार आणि उर्जा दोन्‍ही देऊ शकणारी अशी जागा हवी असते. माझा स्‍वतःचा सहभागही मी उपरोल्‍लेखित व्‍यक्तिंमध्‍येच करतो. कामाच्‍या संबंधाने कोकणात फिरत असताना केवळ योगायोगानेच वरील सगळया मागण्‍या पूर्ण करू शकणारी जागा मला सापडली आणि तीच आता तुमच्‍यापुढे प्रस्‍तुत करत आहे.

सिंधुदुर्गामध्‍ये कणकवली तालुक्‍यातील प्रसिध्‍द फोंडाघाट गावाजवळ दोन-तीन दिवसासाठी राहण्‍याची सोय बघत असताना जवळच्‍याच कौंडये गावातील ‘उत्‍तम फार्म’चं नाव समजलं. तिथे निश्चित सोय होतेय हे कळल्‍यामुळे सरळ कौंडयेचाच रस्‍ता पकडला. तिथे नेणारा रस्‍ता इतका सुंदर होता की त्‍यामुळे उत्‍तम फार्मबद्दलच्‍या अपेक्षाही वाढीला लागल्‍या.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता.
 
उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता पावसात नुकताच न्‍हालेला. हा रस्‍ता उत्‍तम फार्मच्‍या मधूनच गेला आहे. वर दिसणारा पूल (ब्रीज) हा नव्‍यानेच बांधला गेलाय. रस्‍त्‍यासाठी उत्‍तम फार्मने आपली काही जागा सोडून दिल्‍यामुळे विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन’.
 
रस्त्याने विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन’
 
या ब्रीजवर आल्‍याबरोबरच जाणवलं त्‍याखालच्‍या नदीचं खळाळतं अस्तित्‍व पण लक्ष मात्र वेधून घेतलं त्‍यावरील या बंधा-याने !

बंधा-यावरून उधाण येऊन ओसंडणारं पाणी.
 
 डाव्‍या बाजूच्‍या बंधा-यावरुन येणारं पाणी उजव्‍या बाजूला असं नदीरूपात वाहतं.

खालच्‍या अंगाला दिसतेय जुन्‍या साकवाची जागा

जरा वळून पाहताना रस्‍ता असा दिसला.

हा ब्रीज पार करून जाताच आपल्‍याला उजव्‍या बाजूला अशी दिसते उत्‍तम फार्मची जागा -

हिरवाईतून दिसणारा उत्‍तम फार्म

उत्तम फार्मवर राहण्याची सोय दोन प्रकारची आहे. वरच्या चित्रात दिसणा-या चिरेबंदी खोल्या आणि प्रशस्त असा तंबू.

उत्तम फार्म मध्ये राहण्यासाठी सुसज्ज तंबू

एका चिरेबंदी खोलीमध्ये स्वयंपाकधर आणि डायनिंग रुम बनवलेली आहे. पूर्णवेळ स्वयंपाकी (खानसामा) आणि आवश्यक त्या भाज्या नि वाणसामानाने भरलेलं स्वयंपाकघर ही माझ्यासारख्या हौशी बल्लवासा़ठी पर्वणीच होती. या सोयीचा मात्र मी पुरेपूर वापर करुन घेतला.

सकाळ – संध्याकाळच्या रीकाम्या वेळेत उत्तम फार्म मध्ये फेरफटका मारताना टिपलेली काही दृश्ये –

उत्तम फार्मकडे आणणारा रस्ता
 
उत्तम फार्मवरुन दिसणारा ब्रीज व बंधारा
 
उत्तम फार्मवरुन दिसणारी नदी

उत्तम फार्मचं माडांचं बन नि दालचिनी लागवड

सकाळी दाराशी पडलेला पारिजातकाचा सडा

मुक्कामादरम्यान उत्तम फार्मच्या व्यवस्थापकांशी बोलताना ते किती मोक्याच्या जागी वसलंय याची नीट कल्पना आली. तिथून साधारण १८ किमी वर दाजीपूर अभयारण्य आहे. इथे गव्यांचं साम्राज्य आहे. साधारण १० किमी वर नापणे धबधबा आहे, सुमारे ५० किमी वर समुद्रकिना-यावरचं कुनकेश्वर महादेवाचं स्थान आहे, जवळपास ७५ किमी वर डॉल्फिन्सच्या झुंडी पहाण्यासाठी प्रसिध्द वेंगुर्ला आहे. त्याशिवाय १०० किमी वर कोल्हापूर – राधानगरी अभयारण्य आणि दूधसागर धबधबाही आहे. व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार ब-याचदा पर्यटक पहिला मुक्काम गणपतीपुळ्याला करतात आणि तिथून सकाळी निघून दुपारपर्यंत कौंड्याला येतात कारण गणपतीपुळे इथपासून कौंड्ये फक्त १५० किमी वर आहे.

माझ्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी उत्तम फार्म मधली एक अलिबाबाची गुहाच माझ्यासमोर उघडली आणि त्यासाठी मला कोणत्याही परवलीच्या शब्दाची आवश्यकता लागली नाही. उत्तम फार्म तर्फे कौंड्ये गावक-यांसाठी केलेली वाचनालयाची सोय तिथे राहायला येणा-या पर्यटकांसाठीही उपलब्ध होती. दोन-तीन मोठी कपाटे भरुन असलेली मराठी – इंग्लीश भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं समोर बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर तीन-चार तास मी बकुळीच्या झाडाखालच्या पारावर बसून अरुण कोलटकरांच्या ‘द्रोण’ या दीर्घ कवितेचा आणि वा. वि.मिराशींच्या ‘कालिदास’ विषयक अभ्यासपूर्ण लेखनाचा आस्वाद घेतला. दरम्यान चहा – कॉफी नि त्याबरोबरच्या अमनचमन खाऊचा रतीब बसल्या जागेवरच मिळण्याची सोय झाली होती.

कौंड्ये गावातल्या जीवनाचा केंद्रबिन्दू तिथलं पावना देवीचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये आणि विशेषत: दस-याच्या दिवशी इथे मोठा उत्सव असतो. या उत्सवात समस्त गावकरी येतातच पण गावातले मुंबईला वास्तव्याला असलेले चाकरमानी देखिल यावेळी आवर्जुन उपस्थित असतात. सव्वाशे वर्षापूर्वीचं हे मंदिर ही उत्तम फार्मच्या लगतच आहे.

उत्तम फार्मच्या आंब्याच्या वनालगतच पावना देवीचं मंदिर
 
 पावना देवी मंदिर  

पावना देवीच्या मंदिराकडे नेणारा गर्द झाडीतील रस्ता

मंदिराच्या आवारातील विरगळ आणि ब्राह्मणदेव

विरगळ जवळून

विरगळ (दुसरा) जवळून 

एकूण काय, तर कामानिमित्ताने ओळखीचं झालेल्या उत्तम फार्मवर निसर्ग सान्निध्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि सोबतच जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी पुन्हा एकदा आवर्जुन मुक्कामाला येण्याचं ठरवून अस्मादिकांनी मुंबई नामे सिमेंट – कॉन्क्रिटच्या जंगलाकडे कूच केले.

 

Thursday 21 June 2012

एका गाण्याची गोष्ट

रॉन फेअर आता काहीसा दडपणाखाली येऊ लागला होता. म्हंटलं तर तो तसा काही दडपण घेणारा माणूस नव्हता, नव्हे त्याची वृत्तीच तशी नव्हती. रॉन एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ध्वनि-मुद्रण अभियंता होता. संगीताची दुनिया, त्याने अगदी लहानपणापासून पाहिलेली. त्याच्या आजोबांनी राहत्या गावात एक छोटेखानी रेडियो स्टेशनच सुरू केलेलं. वयाच्या दोन अडीच वर्षाचा असल्यापासून रॉन मायक्रोफोनच्या अवती भवती गाणी गात खेळत असे. त्याची संगीतामधली आवड त्याच्या पालकांनी चांगली जोपासली. त्याच्यासाठी उत्तमोत्तम संगीत शिक्षक नेमून त्यांनी त्याच्या संगीत विषयक जाणीवा रुंदावल्या होत्या. तो चांगला गीतकार - संगीतकार तर बनला होताच पण त्याबरोबरच पुढे त्याने स्वतःच्या आवडीने संगीत ध्वनि-मुद्रणाचा अभ्यास केला आणि तो वयाच्या सतराव्या वर्षीच आघाडीच्या साऊण्ड रेकॉर्डिस्ट्सपैकी गणला जाऊ लागला. त्याने हॉलिवूडच्या साऊण्ड आर्ट युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना ध्वनि मुद्रणकलेचे धडेही दिलेले होते. असं असूनही आत्त्ताचा त्याच्या अडचणीचा मुद्दा निराळाच होता.

आपली संगीत ध्वनि-मुद्रण अध्यापनाची कारकिर्द सांभाळता सांभाळता रॉन हॉलिवूडमधल्या चित्रपट उद्योगातही आपलं योगदान देत होता. आपल्या अभ्यासाच्या आणि कलेच्या बळावर तो एक आघाडीचा कार्यकारी संगीत निर्माता बनला होता. या हुद्द्यावर काम करणार्‍या व्यक्तिचं काम म्हंटलं तर सोपं पण म्हंटलं तर फारच डोकंखाऊ असतं. रॉनच्या कामाचं वर्णन, चित्रपटासाठी योग्य गाणी मिळवणं, त्यांच्यात कथेच्या गरजेप्रमाणे आवश्यक असल्यास बदल करणं, ती गाणी गरजेनुसार पुन्हा ध्वनिमुद्रित करून घेणं आणि ध्वनि संपादकाकडून चित्रपटात योग्य जागी बसवणं, या शब्दात करावं लागेल. रॉनला हे काम आवडायचं. अडचणी येतात हे त्याला माहित होतं आणि अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या श्रमांतून काहीतरी चांगलं बाहेर पडतं यावर त्याला विश्वासही होता.
झालं असं होतं की एका चित्रपटासाठी रॉन गाणी शोधत होता. प्रेमकथा असलेल्या या चित्रपटासाठी त्याने काही जुनी गाणी नव्याने करून घेतलेली. कथेला चपखल बसणारी. आता एकच गाणं बाकी होतं. गाण्याची जागा तशी साधीशीच होती. नायक आणि नायिका यांच्यात काही कारणाने बेबनाव झालाय. ते एकमेकांपासून दूर झालेत पण त्यांची भावनिक जवळीक मात्र दोघांनाही विसरता येत नाहीये, अशी काहीशी. त्याने एका लोकप्रिय ग्रूपला यासाठी एखादं नवं गाणं बनवून देण्याची गळ घातलेली. त्या ग्रूपमधला गीतकार - संगीतकार वैशिष्ट्यपूर्ण असल्याने काहीसा निश्चिंत असलेला रॉन नुकत्याच आलेल्या बातमीने काहीसा गांगरून गेला होता.

रॉन काम करत असलेला चित्रपट पूर्ण झाला होता. चित्रीकरण संपलेलं. आता संपादनाची प्रक्रिया सुरू होती. त्या बरोबरच एका बाजूला जेम्स न्यूटन हॉवर्डसारखा दिग्गज संगीतकार पार्श्व संगीत बनवत होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस ठरलेला असल्याने प्रत्येक जण वेळेत आपापलं काम करत होता. असं असताना बातमी आली की रॉनच्या लोकप्रिय ग्रूपचा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा फार पूर्वी ठरलेला दौरा अगदी पंधरा दिवसावर आलाय त्यामुळे नवं गाणं बनवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाहीये. रॉनने ताबडतोब ग्रूपची रेकॉर्ड कंपनी इ एम् आय कडे धाव घेतली. इ एम् आयच्या अधिकार्‍यांनी रॉन आणि त्या म्युझिक ग्रूपची तातडीची बैठक बोलावली. लॉस एन्जलिसमधल्या कंपनीच्या प्रशस्त बोर्डरूममध्ये बैठकीला सुरूवात झाली. रॉन काय किंवा तो म्युझिक ग्रूप काय किंवा जगभरात पसरलेली इ एम् आय काय, बैठकीमधली सगळीच सिने आणि संगीत सृष्टीमधली दादा मंडळी होती.
आता यातून काय मार्ग काढावा यासंबंधी विचार चालू होता. मुद्दे निघत होते त्यांची स्पष्टीकरणं मिळत होती पण तेव्हाच गुंताही सुटत नव्हता. सरते शेवटी रॉनला कबूल करावं लागलं की आता त्याला त्या ग्रूपचं नवं गाणं चित्रपटासाठी बनवून मिळू शकणार नाहीये. रॉनची पुढची अडचण ही होती की आता कोणत्याही दुसर्‍या नव्या ग्रूपकडे ही मागणी करून गाणं मिळवण्यासाठीचा वेळच त्याच्याकडे नव्हता. बैठकीतलं वातावरणही तणावपूर्ण बनलं होतं. रॉनचं नाव संगीत क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जायचं त्यामुळे आत्ता तयार झालेली ही कोंडी कशी फोडता येईल याचाच सगळेजण विचार करू लागले.

रॉनने ग्रूपचा गीतकार - संगीतकार पेर गिझेल आणि ई एम् आय् चा सी ई ओ जो स्मिथशी बोलायला सुरूवात केली, "मित्रांनो, इतक्या सव्यापसव्यानंतरही परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे खरं की आता मला हवं असलेलं नवीन गाणं मिळणं कठीणच दिसतंय. तुमच्याकडे काही जुन्यामधलं असेल तर त्यातलं काही तरी सांगा."
यावर जो उत्तरला, "रॉन, अरे, तुला जसं गाणं हवंय तशापैकी आमच्याकडे काही असेल तर आमच्यापेक्षाही तुलाच जास्त माहित असणार ना! तेव्हा तुलाच काही आठवत असल्यास तूच मला सांग. ते गाणं तुझ्या हवाली करण्याचं काम माझ्याकडे लागलं."

येवढ्यात पेर रॉनला म्हणाला, "रॉन, जरा नेमक्या कोणत्या सिच्युएशनसाठी गाणं हवंय ते पुन्हा एकदा सांग बरं."
"अरे, सिच्युएशन तशी साधीच आहे", रॉन त्याला म्हणाला, "पण चित्रपटामध्ये कथेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. असं बघ, मूळ कथा ना, त्या शॉच्या पिग्मॅलियन सारखीच आहे. इथे नायक नि नायिकेचा थोड्याच दिवसांचा सहवास झालाय पण त्यांना एकमेकांबद्दलच्या प्रेमाची फारशी जाणीव झालेली नाहीये. इतक्यात काही कारणाने त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता ते एकत्र नाहीयेत पण त्यांची फारकत होण्यापूर्वीच्या एकमेकांच्या सहवासातल्या दिवसांच्या आठवणी अगदी ताज्या आहेत. त्या आठवणींच्या शिडकाव्यामध्ये त्यांना असा प्रश्न पडतोय की आपल्याला परस्परांबद्दल जे वाटतंय ते प्रेमच आहे का निव्वळ आकर्षण? एकमेकांच्या सहवासात घालवलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवून त्यांना असा साक्षात्कार होतो की ते जे काही होतं ते प्रेमच होतं आणि दुसरं काही असूच शकत नाही. आता मला नवीन गाणंच का हवं होतं? तर माझी अशी इच्छा होती की या सिच्युएशनमधलं गाणं हे कुणा एकाचाच म्हणजे केवळ नायकाचा किंवा केवळ नायिकेचा भाव दर्शवणारं नकोय तर असं हवंय की ते दोघांनाही एकाच वेळी लागू पडावं. आता, असा परिणाम देणारं कोणतंही जुनं गाणं, अमेरिकेत तरी माझ्या ऐकण्यात आलेलं नाहीये. मग आता काय करावं हाच माझ्यासमोरचा प्रश्न आहे."

"रॉन", जो कडे बघत पेर म्हणाला, "मला वाटतं, आमच्या एका जुन्या गाण्याने तुझे प्रश्न सुटू शकतील. अरे, दोन वर्षांपूर्वी आमचं एक गाणं इ एम् आय् जर्मनीने युरोपात प्रकाशित केलेलं. स्वीडनच्या टॉप चार्ट्समध्ये ते पहिल्या दहामध्ये येऊन खूप लोकप्रियही झालेलं. तुला जशी सिच्युएशन अपेक्षित आहे तशीच काहीशी त्या गाण्याचीही सिच्युएशन आहे पण तुला आधीच सांगून ठेवतो, ते गाणं आम्ही खास ख्रिसमस साँग म्हणूनच लिहिलेलं. गाण्यात त्यासंबंधीचे काही शब्दही आहेत. तरी पुन्हा नक्की बघावं लागेल. जो ला शक्य होईल बहुतेक जर्मनी ऑफिसकडून त्याची कॉपी मिळवणं. तोपर्यंत मी तुला गाणं सांगतो."
हे ऐकताच जो ने समोरच्या इंटरकॉममधून आपल्या खाजगी सचिवाला जर्मनी ऑफिसकडून त्या गाण्याची कॉपी मागवायची आज्ञा केली. दुसर्‍या दिवशी गाण्याची कॉपी इ एम् आय् च्या ऑफिसात पोहोचणार होती म्हणून बैठक तिथेच स्थगित झाली आणि रॉन, पेर बरोबर त्याच्या स्टुडिओमध्ये गेला. तिथे त्याने गाणं वाचलं. पेरने त्याला ते गाऊनही दाखवलं. गाण्याचा नि गाण्याच्या चालीचा अंदाज येताच रॉनला विश्वास वातायला लागला की आता त्याचं काम नक्कीच आटोक्यात आलेलं होतं. त्याने पेर आणि त्या गाण्याचा मूळ निर्माता क्लॅरेन्स इयोफ्मान यांना ख्रिसमसच्या आणि त्यासंबंधी असलेले शब्द बदलून त्याजागी दुसरे कोणते तरी योग्य शब्द टाकण्याची विनंती केली. मूळ गाण्याची कॉपी हातात आल्यावर पेर, इयोफ्मान, रॉन यांनी पुढच्या दहा दिवसात त्यातल्या दुरूस्त केलेल्या ओळी पुन्हा गाऊन घेऊन मूळ गाणं संपादित करून नव्याने ध्वनि-मुद्रित केलं. त्यात संगीताचे नवीन तुकडे जोडले. रॉनला गाण्याचं नवं रूपडं चांगलंच आवडलं. काम पूर्ण करून पेरचा म्युझिक बॅण्ड आपल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवानाही झाला.

रॉनला वाटलं की आता सारं काही वेळेत पूर्ण होईल पण अडचणी येवढ्यात संपणार्‍या नव्हत्या हे त्याच्या लवकरच लक्षात आलं.
गाण्याचं ध्वनि-मुद्रण घेऊन लगेचच रॉन, चित्रपटावर जिथे संपादनाची प्रक्रिया होत होती, त्या स्टुडीओमध्ये गेला. तिथे चित्रपटाचा दिग्दर्शक, गॅरी मार्शल, निर्माता स्टीवन रुदर, कार्यकारी निर्माती लॉरा झिस्कीन आणि एडिटर राजा गोस्नेल उपस्थित होते. रॉनने त्यांना त्याची गाण्याबद्दलची सगळी कथा सांगितली आणि गाणं त्यांच्या समोर ठेवलं. गाणं एकदा ऐकण्याची इच्छा गॅरीने व्यक्त करताच रॉनने तशी व्यवस्था केली. गाणं ऐकून संपतंय इतक्यात स्टीवनने जाहीर केलं की त्याला गाणं फारसं आवडलं नाहीये. गॅरीही म्हणाला की चित्रपटातल्या सिच्युएशनमध्येही ते बसत नाही आहे. गॅरीचं म्हणणं सरळ होतं. तो रॉनला म्हणाला, " अरे, गोष्ट संपूर्णपणे उन्हाळ्यात घडतेय रे! या गाण्यात आलेले हिवाळ्याचे संदर्भ दाखवायचे असतील तर काही भागांचं रीशूटींग करावं लागेल. लोकेशन बदलावं लागेल. यामध्ये बराच वेळ जाईल आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळही बदलावी लागेल, नाही का?" रॉनची ही बैठक मात्र थोडी वादळीच झाली. चुकीचं कुणीच नव्हतं पण रॉनने शेवटच्या दहा-बारा दिवसात केलेले श्रम अगदी वाया जातायत की काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली. परिस्थितीने निराश झालेल्या रॉनने आपण केलेली गाण्याची निवड कशी योग्य आहे हे जीव तोडून सांगायचा प्रयत्न केला पण स्टीवननं त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही. शब्दाने शब्द वाढला आणि म्हणून मग एडीटर रूममधल्या आवाजाची तीव्रताही! कोणत्याही निर्णयाविना बैठक संपली.

पुढने काही दिवस चित्रपटावरच्या आवश्यक त्या प्रक्रिया सुरूच होत्या. गॅरी, राजा आणि चित्रपटाची दुसरी एडीटर प्रिसिला नेड यांच्यासह संपादनाचं काम करत होता. साऊण्ड एडीटर रॉबर्ट फिट्झराल्ड आणि जेरेमी गॉर्डन, जेम्स न्यूटन हॉवर्डचं पार्श्वसंगीत जोडत होते. दरम्यान त्यांनी गाण्याची चित्रपटासाठीची फीत बनवून ठेवलेली. अखेर चित्रपटात नायक-नायिकेमध्ये आलेल्या दुराव्याचा भाग संपादनासाठी आल्यावर गॅरीला जाणवलं की हा प्रवेश कुठे तरी कमी पडतोय. चित्रपटातल्या नटांनी आपलं काम चोख केलेलं पण समोर सरकणारी दृश्य अपेक्षित परिणाम करत नव्हती. या प्रसंगासाठी जेम्स हॉवर्डच्या पार्श्वसंगीताचाही हवा तसा उठावदार परिणाम घडताना दिसत नव्हता. त्याने अनेक प्रयोग करून पाहिले, दृश्यांचा क्रम बदलून पाहिला, निराळे कोन (अँगल्स) वापरून पाहिले, क्लोज अप्स जोडून पाहिले पण त्याला हवं तसं पडद्यावर दिसत नव्हतं. अचानक त्याला रॉनने आणलेल्या गाण्याची आठवण झाली. त्याने राजा आणि रॉबर्टच्या साहाय्याने चित्रफीत आणि ध्वनिफीत यांची यथायोग्य जोडणी केली आणि तोच भाग पुन्हा जुळवून सुरू केला. एकापाठोपाठ चित्रपटातली दृश्य पुढे सरकू लागली. बॅकग्राऊण्डला रॉनने आणलेलं गाणं वाजू लागलं. त्यातल्या गायिकेने टिपेचा सूर लावला आणि त्याच वेळेला गॅरीने राजाच्या साहाय्याने जुळवलेलं दृश्य समोरून जाऊ लागताच प्रिसिलाच्या घशातून अस्फुटसा हुंदका फुटला नि गॅरीला कळलं की त्याला अपेक्षित असलेला परिणाम साधला गेला आहे. एडीटर रूममधलं वातावरण क्षणात बदललं आणि एकदम मोकळं झालं. गॅरीने पटापट त्या गाण्यादरम्यानच्या थोड्या भागात नीळसर प्रकाशाचा वापर करून अंधाराचा परिणाम साधला, वाहत्या वार्‍याच्या झोताची काही दृश्ये जोडली आणि गाण्याच्या ओळींमध्ये आलेला थंडीचा फील चित्रफीतीवर आणला.
अशा तर्‍हेने रॉनची मेहनत फुकट गेली नाही. अडचणींचा सामना करत त्याने तयार केलेलं गाणं चित्रपटात चपखल बसून अपेक्षित परिणाम करून गेलं. १९९० साली ठरलेल्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला, अमेरिकेतच नाही तर जगभरातल्या सिनेरसिकांना आवडला, हिट झाला आणि रॉनमुळे चित्रपटात सामील झालेलं गाणं देखिल पुढे प्रचंड लोकप्रिय झालं. अमेरिकेत बिलबोर्ड हॉट १०० चार्ट्समध्ये १ल्या क्रमांकावर गेलं. जगभरात लोकप्रिय झालं.

ते गाणं होतं 'Roxette' या ग्रूपचं, पेर गिसेलने लिहिलेलं नि संगीत दिलेलं आणि मारी फ्रेडरिकसन् ने गायलेलं 'It Must Have Been Love', आणि तो चित्रपट होता, 'Pretty Woman'.

नंतर चित्रपटामधल्या दृश्यांचा वापर करून 'Roxette'ने या गाण्याचा विडिओ बनवला. तो सुद्धा खूपच नावाजला गेला. याचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण विडिओ स्लो मोशनमध्ये दिसतो पण गाण्याचं लिप-सिंक मात्र नॉर्मलच राहतं. हे १९९० साली वापरण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञान होतं. यात चित्रिकरण नॉर्मल स्पीडने होतं पण गाण्याचं लिप-सिंकिंग फास्ट स्पीडने होतं म्हणजे चित्रिकरणाच्या वेळी गाणं चिपमंक्स गातायत अशा आवाजात होतं आणि शेवटी स्लो मोशन आणि लिप-सिंकिंगचं सिन्क्रोनायजेशन एडीट करून साधलं जातं. आपल्याकडे १९९२ सालच्या 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटातल्या 'पहला नशा, पहला खुमार' या गाण्यात हे तंत्र पहिल्यांदा वापरण्यात आलं.

आता आनंद घ्या 'It Must Have Been Love' या अप्रतिम गाण्याचा.

संगीताच्या दुनियेमध्ये कुठल्या गाण्याचं नशीब कसं नि कधी फळफळेल हे केव्हाही निश्चितपणे सांगता येत नाही. स्वीडनमध्ये टॉप १० मध्ये येऊनही इ एम् आय् जर्मनीने डब्यात टाकलेल्या आणि नंतर दोन वर्ष धूळ खात पडलेल्या 'It Must Have Been Love' गाण्याला 'Pretty Woman' चित्रपटाद्वारे जगभर लोकप्रियता मिळणं हे त्याचंच द्योतक ठरावं, नाही का?

सिने आणि संगीतक्षेत्रामध्ये घडलेल्या सत्य घटनेचं नाट्यमय रुपांतरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यात उल्लेखलेल्या व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहेत आणि अजूनही सिने आणि संगीतक्षेत्रात आपापलं भरीव योगदान देत आहेत.