Friday, 25 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (२)

ती - भाग २
---------------
आपल्या भिरभिरणार्‍या विचारांना सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच शेवटचं प्रेझेण्टेशन संपलं. त्याच्या टाळ्यांचा आवाज विरतोय न विरतोय तोच सूत्रसंचालकांनी विद्यार्थी-प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी तिला मंचावर आमंत्रित केलं. आपलं नाव ऐकताच कधी नव्हे ते तिला छातीत धडधडल्यासारखं झालं. अंगाला सूक्ष्मसा कंप सुटला आणि घशाला कोरड पडल्यासारखी झाली. तिची धास्ती वाढली. उपस्थित लोकांना तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत ते तिच्या नावाच्या उल्लेखाने झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटातून अधोरेखितच झालं होतं. हलक्याशा लटपटत्या पायाने ती मंचावर चढली आणि पोडियमजवळ उभं राहून तिने उपस्थित प्रेक्षकांकडे एक नजर टाकली. संपूर्ण प्रेक्षागाराचे डोळे तिच्यावर रोखले गेले होते अणि ते तिच्या बोलण्याची प्रतीक्षा करत होते पण तिचे शब्द मात्र घशातच अडकल्यासारखे झालेले.

काय करावं हेच तिला सुचत नव्हतं. मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या पोडियमजवळ उभी असलेली ती चेहर्‍यावर कोणताही ताण न दाखवता प्रेक्षकांकडे बघत असताना तिची, तिच्या उजव्या बाजूला सभागृहाच्या मागच्या रांगेतल्या टोकाच्या खुर्चीवर बसलेल्या त्याच्याशी नजरभेट झाली. त्याचं आश्वासक हसणं बघताच तिचा ताण कुठच्याकुठे निघून गेल्यासारखं झालं. तिने मनाशीच ठरवलं, आता जे काही सांगायचंय, समजवायचंय ते यालाच सांगायचं, समजवायचं. मी भले असेन विद्यार्थी प्रतिनिधी पण प्रेक्षक प्रतिनिधी हाच. ह्याला समजलं तर सगळ्यांना समजलं. तसा हा पण हुशारच आहे, त्याला समजलंय हे मलाही नक्कीच कळेल आणि आत्मविश्वासाने तिने बोलायला सुरूवात केली.

मुद्देसूद, संशोधकांच्या प्रेझेण्टेशनमधल्या वैशिष्ठ्यपूर्ण वाक्यांचा उल्लेख करून, नव्या कल्पनांचा आढावा घेऊन, काही ठिकाणी आक्षेप घेऊन, काही आक्षेपांचे निराकरण करून तिच्या मनोगताची वाग्गंगा प्रवाहित होत होती. त्याच्या चेहर्‍यावरून तिला सहजच कळत होतं की ती जे काही बोलत होती ते त्याला समजतंय आणि पटतंय. क्षणाक्षणाला तिचा आत्मविश्वास वाढत होता, विचार स्पष्ट होत होते, शब्दावरचा जोर वाढत होता, वक्तृत्वाला बहर येत होता, जणु आपल्या मत-प्रदर्शनाने तिने सगळं सभागृहच काबिज केलं होतं. पण तिच्या विचारांचा केन्द्रबिंदू तोच होता. ती तिची मतं फक्त आणि फक्त त्यालाच सांगत होती. भरलेलं सभागृह जणु अस्तित्त्वातच नव्हतं. आभारप्रदर्शनाचं शेवटचं वाक्य म्हणून तिने आपलं मनोगत संपवलं आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. तिने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलेलं आणि तिच्या प्रतिभेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं. मंचावरून खाली उतरताच तिचं अनेक पाहुण्या संशोधकांनी उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल अभिनंदन केलं. तिच्या शिक्षकांनीही तिचं कौतुक केलं. सेमिनारचा समारोप समारंभ सुरू झाला आणि ती शांतपणे दरवाज्याजवळच्या एका कोपर्‍यातल्या खुर्चीवर विसावली.

त्या कोपर्‍यात तिला आवश्यक ती विश्रांती मिळणार होती. तो जिथे बसलेला तिथे तिने मान वळवून बघितलं पण त्याची जागा रिकामी होती. एक छोटासा सुस्कारा सोडून ती खुर्चीवर मागे रेलली आणि तिने डोळे मिटले. समारोप समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार वगैरे कार्यक्रम सुरू होता, त्यात सध्या तिला काहीच रस नसल्याने ती आरामात होती. येवढ्यात तिला जाणवलं, कुणीतरी हलकेच तिच्या शेजारच्या खुर्चीमध्ये येऊन बसलेलं. तिने डोळे उघडून पाहिलं, तिच्या शेजारी हातात वाफाळता कॉफीचा ग्लास घेऊन तोच बसलेला. ती चटकन् नीट बसली आणि त्याच्याकडे बघून हलकसं हसली. ती काही बोलणार तोच तिच्या हातात गरम गरम कॉफीचा ग्लास देत तो हसून म्हणाला, "आत्ता या क्षणाला तुला ही कॉफीच आवडेल. घे! बाकी मस्त झालं तुझं भाषण. चक्क मलाही समजलं. मी विभागात तसा नवखाच आहे, डिप्लोमाला दाखल झालोय यंदा. हे माझं कार्ड. शहराच्या मध्यवर्ती भागातच माझं ऑफिस आहे. कधी त्या भागात येणं झालं तर नक्की माझ्या ऑफिसात तुझी पायधूळ झाड, काय? कॉफी गरम आहे, लगेच घे, घसाही शेकून निघेल छानपैकी!" प्रत्युत्तरादाखल ती थँक्स म्हणतेय तोवर तो समोर दिसलेल्या विभाग-प्रमुखांच्या दिशेने गेला.


विभाग-प्रमुखांशी बोलणार्‍या त्याच्याकडे बघतच ती कॉफीचा आस्वाद घेऊ लागली. विभाग प्रमुखांशी बोलून दरवाज्यातून बाहेर पडता पडता त्याने मागे वळून तिच्याकडे निरोपाचा हात दाखवला आणि त्यावर तिनेही प्रतिसाद दिला. तो निघून जाताच तिचं लक्ष त्याच्या व्हिझिटिंग कार्डाकडे गेलं. त्याचं नाव वाचता वाचता तिला लक्षात आलं, आज त्याने तिला खूपच मदत केली होती. सभागृहात सोडण्यापासून ते भाषणाच्या वेळेपर्यंत, पण तिने त्याबद्दल एकदाही त्याला धन्यवाद दिले नव्हते. कार्डावरचा पत्ता बघून येत्या काही दिवसात त्याच्या ऑफिसात जाण्याचा ती विचार करू लागली. आता कार्यक्रम संपलेला असल्याने ती पुन्हा आपल्या मैत्रिणींच्या गराड्यात होती पण तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. दिवसभरातल्या वेगवेगळ्या वेळेतला त्याचा चेहराच तिला सारखा आठवत होता. त्याची मदत, त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं आणि जाता जाता त्याचं निरोपाचं हात दाखवणं, सारं सारं पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यापुढे येत होतं. हातातलं कार्ड तिने आपल्या पर्स मध्ये ठेवलं आणि तिने निर्णय घेतला, आता त्याचे आभार मानायला त्याच्या ऑफिसातच जाऊन यायला हवं. असा निर्णय होताच ती नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सामील होऊन गेली कारण आता तिच्या कृतीचा आराखडा तिच्या डोक्यात तयार होता.

क्रमशः

No comments:

Post a Comment