Saturday 25 October 2014

संवादिका : रोड टू विन (जिंकण्यासाठी कायपण...)

"बर्गोमी, काय करायचं बोल! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?"
"ए माल्डिनी, काय बोलतोयस? कसला धंदा? आणि हे फॅमिली, फॅमिली काय प्रकार आहे?"
"अरे दोनादोनी, सांग रे याला! लक्ष्य कधी नव्हे ते येवढं जवळ दिसतंय आणि हा मात्र.... ए, घुसळ रे याला, तू चेंडू घुसळतोस तसं."
"बर्गोमी, सध्या माल्डिनी पुझो वाचतोय रे..."
"हो का रे, मग काय आता पाब्लो माल्डिनीच्या ऐवजी डॉन कॉर्लिओनी म्हणायचं का तुला?"
"अरे नाय रे! मी पुढच्या मॅचबद्दल विचारतोय. काय करायचंय?"
"असं आहे बघ, उद्या मैदानावर जायचं. खेळायला उतरायचं. ते देतील तितके गोल खायचे आणि हरून परत यायचं. बस्स, सोप्पी स्ट्रॅटेजी!"
"आयला, हे बरं नाय हं का बर्गोमी! साला, कापितानोच असं म्हणायला लागला, तर टीमचं कसं होणार?"
"दोनादोनी, गेली पाच वर्षं चॅम्पियन आहे जर्मन टीम, ते काय उगाच? त्यात आपण स्पर्धेत पहिल्यांदा खेळतोय. चेचणार रे ते आपल्याला उद्या, हे सांगायला तुला नॉम्स्टर्दामुस पायजेल का?"
"मग काय उद्या मार खायलाच जायचं का?"
"भाईलोक्स, म्हणून तर कधीपासून विचारतोय, काय करायचं बोला! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?"
"माय गॉड, पुझो पुन्हा बोलायला लागला..."
"माल्डिनी, जे होईल ते ताठ मानेने घेऊ. पहिल्याच प्रयत्नात इथपर्यंत पोहोचू असं वाटलेलं का?"
"तरी बर्गोमी, कापितानो म्हणून तू उद्याच्या गेमची स्ट्रॅटेजी ठरवायलाच पाहिजेस."
"खरंय दोनादोनी. उद्या सगळ्यात जास्त शिव्या झेंगा खाणार. तसा तो प्रत्येक गोल खाल्यावर खातोच. उद्या एरवीपेक्षा तिप्पटीने खाईल."
"हो ना? मग हे मला झेंगाला सांगितलेच पायजे."
"थांब रे, माल्डिनी....."
"ए झेंगा, उद्या उतरणार तुझा लेंगा.....!"
"काय कुचाळक्या करताय रे पोट्टेहो? तुम्ही असताना कुणाचा हात माझ्या लेंग्याच्या नाडीपर्यंत पोहोचणारे?"
"उद्याच्या मॅचबद्दल बोलतोय रे! यंदाची जर्मन टीम नेहमीप्रमाणेच भारीये..."
"मग तुम्ही दहा लोक मैदानात काय चणे खाणारात का रे?"
"होय. बर्गोमीने स्ट्रॅटेजी ठरवली नाही तर आम्ही चणे खाणार आणि तू गोल्स. शिवाय तुला बरोबर तोंडी लावायला लोणच्यासारख्या चरचरीत शिव्यासुद्धा मिळणारेत, एकदम फ्री! बरोबर ना दोनादोनी?"
"हे बाकी खरंय रे..."
"अरे, तुम्ही तुमचं काही म्हणणं सांगा की मग..."
"माझं मत सरळ आहे. दोनादोनी, तू मिडफिल्ड सांभाळ. चेंडू माल्डिनीकडे सरकव म्हणजे माल्डिनी गोल मारेल नि चेंडू बर्गोमीकडे सरकला की तो डिफेन्ड करेल. माझ्यापर्यंत कुणाला येऊच देऊ नका म्हणजे झेंगा रहेगा चंगा ही चंगा! हॅ! हॅ! हॅ!"
"हो रे हो, जर्मन टीमचे माथायुस, क्लिन्जमन, जोकिम, ब्रॅह्म आणि म्युलर, सग्गळे चणे- फुटाणे खात बसणारेत मॅचमध्ये, नाही का?"
"म्हणूनच विचारतोय ना, शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का......"
"ए बाबा शांत रहा बरं. आपण प्रत्येकाने आपापलं काम नीट केलं तरच आपला टिकाव लागणार आहे."
"बरोबर आहे रे बर्गोमी, ते तर करूच पण उद्याच्या मॅचमध्ये वाईट्ट हरण्यापासून कसं वाचता येईल?"
"दोनादोनी, मग काय करायचं?"
"हे बघ, डी'नापोली, डी'ऑगस्टिनी आणि पाग्लिउका तुला डिफेंडींग करायला मदत करतील, विआली, सेरेना आणि टाक्कोनी मिडफिल्डमध्ये माझ्याबरोबर राहतील आणि माल्डिनीला शिल्लाची मदत करेल. झेंगा गोलपोस्टवर असेलच. काय माल्डिनी?"
"लेकाच्यांनो पण हे पुरणार आहे का?"
"पुरेल न पुरेल, आणखी काय करणार?"
"बर्गोमी, माझ्याकडे एक आयडिया आहे. त्याप्रमाणे केलं तर आपण जिंकूही शकू."
"काय सांगतोस माल्डिनी? ते कसं शक्यंय?"
" मी जर्मन संघाला अशी ऑफर देईन की ते ती नाकारूच शकणार नाहीत.”
"आयला, बोलला, पुन्हा पुझो बोलला..."
"डॉन माल्डिनी, आपण आपले आदर्श, तरूण, तडफदार, देशभक्त डॉन कॉर्लिओनी, यांच्याकडून प्रेरणा घेऊन अंडरवर्ल्डच्या मदतीने मॅच फिक्सिंग वगैरेंच्या विचारात आपल्या स्वतःच्या टाळक्याचा फुटबॉल तर करून घेत नाही आहात ना?"
“नाय रे भाई, म्हणजे मी अशी योजना आखेन की जर्मन टीम तिच्या परिणामापासून वाचूच शकणार नाही."
"काय करणारेस तू, माल्डिनी?"
"मैं जो डावे हात से करताय वो उजवे हात को पता नही चलताय. झेंगा, चल माझ्याबरोबर. बरीच झाली प्रॅक्टीस. आता माझी पेटली."
"दबंग आणि सिंघमसुद्धा मारियो पुझोने लिहिलेले का रे, दोनादोनी?
---x---
"बर्गोमी, आपण धुपणार रे आता...."
"काय झालं दोनादोनी? आपण चांगलं खेळलो की!"
"तसं नाही रे. माल्डिनीने काय केलं कळलं?"
"साला, गेम सुरू असताना डिफेंडींग करण्यातून वेळ झाला तर बघेन ना मी. त्यात कोचचे हातवारे, खाणाखुणा! शिंचा भुगा होऊन बसला भेज्याचा... आता सांगतोस का?"
"तू बघितलं नाहीस का जर्मनांकडे? कसले चुळबुळत, खाजवत खाजवत खेळत होते? कधी असे खेळतात का ते? जणू खरारा चाललेला..."
"आयला हो रे! मलाही वाटलं तसं. त्यांचे पासेस् चुकत होते, आपल्याला गोल करायचा चान्सही देत होते. त्यांना मिळालेले दोन चान्स मात्र त्यांनी घेतले. ते ही नसतं होऊ शकलं पण आपण माल्डिनी आणि झेंगालाच हाफ टायमात बदललं ना! पण आपण एकूण बरे खेळलो. जर्मनांच्या विरुद्ध २-० हार म्हणजे काही फारसं वाईट नाही. स्पर्धा राऊंड रॉबिन असल्याने ही मॅच हरूनही आपण फायनलला आलोत. ते ही पहिल्याच प्रयत्नात..."
"दिसतं तसं नसतं, बर्गोमी...."
"असं का म्हणतोस?"
"हाफ टायमात माल्डिनी आणि झेंगाला कोचनं पकडलं. मॅचच्या सुरूवातीला त्यांनी जर्मन टीमवर आणि त्यांच्या सामानावर खाजखुजलीची पावडर टाकली."
"आँ? काय सांगतोस?"
"म्हणून तर त्यांना शिक्षा केली कोचनी आणि हाफ टायमानंतर बाहेर बसवलं. नशीब जर्मनांनी आयोजकांकडे तक्रार केली नाही."
"हे देवा! माल्डिनीची आयडीया 'ही' होती होय?"
"जर्मन कोचने आपल्या कोचना सांगितलंय, फायनलला भेटू, म्हणून...."
"चल, आपल्या कोचना भेटू. विचारू, फायनलला आहेत का दोघे?"
"आहेत. त्या दोघांनाही फायनलला खेळवण्याच्या अटीवरच जर्मनांनी तक्रार केलेली नाही."
"अँ? काय विचार काय आहे त्यांचा?"
---x---
"आज आपल्या शाळेच्या क्रीडा विभागासाठी फारच आनंदाचा दिवस आहे. गेली दोन वर्षं पाटील सरांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज मिळालं असं म्हणता येईल. शाळेच्या वीस वर्षांच्या इतिहासात कधीही न केलेला पराक्रम यंदाच्या मुलांनी केलेला आहे. पदार्पणातच आंतरशालेय बिपीन फुटबॉल चषकामध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळवलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की गेली दोन वर्षं आपण आपला फुटबॉल संघ बांधण्याचा प्रयत्न करतोय. मला पाटील सर म्हणालेले की मुलं इटालियन संघाचे फॅन बनलेत. त्यांनी स्वतःसाठी इटालियन नावंही घेतली आहेत. मला खरच त्यांच्या डेडिकेशनबद्दल आणि झोकून देण्याच्या प्रवृत्तीबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. या त्यांच्या पहिल्याच स्पर्धेमध्ये मुलांनी सुंदर खेळ केला. गेल्या पाच वर्षांच्या विजेत्या संघाला आधीच्या राऊंडमध्ये एकदम टफ फाईट दिली. पण स्पर्धेच्या फायनलमध्ये मुलं ढेपाळली. हरकत नाही. त्यांचा फायनलचा हा पहिलाच अनुभव होता. या अनुभवापासून धडा घेऊन पुढल्या वर्षी ते आपली कामगिरी नक्कीच सुधारतील अशी मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा आमच्या फुटबॉल संघाचं आणि विशेषतः त्यांच्यावर मेहनत घेणार्‍या पाटील सरांचं अभिनंदन करतो आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देतो."
---x---
"माल्डिनी, झेंगा, ऐकताय ना?"
"होय सर."
"फायनलला आपण १८-० हरलोय. प्रिन्सिपॉल देशमुख सर म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला सुधारणेला खूप वाव आहे, नाही का?"
"..............."
---x---
ही संवादिका 'मिसळपाव दिवाळी अंक २०१४' मध्ये पूर्वप्रकाशित. 

Sunday 12 October 2014

तफावत

जेवणानंतर जडावलेलो. टळटळीत ऊन मी म्हणत होतं. ऑफीसच्या दिशेने जाणारा रस्ता उभाच्या उभा सुस्त अजगरागत पडलेला. म्हंटलं, गाडी मागवण्यापेक्षा आज अंगाला उन्हं द्यावं. तसाच चालू लागलो. रस्त्याला लागलो तर लक्षात आलं, दुतर्फा झाडीही कमीच झालीयेत. बिनरहदारीच्या रस्त्यावर आता आरामात चालू लागलो तर दिसलं, लांबवरच्या एकमात्र काहीशा डेरेदार वडाखाली सावलीला तिघजणं बसलीयेत, बुवा, बाई नि बहुतेक त्यांचं लहानसर लेकरू. आणखी पुढे जाईतो चित्र जास्त स्पष्ट झालं. तिघेही सावलीलाच बसलेले. मी लांबवरचे हिरवट नीळे डोंगर, आजुबाजूची फुटकळ झाडी नि भाताची पिवळट शेतं बघत त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मला कळलं, त्यांचंही माझ्याकडे लक्ष होतं. तिघांनी बरीच दलमजल केल्याचं कळत होतं. मी जवळ पोहोचताच मळकट सदर्‍याच्या बुवानं तसल्याच रंगाची गांधी टोपी डोक्यावर चढवून लेकराला खूण केली नि ते लेकरू सावलीखालून उठून बापासंगत चालू लागलं. त्यासरशी रस्त्याच्या टोकाशी सावलीत बसलेल्या ठसठशीत कुंकू लावलेल्या नि तसल्याच रंगाची साडी नेसलेल्या त्याच्या आईने उठून बुडाखालच्या बर्‍यापैकी झिजलेल्या प्लॅस्टीकच्या चपल्या चढवल्या आणि तीही त्यांच्या मागोमाग चालती झाली. जणू मी त्यांच्यापर्यंत येईतो विश्रांती घेऊ असं आधीच ठरलेलं. अंतर बरच कापायचं असावं बहुतेक, आधी तिठ्यापर्यंत आणि नंतर पुढेही, मिळालं तर वाहन नाही तर पुन्हा पायीच. मजेखातर उन्हात घाम गाळणारा मी, रस्ते, सरकारी बसेस् किंवा इतर वाहनं अजूनही न पोचलेली गावं, तिथल्या गावकर्‍यांचं गरीबीतलं जीवन, खर्चाच्या हातमिळवणीसाठी त्यांना करावे लागणारे कष्ट असा काहीबाही विचार करतोय तोच मागून एक चारचाकी सर्राट् करून पुढे गेली. दिसलं, त्यातही आई-बाप-लेकरू असं तिघांचंच एक कुटूंब आहे.....

Saturday 21 June 2014

संवादिका - ३



"आहेस का रे?"
"आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे."
"तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?"
"व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?"
"माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला."
"असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D"
"नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..."
"असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनी पडेंगी ना...?"
"तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?"
"काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?"
"चेष्टा नकोय रे! तुला कळणार नाही माझे हाल..."
"काय झालं बेबी? तू मला सांगणार नाहीस का?"
"तुला नाही तर कुणाला सांगू? मन मोकळं करण्यासाठी तुझ्याशिवाय आहे कोण मला?"
"मग सांग तर काय झालं?"
"का नेहमीच्या खपल्या काढायच्या? त्रास होतो रे फार आता..."
"कुछ लेते क्यों नही? :-D"
"ने. ने. तू सगळं चेष्टेवारीच ने."
"बेबी चेष्टा नाही गं. बरं वाटत नसेल तर तू व्यवस्थित औषधं घे ना..."
"देणाराच जवळ नसेल तर....?"
"आता हे काय आणिक्?"
"काय म्हणणार मी दुसरं? तुझ्याशिवाय झुरतेय रे मी नुसती..."
"मग मी का फार आनंदात आहे?"
"असशीलच. म्हणूनच इतका लांब आहेस नं माझ्यापासून?"
"काय म्हणतेयस बेबी? कंपनीच्या दौर्‍यावर गेलो नाही तर ठेवतील का मला नोकरीवर? आणि आता परततोच आहे ना..."
"मिळालीय का गाडी व्यवस्थित? बसायला जागा? की उभ्यानेच प्रवास?"
"रिझर्वेशन मिळालं. छान बसून गप्पा मारतोय की तुझ्याशी..."
"किती छळशील रे?"
"आँ? आता काय झालं?"
"किती दिवस झाले आपल्याला भेटून? तुझी खूप आठवण येतेय..."
"बेबी आजच परततोय की मी..."
"हो, पण मला लगेच थोडाच भेटणार आहेस?"
"विरहाने प्रेम वाढतं म्हणे... ;-)"
"अगदी दुष्ट आहेस तू. इथे मी विरहाने जळतेय नि तुला विनोद सूचतायत."
"अगं, उद्या भेटू की मग आपण."
"उद्यापर्यंतचा वेळ कसा काढू रे मी?"
"अगं, आता हा हा म्हणता उद्या उजाडेल..."
"माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठलाय. मी कुणाकडे मन मोकळं करु रे?"
"बेबी, आपण काहीही झालं तरी उद्या भेटतोय."
"मी रात्र कशी काढू?"
"आपण उद्या नक्कीच भेटतोय बेबी."
"मला तुझा आधार हवाय. तुझ्याशिवाय मी कशी जगतेय माझं मलाच माहिती."
"माझी अवस्था काही वेगळी आहे का गं?"
"कुणास ठाऊक. तुझी लोकं, तुझी व्यवधानं...."
"काय बोलतेयस बेबी? मी तुझ्यापासून फक्त एक फोन-कॉल दूर आहे."
"हो नं. एक फोन-कॉल. तो ही मी मला हवा तेव्हा करू शकत नाही कारण तुझी व्यवधानं....."
"बेबी, तुझ्यासाठी कधीतरी मी त्यांचा विचार केलाय का?"
"ती मला तुझ्यापासून दूर ठेवतात रे..."
"आपण भेटतोय ना उद्या?"
"अरे ते उद्या. मला आज, आत्ता तुझ्या खांद्यावर डोकं ठेवायचंय आणि मनसोक्त रडायचंय."
"बेबी, आपण आत्ता इतके छान गप्पा मारतोय, उद्या भेटायचं ठरवतोय आणि तुला रडू का येतंय?"
"आता सहन होत नाही रे. किती दिवस....? मला आता कठीण होतंय रे..."
"उद्या भेटतोय ना आपण... तेव्हा बोलू."
"तुझ्याशिवाय माझी अवस्था बोलण्याच्या पलिकडे गेलीय, त्याचं काय?"
"बेबी....."
"भीती वाटते, मी माझं काही बरं वाईट....."
"बेबी, काहीतरी बोलू नकोस. मी आहे ना? उद्याच्या आपल्या भेटीचा विचार कर...."
"सहन नाही होत रे आता...."
"एक रात्रच फक्त बेबी, उद्या दुपारी आपल्या नेहमीच्या जागीच भेटतोय आपण...."
"नक्की नं? माझ्या त्रासात भर पाडू नकोस आता आणखी. मला खरंच सहन होणार नाही...."
"बेबी, तुला कधी ताटकळत ठेवलंय?"
"नाही रे, आता कशाचीच शाश्वती वाटेनाशी झालीय..."
"बेबी, अभद्र बोलू नकोस. जेवलीस का?"
"तुझ्याविना अन्न गोड लागत नाही रे..."
"वेडेपणा करू नकोस. जेवून घे थोडं तरी. रात्रीची औषधं विसरू नकोस."
"कशाला घ्यायची आता ती मेली औषधं...? जगायचंय कशासाठी? कुणासाठी?"
"माझ्यासाठी बेबी. तुझ्याशिवाय आहे कोण मला...?"
"आहेत की ती तुझी व्यवधानं...."
"का टोमणे मारतेयस? मी का सुखी आहे या सगळ्यात? तुझ्या आठवणीत जीव तुटतो गं...."
"मग सोडून का देत नाहीस....?"
"इतकं सोपं का आहे सारं...? जगण्यासाठी पैसा लागतो, बेबी..."
"माझं काय?"
"बेबी, तूच माझं सर्वस्व..."
"सर्वस्वाचं सर्वस्व नकोसं झालंय नं तुला...."
"बेबी, आता तू जेव. रात्रीचा औषधाचा डोस घे. गाडी स्टेशनात येतेय. आता बोलता येणार नाही. उतरायला गर्दी आहे."
"नक्की भेटशील ना रे उद्या?"
"हो बेबी, आपण उद्या दुपारी नक्की भेटतोय."
"राजा, तुला उद्या कडकडून भेटायचंय रे..."
"होय बेबी. तुझी आज्ञा शिरसावंद्य. आठवणीने औषधं घे. आता उतरेन. गाडी आली स्टेशनात...."
.
.
.
ट्रिइइइइंग ट्रिइइइइंग! ट्रिइइइइंग ट्रिइइइइंग!
"हां बोल राणी! अगं आत्ताच पोहोचतेय गाडी."
".........................................."
"स्टेशनवर आलीयेस? अरे वा! प्लेझन्ट सरप्राइजच की!"
"............................................."
मनूपण आलीय? फारच छान!"
" ……………………………."
"राणी, माझा इंजिनापासून सातवा डबा आहे बघ! तिथेच थांब. उतरतोच आहे. चल थोडी गर्दी आहे उतरायला. ठेवतो."
______________________________________
त्याने 'वॉट्सॅप'वरचा 'तो' मेसेज बॉक्स उघडला आणि त्यातले नुकतेच झालेले संभाषण एक एक करून डिलीट करून टाकले. क्षणापूर्वीच्या भावनांच्या आवेगांचा आता त्या मेसेजबॉक्समध्ये मागमूसही उरला नाही. जणू काही त्यातलं सारं काही अगदी स्वच्छ आणि टापटीपित होतं. गाडीने स्टेशन गाठलं आणि उतरणार्‍यांच्या गडबडीत तो मिसळून गेला. लोकं उतरली. मी ही उतरलो. माझ्यापासून काही अंतरावर तो आपल्या बायको-मुलीसोबत जाताना दिसला. मुलगी त्याला सारखी बिलगत होती नि बायकोही काहीशी त्याला खेटूनच चालत होती. सारं काही आलबेल होतं.
रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच....