Wednesday 23 September 2020

फुकाच्या नामाचं आकलन

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे

एका कायप्पा समूहावर सकाळपासून या श्लोकाभोवती फिरणारी चर्चा आणि त्यावरून पडलेले प्रश्न वाचून यापूर्वी फार विचार न करता हा श्लोक वाचलाय, ऐकलाय याची जाणीव झाली आणि मी तो श्लोक पुन्हा एकदा वाचला. वाचल्यावर त्यात मला जे काय दिसलं, जाणवलं, ते मांडण्याचा प्रयत्न करतो.

वर उधृत केलेलया श्लोकामध्ये मुख्य भाग आहे, सहज हवन होते अर्थात (जे काही इंधन आहे,) त्याचे सहज हवन होते. हवन होणे म्हणजे ज्वलन होणे. जर ज्वलन आहे म्हणजे ज्वाला आहे, म्हणजेच अग्नी आहे. आता या वाक्यार्धापूर्वी कोणते वाक्य आहे तर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हे वाक्य सरळ सरळ आज्ञा आहे. मुखी म्हणजे मुखामध्ये, तोंडामध्ये, कवळ(ल) म्हणजे घास, कसला तर अर्थात अन्नाचा, घेता म्हणजे घेताना श्रीहरीचे नाम घ्या. जेवत असताना प्रत्येक घासाला श्रीहरीचे नाव घ्या, अशी आज्ञा आपल्याला केलेली आहे. यामुळे काय होते तर आधी सांगितल्याप्रमाणे हवन म्हणजेच अन्नपचन सहज होते. 

मूळ प्रश्न आता असा आहे, ही सहज अन्नपचनाची प्रक्रिया कशी काय होईल? तर या साहजिक प्रश्नाचं उत्तर माझ्या मते अखेरचा वाक्यार्ध आहे, नाम घेता फुकाचे. नाम कोणते तर श्रीहरी हे ते नाम. हे नाम काय आहे तर तो शब्द आहे. शब्दाची निर्मिती होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर उदान वायूची. (वाक् प्रवृत्ती हे उदान वायुचे कार्य आहे.) उदान वायू म्हणजे काय तर आपण जो उछ्वासावाटे वायू बाहेर सोडतो तो उदान वायू. पण आता लक्षात घ्या, श्लोकामध्ये वापरलेला शब्द फुकाचे हा आहे. याचा मूळ शब्द आहे फूंक, ज्याला आपण सामान्य भाषेत फुंकर म्हणतो, तोच शब्द नाम घेता फुकाचे या वाक्यार्धात आलेला आहे. म्हणून संपूर्ण श्लोकाचा अर्थ होतो,

मुखामध्ये घास घेता घेता सोबत श्रीहरीचे नामस्मरण करावे, असे करत असताना ते नाम एखाद्या फुंकरीचे काम करून अग्नीला तीव्र करते; (कारण स्वतः श्रीहरी हाच वैश्वानर म्हणजेच पाचकाग्नी रूपामध्ये प्रत्येक जीवामध्ये उपस्थित आहे) आणि सहज अन्नपचन घडवून आणते.

यापूर्वी कुणी असा अर्थ काढल्याचे वाचनात आलेले नाही. या आधी कुणी हा अर्थ काढला असेल तर आमची विचारधारा एकच आहे, असे मानावे लागेल... 

|| श्रीराम समर्थ ||