Thursday 31 December 2015

कवी मंगेश पाडगावकरांना आठवताना....

मला आजही कविता फारशी कळत नाही. 27 वर्षांपूर्वी तर अजिबात कळायची नाही. यांत्रिकपणे घोकंपट्टी करायची आणि परिक्षेत कवितांवरच्या निर्बुद्ध प्रश्नांची उत्तरं लिहायची, इतकाच माझा आणि कवितेचा संबंध. कवीला कवितेत काय म्हणायचंय हे शिक्षकांनी सांगितलं ते आणि तेवढंच लिहून काढायचो. सांगितलं असेल कधीतरी कवीने शिक्षकांना त्याचं वा तिचं मनोगत, आपून को क्या? असंच असायचं माझं! मग कधीतरी असं कळलं की शिकलेलं कवीचं मत हे शिक्षकांइतकंच गाइडांचंही असतं. या सा-यामुळे कविता उमजणं तर सोडा समजणंही दुरास्पद होत गेलं. या काळात आमच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेने आमच्या भेटीला कवी मंगेश पाडगावकरांना बोलावलं.

शाळेच्या सभागृहात आमची अख्खी बॅच बसलेली आणि समोर पाडगावकर. शाळेच्या क्रमिक पुस्तकात ज्यांच्या कविता असतात अशा कवींना बघण्याचा तो तसा माझा पहिलाच प्रसंग. स्वतःची ओळख करून देत, त्या दिवशी पाडगावकरांनी माईकचा आणि त्याचवेळी सभेसहित सभागृहाचा ताबा घेतला. त्यानंतर बोलगाणी, उदासबोध, कबीरवाणी, जिप्सी अशा त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांच्या ठाशीव आणि नाट्यपूर्ण सादरीकरणात पुढचे दोन तास आम्ही सगळे डुंबत होतो. यात कवितेचं कवीच्या दृष्टीकोनातलं अंतरंगच मला दिसतंय की काय असं वाटायला लागलं.

कविता आजही मला नीटशी उमजत नाही पण कवितेचं सामर्थ्य मला निश्चितपणे दाखवलं पाडगावकरांनी. आज पाडगावकरांच्या देहावसानाची बातमी ऐकली आणि डोळ्यासमोर त्या दिवशीचे, आम्हा मुलांकडे त्यांच्या जाड भिंगांच्या चष्म्यातून मिष्किल डोळ्यांनी बघत, 

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं'

म्हणणारे पाडगावकर उभे राहिले.

माझ्यासारख्या कविता समजण्यात 'ढ' असणा-याला काव्यानंदाचा आणि कविता-सामर्थ्याचा अनुभव देणा-या मंगेश पाडगावकर या मनस्वी कवीला माझ्याकडून ही भावपूर्ण शब्दाञ्जली....

Wednesday 16 December 2015

कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका)

काळ - वर्ष १९९२

(ट्रींग ट्रींग! ट्रींग ट्रींग!!)
"हॅलो! नमस्कार!"
"अरे मी भाई बोलतोय. काय म्हणतायत चिरंजीव? काल बारावीचा रिझल्ट लागला ना?"
"हो ना! रिझल्ट चांगला आहे पण नेहमीप्रमाणे अडनिडा आहे..."
"अडनिडा? का रे? पास झालाय ना? किती टक्के मिळालेत?"
"पास झालाय रे. टक्केही चांगलेच आहेत, पण मेडिकलची अॅडमिशन हुकतेय. त्यासाठी थोडे टक्के कमी पडतायत."
"मग आता विचार काय आहे?"
"तशी त्याला नाशिकच्या फार्मसी कॉलेजात अॅडमिशन मिळालीय. उद्या सकाळी तो आणि मी निघतोय नाशिकला जायला."
"अच्छा, पण मला सांग, त्याला मेडिकलला जायचंय ना?"
"त्याला जायचं असून काय उपयोग? आता फार्मसी करेल."
"बघ, माझ्या मित्राने गेल्या वर्षी मुंबईतच आयुर्वेदाचं कॉलेज काढलंय. आयुर्वेदही शेवटी मेडिकलच. इथे नि तिथे दोन्हीकडे साडेपाच वर्षांचाच कोर्स. आयुर्वेदाला अॅडमिशन मिळण्याइतके मार्क चांगले आहेतच, तर तू नाशिकला जायच्या आधी एकदा तिथे का जाऊन बघून येत नाहीस?"
"असं म्हणतोस? अरे, पण ह्याने आयुर्वेदाचा कधी विचारच केलेला नाही. आयुर्वेदाच्या कॉलेजांचा फॉर्मही शुंभाने भरलेला नाही. जरा समजावतो. बरं म्हणाला तर उद्या आम्ही आधी तिथेच जाऊ. बघतो काय म्हणतायत चिरंजीव..."

-१-

काळ - वर्ष १९९६

"सर, एक विचारायचं आहे?"
"सर? काय बाबा, आज आमच्या नावाचा असा उद्धार का करतोयस? काय हवंय?"
"नाही म्हणजे आता तुम्ही फायनलचे विद्यार्थी, आम्ही ज्युनियर आणि हे हॉस्पिटल, इथे तुम्हीच सर, आम्ही पामर..."
"आता काय हवंय सांगतोस की...."
"सांगतो, सांगतो. डोक्याचा पार भुगा झालाय आपल्या! हे आयुर्वेदाचं गणित काही सुटत नाही आमच्याच्याने..."
"का बुवा? आयुर्वेद कोणतं गणित घालतोय तुला?"
"पहिल्या वर्षी ते वात-पित्त-कफ घोकलं, त्या अस्थी-सिरा-धमन्या पाहिल्या. सुश्रुत-चरक-वाग्भटाची हच्चिसन-चौरसिया-ग्रेंशी सांगड घालता मारामार झाली. ते पार पडलं पण आता दुसर्‍या वर्षाला हे निदानाचं लफडं लागलं. ते रोगाच्या संप्राप्तिचं, दोष-दूष्य संमूर्च्छनेचं गणित काही सुटेना गड्या!"
"तू म्हणतोयस ते खरं आहे. गणित नको म्हणून आपण मेडिकल लाईन घेतो, पण प्रत्येक शास्त्र स्वतःचं एक गणित बाळगून असतंच. मला काय वाटतं माहितेय, शास्त्रं जसं जसं आपल्या अंगात भिनतं ना, तसं तसं ते स्वतःच आपल्याला ते गणित उलगडून दाखवतं. ही अशी अडलेली गणितं सुटतात, पण त्यासाठी अभ्यास क्रमप्राप्तच बाबा..."
"कमी का करतोय अभ्यास? कधी केली नाही येवढी घोकंपट्टी करतोय आयुर्वेदात आल्यावर! वर्गात नुसतंच सांगतात, हे पाठ करा, ते पाठ करा, प्रश्नांच्या उत्तरात श्लोक नसतील तर निम्मे मार्क्स कट्. ते एक टेन्शन. पाठ केलेलं परीक्षेत कसं लिहायचं? अरे तुला सांगतो, मी काहीही पाठ म्हणायला लागताच हल्ली आजीचं पालुपद सुरू होतं - 'व्यर्थ भाराभर केले पाठांतर....', वगैरे वगैरे. ते आणिक एक वेगळं टेन्शन...."
"अरे, तुझा घोळ आला माझ्या लक्षात. तुझी विचारप्रक्रिया चुकीची नाही, कारण आपण मुळात सायन्सचे विद्यार्थी, आपल्याला तसाच विचार करायला शिकवतात."
"मग घोळ काय आहे?"
"आता तू आयुर्वेदाच्या शास्त्राची विचारप्रक्रिया वापर. गेल्या वर्षी तू तंत्रयुक्ती शिकलास, प्रमाणं शिकलास, आठवतंय?"
"शप्पत! पदार्थविज्ञानासारख्या बोरिंग विषयाची आठवण काढून माझं डिप्रेशन वाढवतोयस तू..."
"हॅ हॅ हॅ! तसं नाही रे, कोणत्याही शास्त्राच्या स्वतंत्र तंत्रयुक्ती आणि प्रमाणं असतात आणि त्यांच्या साहाय्याने आपण त्या शास्त्रांचा अभ्यास करत असतो. फक्त आपल्याला ती या नावांनी माहीत नसतात. आयुर्वेदाच्या अभ्यासाची गुरुकिल्ली आहेत या दोन्ही. आता असं बघ, आयुर्वेदाच्या स्वतःच्या काही संकल्पना आहेत, थिअरीज् आहेत. त्यांची सिद्धता व्हावी यासाठी काही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियांचं माध्यम आहेत, तंत्रयुक्ती आणि प्रमाणं. आयुर्वेदाचं एक लॉजिक आहे. या लॉजिकचा उपयोग आयुर्वेद शास्त्राच्या जीवनातल्या अॅप्लिकेशनमध्ये होत असतो. अ‍ॅप्लाईड सायन्स शिकतोच की आपण! प्रश्न इतकाच आहे की हे लॉजिक तुम्हाला किती कळलंय आणि त्याचा वापर तुम्ही किती खुबीने करून घेताय."
"अरे कळतंय, पण वळत नाहीये. थिअरी समजली पण ते अॅप्लिकेशन, अप्लाईड सायन्सची बोंब होतेय ना...."
"अरे बाबा, तीच तर गंमत आहे आयुर्वेदाची! पहिल्या वर्षात दोष-धातु-मल शिकायचे, दुसर्‍या वर्षात त्यांच्यापासून उत्पन्न होणारी विकृती शिकायची आणि तिसर्‍या वर्षाला त्याची ट्रीटमेन्ट समजून घ्यायची आणि करून बघायची."
"पण कशी? हे शिकलेलं सगळं एकत्र कसं आणायचं?"
"त्यासाठीच तर आयुर्वेदाचं लॉजिक वापरायचं, तंत्रयुक्ती वापरायची, प्रमाणं वापरायची."
"हे महान आयुर्वेदलॉजिकज्ञा! आमचा बेसिक प्रश्न हाच आहे, हे सारं करावं कसं?"
"वत्सा, तुजप्रत कल्याण असो. माझी आयपीडी राऊंड घ्यायची वेळ झालेलीच आहे, तेव्हा चल, मी हे तुला एक पेशन्टसाईड क्लिनिक घेऊनच दाखवतो."

-२-

काळ - वर्ष १९९८

"डॉक्टर, एमो नाहीयेत आणि एक पेशन्ट आलाय, तर तुम्ही घ्याल का?"
"अहो सिस्टर, त्यासाठीच तर आम्ही इन्टर्नशीपला इथे येतो ना? पाठवा पाठवा, बघतो मी."
"पाठवते, पण बघा हं, म्हातारा जाम खट आहे. कधी कधी एमोसाहेबांचंही ऐकत नाही."
"पाठवा तर खरं!"
................
"या आजोबा, काय म्हणताय, काय झालंय?"
"तू नवा दिसतोयस इथं. डाक्टरसायेब कुठं गेले इथले?"
"ते नसले तर काय झालं, मी आहे ना आज इथे. बोला काय होतंय?"
"चार दिसामागं गुरं घेऊन रानात गेलोवतो. तो तिथं दगुडावरून पाय घसरला नि पडाया झालं. कंबर लई दुखतीय आनी पायही धरल्यात. गुरं घेऊन जायालाही जमंना झालंय."
"अच्छा, असं झालं तर! चला तपासतो, या इथे झोपा पाहू. हं, श्वास घ्या जोराने, हं, रक्तदाब बघू. हं, कंबर कुठे दुखतीये? इथे? इथे? इथे दाबल्यावर दुखतंय? पाय कुठे त्रास देतोय?"
"हां, आत्ता जिथं दाबतोय तिथं दुखतंय.... तिथं नाई, ते जरा वरल्या बाजूला.... हां तिथंच तिथंच, लई दुखतंय."
"आजोबा, चार दिवस झाले तर काही तेल लाऊन शेकून वगैरे घेतलं की नाही?"
"लावलं ना, तेल लावलं, विटेने शेकलं, कंबरेवर निगडीपाल्याचा लेप लावला, पण गुण नाई आला. मग पोरगा बोलला, डाक्टरला दाखीव म्हणून आलो कसं बसं इथवर...."
"काय आहे, हाडं पिचल्यागत झालंय पडल्यामुळे. पण इथे काही आपल्याला हाडांचा फोटो काढता येणार नाही, आत काही झालंय का ते बघायला, त्यासाठी तालुक्याच्या गावाला जावं लागेल. जाणार का? पण तोवर दुखणं तसंच राहणार."
"आरं, लई त्रास हाय. तू दवा दे जरा."
"लवकर बरं व्हायचंय, दुखणं थांबवायचंय तर सुई टोचावी लागेल."
"आरं, सुई नको. मी सुई घेनार नाई. आधीच कंबर दुखतीय त्यात आनिक् सुई, नको मला. मी सुई घेनार नाई."
"असं काय करता आजोबा, कंबरेचं दुखणं इतकं आहे त्याच्यासमोर सुई कितीशी दुखणार? सुईने दिलेल्या औषधाने कंबर दुखायचीही थांबेल."
"मी सुई घेनार नाई."
"तुम्हाला कंबर आणि पायांच्या दुखण्यातून लौकर बरं व्हायचंय ना? तर मी सांगतो तसं औषध घ्या म्हणजे बरं वाटेल."
"ती सुई दुखती...."
"आजोबा, आता मी देतोय ना, दुखलं तर मला सांगा, मी लगेच थांबवेन. मग ठीक?"
"बरं, बघतो घिऊन, टोच सुई...."
"हां, आता कसं! आता आजोबा, तुम्ही तिथे झोपा मी औषध घेऊन येतो.... हां, आता हे एक थंड औषध लावतो हं.... आता नाही दुखणार.... हां, उठा आता."
"उठू कशाला, सुई टोचनार हायेस ना?"
"आजोबा, सुई टोचून झाली की! आता बघा तासा-दोन तासात तुमची कंबरदुखी कमी होतेय की नाही ते...."
"सुई टोचलीस पन! मला कळालंच नाई. पोरा, तुजा हात लई हालका हाय बग, मला जराबी दुखलं नाई, सुई टोचल्याचं कळलंबी नाई...."
"अरे, अरे, आजोबा, असं आपल्याहून लहान माणसाच्या पाया का पडतात? उठा बरं, एक सुई तर टोचलीय, त्यात काय, दुखणं गेलं की खरं, उठा बरं."
"तसं नाई, पाया तुज्या नाई तर तुला डाक्टर बनवनार्‍या द्येवाच्या पडलोय. त्यानं बरोबर केलंय. आजपरंत सुई दुखली नाई आसं कदीच झालेलं नाई. तू गुनाचा हाईस. द्येव तुजं भलं करेल, लेकरा...."

-३-

काळ - वर्ष १९९९

"डाक्टर साहब, अंदर आयें क्या?"
"आईये. बताईये क्या तकलिफ हैं?"
"वो तीन-चार दिन से सर्दी-खाँसी चल रही हैं. गलें में दर्द होता हैं. निगलने में तकलिफ हैं और बलगम बहोत निकलता हैं अब आज सुबह से बुखार जैसा लग रहा है..."
"आईये, चेक करते है.... मुह खोलिये, जबान दिखाईये.... अच्छा, अब लेट जाईये. साँस लिजिये.... जोर से.... जरा पेट के बल हो जाईये और फिर से साँस लिजिये.... सीधे हो जाई ये.... ब्लड प्रेशर देखते है.... प्रेशर बढा हुवा है.... कुछ गोलियाँ चालू हैं प्रेशर के लिये?"
"नही डाक्टर साहब, अब जो भी हैं आप ही दे दिजियें..."
"ठीक है, देखिये, तकलिफ कई दिनों से चली आ रही हैं. दवाई तीन महिना लेनी पडेगी. कुछ दिन के लिये परहेज रखना पडेगा. बाहर की खाने की चिजें बंद करनी पडेगी. दही, टमाटर, बैंगन, बटाटा बंद किजिये, घर में ही पालक, लौकी सब्जियों का गरम गरम सूप बनाकर पियें, हलदीवाला दूध पिजिये. अभी के लिये, ये दवाई दे रहा हूं, चार दिनों बाद दिखाना...."
"डाक्टर साहब, आपकी फीस?"
"नया केस पेपर बनवाने के और चार दिन की दवाई के सौ रूपये हुए."
"डाक्टर साहब, अब घासफूस की दवाई का इतना क्या दाम? आप यह दस रूपये ले लिजिये."
"मतलब? चेक अप और दवाई फ्री में तो नहीं आती...."
"वो आप दस रुपये में ये काम कर दिजिये. इससे ज्यादा तो हमसे देना होगा नही...."
"तो आप यह दवाई मुफ्त में ही ले जाना पसंद करेंगे?"
"अगर आप कहते हो तो वैसे करेंगे...."
..................
डॉक्टरला सदर पेशन्ट त्याच संध्याकाळी रस्त्याच्या कडेला भेळ आणि दही-बटाटा-पुरीवर ताव मारताना दिसला.

-४-

काळ - वर्ष २००७

"आत येऊ का?"
"अरे ये, ये. बस. काय म्हणतायत तुझे पेशन्ट्स?"
"आत्ताच शेवटचा पेशन्ट औषध घेऊन गेला; तेवढ्यात वॉर्डबॉयने तुम्ही बोलावल्याचं सांगितलं नि लगेच आलो."
"हो, शेवटचा पेशन्ट गेला की माझा निरोप द्यायला मीच त्याला सांगितलेलं."
"बोला, काही काम होतं का?"
"काम असं नाही रे, पण मला सांग, सध्या कसं काय चाललंय? शेड्यूल कसं चाललंय तुझं?"
"सर, सकाळी शहरातलं क्लिनिक, दुपारी इथे आणि संध्याकाळी उपनगरातला दवाखाना, सध्या असं व्यवस्थित सुरू आहे. दोनेक विद्यार्थीही येतात अधून मधून शिकायला."
"मी गेली दोन-तीन वर्षं तुला इथे बघतोय, तू सिस्टिमॅटिकली पेशन्ट्स बघतोस. ते आयुर्वेदात सांगितलंय ना, दर्शन-स्पर्शन-प्रश्न परीक्षा का काय, तसं. आणि बरोबरच तू त्यांना पथ्यापथ्य सांगतोस, काही विशिष्ट पदार्थ त्यांनी खावे, असं असेल तर तुला त्याची रेसिपीही सांगतोस असंही ऐकलंय मी, बरोबर ना?"
"आहे खरं तसं. शुद्ध आयुर्वेदाचा विचार करायचा तर तसं होणारंच ना! पण सर, मला आता असं वाटतंय की तुम्ही माझ्या डिपार्टमेन्टमध्ये, तुमचे हेर पेरलेत की काय?"
"अरे बाबा, मोठ्या हॉस्पिटलच्या सीएमओ आणि अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरला येवढी बातमी न कळायला काय झालंय? पण मुद्दा तो नाहीये. मला तुला दुसरंच काही सांगायचंय."
"बोला की सर, काय म्हणताय?"
"तू एका पेशन्टला सरासरी किती वेळ देतोस?"
"तसं गणित करणं कठीण आहे सर. जुनाट रोग असेल तर वेळ जास्त लागतो, रोगी वयस्कर असेल तरही वेळ जास्त लागतो. काही बायकांना औषधाच्या प्रक्रिया समजायला वेळ लागतो, तर कधी दहा मिनिटांच्या आतच पेशन्ट औषधं घेऊन बाहेर पडलेला असतो. तरी सरासरी ३०-३५ मिनिटे धरायला हरकत नाही. आयुर्वेदासाठी इतकं करणं म्हणजे काही फार नाही, नाही का, कारण शेवटी पेशन्टचा आयुर्वेदावरचा विश्वास वाढणं महत्त्वाचं आहे."
"मी ही तेच गणित केलेलं. हे असं तू गेले आठ वर्षं करतोयस, बरोबर?"
"होय सर, १९९९ पासून."
"म्हणजे अर्ध्या तासात तू एका पेशन्टला त्याच्या रोगाच्या बाबतीत आयुर्वेद शिकवतोस, होय ना?"
"सर, एका अर्थाने बरोबरच आहे तुमचं! एकप्रकारे आयुर्वेदाचं शिक्षण देण्याचीच ही प्रक्रिया होईल."
"म्हणून माझं तुला असं सांगणं आहे की आता तू वेगळा विचार करावास."
"वेगळा म्हणजे?"
"अरे, वेगळा म्हणजे वेगळ्या दृष्टीकोनातून. अर्ध्या तासात तू जितके श्रम करतोस आणि एका पेशन्टला आयुर्वेदात साक्षर करतोस, तितक्याच वेळात शंभर लोकांपर्यंत कसा पोहोचू शकशील याचा आता विचार कर. एका पेशन्टपायी तुझी जितकी एनर्जी वापरली जाते तितक्या एनर्जीच्या वापराने शंभर पट परिणाम कसा घडवता येईल याचा विचार कर. तुझं आयुर्वेदावरचं प्रेम आणि त्याच्या प्रसाराची ऊर्मी बघून मला हे तुला सुचवावसं वाटलं."
"तत्त्व म्हणून हे योग्य वाटतंय. पटतंय खरं. पण हे करावं कसं?"
"ते मात्र मी तुझ्यावर सोडेन. शोधून काढ एखादा शुद्ध आयुर्वेदिक उपाय, याच्यावरही...."
"मी नक्की विचार करतो सर, यावर..."

-५-

वर्ष २००७ नंतर, 'मंजिलें और भी हैं...’वर निष्ठा असलेल्या डॉक्टरांनी नव्या वाटा धुंडाळण्यास सुरुवात केली. डॉक्टरांना काही मार्ग अल्पयशदायी ठरले, तर काही चांगल्यापैकी यशदायक ठरले. असं असलं तरीही या तत्त्वानुसारच डॉक्टरांची आयुर्वेदाच्या प्रचाराची आणि प्रसाराची वाटचाल नवनव्या वाटांवर सुरूच आहे.

(समाप्त किंवा पुढे चालू....)

Friday 1 May 2015

मिस्टिसिझम - एक चिंतन - २

आधी म्हण्टल्याप्रमाणे 'मिस्टिसिझम' या शब्दाच्या व्युत्पत्तीमधून आपल्या हाती फारसं काही लागत नाही पण येवढं नक्की की या शब्दाचे सामान्यतः दोन अर्थ लागतात. यातला पहिला अर्थ अनुभवात्मक आहे तर दुसरा जीवनपद्धतीविषयक. हा जो दुसरा जीवनपद्धतीविषयक अर्थ आहे तो निस्संशय अनुभवात्मक अर्थावर अवलंबून आहे म्हणून आपण सुरूवातीला या अनुभवात्मक अर्थाचाच विचार करू.

आता प्रश्न असा आहे की हा 'अनुभव' नेमकं काय प्रकरण आहे? सामान्य भाषेमध्ये व्यक्त करायचं झालं तरी आपल्याला लक्षात येतं की आपण याबद्दल काही फारसं सांगू शकत नाही. आपण इतकंच म्हणू शकतो की मी यापूर्वी जे भोगलेलं आहे, ते म्हणजे अनुभव. पूर्वीपासून असलेल्या ज्ञानाला अनुभव म्हणता येईल. पण पूर्वीपासून असलेलं सगळंच ज्ञान अनुभव होईल का? हे ज्ञान कुठे होतं? कुणाला होतं? कसं होतं? गुंतागुंत वाढत जाते आहे. याची सोडवणूक करण्यासाठी आपण 'ज्ञान' म्हणजे काय, याबद्दल भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या उहापोहाबद्दल आधी पाहू.

भारतीयांच्या मते ज्ञान हे बुद्धीचं साध्य आहे. बुद्धी असेल तर ज्ञान होईल आणि बुद्धी नसेल तर ज्ञान होणार नाही, इतकं त्यांचं साहचर्य मानण्यात आलेलं आहे. किंबहुना या गृहितकावरच त्यांनी बुद्धीची व्याख्या केलेली आहे.

'सर्वव्यवहारहेतुर्ज्ञानं बुद्धि:।'

अर्थात, आहार-विहारादि सर्व प्रकारच्या व्यवहारांचे निमित्त वा कारण असे जे ज्ञान आहे, त्याला बुद्धी असं म्हणतात. एका अर्थाने बुद्धी आणि ज्ञान यांच्यात एकात्मताच मानली गेली आहे. आता ही बुद्धी किंवा ज्ञान किती प्रकारचं असतं, तर त्याबद्दल सांगतात -

'सा (बुद्धि / ज्ञानम्) द्विविधा। स्मृतिरनुभवश्च।'

अर्थात, बुद्धी किंवा ज्ञान दोन प्रकारचे आहेत. एक स्मृति आणि दुसरे अनुभव.

स्मृति म्हणजे काय, तर

'संस्कारजन्यं ज्ञानं स्मृति:।'

अर्थात, संस्कारांद्वारे निर्माण होणारे ज्ञान म्हणजे स्मृति. आपल्या ज्ञानेन्द्रियांच्या साहाय्याने ग्रहण केलेल्याचा जो ठसा बुद्धीवर, ज्ञानावर उमटतो, त्याला संस्कार म्हणता येईल. हा ठसा सकारण-विनाकारण, सहेतु-निर्हेतु आपलं अस्तित्व बुद्धीवर दाखवत असतो, त्यालाच स्मृति म्हण्टलेलं आहे.

'तद्भिन्नं ज्ञानमनुभव:।'

तर या उलट ज्ञान जे आहे त्यास 'अनुभव' असे म्हणतात. म्हणजे संस्काररूपी ज्ञानापेक्षा भिन्न ज्ञान म्हणजे अनुभव.

आता असं बघा, स्मृति आणि अनुभव ही दोन्ही ज्ञानच आहेत. संस्काररूप ज्ञानाची बनते स्मृति आणि त्याहून भिन्न तो अनुभव. म्हणजे पूर्वी घडून संस्काररूप झालेले ज्ञान म्हणजे स्मृति आणि पूर्वी न घडलेले, त्यामुळे संस्काररूप न झालेले, केवळ वर्तमानकालीन ज्ञान हा अनुभव, अशी थोडक्यात मांडणी करावी लागते.

हा सगळा उहापोह करण्याचं कारण म्हणजे आपण ज्या विषयाचा विचार करत आहोत, मिस्टिसिझम, हा एक अनुभवाचा भाग आहे, असं आपण यापूर्वी अनेकदा उद्धृत केलंय. जोपर्यंत अनुभव म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट होत नाही, तोपर्यंत याबद्दलचा भारतीय दृष्टिकोण स्पष्ट होऊच शकणार नाही.

भारतीय दर्शनशास्त्रज्ञांच्या मते, स्मृति आणि अनुभव यांच्यात व्यवस्थित भेद आहे. याचं स्पष्टिकरण करताना ते म्हणतात की "मी स्मरतो" आणि "मी अनुभवतो", हे दोन भिन्न भिन्न प्रत्यय आहेत. स्मृति पूर्वानुभवाने होणारी असते आणि ही फक्त अनुभवजन्य संस्कारापासून होते (स्मरण) तर अनुभवाचा विषय हा प्रत्यक्ष आणि केवळ वर्तमानकालीन असतो (अनुभव). आता आपण निश्चितपणे म्हणू शकतो की पूर्वी कधीही नसलेल्या, नव्याने झालेल्या ज्ञानाचा संबंध मिस्टिसिझमशी आहे.

भारतीय शास्त्रज्ञ अनुभवाबद्दल अधिक विवेचन करताना म्हणतात,

'स (अनुभवः) द्विविधः। यथार्थोSयथार्थश्च।'

अर्थात, हा अनुभव दोन प्रकारचा असतो. एक यथार्थ आणि दुसरा अयथार्थ.

याचं स्पष्टिकरण देतात,

"तद्वति तत्प्रकारकानुभवो यथार्थः। यथा रजतं इदं रजतं इति ज्ञानम्। सैव प्रमेत्युच्यते।"

अर्थात, पदार्थ जसा आहे तसाच त्याचा अनुभव होणे याला यथार्थ अनुभव असं म्हणतात. जसं चांदीला पाहिल्यावर चांदीचंच ज्ञान होणं. या यथार्थानुभवाला शास्त्रामध्ये 'प्रमा' असे म्हणतात.

"तदभाववति तत्प्रकारकानुभवोSयथार्थः। यथा शुक्तौविदं रजतमिति ज्ञानम्।"


पण पदार्थ ज्या प्रकाराने युक्त नसतो त्याचे त्याच प्रकाराने ज्ञान होणे, याला अयथार्थ अनुभव असं म्हणतात. जसं, शिंपल्याच्या ठिकाणी (त्याचा रंग, चकाकी यामुळे) ही चांदी आहे असं ज्ञान होणं.

आत्तापर्यंत अनुभवाचा शास्त्रीय दृष्टिकोणातून विचार केल्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे परतू. आपण पहिल्या भागात जे पाहिलेलं त्यात असामान्य विलक्षण अनुभवाला आपण 'मिस्टिक' असं संबोधलं होतं. मग आत्ता केलेल्या ज्ञान आणि त्यातही अनुभवाच्या विवेचनाचा विवेचनाचा विचार करताना असा प्रश्न निर्माण होतो की 'मिस्टिक' अनुभवाला आपण यथार्थ श्रेणीत ठेवावं की अयथार्थ? उदाहरणांत सांगितलेले मिस्टिक अनुभव, हे ज्ञानाचे, चांदीच्या उदाहरणाप्रमाणे जसे आहे तसे जाणण्यासारखे यथार्थ अनुभव नाहीत पण त्याच वेळेला शिंपल्याऐवजी चांदी वाटण्यासारखे अयथार्थही नाहीत. मिस्टिक अनुभव हे तात्कालिक अर्थात कालसंबद्ध असतात आणि ते अनुभवकर्त्यासाठी त्या काळापुरते यथार्थ असतात. मग अशा परिस्थितीत या अनुभवांसाठी आपल्याला अनुभवाचा एक तिसरा प्रकार मानावा लागतो.

दर्शन शास्त्रात न सांगितलेल्या या तिसर्‍या प्रकारच्या अनुभवाबद्दल बोलण्यापूर्वी अनुभव किंवा मूळात ज्ञान होण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ पण ते पुढील भागात.....

Tuesday 14 April 2015

मिस्टिसिझम - एक चिंतन - १



मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे.
मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा? तर बहुदा ज्या गोष्टींचं आपण वर्णन करू शकत नाही आणि त्याच वेळेला त्यांचं अस्तित्त्व मात्र मान्य करावं लागतं, अशा वेळी माणूस गप्प राहाणंच पसंत करतो, या न्यायानं मिस्टिक आणि मिस्ट्री या शब्दांना गूढतादर्शक अर्थ प्राप्त झाला असावा. मिस्टिक आणि मिस्ट्री शब्दामधून आणखी एका शब्दाची आठवण होते. तो म्हणजे 'मिस्ट' (mist) अर्थात धुकं हा शब्द. धुक्यात वेढलेल्या वस्तू आपलं मूळ रूप न दाखवता काही निराळ्याच स्वरूपात दिसतात. म्हणूनही कदाचित अशा गोष्टींना आणि अनुभवांना मिस्टिक किंवा मिस्ट्री असं संबोधन मिळालं असावं. अर्थात त्यांचं यथार्थ वर्णनही करता येत नाहीच. मिस्टिक किंवा मिस्ट्री ही व्यक्तिसापेक्ष असते आणि त्या बरोबरच ती विशिष्ट कालसंबद्धही असते. म्हणजेच तो एक वैयक्तिक अनुभव असतो. काही वेळेला त्याची प्रचिति समूहामध्येही मिळाल्याची उदाहरणे आहेत पण त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल नेहमीच शंका राहते. तरी व्यक्तिसापेक्ष मिस्टिक अनुभव हे मात्र अनेकदा दिसून येतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या परिणामांचा प्रत्यय असा अनुभव प्राप्त झालेल्या व्यक्तिखेरीज इतर लोकही तो घेऊ शकतात. असं असल्यामुळेच मिस्टिक गोष्टींच्या अस्तित्त्वाची दखल घ्यावी लागते.
या विवेचनाला उदाहरणाची जोड दिल्याशिवाय ते अधिक स्पष्ट होणं कठीण होईल. आपण कशाला नेमकं मिस्टिक म्हणावं, हा कळीचा मुद्दा होईल. एखादा चित्रकार, आपलं चित्र पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा चित्राकडे बघतो, आणि त्याला प्रश्न पडतो की खरोखर आपणच हे बनवलंय? कसं काय साध्य झालं बरं हे? वस्तुतः त्याने चित्रावर प्रचंड मेहनत घेतलेली असते, विचार केलेला असतो, तासन् तास त्यावर रंगलेपन केलं असतं पण या सगळ्याची त्याची स्मृती जणू काही त्यावेळी लुप्त झालेली असते. मग तो त्या कृतीचं कर्तृत्व स्वत:कडे न घेता तो चित्रकार हे काम कुणीतरी त्याच्याकडून करून घेतल्याचं आणि मूळ कर्ता कुणी वेगळाचं असल्याचं प्रतिपादन करतो. अशीच काहीशी गोष्ट लेखक, गायकांच्या बाबतीत होताना दिसते. चित्रकार, शिल्पकार, लेखक अशा कलाकारांची कामं सुरू असताना, त्यांच्या कलांचं प्रदर्शन होत असताना शेकडो लोकं त्यांना बघत असतात तरी ते त्या कलाकारांच्या अनुभूतीपासून अनभिज्ञ असतात. म्हणजे हे वैयक्तिक अनुभवाचं उदाहरण म्हणून म्हणता येतं.
समजा, एखाद्या गायकाचा गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, गायक एकाग्रतेने राग-मांडणी करतोय आणि अचानक तो एखादी अपरिचित पण सुंदर जागा घेतो आणि प्रेक्षागृहात त्याची उत्फूर्त प्रतिक्रिया उसळते, अशा वेळी काही तरी वेगळा अनुभव येतो. तो कदाचित गायक आणि श्रोते यांच्या ठायी एकाच वेळी किंवा आधी गायकाच्या आणि त्यानंतर लगेच श्रोत्यांच्या ठायी निर्माण झाला असावा पण एक नक्की म्हणता येतं की बहुतांशी हे ठरवून घडलेलं नसतं. हा सामूहिक अनुभव असतो पण सामान्य नक्कीच नसतो.
ही जी वर दोन उदाहरणं आहेत, त्यांच्या अन्तर्भाव आपण मिस्टिक उदाहरणं म्हणून करू शकतो. या घटनांच्या कर्मुकत्त्वाची कारणमीमांसा करणं आपल्याला जमत नाही. त्याबद्दल आपण बोलायला गेलं तरी निष्पन्न काहीच होण्यासारखं नसल्याने आपण गप्प राहतो आणि म्हणूनच आपल्यासाठी ही मिस्टिक किंवा मिस्ट्री बनतात.
वर म्हण्टल्याप्रमाणे अनेकदा अशा घटनांचं कर्तृत्व हे दुसर्‍या कुणाला तरी दिलेलं आढळतं. बहुदा हे कर्तृत्व दैवी मानलं जातं. या जगाचा कुणी एक जगनियन्ता आहे आणि त्या जगनियन्त्याच्या अस्तित्त्वाचा पुरावा म्हणून अशा अनुभवाकडे पाहिलं जातं. यामुळेच कधी कधी असा अनुभव माणसाला मूळापासून बदलवतो. एकदा आलेला हा अनुभव पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करू लागतो आणि तेच त्याचं आयुष्यभराचं ध्येय बनतं कारण ते त्या जगन्नियन्त्याच्या प्राप्तीचा मार्गच मानलं जातं. इथेच एकदा आलेल्या अनुभवाच्या पुनर्प्राप्तीसाठी म्हणजे त्याद्वारे त्या परमतत्त्वाच्या प्राप्तीसाठीच जणू माणूस आपलं उर्वरित आयुष्य वेचतो, तेव्हा मिस्टिसिझम ही त्याची जीवनप्रणाली होते. इझम हा विचारप्रणालीनिर्देशक शब्दच आहे. विचारप्रणाली ही बहुदा व्यक्तिच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या विश्वासपात्र अशा तत्त्वांवर आधारित असते. जेव्हा वर्णन करता येण्यास कठीण परन्तु ज्यांचं अस्तित्त्व अमान्य करणंही अशक्य अशा गूढ, रहस्यमय तत्त्वावर आधारित विचारप्रणाली किंवा अशा विचारांवर आधारित जीवनप्रणालीला मिस्टिसिझम असं म्हणता येईल.
या मिस्टिक घटना का घडतात याबद्दल विचार करण्यापूर्वी आपल्याला, त्या कशा घडतात याचा विचार करणं योग्य व्हावं. त्यांच्या निर्माण होण्याची प्रक्रिया आपण नीट समजू शकलो तर आपल्याला त्यांची कारणमीमांसा करणं अधिक सोपं जाईल. एक मात्र निश्चित सांगता येईल की मिस्टिसिझम हा शब्द पाश्चात्य असला तरी ही एक वैश्विक वृत्ती आहे. तिचा उगम पौर्वात्य असला तरी सध्या ती जगभरात मान्य संकल्पना आहे. मिस्टिक विचारधारेबद्दल जगभरात विवेचन होत असताना त्याबद्दल अस्सल भारतीय स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न करण्याच्या विचाराने प्रेरित होऊन या लेखनाचा घाट घातला आहे. पुढील भागात या प्रेरणेचा विस्ताराने धांडोळा घेण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे.

Sunday 15 February 2015

18 Till I Die



"अरे बाबा, काय झालंय काय नक्की आजोबाला?" मी हा प्रश्न थर्ड टाईम विचारत होतो. बाबाचं अटेन्शनच नव्हतं माझ्याकडे. ते ही खरंच म्हणा, आपल्या मुलाकडे लक्ष न देण्याचा, आजोबा म्हणतो तो  भारतीय संस्कार आमच्या बाबाने अजूनही हौसेने का काय म्हणतात ना तसा जपला होता, आपल्या एजची हाफ इयर्स कॅनडात घालवूनही! पण आता मी ट्वेल्व्ह इयर्सचा झालोय आणि पुढल्या ऑक्टोबरात आई म्हणते तसा थर्टीन इयर्सचा घोडा होणार असल्यामुळे थांबणार नाही, असं मनातल्या मनात म्हणत फोर्थ टाईम विचारायच्या तयारीला लागलो. फक्त आता मी माझा मोर्चा, हा माझ्या आजोबाचा शब्द, आईकडे वळवला. आजोबा पूर्वी खूप मोर्चा मोर्चा खेळलाय, असं आई म्हणाल्याचं मला आठवलं.

मला भारतात येऊन आता थ्री डेज तर नक्कीच झालेत. आजोबाच्या सिकनेसची बातमी बाबाला कळल्या कळल्या आम्ही मिळेल त्या विमानाचं तिकिट काढून भारतात आलो. नाही तरी माझी व्हेकेशन्सच चालू होती आणि आजोबाला भेटायला आपण कधीही, ते आई म्हणते ना, एका पायावर का काय, तसा तय्यार. पहिला दिवस मला काय आजोबा भेटला नाही कारण मला कुणी त्या हॉस्पिटलमध्येच नेलं नाही. बाबा नि आई जाऊन आले, मला सखूमावशीबरोबर ठेऊन. मला आई नि बाबा काही सांगतंच नाहीयेत. मग आज हट्टाने आजोबाला भेटायला इथे आलो तर आजोबा झोपलाय आणि मला कुणी त्याला काय झालंय ते सांगत नाहीये. मग मी पण आता ठरवलंय, आता आपण भूणभूण करायची. हा माझ्या आजोबाचाच शब्द.

आमच्या नगरच्या घरासमोरही टोरॅन्टोच्या घरासमोर असल्यासारखं एक मोठ्ठ पार्क आहे. पहिल्यांदा आजोबाला भेटायला आलो ना तेव्हा मी सारखं दुपारच्या उन्हात त्या पार्कात जायला मागत असायचा. मग आई आणि आजोबाला मी सारखं सांगायचा की पार्कात जाऊ या, आपण पार्कात जाऊ या. मग नेलं नाही की मी रडत, मुसमुसत ते परत परत म्हणत राहायचा. मग आजोबा म्हणायचा, "काय सारखी भूणभूण लावलीयेस रे? चल, जाऊ तुझ्या पार्कात." मग आमची वरात निघायची तिकडे. आता तुम्ही म्हणाल, हे मला कसं माहिती, तर हे सगळं मला सांगितलं माझ्या आईने, कारण तेव्हा मी एकदम बेबी होतो ना, यातला तो वरात शब्द मात्र आमच्या बाबाचा. टोरॅन्टोमध्येही आम्ही कुठेही निघालो ना की तो म्हणतोच, निघाली वरात, म्हणून!

ओ फिश्, माझं हे असंच होतं. एकातून दुसरं, दुसर्‍यातून तिसरं निघत जातं आणि मग ते आई म्हणते तसं हनुमानाच्या टेलसारखं होतं, डेमन किंग रावणाने नाही का हनुमानाच्या टेलला आग लावायला सांगितल्यानंतर त्याची टेल लांब होत गेली, अगदी तसंच, संपतंच नाही मग सुरूवात आठवायला लागते. तर मी काय म्हणत होतो, हं. आजोबाला काय झालंय ते आता आईलाच विचारतो.

मी भूणभूण करायच्या तयारीने आईजवळ गेलो तर तिनेच मला एका बाजूला घेतलं आणि तिथल्या कोचावर बसवलं. ती पण माझ्या शेजारीच बसली. मग हळू आवाजात म्हणाली, "चंद्रा, बाळ, आजोबाला बरं नाहीये. बाबा घेऊन जाईल तुला आजोबाकडे. पण तू आजोबाला त्रास द्यायचा नाही हं." आता काय, आईने सांगितलं म्हणजे बाबा घेऊन जाणार म्हणजे जाणारच आजोबाकडे. मी मग माझा भूणभूण प्रोग्रॅम कॅन्सल केला आणि रंगा अंकलशी बोलणार्‍या बाबाकडे बघू लागलो.

एरवीपेक्षा आज बाबा खूपच हळू बोलत होता रंगाकाकाशी. एरवी, बाबा बोलायला लागला की समोरच्या डेलच्या घरीही क्लिअरली ऐकू येतं तो काय बोलला ते. पण नो प्रॉब्लेम, नो बडी अंडरस्टॅण्ड मराठी इन डेल्स हाऊस. तिला तर धड इंग्लिशही येत नाही. ती जे काही बोलते ते मला नीट कळत नाही पण ऐकत राहावसं वाटतं. आई म्हणते ती क्युबेकवरून आलीय. फ्रेंच बोलते. मी ठरवलंय, पुढच्या वर्षी शाळेत फ्रेंच क्लास घ्यायचा म्हणून. मग मी तिच्याबरोबर मस्त गप्पा मारेन. ओ हो, पुन्हा माझी हनुमानाची टेल....

तर बाबा रंगाकाकाला सांगत होता, "बाबांना असं का झालंय तेच कळत नाहीये. गेली दोन वर्षं त्यांनी माझ्याकडे यायचं थांबवलंय. जमत नाही, दग दग होते. पाय सुजतात, दुखतात, म्हणत होते. थोडा डायबिटीस आहे पण फार नाही रे. आता नुसते झोपून असतात. प्रभाकाका नि सोनाकाका आणि आता आई गेल्यावर तर त्यांनी अंथरूणच पकडलंय. कुणाशी बोलणं नाही काही नाही. सारख्या जुन्या आठवणी काढून रडत बसतात. डॉक्टरकाका म्हणत होते की बाबा डीप्रेशनमध्ये गेलेत. त्यांना त्यातून बाहेर काढायला हवंय रे. त्यांचं वय पण फार नाही. त्यांना टोरॅन्टोला न्यायची केव्हाही तयारी आहे पण तिथली थंडी सोसत  नाही ना. काय करावं तेच कळत नाहीये.” असं काय काय तो खूप वेळ बोलत राहिला. मला कळलं की मला आजोबाला भेटवायला तो विसरलाय. मग मी त्याला जोरात हाक मारली, "बाबा, मला आजोबाला भेटायचंय." तसा तो थांबला. मला म्हणाला, "चंद्रा, आजोबाला डॉक्टर अंकलने औषध दिलंय. आपण जाऊ हं आजोबाला भेटायला. चल."

मग रंगा अंकलला तिथेच उभा ठेऊन आम्ही आजोबाच्या बेडकडे गेलो. तिथे गेल्या गेल्या मी झोपलेल्या आजोबाला हलवलं आणि जोरात हाक मारली. तसा आजोबा डोळे उघडून माझ्याकडे बघायला लागला. मग एकदम तो उठला आणि मी त्याच्या बेडवर उडी मरून चढलो. बाबा मला कायतरी बोलायला गेला तर डॉक्टरकाकांनी त्याला बाजूला बोलावलं. मग मी आणि आजोबा दोघेच उरलो. मी विचारलं, "आजोबा, अरे तुला काय झालंय? तुझे पाय दुखतात का पोट दुखतंय? मी येवढ्या लांबून तुला भेटायला आलो तर बाबाने आज आणलं इथे. तू कसा आहेस?"

मी येवढं विचारतोय तर आजोबा रडायलाच लागला. मला तर काहीच कळेना. मला जवळ घेऊन माझे खूप किसेस् घेतले त्याने. तो रडायचं थांबेचना. मग मी त्याला म्हणालो, "आजोबा, तुला इथे कंटाळा आलाय का तर आपण घरी जाऊ. डॉक्टरकाका सोडणार का आज? नाही? उद्या? ओके ओके, मग आजोबा, अरे आपण उद्या घरी जाऊ या!"

मी असं बरंच काही बोलत बसलो मग त्याच्याशी, बाबा म्हणतो तसं, सटरफटर, कारण आजोबाला माझं सटरफटर बोलणं आवडतं. टोरॅन्टोतही आम्ही खूप सटरफटर बोलायचो. सडन्ली माझ्या लक्षात आलं की आजोबाने त्याचा नेहमीचा वॉकमन हॉस्पिटलमध्ये आणलेलाच नाहीये. आजोबाला साँग्ज ऐकायला आवडतं. मला कळलं, तो इथे जाम बोअर झाला असणार आणि म्हणूनच बाबा म्हणाला तसा डिप्रेशन का काय ते त्याला झालं असणार. मग मी एक आयडिया केली. माझा नवा डिस्कमन त्याला दिला आणि डोळा मारत त्याला म्हणालो, "आजोबा, हा आज तू वापर. यात माझी नवी सीडी टाकलीय. आमच्या टोरॅन्टोचाच एक म्युझिशियन आहे ना त्याचा तो अल्बम आहे. तुला आवडेल कारण तो ही तुझ्याच वयाचा आहे रे."

----------०----------

मोहन, लीना आणि चंद्रा भेटून गेल्यावर आकाशात पुन्हा मळभ दाटून आल्यासारखं वाटायला लागलं. मन उदास झालं. पुन्हा रडू यायला लागलं. छातीवर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. श्वास घ्यायला त्रास होतोय की काय असं वाटायला लागलं. तसंच पांघरूणात घुसून बसावसं वाटू लागलं. कुणाशी बोलणं नको की काही नको. मुलगा, सून, नातू साता समुद्रापारहून फक्त आपल्यासाठी आल्याचं बघूनही मला कसली तरी भीती वाटल्यासारखं वाटू लागलं. मी ट्यूब बंद करून अंधार केला तसा मला अंधाराचीही भीती वाटायला लागली. काहीच सुचत नव्हतं. जरा कलंडलो तर हाताच्या धक्याने चंद्राचा डिस्कमन सुरू झाला. त्याने इयर-फोन जाता जाता माझ्या कानातच खुपसलेला तो काढायचा तसाच राहिलेला आणि तशातच कानात गाणं वाजायला लागलं.

Wanna be young - the rest of my life
Never say no - try anything twice
Til the angels come - and ask me to fly
Gonna be 18 til I die - 18 til I die
Can't live forever - that's wishful thinkin'
Who ever said that - must of bin' drinkin'
Don't wanna grow up - I don't see why
I couldn't care less if time flies by

18 til I die - gonna be 18 til I die
Ya it sure feels good to be alive
Someday I'll be 18 goin' on 55! - 18 til I die

Anyway - I just wanna say
Why bother with what happened yesterday
It's not my style - I live for the minute
If ya wanna stay young - get both feet in it - 18 til I die
A 'lil bit of this - a 'lil bit of that
'Lil bit of everything - gotta get on track
It's not how ya look, it's what ya feel inside
I don't care when - I don't need to know why

18 til I die - gonna be 18 til I die
Ya it sure feels good to be alive
Someday I'll be 18 goin' on 55! - 18 til I die

Ya there's one thing for sure - I'm sure gonna try

Don't worry 'bout the future
Forget about the past
Gonna have a ball - ya we're gonna have a blast
Gonna make it last

18 til I die - gonna be 18 til I die
Ya it sure feels good to be alive
Someday I'll be 18 goin' on 55! - 18 til I die

gonna be 18 til I die
I gonna be 18 til I die
18 til I die

गाणं लयदार होतं. शब्द हळू हळू कळायला लागले आणि गाण्याच्या शेवटाला येईपर्यंत जाणवलं, आकाश मोकळं होऊ लागलंय....