Tuesday 27 December 2011

पुस्तक परिचय - ३: रान-> जी.ए. कुलकर्णी

पुस्तक परिचय - ३ : द ट्रीज (रान) - कॉनरॉड रिक्टर (अनु. जी.ए. कुलकर्णी)

आज जी.ए. कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं 'रान' वाचलं. 'कॉनरॉड रिक्टर' यांच्या १९४० सालच्या 'द ट्रीज' या कादंबरीचा हा अनुवाद आपल्याकडे साधारण ७०च्या दशकात मराठीत प्रसिद्ध झाला.

पेनसिल्व्हानिया मधून दुष्काळामुळे स्थलांतरीत झालेल्या ल्युकेट कुटुंबाची गोष्ट म्हणजे 'द ट्रीज' किंवा 'रान'! पुस्तकात सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, काही माणसं खा
र्‍या वार्‍याचा वेध घेत समुद्राच्या दिशेने सरकतात तर काही झाडा-झुडपांच्या ओढीने जंगलाकडे जातात. ल्युकेट कुटुंबीय दुसर्‍या प्रकारामध्ये मोडतात. हे संपूर्ण कथानक हे जंगलामध्ये, नव्या वसाहती उभारल्या जाण्याच्या सुमारास घडतं. जंगलामध्ये वसाहती करणार्‍यांच्या वाटेला येणारे खडतर जीवन चित्र आपल्यासमोर उलगडले जाते. इथे निसर्ग माणसांवर संकटे आणतो आणि निसर्गच त्यांना मायेची उब देतो.

संपूर्ण कादंबरीत जी. ए. कुलकर्णी यांना साजेसा एक गूढ अंत:प्रवाह आहे. पुढे काय होईल याची उत्कंठा ही आहे. रानात, झाडाझुडपात राहणा
र्‍या ल्युकेटस कुटुंबामधल्या प्रत्येकाचा स्वभाव या अनुवादात उत्तम प्रकारे व्यक्त झाला असंला तरीही लक्षात राहते ते अदम्य इच्छाशक्ती आणि स्वाभाविक कणखरता यांचं प्रतिक असलेली ल्युकेट कुटुंबामधली थोरली मुलगी, सेर्ड! स्वत: लहान असूनही आईविना पोरक्या झालेल्या आपल्या सर्व भावन्डान्चा ती ज्या पद्धतीने सांभाळ करते आणि वडिलांच्या परागंदा होण्यानंतरही ज्या तडफेने संसार चालवते त्याचे चित्रण वाखाणण्यासारखे झाले आहे. कथेच्या अखेरीस तोपर्यंत आपल्या आई-वडिलांचा संसार चालवणारी सेर्ड स्वत:चा संसार ज्या पद्धतीने करताना दिसते त्यावरून आपणही तिच्या भावी उज्ज्वल भविष्यकाळाची कामना करत पुस्तक संपवतो. 
 
कॉनरॉड रिक्टर यांनी लिहिलेल्या त्यांच्या 'अवेकनिंग लँड' नावाच्या ट्रायलॉजीतलं 'द ट्रीज' हे पहिलं पुष्प होतं आणि ते मूळातंच फार टोकदारपणे सादर झालेलं होतं. मराठी वाचकांसाठी यातला टोकदारपणा जी. ए. तितक्याच समर्थपणे दर्शवण्यात यशस्वी झाले होते असं नक्कीच म्हणता येतं. मला कल्पना नाही की या ट्रायलॉजीमधली पुढची 'द फिल्ड्स' आणि 'द टाऊन' यांची भाषांतरं जी. ए. कुलकर्णींनी किंवा कुणीही केलेली आहेत का पण असो अगर नसो, भाषांतरीत अथवा मूळात या मालिकेतील पुढली पुष्पं जरूर मिळवून वाचण्यासारखी असतील यात शंकाच नाही. 

Sunday 25 December 2011

पुस्तक परिचय - २: 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' - प्रतिभा रानडे

मला असं वाटायचं की भारतात आणि विशेषत: मराठीत जागतिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण असं लेखन वृत्तपत्रांतील सदरापुरतंच मर्यादित असल्याचं जाणवतं पण याला छेद गेला प्रतिभा रानड्यांच्या 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' या पुस्तकाच्या वाचनातून!


आपल्याच देशाच्या जमिनीच्या एका तुकड्यातून जन्मलेल्या पाकिस्तानची ही गोष्ट! पाकिस्तान, ही भारताला चुकवावी लागलेली स्वातंत्र्याची किंमत आहे. आधी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान या स्वरूपात आणि नंतर त्यांच्यातून फुटून निघालेल्या बांगला देश या स्वरूपात. भारताबद्दल पराकोटीचा द्वेष असलेला हा देश आपल्याशी नेहमीच शत्रुत्व ठेवून वागलेला आहे. ४ वेळा प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग त्याने भारतावर लादलेला आहेच पण भारताशी पुढची हजारो वर्ष प्रत्यक्ष वा छुपे युद्ध करण्याची आत्यंतिक इच्छा त्याच्याकडून जाहीरपणे व्यक्त झालेली आहे. असं असूनही आपल्या या आक्रमक शेजार्‍याविषयी आपल्याकडे राजनैतिक माहितीची वानवा असते.


आपल्याला काही अंशी ऐतिहासिक ज्ञान असते पण सद्य परिस्थितीच्या आकलनासाठी ज्या राजकीय परिस्थितीची आपल्याला कल्पना असणे आवश्यक असते ती आपल्या कोणत्याही माध्यमातून एकत्रितरीत्या आपल्याला मिळत नाही आणि मग त्यामुळे ही राजकीय, सामाजिक आणि वैचारिक समस्या किती खोल रुजलीय हेच आपण निश्चित करू शकत नाही. यामुळे या समस्येचे समाधान शोधणे तितकेच कठीण बनते.


अशा महत्त्वाच्या विषयावरील पुस्तकासाठी प्रतिभा रानड्यांसारख्या लेखिकाच योग्य ठरतात. त्यांचा अशा राजनैतिक विषयांचा अभ्यास आहेच पण त्या बरोबरच त्या स्वत: अनेक वर्ष अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा देशात राहिलेल्या आहेत. तेथील समाज जीवनाचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केलेला आहे, तिथल्या लोकांशी त्यांचा गेली अनेक वर्ष संवाद आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून जवळपास २००९ पर्यंतच्या कालाचा आढावा त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. अनेक पुस्तके आणि वृत्तांकनांचा वापर करून, मुलाखतींचा आणि राजकीय व्यक्तिंच्या चरित्रांचा अभ्यास करून, त्यात स्वत:च्या संशोधनाची जोड देवून प्रतिभा रानडे यांनी पाकिस्तान ची ऐतिहासिक, राजनैतिक आणि सामाजिक कहाणी आपल्यासमोर उलगडलेली आहे.


पाकिस्तानची ही कहाणी आपल्या समोर येते ती तिथल्या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या माध्यमातून! झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक़, मोहम्मद खान जुनेजो, बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ, परवेझ मुशर्रफ आणि आसिफ झरदारी यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत प्रतिभाताई आपल्याला 'पाकिस्तान' शिकवतात. पाकिस्तानात न रुजलेली लोकशाही, सतत पाठपुरावा करणारी लष्करशाही, पाकिस्तानात रुजलेला कट्टर इस्लाम आणि त्याचा तिथल्या समाजावर झालेला परिणाम या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीतून आपल्याला समजतो.


हिंदूंच्या द्वेषातून निर्माण झालेल्या देशाला स्वत:ची अस्मिता शोधण्यासाठी घ्यावा लागलेला इस्लामचा सहारा यातूनच आपल्याला स्पष्ट होतो. यामधून कोणताही राजकीय नेता सुटू शकलेला नाही. कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीत पाकिस्तानात तीनच हुकुमाचे पत्ते खेळले गेले आहेत.... Allah, Army आणि America! या तीन A's मुळे पाकिस्तानला जाणण्यासाठी परिस्थितीचा तीन स्तरांवर विचार करावा लागतो हे प्रतिभाताईंनी फारच वेचक आणि वेधकपणे या पुस्तकातून आपल्याला समजावले आहे.


आर्य चाणक्यांनी सांगितलेच आहे की शत्रूवर मात करण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. भारताच्या या परंपरागत शत्रू विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर प्रतिभा रानडे यांच्या 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' या पुस्तकाला पर्याय नाही. 

Tuesday 20 December 2011

खवय्यांची सोय - १

"आज जग हे 'ग्लोबल व्हिलेज' झालेलं आहे", असं एक पेटंट वाक्य सध्या सगळीकडेच ऐकू येतंय. जगाचं माहित नाही पण दळणवळणातल्या क्रान्तिमुळे महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतात गावोगावी एकमेकांशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. किंबहुना मुंबईपुरता विचार केला तर महाराष्ट्रच नाही तर अख्खा भारत मुंबईशी जोडला गेला आहे. कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने कानाकोपर्‍यातून माणसं मुंबईत येतात, दोन-चार दिवस राहतात, आपली कामं उरकतात आणि परततात. राहण्याची सोय कुठेही होऊ शकते पण अडचण नेहमीच खाण्याची होते असं मला वाटतं. आपल्याला साजेहा, आवडणारा आहार आपल्याला कुठे मिळेल हे कुणी आधी सांगितल्याशिवाय अचानक आपल्याला कळूच शकत नाही. म्हणून म्हंटलं, आपल्या जगभरातील मित्रांसाठी इथे माझ्या आवडत्या काही ठिकाणांची माहिती देऊ या!

मी जन्मापासून निरामिष आहार ग्रहण करणारा आणि त्यामुळे माझ्या आवडीही तशाच तेव्हा त्याच प्रकारच्या खानावळीची माहिती तुमच्याबरोबर वाटतोय. या जागेची माहिती कदाचित अनेकांना आधीच असेल पण तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

मी प्रामुख्याने मुंबई इथे आहे आणि माझ्या लहानपणी ४-६ महिन्यातून एकदा हॉटेलिंगसाठी घराबाहेर जेवायचे प्रसंग यायचे. त्यातही माझ्या खाण्याचे प्रमाण पाहून माझ्या घरच्यांनी घरच्या घरीच माझी सोय लावणे किती उपयुक्त ठरते ते खूप आधीच जाणले होते. असं असतानाही अनेक वर्षांपूर्वी काही कारणाने एका खानावळीत जाण्याचा योग आला. त्याकाळी बाहेर खायचं म्हणजे उडप्याकडेच खायचं असंच असायचं आणि एकूणच एक डोसा, २ इडल्या एवढ्याने माझी भूक कधीच शमायची नाही नि माझा तिथेच त्रागा सुरु व्हायचा. तरीही या उडप्याकडेच जाऊया असं तीर्थरूपांचं म्हणण पडलं आणि अस्मादिक तिथे स्थानापन्न झालो. जरा घुश्श्यातच असल्याने आजूबाजूला न बघता मी तडक दिसेल त्या पहिल्या खुर्चीत मान खाली घालून बसलो.

आजूबाजूला प्रचंड गडबड उडालेली आणि अनेक मुले इकडे तिकडे फिरत होती पण मी मात्र मान वर करून कुठे बघतच नव्हतो. मला या उडप्याकडे घेऊन येण्याबद्दल वडिलांवर चिडून मी तसाच फुरगंटून बसलेलो असताना माझ्यासमोर मोठ्ठ केळीच पान अंथरलं गेलं. मुंजीचं जेवण तेव्हढ केळीच्या पानावर जेवलेल्या मला ते अचंबित करणारं होतं. तेव्हा पहिल्यांदा आजूबाजूला बघितल्यावर सगळ्यांच्याच समोर वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं केळीच्या पानाचं ताट दिसलं. वडिलांनी हसून माझ्या पानावर पाणी ओतलं आणि ते पुन्हा एकदा धुतलं. मला हे सारं नवीन होतं. अचानक त्या स्वच्छ पानावर मीठ, लोणचं, तीन प्रकारच्या भाज्या, रस्सम, सांबार, दही, ताक आणि पापड या व्यंजनांनी आपापलं स्थान ग्रहण केलं. एक वाटी पायसम (खीर) ची आली नि पुढच्याच क्षणाला छान तूप लावलेली गरम गरम पोळी माझ्या ताटात पडली आणि माझा राग कुठल्याकुठे विरघळून गेला. हव्या असतील तर तिथे
टमटमीत  फुगलेल्या पुर्‍याही उपलब्ध होत्या. माझ्या चेहर्‍यावर "अजि म्या ब्रह्म पाहिले"से भाव उमटले असावेत कारण वडील माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसून म्हणाले काळजी करू नकोस ही अमर्यादित भोजन थाळी आहे. 

या घटनेला आज २५ वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे पण माझ्या आठवणीतली ही खानावळ अजूनही तशीच आहे. तसंच केळीचं पान, तसेच रस्सम - सांबार, तशाच भाज्या, गरम गरम पोळ्या नि भात आणि त्याच क्वालिटीचा पापड..... आता गोडाचा पदार्थ मात्र एकदाच मिळतो किंवा अतिरिक्त पैसे देऊन घ्यावा लागतो.

तेव्हा मित्रानो, असा तृप्तीदायक अनुभव घ्यायचा असेल तर जरूर भेट द्या -
"रामा नायक यांचे उडुपी श्री कृष्ण बोर्डिंग हाऊस"
माटुंगा (सेन्ट्रल) स्टेशन समोर, माटुंगा (पूर्व), मुंबई.

स्टेशन समोरच्या या इमारतीत शिरताच स्वच्छता राखल्याचे दिसते. भिंतींवर गीता - गीताई चे श्लोक लिहिलेले आढळतात. मराठी, कोकणी आणि कानडी मुले आपापली नेमून दिलेली कामे झटपट करताना दिसतात. खूप गर्दी - गोंधळातही बर्‍यापैकी सौजन्याने व्यवहार होतो.


इथे मर्यादित थाळी - रु. ४५/- (अधिक तुम्हाला हवी असल्यास एक्स्ट्रा व्यंजने त्यांच्या किमती प्रमाणे) आणि अमर्यादित थाळी - रु. १२०/- अशा आपल्याला परवडणार्‍या दरात अप्रतिम तृप्ती होते. 

टीप -
  • छायाचित्रे आंतरजालावरून साभार
  • उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग व्यवस्थापनाने दरांमध्ये बदल केला असू शकतो.
  • ही जाहिरात नाही. 

Sunday 18 December 2011

पुस्तक परिचय : 'कोल्ड स्टील' - टीम बुके, बायरन उसी


राम राम दोस्तहो!

मागच्या वेळेप्रमाणे आणखी एका भन्नाट पुस्तकाची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे.

सध्या जमाना ग्लोबलायझेशनचा आहे. आपली समज, आपला व्यवहार, व्यवसाय आणि अगदी आपलं साहित्यही गेली अनेक वर्ष या ग्लोबलायझेशन पासून अस्पर्श्य राहिलेलं नाही. असं असूनही आत्ता कुठे मराठीत हे वारं शिरू लागलंय. सातासमुद्रापार होणारी मराठी सम्मेलनं कदाचित याचीच द्योतकं असतील.

तसं म्हटलं तर मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांच्या कॉर्पोरेटस, त्यांचे व्यवहार या संदर्भात अच्युत गोडबोले, गीता पिरामल (अनुवादित) इ. लेखकांनी मराठीत लिखाण सुरु केलेलं आढळतं पण जागतिक स्तरावर ज्या ताज्या घडामोडींबद्दल, गोष्टींबद्दल चर्चा आणि ती ही हिरहिरीने होते, त्याबद्दल मराठी भाषेत काही फारसं आलेलं दिसत नाही, असा जो माझा एक समज होता, त्याला नुकताच छेद दिला, सुभाष जोशी यांनी मराठीत अनुवादित केलेल्या टीम बुके आणि बायरन उसी या लेखक द्वयीने लिहिलेल्या "कोल्ड स्टील" या पुस्तकाच्या वाचनाने!
लक्ष्मी मित्तल आणि जोसेफ किंश्च (आर्सेलरचे चेअरमन)

काही वर्षांपूर्वी भारतीय वंशाच्या लक्ष्मी मित्तल या लंडन स्थित अग्रगण्य पोलाद व्यावसायिकाने आपल्या मित्तल स्टील या कंपनीतर्फे युरोपातील सर्वाधिक पोलाद निर्मिती आणि विक्री करणारी आर्सेलर ही कंपनी विकत घेण्यासाठी बाजारात आक्रमकपणे बोली लावली होती. खरं तर ही मुक्त बाजारपेठेतील एक सर्वसामान्य घटना होती पण हे एखादं आक्रीतच घडलेलं आहे या सारखी प्रतिक्रिया तेव्हा जगभरात उमटली. आर्सेलर ने या प्रस्तावाला सर्व स्तरावर विरोध केला पण हा विरोध वंशवाद आणि अहंभाव यावर आधारित होता. युरोपियानांची पोलाद व्यवसायातील अग्रणी कंपनी, कोण कुठला भारतीय मित्तल विकत घ्यायला बघतोय हे आर्सेलर च्या सिईओ गी डोल आणि संचालक मंडळातील युरोपियन सभासदांना सहनच झालं नाही. मित्तल च्या प्रस्तावावर साधक बाधक चर्चा न करताच आर्सेलर ने त्याच्या विरुद्ध (कॉर्पोरेट) युद्ध पुकारले. 


या युद्धात दोन्ही गटांनी जी खलबतं केली, एकमेकांविरुद्ध जे डाव-प्रतिडाव टाकले, त्यात कोण कोण सहभागी झाले, त्यात धोरणांची आखणी कशी झाली, कुणी आणि कशी त्याची अंमलबजावणी केली, त्यासाठी मोठ्याप्रमाणात पैसा कसा गोळा केला आणि तो कसा, कोणावर खर्च केला, आपल्याला हवा तो परिणाम साधण्यासाठी गोष्टी कोणत्या थरावर गेल्या, दोन कंपन्यांच्या 'मर्जर' ची घटना अनेक देशांच्या एकमेकान्बरोबरच्या राजनैतिक संबंधांवर कसे परिणाम करून गेली या आणि अशा अनेक गोष्टींचा लेखाझोका म्हणजे "कोल्ड स्टील" होय!

या कॉर्पोरेट लढाईची रम्य नि उत्कंठावर्धक कथा वाचत असतानाच लेखक आपल्याला कॉर्पोरेट गव्हरनन्स , जागतिक शेअर मार्केट व्यवहार, मर्जर आणि एक्विझिशन प्रक्रिया, त्यातील आर्थिक गुंतागुंत इ. आजपर्यंत अनभिज्ञ अशा विषयांमध्येही सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतात.

असं म्हटलं जातं की मराठी माणूस नुकताच कुठे भारतीय शेअर बाजारात उतरू लागला आहे. त्याच वेळी लक्ष्मी निवास मित्तल या भारतीय पास-पोर्ट बाळगणा~या उद्योजकाने जागतिक बाजार-पेठेतल्या दिग्गज पोलाद व्यावसायिकांशी लढा देवून आर्सेलर या जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपनीला विकत घेण्याची "कोल्ड स्टील" मध्ये वर्णन केलेली सत्य-घटना ऊर अभिमानाने भरून टाकते.

सुभाष जोशी यांनी केलेलं या पुस्तकाचा मराठी अनुवाद हा सगळा इतिहास कुठेही अडखळून न जाता आपल्यासमोर मांडतो.


तेव्हा "कोल्ड स्टील" वाचाच!

Friday 16 December 2011

पुस्तक-परिचय : 'द काईट रनर' - खालेद हुसैनी

एक फारच सुंदर पुस्तक!

आपल्या भारताप्रमाणेच हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला शेजारी देश म्हणजे 'अफगाणिस्तान'! आज प्रचंड अंतर्गत कलह आणि यादवीने होरपळून जात असलेल्या या देशाची म्हणावी तशी आपल्याला माहिती नसते. आज केवळ धर्माच्या नावाने आपण दूर सारलेला हा आपला शेजारी पारंपारिक दृष्ट्या आपल्या खूप जवळचा आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आपण त्या संबंधी माहिती घेण्याचंच टाळतो. देश पुस्तकी धर्माने बनत नाही तर जित्या-जागत्या माणसांनी बनतो हेच आपण विसरून गेलो आहोत आणि खालेद हुसैनींचा 'द काईट रनर' आपल्याला अशाच एका जित्या-जागत्या अफगाणी मुलाची, आमीरची कहाणी सांगतो.

आमीर हा एक उच्चभ्रू पश्तून मुलगा आणि 'द काईट रनर' ही त्याचीच गोष्ट! काळ अफगाणिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू व्हायच्या जरा आधीचा आणि आपल्यासमोर उलगडते आमीर आणि त्याचा हाजरा नोकर हसन यांची कहाणी! या कहाणीत पुढे आमीरचे वडील, त्याचा एक काका, हसनचे वडील आदि अनेक पात्रं येतात पण काही काळाने ही एकट्या आमीरची कहाणी न राहता अख्ख्या अफगाणिस्तानची कहाणी बनते आणि आपण अफगाणी लोकांच्या आणि पर्यायाने अख्ख्या अफगाणिस्तानच्या दु:खाचा अनुभव घेऊ लागतो.

कथानकात पतंगाच्या काटा-काटीचा प्रसंग फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. भारतातल्या गुजराती समाजाप्रमाणेच अफगाणिस्तान मध्येही पतंग उडवण्याच्या चढाओढीला सामाजिक स्थान आहे. या चढाओढीत जितके महत्त्व शेवटी उरणार्‍या विजेत्या पतंगाला आहे तितकेच सर्वात शेवटी कापल्या जाणार्‍या पतंगालाही आहे. विजेता आणि उपविजेता पतंग तिथे एखाद्या ट्रॉफी प्रमाणे घरी ठेवला जातो.

पतंग धावत जाउन उडवणार्‍या आणि या काटा-काटी मध्ये काटल्या गेलेल्या पतंगाच्या मागे तो पकडण्यासाठी धावणार्‍या मुलांना 'काईट रनर' म्हटलंय. अशाच एका 'काईट रनिंग'च्या प्रसंगी लहानग्या आमीरचं भावविश्व उध्वस्त होतं आणि पुढे ३०-३२ वर्षांनी एका 'काईट रनिंग'च्याच प्रसंगाने काही अंशी सांधलं जातं.


सुख किंवा आनंद नावाच्या पतंगाच्या मागे धावणार्‍या आयुष्य नावाच्या 'काईट रनर'ची खालेद हुसैनी यांची गोष्ट वैजयंती पेंडसे यांच्या सकस मराठी अनुवादाद्वारे सगळ्या मराठी भाषिकांना आवडेल अशीच आहे.

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

Thursday 15 December 2011

अखेरचा पाठ


शाळेत जायला नेहमीपेक्षा जरा उशीरच झालेला. तरी मी पाय ओढतंच चाललेलो. आज शाळेत मला मास्तरांची बोलणी खायला लागणार हे त्रिकालाबाधित सत्य होतं. कारण काल हॅमेल मास्तरांनी सांगितलेलंच होतं की उद्या ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत नि मला कृदन्तातलं ओ की ठो येत नव्हतं. आता चांगलंच उजाडलेलं. पक्षी बाजूच्या झाडींमधून चिवचिवत होते आणि पलिकडच्या मैदानात प्रशियाचं सैन्य संचलन करत होते. व्याकरणातील कृदन्तांच्या माहितीपेक्षा संचलनाचं ते दृश्य जास्त मनमोहक होतं पण मी माझ्या मनावर ताबा ठेऊन शाळेच्या दिशेने जाऊ लागलो.
शाळेच्या रस्त्यावर शहर सभागृहावरून जाताना मला तिथल्या फळ्यावरची बातमी वाचणारी गर्दी दिसली. गेल्या दोन वर्षांपासून हा फळा आम्हाला वाईट बातम्या पुरवत होता - हरलेल्या लढाया, जेत्यांचे जाहिरनामे, मुख्य सैन्याधिकार्‍यांच्या नागरिकांसाठीच्या आज्ञा वगैरे वगैरे. मग मी चालता चालताच विचार करू लागलो, आज कोणती वाईट बातमी देतोय हा? याच विचारात जातच होतो की तिथे आपल्या मदतनिसांबरोबर उभ्या असलेल्या शिकलगार आणि घड्याळचीने मला हाक मारून म्हण्टलं, "अरे मुला, का इतका घाईने चालला आहेस? आता शाळेत अगदी आरामातच पोहोचशील की तू!"
मला वाटलं ते माझी मस्करी करत आहेत म्हणून मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला आणि हॅमेल मास्तरांची वाडी येईतो मला चांगलाच दम लागला.
एरवी शाळा सुरू असताना इथे एक प्रकारचा गोंधळ असतो. त्याचा आवाज पार दोन आळी पलिकडे पर्यंत ऐकू येतो. कधी पाढे म्हणण्याचा आवाज,  कधी कविता म्हणण्याचा आवाज तर  कधी संथा घोकतानाचा आवाज, अगदी जोरजोराने अभ्यास सुरू असतो. परिस्थिती अशी की आपले कान झाकून घेतल्याखेरिज तुम्हाला कधी कधी स्वतःचा आवाजही ऐकू येत नाही. त्यातच मास्तरांच्या हातची वेताची छडीही आवाज करत असते. कधी याच्या पाठीवर तर कधी त्याच्या. पण आज वातावरण काही वेगळंच होतं. मी कुणाच्याही लक्षात न येता आपल्या जागेवर जायच्या प्रयत्नात होतो पण त्या दिवशी अगदी सुट्टीचा दिवस असल्यासारखी शांतता होती. खिडकीतून मला माझे सहपाठी मित्र आपापल्या जागा पकडून बसलेले दिसले. हॅमेल मास्तर आपली छडी घेऊन त्यांच्या मधल्या जागेतून फिरताना दिसले. मग सगळ्यांसमोर मला वर्गात जाऊन बसावं लागलं. तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी किती घाबरलेलो असणार तेव्हा ते!
पण माझ्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. हॅमेल मास्तरांनी माझ्याकडे बघितलं आणि मृदू स्वरात म्हणाले, "फ्रांजबाळा, आम्ही तुझ्याशिवायच वर्ग सुरू करत होतो. जा बस तुझ्या जागी."
मी उडी मारून माझ्या बाकड्यावर बसलो तेव्हा कुठे माझा थोडा जीवात जीव आला. मी पाहिलं की गुरूजींनी त्यांचा आवडता शेवाळी रंगाचा कोट चढवलाय, त्याखाली फ्रीलवाला शर्ट घातलाय आणि त्यांची काळी, कलाबुत केलेली छोटीशी टोपीही घातलीय. पण हे सारं तर ते फक्त शाळा तपासणीच्या दिवशी किंवा बक्षीस समारंभाच्या वेळेसच घालायचे! आज वेगळेपण केवळ यातच नव्हतं, ते जणू अख्ख्या शाळेतंच दाटून आलेलं. पण मला सगळ्यात जास्त आश्चर्याचा धक्का, जेव्हा एरवी रिकामी असलेली आमच्या वर्गातली पार मागची बाकडी काही गावकर्‍यांनी बसल्यामुळे भरलेली पाहिली, तेव्हा बसला. गावातील ती प्रतिष्ठीत मंडळी अगदी आमच्या सारखीच वर्गात बसलेली. आपल्या त्रिकोणी टोपीसह म्हातारबा हाऊजर, आमच्या गावचे माजी सरपंच, माजी पोस्ट मास्तर आणि इतर अशी अनेक जणं. सगळेच जण दु:खी वाटत होते. म्हातारबा हाऊजरने आपल्या समोर एक जुना स्वाध्याय उघडून ठेवलेला. त्यावर त्याचा तो पुराणकाळचा चष्मा ठेवला होता.
मी या सगळ्याबद्दल विचारच करत होतो की हॅमेल मास्तर आपल्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या नेहमीच्या गंभीर पण काहीशा मायाळू आवाजात म्हणाले, "मुलांनो, आज तुम्हाला माझा हा शेवटचा वर्ग असेल. बर्लिनहून आदेश आलाय अल्साक नि लॉरेनच्या शाळांमध्ये आता केवळ जर्मन भाषाच शिकवली जाईल. नवीन मास्तर उद्यापासून शिकवायला येईल. आपल्या फ्रेंच भाषेची ही शेवटची शिकवणी असेल. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका.
मला ते शब्द जणू तडिताघातासारखेच वाटले.
अच्छा! म्हणजे शहर सभागृहावर हीच बातमी लावली असणार!
फ्रेंच भाषेचा माझा शेवटचा वर्ग, पण का? मला तर जुजबी फ्रेंचही लिहिता येत नव्हतं अजून! आता मला ते कधीच शिकता येणार नाही! ते शिक्षण इथेच थांबणार? अरेरे! मला कितीतरी दु:ख होत होतं, मी माझा फ्रेंच भाषेचा पाठ वेळच्या वेळी शिकलो नव्हतो, त्यावेळी मी पक्षांची अंडी मिळवण्यासाठी, घसरगुंडीवर खेळण्यासाठी म्हणून वेळ वाया घालवला होता. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत मला माझी अभ्यासाची पुस्तकं मूर्खपणा वाटत होती, उचलून शाळेत आणण्यासाठी मोठा भार वाटत होती पण आता माझं व्याकरणाचं पुस्तक, माझं इतिहासाचं पुस्तक हे सर्व माझे जुने मित्र वाटत होते. त्यांची साथ सोडणं मला जीवावर येत होतं. हेच हॅमेल मास्तरांच्या बाबतीतही वाटत होतं. ते आता आम्हाला सोडून दूर जाणार आणि पुन्हा आम्हाला कधीच भेटणार नाहीत ही भावना मला त्यांचे नियम, त्यांच्या छड्या आणि त्यांचं वेळोवेळी आमच्यावर करवादणं विसरायला लावत होती.
बिचारे हॅमेल मास्तर, आज त्यांचा शिकवण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपले ठेवणीतले कपडे त्यांनी घातलेले. आता माझ्या लक्षात आलं की गावची थोर मंडळी आज शाळेत का आली आहेत ते! कारण या बातमीने ते देखिल दु:खी झालेले. तेही जास्ती शाळा शिकले नव्हते. ती बहुतेक त्यांची हॅमेल मास्तरांच्या चाळीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत होती, ही सेवा सुद्धा अशा देशाच्या भाषेची की जो देशच आता त्यांचा उरला नव्हता.
मी हा सगळा विचार करत असतानाच माझं नाव पुकारलं गेलेलं मी ऐकलं. आता वाचण्याची माझी पाळी होती. तो कृदन्ताचा नियम मला मोठ्याने, व्यवस्थितपणे आणि न चुकता म्हणता यावा म्हणून तेव्हा माझी काहीही द्यायची तयारी होती पण मी पहिल्याच शब्दावर अडखळलो आणि तसाच धडधडत्या हृदयाने, खालमानेने उभा राहिलो. हॅमेल मास्तर मला म्हणाले,
"मी तुला ओरडणार नाही, फ्रांज बाळा, तुला तुझंच वाईट वाटलं पाहिजे. बघ कसं असतं, आपण रोज स्वतःला म्हणतो, ह्या! माझ्याकडे खूप वेळ आहे, मी उद्या शिकेन! आणि आता पहा आपल्यासमोर काय मांडून ठेवलंय. हं, अल्साकची हीच सर्वात मोठी अडचण आहे, इथे सगळे जणच शिकायचं उद्यावर टाकतात. मग बाहेरची लोकं म्हणतात, हे असं कसं? तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता अणि तुमची स्वतःची भाषा तुम्ही लिहू तर शकत नाहीतच पण धड बोलूही शकत नाहीत. पण फ्राज बाळा, तू काही फार वाईट मुलगा नाहीस, या सगळ्याचा दोष आमच्यावरच लागणार आहे."
“तुमच्या पालकांचीच तुम्ही शिकावं अशी इच्छा नाही. ते तुम्हाला शेतात किंवा गिरणीत काम करायला प्रोत्साहन देतात कारण त्यामुळे थोडे जास्त पैसे मिळतात. आणि मी? मीसुद्धा काहीसा दोषी आहेच. मी तर तुमच्यापैकी कित्येकांना शाळेच्या अभ्यासाच्या वेळात माझ्या बागेला पाणी घालण्यासाठी पाठवलंय आणि कित्येक वेळा मला मासेमारीचा आनंद घ्यावासा वाटला म्हणून तुम्हाला सुट्टी नाही दिलीय?"
मग एकातून दुसरं असं करत करत हॅमेल मास्तर आपल्या फ्रेंच भाषेबद्दल बोलू लागले. त्यांनी सांगितलं की फ्रेंच भाषा जगातली सगळ्यात गोड भाषा आहे. सगळ्यात सुस्पष्ट आणि तर्कदृष्ट्या अचूक, आपल्याला आपल्या जीवाच्या आकांताने तिचं रक्षण करायला पाहिजे आणि कधीही तिचा विसर पडू देता कामा नये कारण जो पर्यंत आपण आपली भाषा उराशी जपून ठेवतो तोपर्यंत गुलामगिरीतून सुटण्याची किल्लीच जणू आपल्याजवळ बाळगतो. मग त्यांनी व्याकरणाचं पुस्तक उघडलं आणि तो धडा वाचायला सुरूवात केली. मला आश्चर्यच वाटायला लागलेलं कारण आता तोच धडा मास्तर वाचत असताना मला चांगल्यापैकी समजत होता. ते जे काही शिकवत होते ते सोप्पं वाटत होतं, फारच सोप्पं. मी विचार केला, मी इतक्या काळजीपूर्वक कधी पाठ ऐकलाच नव्हता आणि मास्तरांनीही त्यापूर्वी इतक्या संयमाने कधी शिकवला नव्हता. मला असं वाटू लागलेलं की जायच्या आधी हॅमेल मास्तरांना जितकं शक्य होईल तितकं जास्त शिकवायचं होतं, जणू सगळंच्या सगळंच, एकाच फटक्यात!
व्याकरणानंतर आमचा लिखाणाचा तास होता. त्या दिवशी हॅमेल मास्तरांनी आमच्यासाठी सुंदर, बाळबोध अक्षरात फ्रान्स, अल्साक, फ्रान्स, अल्साक असं लिहिलेले नवे कागद आणलेले. आमच्या वर्गात छोट्या छोट्या झेंड्यांप्रमाणे ते सगळीकडे अडकवले, आमच्या बाकड्यांवर छोट्या काठीवर लावले. तुम्ही त्यावेळी सगळ्यांना लेखन सराव करताना बघायला हवं होतं, किती शांतपणे तो सराव सुरू होता! जर कुठला आवाज होत होता तर तो केवळ लेखणीचा कागदावर होणारा! मधूनच काही फुलपाखरं नि भुंगे उडत उडत वर्गात आले पण एरवी अशावेळी दंगा करणारे आज एकदम शांत होते. कुणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. सगळे जण अक्षरं गिरवत होते. अगदी लहान बच्चेकंपनीनेही तिथे लक्ष दिलं नाही. ते देखिल आपला चित्रातला माशाचा गळ गिरवत होते जणू तो गळ म्हणजे फ्रेंच मूळाक्षरंच होती. आमच्या वर्गाच्या छतावर काही पारवे घुमत होते. माझ्या मनात विचार आला, आता या पारव्यांनाही ते जर्मन भाषेमध्ये घुमायला लावणार की काय?
जेव्हा जेव्हा मी मधूनच मान वर करून पाहिलं तेव्हा तेव्हा हॅमेल मास्तर मला स्तब्धपणे त्यांच्या खुर्चीवर बसून कधी इथे तर कधी तिथे असं बघताना दिसले, जणू मनात इथल्या वर्गातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची छबी टिपून घेत होते. बापरे! या एकाच जागी ते चाळीस वर्ष होते. बाहेरचा बगिचा आणि पुढ्यात सगळी मुलं, असंच, सलग चाळीस वर्ष! आता वर्गातली बाकडी वापरून वापरून गुळगुळीत झालेली, बगिच्यातली अक्रोडाची झाडं उचीने खूप वाढलेली आणि त्यांनी स्वतः रुजवलेली चमेली खिडकीवरून पार छतावर पसरलेली. त्यांच्या हृदयाला किती यातना होत असतील हे सारं सोडून जाताना? वरच्या मजल्यावरच्या खोलीत त्यांच्या बहिणीचा सामानाची बांधाबांध करतानाचा आवाज येत होता. नंतरच्याच दिवशी त्यांना देश सोडून जायचं होतं. पण मास्तरांमध्ये येवढा संयम होता की त्यांनी आमचा संपूर्ण पाठ आमच्याकडून शेवटपर्यंत म्हणून घेतला, मग लेखन करून घेतलं, इतिहासाचा धडा शिकवला मग लहान मुलांकडून बा बे बि बो बु वगैरे म्हणून घेतलं.
आमच्या वर्गात मागे बसलेला म्हातारबा हाऊजरही आपला चष्मा लाऊन आणि पुस्तक दोन्ही हातात धरून त्यातून अक्षरं वाचत होता. आम्ही बघत होतो की तो रडत देखिल होता, भावनावेगाने त्याचा आवाज चिरकत होता. तो इतका विनोदी वाचत होता की आम्हाला त्यावर हसावसं नि त्याचवेळी त्याच्यासारखं रडावसंही वाटत होतं. हं, तो अखेरचा पाठ मला किती व्यवस्थित कळलाय!!
त्याचवेळी अचानक चर्चच्या घड्याळाचे बारा वाजल्याचे टोले पडले आणि मग प्रार्थनेची घोषणा झाली. मागोमाग प्रशियन सैन्याच्या कवायतीच्या समाप्तीची धून वाजवणारी ट्रंपेट्स वाजली. हॅमेल मास्तर उदासपणे खुर्चीतून उठून उभे राहिले, तेव्हा इतके उंच ते मला आधी कधीच वाटले नव्हते.
"माझ्या मित्रांनो," ते बोलू लागले, "मी - मी -" पण त्यांचे शब्द घशातच अडकले. ते पुढे काही बोलूच शकले नाहीत. मग ते फळ्याकडे वळले, हातात खडू घेऊन त्यांच्या संपूर्ण आवाक्याने, मोठ्यात मोठ्या अक्षरात त्यांनी तिथे लिहिलं -
"फ्रान्स चिरायु होवो!"
आणि मग ते थांबले, भिंतीला रेलून उभे राहिले आणि एकही शब्द न बोलता आम्हाला आपल्या हाताने इशारा केला -
"शाळा सुटली, तुम्ही आता जाऊ शकता." 
---------------------------------------------------------------------------------------------------------------


(अल्फॉन्स दूदे यांच्या "द लास्ट लेसन" या कथेचा स्वैर अनुवाद)
छायाचित्रे आंतरजालावरून साभार

Monday 28 November 2011

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

माझे आं. जा. मित्र श्री. यशवंतराव कुलकर्णी यांनी मिसळपाव या मराठी संस्थळावर तत्त्वज्ञ यु. जी. कृष्णमूर्ती यांच्या मतांवर आधारीत लेख लिहिला होता. यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत या लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं. तसं ते त्या धाग्यामध्ये प्रतिसादाच्या स्वरूपात करता आलं असतं पण त्यातील विचारांचं आणि लिखाणाचं बृहत्त्व पहाता नवा लेख लिहिणच गरजेचं वाटलं म्हणून हा प्रपंच.

यकुशेठांच्या लेखनातले मुद्दे मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे, ते पुढील प्रमाणे -
  • युजींच्या तथाकथित रुपांतरणोत्तर आयुष्यातली एक जाणीव म्हणजे त्यांचा भाषाविचार. सदर भाषाविचार हा त्यांच्या उपरोल्लेखित लेखाचा विषय आहे.
  • भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.
  • संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.
  • व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.
  • अशा अभिनिवेशांद्वारे जीवित झालेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांनी बनलेल्या भाषांमुळे एका ठराविक अभिव्यक्तीचे बंधन पडते.
  • असं असल्यामुळे सदर शब्दरुपी भाषा सर्वश्रेष्ठ सत्य उलगडून सांगण्यास (लेखानुसार आणि स्वतः युजींच्या म्हणण्यानुसार त्यांचे जगाबद्दलचे मत व्यक्त करण्यात) अपुरी पडते.
  • मग त्यांना असं जाणवतं की चिह्नरूपी भाषेतल्या शब्दांची त्यांना काहीच आवश्यकता नसावी म्हणून युजी या माध्यमावर अवलंबून रहात नाहीत.
  • तरीही त्यांच्या अनुयायांशी होणारा संवाद शब्द-भाषेच्या मार्फतच व्हावा लागतो. त्यामुळे त्या संवादात योजलेल्या शब्दांचा त्यांची मानसिक अवस्था समजण्यापुरताच उपयोग व्हावा अशी त्यांची धारणा आहे किंवा तसाच तो होतो असं त्यांचं मत आहे.
  • आयुष्यभरात या चिह्नरूपी भाषेच्या विळख्यात राहिल्याने आपण जग जाणू शकत नाही तर त्याऐवजी या चिह्ननिर्देशित प्रतिमांच्या घोटाळ्यात फसतो.
  • जेव्हा या चिह्नांनी दर्शवलेल्या प्रतिमांच्या जंजाळातून सुटू म्हणजे भाषा --> शब्द --> चिह्न --> प्रतिमा --> असत्य ही साखळी तोडू तेव्हा आपल्याला सत्याचं म्हणजेच युंजींच्या मताने आपल्या आजुबाजुच्या जगताचं दर्शन होईल.
आता वरील जंत्रीमध्ये जे विवेचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचा विचार करण्यापूर्वी खुद्द युजींबद्दल चार शब्द सांगणं आवश्यक होईल असं मला वाटतं.

यु. जी. तथा उप्पलुरी गोपाल कृष्णमूर्तींचा जन्म मच्छलीपट्टणम् (आन्ध्र प्रदेश) मध्ये १९१८ साली आणि त्यांचा मृत्यु २००७ साली इटली इथे झाला. तत्त्वज्ञान, अध्यात्माची आवड असणारे युजी अनेक वर्ष अनेक योगी आणि तत्त्वज्ञानी लोकांशी संबंधित राहिले. त्यांचे आजोबा थिऑसॉफिस्ट असल्याने त्यांचा तिथे ओढा होता आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या मदतीसाठी ऐन विशीत त्यांनी युरोपात लेक्चर्स दिली होती. पुढे युजी रमण महर्षी आणि जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात आले. दोन्हीकडे त्यांचं समाधान झालं नाही. दरम्यान जे. कृष्णमूर्तींशी विसंवाद होऊन ते तिथून बाहेर पडले. त्यानंतर काही वर्ष ते आपल्या थोरल्या मुलाच्या उपचारांसाठी अमेरीकेत राहिले. याच वेळेला त्यांनी आपल्या कुटुंबापासून फारकत घेतली आणि स्वतः इंग्लंडमध्ये आणि नंतर पॅरीसला जाऊन राहिले. तिथे त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची झाल्यामुळे तिथून ते जिनीवाला गेले. तिथे त्यांनी भारतीय वकिलातीत जाऊन त्यांना भारतात पाठवण्याची विनंती केली. वकिलातीने त्यांच्या परत पाठवणीसाठी खर्च करण्याचं नाकारलं. तेव्हा भारतीय वकिलातीमधल्या व्हॅलेंटिना नावाच्या साठीच्या महिलेने त्यांना आसरा दिला आणि युजींना स्विट्झर्लंडमध्ये घर मिळालं. एकूण या दरम्यान युजींची शारीरिक आणि मानसिक बरीच आबाळ झाली. दरम्यान त्यांचे शक्य त्या मार्गाने अध्यात्मिक साधनेचे प्रयत्न सुरूच होते. याच काळात तिथे लेक्चर्स देण्यासाठी आलेल्या जे. कृष्णमूर्तींशी पुन्हा संपर्क होऊन संवादाला सुरूवात झाली पण थोड्याच दिवसात युजींचा जे. कृष्णमूर्तींकडून भ्रमनिरास होऊन ते पुन्हा वेगळे झाले.

या काळातच युजींना तथाकथित शारीरिक आणि मानसिक रुपांतरणाचा अनुभव आला. त्यांनी स्वतः या अनुभवाचं वर्णन असं केलेलं आहे (संदर्भः विकीपेडिया) -
I call it calamity because from the point of view of one who thinks this is something fantastic, blissful and full of beatitude, love, or ecstasy, this is physical torture; this is a calamity from that point of view. Not a calamity to me but a calamity to those who have an image that something marvelous is going to happen.
Upon the eighth day:
Then, on the eighth day I was sitting on the sofa and suddenly there was an outburst of tremendous energy – tremendous energy shaking the whole body, and along with the body, the sofa, the chalet and the whole universe, as it were – shaking, vibrating. You can't create that movement at all. It was sudden. Whether it was coming from outside or inside, from below or above, I don't know – I couldn't locate the spot; it was all over. It lasted for hours and hours. I couldn't bear it but there was nothing I could do to stop it; there was a total helplessness. This went on and on, day after day, day after day.
The energy that is operating there does not feel the limitations of the body; it is not interested; it has its own momentum. It is a very painful thing. It is not that ecstatic, blissful beatitude and all that rubbish – stuff and nonsense! – it is really a painful thing.

या अनुभवानंतर त्यांनी स्वतःचं तत्त्वज्ञान मांडायला सुरूवात केली. त्यांचं तत्त्व त्यांच्याच शब्दात होतं, "Tell them that there is nothing to understand." (सांगा त्यांना की इथे काहीही जाणण्यासारखं नाही.) - सं. - विकीपेडिया

त्यांचं सदर तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या काही व्यक्तींना ते ज्ञानी वाटत तर काहींना पाखंडी पण लवकरच त्यांच्या या 'अगम्य' तत्त्वज्ञानाबद्दल पुस्तकं लिहिली गेली, त्यांची विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली आणि ते एकूणच प्रसिद्धीस पावले.

युजींबद्दलची माहिती सगळ्यांना असणं शक्य नाही म्हणून इथे आधी सांगितली.

योग आणि ध्यान करणार्‍यांच्या साधनेमध्ये त्रुटी किंवा चूक घडल्यास त्याचे परिणाम त्यांच्या मनाला भोगावे लागतात असं योगशास्त्रात सांगितलं जातं. हे परिणाम क्लेश स्वरूपात त्यांचे मन त्रिगुणांपैकी (सत्त्व-रज-तम) ज्या गुणाच्या अधिपत्याखाली असेल त्यानुसार घडून येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश होत. पातंजल योगसूत्रांमध्येही या क्लेशांना अविद्याजन्य मानलेलं आहे. हे इथे सांगण्याचं कारण इतकंच की असाच काहीसा प्रकार युजींच्या बाबतीत घडला असावा आणि त्यालाच त्यांनी त्यांना स्वतःला अनुभवाला आलेलं 'रुपांतरण' असं मानलं असावं. यासाठी किती काळ लागतो वगैरे सूत्रांमध्ये दिलेलं नाही पण युजींची ही अवस्था आठ दिवस होती असं त्यांच्या शब्दांतूनच कळतं. युजींच्या भ्रमित अवस्थेला सुरूवात झाली ती इथेच असं मला वाटतं. मात्र त्यांनी स्वतः मात्र या अनुभवाला एका विशिष्ट जाणीवेचं स्वरूप मानलं आणि नंतर त्या जाणीवेलाच नाकारलं. गौतम बुद्धापासून इतर तत्त्वज्ञानींना जे सर्वश्रेष्ठ सत्याचं ज्ञान झालं त्याचा शोध घेणार्‍या युजींनी त्याच सत्याला नाकारलं, त्याच्या ज्ञानाला नाकारलं इतकंच काय तर त्यांनी व्यक्त झालेल्या प्रत्येक गोष्टीला नाकारलं. या नकाराचाच एक भाग म्हणजे यशवंतरावांनी मांडलेला त्यांचा भाषा-विचार.

युजींचं हे सगळं तत्त्वज्ञानच कसा एक भ्रम आहे हेच आता आपल्याला समजून घ्यायचं आहे.

युजी म्हणतात -

भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.
संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.
व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.

अशा अभिनिवेशांद्वारे जीवित झालेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांनी बनलेल्या भाषांमुळे एका ठराविक अभिव्यक्तीचे बंधन पडते.

हे सगळ म्हणत असताना युजी विसरतात की भाषा हे केवळ संवादाचंच माध्यम नाही तर ते ज्ञानाचंही माध्यम आहे. आता कुणी म्हणेल की त्यांनी ज्ञानच नाकारलंय तर हे माध्यमही नाकारणारच ना! पण त्याच वेळेला ते त्यांच्या मनाची अवस्था अनुयायांना समजावी म्हणून त्याच भाषेचा उपयोग करतात म्हणजे हा वदतोव्यघातच म्हणायला हवा. त्यांच्या अनुयायांना त्यांच्या मनाची अवस्था समजते म्हणजेच युजींच्या मनाच्या अवस्थेचं ज्ञान होतं म्हणजेच ते ज्या ज्ञानाला नाकारत आहेत त्याचंच अस्तित्व इथे त्याच वेळेला मान्यही करत आहेत. हे त्यांच्या भ्रमाचेच द्योतक होईल.

या शिवाय त्यांनी भाषा ही चिह्नयुक्त वा प्रतिमास्वरूप मानली आहे. भाषा मुळात दोन प्रकारची आहे. बोली भाषा आणि लिखित भाषा. बोली भाषेत स्वर आणि व्यंजनं येतात तर लिखित भाषेत त्यांना विशिष्ट चिह्नं. युजी जेव्हा भाषेला प्रतिमा वा चिह्नयुक्त म्हणतात तेव्हा त्यांचा रोख लेखी भाषेतील चिह्नांकडे आहे असंच जाणवतं. त्याचप्रमाणे ते जेव्हा भाषेला जगाची प्रतिमा मानतात (मुळात हा विचारच किती निरर्थक आहे? तुम्ही जगालाच नाकारता मग त्याची ही प्रतिमा कुठून पैदाकरता?) आणि त्या भाषेच्या शब्दांच्या अक्षरांना संकुचित वापरामुळे तुकड्या तुकड्याने अभिव्यक्त मानतात तेव्हा त्यांचा उपरोल्लेखित वैचारिक भ्रम अधिक स्पष्टपणे दिसतो. कारण एकदाका तुम्ही ज्ञान नाकारलंत, जाणीव नाकारलीत, सत्य नाकारलंत की मग ही शाब्दिक अभिव्यक्ती काय चीज आहे? "जगात काहीही जाणण्यासारखं नाही, जे काही आहे ते केवळ काही असंबद्ध वाक्यं आहेत, ज्यांची संगती तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता," अशा वाक्यांमधून (सं - विकी) युजींची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते असं मला वाटतं कारण एका बाजूला ते ज्या ज्या गोष्टींचं अस्तित्त्व नाकारतात त्या त्या गोष्टी ते दुसर्‍या अंगाने (इनडायरेक्टली) मान्य करतात. मग त्यांनी सांगितलेलं तथाकथित तत्त्वज्ञान केवळ त्यांनी त्याज्य मानलेल्या भाषेतील शाब्दिक बुडबुडेच होतात. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. ऐकणार्‍याला हातात काहीच मिळत नाही. वेळ मात्र फुकट जातो.

मात्र असं असूनही युजी अंगाला काहीच लाऊन घेत नाहीत. त्यांनी ज्ञानालाच नाकारलेलं असल्याने ते कोणतं तरी ज्ञान देत आहेत असं ते स्वतःच मानत नाहीत पण त्याचवेळेला ऐकणार्‍याला त्यांच्या विधानांची संगती लावण्याच्या दृष्टीने त्यांच्या मते मृत भाषेतील शब्दांचे बुडबुडे ते सोडतच असतात मात्र हे बुडबुडे त्यांची मानसिक अवस्था समजावी म्हणूनच असतात, हे एक गौडबंगालच आहे.

करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे. युजी स्वतः सांगतात की मी सगळं नाकारतोय पण लोकंच त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांच्या (युजींच्या) असंगत वाक्यांतून अर्थ काढत बसतात आणि अखेर काहीच हातात न मिळाल्याने निराश होतात. युजींच्या वक्तव्यांचा विचार करता ते त्यांना प्रश्न विचारणार्‍याचा प्रत्येक मुद्दा नाकारतात. प्रश्नकर्ता कोणत्यातरी अडचणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याच्या अडचणी व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांनाच नाकारतात. नंतर त्याच्या अडचणींनाच नाकारतात. पुढे त्या व्यक्तीच्या जाणीवांनाच नाकारतात आणि अशा प्रकारे आपल्या अडचणींचा सामना करताना मेटाकुटीला आलेला जिज्ञासू अधिकच संभ्रमात पडतो आणि त्यांच्या नकारात गूढ अर्थ शोधू लागतो. यातच पुढे अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचा विचार काहीही निष्पन्न करत नाही आणि असे असंबद्ध नि 'गूढ' विचार व्यक्त करण्यासाठी युजींसारखं रुपांतरणही आवश्यक नसतं. आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात. भांग खाऊन व्यक्त केलेले नसले तरी युजींचे विचार तसाच एक कल्पनाविलास वाटतो.

खरं तर युजींच्या या तथाकथित तत्त्वज्ञानाचं (पुन्हा वदतोव्यघात) वेगवेगळ्या प्रकारे खंडन करता येणं शक्य आहे. अनेक संदर्भ आणि शास्त्रवचनं यासाठी देता येतील पण ज्यांनी स्वतः तत्त्वज्ञानाचा पाया असलेलं शाश्वत सत्य नाकारलं, त्या सत्याचं ज्ञान नाकारलं, त्या सत्याच्या ज्ञानाचं साधन नाकारलं आणि जग तथा जीवनासंदर्भात कुठल्याही तर्‍हेची साध्यं नाकारली अशा व्यक्तीला फक्त 'नाकारून'च त्याच्या मतांचं खंडण करणं मला अधिक योग्य वाटतं.

Sunday 27 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (६)

तो - अंतिम भाग
......................

"Something Stupid" सुरू झालं आणि त्याच्या केबीन मधलं वातावरणच बदललं. जसे जसे या गाण्याचे सूर घुमू लागले तसे तसे तिथले बाकी आवाज एकदम शांत झाले. आता तिथे ना कुठले वाद होत होते, ना कुठले विवाद आणि ना कसल्या चर्चा! तो डोळ्यात प्राण आणून तिच्याकडे बघत होता पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. त्याला इतक्या दिवसात कळलंच होतं की ती खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तिला जे बोलायचं असतं ते ती नेहमीच आधी तिच्या डोळ्याने आणि तिच्या चेहर्‍याने बोलते. तिला एखाद्या गोष्टीचा प्रतिवाद करायचा असेल तर तिची नजर तीक्ष्णपणे समोरच्यावर केन्द्रित होते, एकदम फोकस्ड, तिच्या ओठांना एक वेगळाच बाक येतो, दातांनी खालचा ओठ थोडासा चावला जातो आणि समोरच्याचं बोलणं संपल्या संपल्या ती एक खोल श्वास घेऊन त्या व्यक्तीवरची नजर जराही न हलवता आपल्या बोलण्याला सुरूवात करते. बोलते कसली, जणु समोरच्या व्यक्तीच्या युक्तिवादाच्या चिंधड्याच करते. संदर्भ, उदाहरणं, प्रयोग आणि त्यांचे निष्कर्ष अशांनी युक्त तिची अमोघ वाणी जेव्हा थांबते तेव्हा समोरचा पार नामोहरम झालेला असतो. तर जेव्हा एखाद्या विचाराशी ती सहमत असते तेव्हा तिचे डोळे मोठ्ठे होतात, अगदी काहीसे लकाकूही लागतात, चेहर्‍यावर एक वेगळंच हास्य पसरतं. जणू ती समोरच्याला सांगत असते की होय, खरंय, माझाही अगदी हाच विचार आहे. समोरच्या व्यक्तीच्या निष्कर्षाशी सहमती दर्शवतानाही ती स्वतःचे त्या निष्कर्षाप्रति येण्यामागचे विचार स्पष्ट करते, उत्फुल्ल चेहर्‍याने त्याची मीमांसा करते आणि ती हे करत असताना समोरच्या व्यक्तीलाही जाणवतं की तिच्या या विचारांनीही त्याच्याच निष्कर्षांचं अधोरेखन होतंय. एखादी गोष्ट तिला नव्याने कळत असेल तर तिचे डोळे खूप गंभीर होतात, चेहराही तसाच बनतो, ओठ जरासे मुडपले जातात आणि उजवा पंजा हनुवटीखाली येऊन समोरच्या व्यक्तीकडे बघता बघता तिची तर्जनी तिच्या गालावर टिचक्या मारू लागते, हे तिचं त्या नव्या माहितीची मेंदूत पडताळणी होत असल्याचं लक्षणच तो मानायचा. पण आजचं लक्षण काही वेगळंच होतं.

तो त्याच्या टेबलामागच्या खुर्चीवरून समोर बसून ते गाणं ऐकणार्‍या तिच्या हावभावांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटायचं की आता तो तिच्या डोक्यात काय चालू आहे ते तिच्या चेहर्‍याकडे बघताच समजू शकतो पण आता त्याला काहीच अंदाज येत नव्हता. तो एकटक तिच्याकडे बघत होता पण त्याला तिच्या मनातल्या गोष्टींचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. फ्रँक आणि नॅन्सी सिनात्रांनी त्यांच्या गाण्याची दोन्ही कडवी म्हणून झाली आणि गाणं शेवटाला येण्यापूर्वीची व्हायोलिन, पियानो, गिटार, सॅक्सोफोन आणि ट्रंपेटवरची ती धुंद धून सुरू झाली. त्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागली. त्याला त्याच्या टेबलावर तिच्या समोर फिरवून ठेवलेला लॅपटॉपचा स्क्रीन तिचा चेहरा वाचण्याच्या प्रयत्नातला अडथळा नसतानाही तसा वाटायला लागला. आपल्या जागेवरून उठून तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. आता फ्रँक आणि नॅन्सी पुन्हा एकदा दुसरं कडवं गात होते. ते सुरू झाल्या झाल्या इतका वेळ स्तब्धतेने ऐकणार्‍या तिने स्क्रीनवरची नजर जराही न हटवता आपल्या उजव्या हातावर हनुवटी टेकवली. त्याने पाहिलं की ती अजूनही ते गाणं गंभीरपणे ऐकतेय आणि जसं शेवटचं कडवं पुन्हा सुरू झालं तसा तिच्या तर्जनीने गालावर ताल धरला होता.

गाण्याच्या ध्रुवपदातल्या शेवटच्या तीन शब्दांचा पुन्हा पुन्हा उच्चार करून फ्रँक आणि नॅन्सीने गाणं संपवलं आणि त्याची केबीन एकदम शांत झाली. तो तिच्याचकडे बघत होता पण तिची लॅपटॉपच्या स्क्रीनवरची नजर अजूनही हलली नव्हती. त्याच्या मनावर आता प्रचंड दडपण आल्याची जाणीव झाली. तो काहीच बोलू शकला नाही. तीही काहीच बोलत नव्हती. केबीनमध्ये तणावग्रस्त शांतता निर्माण झाली. अचानक त्याने बघितलं की ती डाव्या हाताची तर्जनी लॅपटॉपच्या कर्सरपॅड वरून फिरवत आहे. त्याला कसलाच अंदाज येत नव्हता. कसंबसं त्याने तिला विचारलं, "कसं काय वाटलं गाणं?" त्यावर आपली कर्सरपॅडवरची हालचाल जराही न थांबवता तिने प्रत्युत्तरादाखल नुसताच हुंकार दिला.

त्याला कळेचना की पुढे काय करावं. बाण तर सुटलेला कारण तो सोडणं त्याच्या हातात होतं पण त्यामुळे होणारा परिणाम मात्र त्याच्या हाती नव्हता. त्याने केलेले तिच्या प्रतिसादाचे सगळे अंदाज आता कोसळून पडलेले. गाणं संपल्यावरही तिने एका हुंकाराखेरीज काहीच म्हण्टलेलं नव्हतं आणि आपली स्क्रीनवरची नजरही हटवली नव्हती. त्याच्याकडे पाहिलेलंही नव्हतं. त्याने खूप प्रयत्नाने तिला विचारलं, "काय झालं? काही चुकलं का?" यावर तिनेही काहीच उत्तर दिलं नाही. ना तिची स्क्रीनवरची नजर ढळली ना तिची कर्सरपॅडवरची डाव्या तर्जनीची हालचाल. त्याचा अगदी तिच्याकडे व्याकुळतेने बघणारा पुतळाच झाला होता. अचानक ती खुर्चीवर ताठ बसली आणि स्क्रीन वरची नजर उचलून अत्यंत थंडपणे त्याच्यावर रोखली. त्यानेही तिच्या नजरेला नजर दिली. तिच्या त्या नजरेतले भाव जाणण्याचा तो प्रयत्न करू लागला पण त्याचा कोणताही निर्णय होत नव्हता. त्याला इतकंच समजत होतं की तिचा चेहरा काहीसा कठोर, काहीसा भावनाहीन असा वाटतोय. आता त्याला आपण जे समजतोय त्याच्यावरही शंका येऊ लागली होती.

हाताची घडी घालून ती आता त्याच्याकडे बघत होती, इतक्यात लॅपटॉपमधून हलकेच ड्रमचे बीट्स ऐकू यायला लागले. त्याला कळेचना की हा कसला आवाज येऊ लागला ते आणि अचानक त्याच्या कानावर गाण्याचे शब्द आले. फ्रँक सिनात्राच गात होता -


Fly me to the moon
Let me play up there among the stars
Let me see what life is like On jupiter and mars

तो एकदम आश्चर्याने थक्क झाला. ती इतका वेळ त्याच्या गाण्यांची यादी बघत होती हे याला समजलं. कर्सरपॅडवरची हालचाल त्याचंच द्योतक होती. गाणं जसं जसं पुढे जात होतं तसे तसे तिच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. गाणं जसं पहिल्या कडव्याच्या शेवटाला आलं आणि फ्रँक गाऊ लागला -

In other words, hold my hand
In other words, baby kiss me


तेव्हा त्याने पाहिलं की तिचे डोळे चमकत आहेत आणि चेहर्‍यावर एक खट्याळ हसू आहे. त्याने हे ही पाहिलं की जसं फ्रँकने baby kiss me म्हंटलं तसं तिने हसून त्याच्या दिशेने एक उडतं चुंबन फेकलं.
आता त्याचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. तिने त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं आणि ते ही त्याच्या इतक्याच कल्पकतेने. जे त्याच्या मनात होतं तेच जणु अगदी तिच्याही मनात होतं.

फ्रँक गातच होता -

Fill my heart with song
Let me sing for ever more
You are all I long for
All I worship and adore
In other words, please be true
In other words, I love you

जसा तो दुसर्‍या कडव्याच्या शेवटाला आला तशी तिची नजर खाली गेली. त्याच्या लक्षात आलं की तिच्या गालांची लाली वाढली आहे. डोळ्याच्या कोपर्‍यातून ती त्याच्याचकडे बघत आहे. गाण्याचं दुसरं कडवं संपल्यावर ड्रम्स, ट्रंपेट, व्हायोलिन, बासरी, पियानो आणि सॅक्सोफोनवरची जीवघेणी धून सुरू झाली. ती संपता संपता फ्रँकने दुसर्‍या कडव्यातले शब्द पुन्हा गायला सुरूवात केली. आता त्याला त्या आधी ऐकलेल्या शब्दांचा नव्याने अर्थ लागत होता. त्या प्रसंगासाठी या शब्दांइतकं अधिक काहीच चपखल बसणं त्याला अशक्य वाटत होतं. आता त्याच्या हृदयात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद भरून राहिला होता. तो हसर्‍या चेहर्‍याने एकटक तिच्याकडे बघत होता आणि फ्रँक गाणं पुन्हा एकदा शेवटाला नेत होता. ध्रुवपदाची आळवणी करताना त्याने नेहमीप्रमाणे In other words ची द्विरुक्ती केली आणि तो जसा पुढचे शब्द गाऊ लागला तसं त्याने पाहिलं की तीही लिपसिंक करत त्याला म्हणत होती,

"I... Love….. You!"

(समाप्त)

फ्लाय मी टू द मून.... (५)

ती - (पुन्हा) भाग २
.........................

आज तिला ऑफिसात आल्या आल्या लगेचंच जाणवलं, त्याने त्याची कामं ती येण्यापूर्वीच हातावेगळी केली होती. त्याच्या केबीन बाहेरच्या काचेतून तिने पाहिलं की पुढ्यात एक जाडंसं पुस्तक घेऊन तो बसलेला नि त्याचं त्या पुस्तकात जराही लक्ष नव्हतं. डोळ्यापुढे पुस्तक होतं, डोळे अक्षरांवरून फिरतही होते पण त्यात कुठेही त्याचं मन असल्याचं तिला वाटलंच नाही. तिने मनाशी विचार केला, गेले साहेब तंद्रीत! वाचलेलं नक्कीच डोक्यात जात नाहीसं दिसतंय. मग त्याच्या केबीनचा दरवाजा उघडून ती आत गेली. तिला आलेलं बघताच त्याच्या चेहर्‍यावर एक मस्त हसू उमटलं. त्याचं ते हसू बघताच तिला एकदम तिच्या छातीत काहीतरी लक्कन् हलल्यासारखं झालं, मनात भावनांचे आनंददायक तरंग उठल्यासारखं झालं पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेऊन नेहमीप्रमाणे आपली पर्स तिथल्या सोफ्यावर टाकली आणि प्रत्युत्तरादाखल हसत, हातात पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या समोर बसली. एक मोठा श्वास घेऊन तिने दोन - तीन घोट पाणी पिऊन स्वतःला सावरलं. तिच्या मनातले तरंग तिला त्याला लगेच दाखवून चालणारच नव्हतं कारण त्याच्याबरोबरची निखळ मैत्री तिला जीवापाड जपणं आवश्यक वाटत होतं.

मग त्याने तिच्या कार्यक्रमाबद्दल विचारलं आणि त्यामुळे तिला सहजच एक वे आऊट मिळाल्यासारखं वाटलं. त्यानंतर, तिच्या गुरूंनी तिच्यावर कशी जबाबदारी टाकली, तिच्याशिवाय हे काम तडीस नेण्यासाठी कसं कोणीही योग्य नव्हतं, तिने कार्यक्रमाची रूपरेषा कशी बनवली, त्यासाठी तिला काय विचार करावा लागला, तिने बनवलेला कार्यक्रमाचा आराखडा तिच्या गुरूंनी मान्य केल्यावर कार्यक्रमाच्या प्रेझेंटेशनचा तिने कसा विचार केला, तिचा स्वतःचा पर्फॉर्मन्स देण्याचं तिने कसं ठरवलं, त्यासाठी कशी तयारी केली, वेळेचं गणित कसं बांधलं या गेल्या पंधरा दिवसांच्या सगळ्या गोष्टी, ज्या तिला त्याला सांगाव्याशा वाटत होत्या त्या तिने त्याला सांगितल्या. त्याबरोबरच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या पर्फॉर्मन्सदरम्यान आलेल्या अडचणी, त्यातून काढलेली वाट हे सगळं सगळं तिने त्याला सांगितलं. या दरम्याने तो काही नुसताच गप्प बसलेला नव्हता. त्यानेच तिच्या निर्णयांची समीक्षा करून ते कसे योग्य होते हे ही तिला सांगितलं, जे प्रत्यक्ष ते निर्णय घेताना, त्यांच्या परिणामांच्या दृष्टीने कसे आवश्यक होतील, ते तिच्या आधी लक्षातच आलं नव्हतं. त्याच्या समीक्षणाचा एक नवाच पैलू तिला आज जाणवला आणि त्यामुळे तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला. आता तिला किती बोलू आणि किती नको असंच झालेलं. जणु गेल्या पंधरा दिवसांचा बॅकलॉगच तिला भरून काढायचा होता.

आज तिने ठरवूनच येताना जास्तीचा डबा भरून आणलेला. तिने त्याला सांगितलं की पंधरा दिवसांनी त्याला भेटायचं असल्याने कुठे बाहेर हॉटेलात वगैरे जाण्यापेक्षा त्याच्या ऑफिसातच मनमोकळ्या गप्पा करता येतील म्हणून सकाळीच तिने स्वतः घरी स्वयंपाक करून काही त्याची आणि काही तिची आवडती व्यंजनं बनवून आणली होती. याचं त्याला एकदम अप्रूप वाटलं पण अर्थातच त्याने या सूचनेला आनंदाने अनुमोदन दिलं. त्याच्या ऑफिसातल्या प्लेट्स घेऊन दोघांनी जेवणाचा जामानिमा सिद्ध केला आणि जेवायला बसले.
जेवताना विषय तिच्या कार्यक्रमावरून संगीतावर आला. संगीतामध्येही विशेषत्वाने कृष्णवर्णीयांनी लोकप्रिय केलेल्या जॅझ, ब्लूज आणि स्विंग संगीत प्रकाराकडे त्यांची चर्चा वळली. तिचा स्वभाव सर्वसामान्य कलाकारासारखा मनस्वी होता. त्यामुळे एक प्रकारची बंडखोरीची भावना तिच्या मनात सहजच उत्पन्न व्हायची. त्यात जॅझ नि ब्लूज चा संदर्भ निघाला की तिच्या मधली बंडखोरीची भावना उफाळून वर यायची. यामुळे आपोआपच ही चर्चा कृष्णवर्णीयांची मुस्कटदाबी, त्यांच्यावरचे अत्याचार, गुलामगिरीची प्रथा आणि अशा वातावरणात या संगीतप्रकारांचा त्यांनी केलेला स्ट्रेस-बस्टर सारखा वापर इथे पोहोचली. कृष्णवर्णीयांवरच्या अन्यायाचा विषय निघाला की तिच्या वक्तृत्वाचा निराळा पैलू बाहेर यायचा. ती मग पोटतिडकीने या प्रकारच्या संगीतामधल्या कृष्णवर्णियांच्या अभिव्यक्तिबद्दल बोलू लागली. वेगवेगळे कृष्नवर्णीय संगीतकार, गायक तिला नावानिशी माहित होते आणि त्यांची चरित्रेही जणु तिला अगदी पाठ होती. ती त्यांची गाणी, त्यांच्या गाण्यामागच्या आणि त्यांच्या संगीतामागच्या प्रेरणा यांचं वर्णन करून सांगत होती. या दरम्यान एखाद दुसरी घटना आठवणीने तो ही सांगत होता पण दरम्यान त्याने एकदम विषय फ्रँक सिनात्राच्या संगीताकडे नेला.

त्याने मत मांडलं की गौरवर्णीय असूनही सिनात्राचं जॅझ संगीतातलं कर्तृत्वही वादातीत आहे. त्याने जॅझ, स्विंग आणि ब्लूज संगीतामध्येच गायकाचं करीअर केलंय. त्याने त्या दरम्यान लुई आर्मस्ट्राँग, बी. बी. किंग अशा कृष्णवर्णीय संगीतकारांबरोबर कामं केली आहेत. जॅझ संगीत हे काळ्यांचं संगीत या कॅटेगरीतून अभिजात संगीताच्या दर्ज्यापर्यंत पोहोचण्यासाठी सिनात्रासारख्यांचा हातभार फार महत्त्वाचा मानला गेला पाहिजे असं ठासून प्रतिपादन त्याने केलं. त्यावरही तिचा प्रतिवाद होताच. तिच्यामते सिनात्रा जॅझपेक्षा सुरूवातीच्या पॉप संगीतात जास्त रमला कारण त्या काळातल्या वर्णद्वेषी वातावरणाचा तो परिणाम होता. असे वाद - प्रतिवाद होता होताच त्यांचं जेवण झालं पण चर्चा काही थांबली नाही.

ऑफिसातल्या फ्रीजमधल्या फळांच्या रसाने आपापले ग्लास भरून दोघेही आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहून चर्चा करू लागले. मग त्याने त्याच्या कॉम्प्युटरमधली सिनात्राची जॅझ आणि स्विंग प्रकारची गाणीच तिला वाजवून दाखवायला सुरूवात केली. सिनात्राचा आवाज, त्याच्या गाण्यातले शब्द आणि उत्फुल्ल जॅझ संगीत यांचा एकत्रित परिणामच असा झाला की त्यांच्या चर्चेमध्ये निर्माण झालेलं वादाचं वातावरण झटक्यात निवळलं आणि दोघेही सिनात्राच्या गाण्यांचा आनंद घेऊ लागले. एकापाठोपाठ एक सिनात्राची गाणी लावता लावता त्यांचा मुख्य कृष्णवर्णीय संगीताचा मुद्दा बाजूला राहून ते सिनात्राची गाणीच ऐकू लागले. एकदम त्याने म्हण्टलं की सिनात्राचं एक त्याचं आवडतं गाणं तिने ऐकावं जरी ते पॉप संगीतातलं असलं तरी आणि त्यावर तिची प्रतिक्रिया द्यावी. तिलाही सिनात्राची गाणी आवडतंच होती, पण तो कोणतं गाणं ऐकवतो आहे हे मात्र तिला लक्षात येत नव्हतं. तिने ठीक, चालेल असं म्हण्टल्यावर त्याने गाणं सुरू केलं "Something stupid".




तिने हे गाणं खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं. सिनात्रा आणि त्याची मुलगी नॅन्सी सिनात्रा यांनी गायलेलं ते ड्युएट होतं. तिला आठवलं, हे मूळ गाणं काही त्यांचं नव्हतं. कार्सन पार्क्स आणि त्याची पत्नी गेल फूट यांचं मूळ गाणं सिनात्राने नॅन्सी सोबत १९६७ साली गायलं आणि ते आधीपेक्षा जास्त फेमस झालं. सिनात्रा संगीतक्षेत्रात आधीच प्रसिद्ध होता पण तेव्हा संगीत कारकिर्दीची सुरूवात करणार्‍या नॅन्सीसाठी हे गाणं फेमस होणं चांगलंच पथ्यावर पडलं होतं आणि तिचं सांगितिक करीअरही त्याने मार्गी लागलेलं. तिला त्यातले सगळेच शब्द काही आठवत नव्हते पण हे नक्कीच आठवत होतं की ते एक प्रेमगीत होतं कारण यामुळेच तर बाप-लेकीने गायलेल्या या प्रेमगीताला संगीताच्या दुनियेमध्ये चेष्टेने 'इन्सेस्ट साँग' असं संबोधलं जातं हे ही तिला ठाऊक होतं.

काहीशा प्रश्नार्थक चेहर्‍याने तिने ते गीत ऐकायला सुरूवात केली. तिला लक्षात येत नव्हतं की तो हे गाणं तिला का ऐकायला सांगत होता. तसं आधीही तो तिने एखादी त्याला आवडलेली कथा वाचावी म्हणून एखादं पुस्तक वाचायचा आग्रह करायचा किंवा एखादं गाणं ऐकण्याचाही आग्रह करायचा पण आत्तासारखं ऐकून प्रतिक्रिया दे असं मात्र त्याने यापूर्वी कधीच म्हण्टलेलं नव्हतं. म्हणून मग ती लक्षपूर्वक ते गाणं ऐकू लागली. "Something Stupid" गाण्याचे सुरूवातीचे गिटारवर छेडलेले सूर ऐकूनच तिला जाणवलं की हे गाणं तिला नक्की आवडणार आहे आणि पुढे फ्रँक आणि नॅन्सी सिनात्रांनी गायलेले शब्द तिला ऐकू येऊ लागले.

I know I stand in line until you think You have the time to spend an evening with me
And if we go someplace to dance I know that there's a chance you won't be leaving with me
And afterwards we drop into a quiet little place And have a drink or two......
And then I go and spoil it all by saying Something stupid like I love you
I can see it in your eyes that you despise The same old lines you heard the night before..
And though it's just a line to you for me it's never seemed so right before
I practice everyday to find some clever lines To say to make the meaning come true......
But then I think I'll wait until the evening gets late And I'm alone with you
The time is right your perfume fills my head The stars get red and on the nights so blue......
And then I go and spoil it all by saying Something stupid like I love you

तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती जे काही ऐकत होती आणि तो तिला त्यातून जे ऐकवत होता त्याची तिने अशाप्रकारे कधीच अपेक्षा केली नव्हती. तिला माहित होतं की तो रसिक आहे, हुशार आहे, अगदी चांगला योजकही आहे पण या वेळेला त्याने ज्या कल्पकतेने हे गाणं निवडून तिला ऐकवलेलं त्यामुळे ती अगदी दिङ्मूढ झालेली. तिच्या मनात भावनेचे कल्लोळ उठले होते. त्याच्या स्वतःचे मन गाण्याच्या या मार्गाने उघड करण्याच्या प्रयासाला कसं उत्तर द्यावं याचाच ती विचार करत होती. तिला त्याचं मन समजलेलं होतं. तिला हे ही जाणवलेलं की जो कूटप्रश्न तिला पडला होता त्याच प्रश्नाने त्यालाही संत्रस्त केलं आहे. पण तिने आपल्या मनातल्या भावना प्रयत्नपूर्वक चेहर्‍यावर येऊ दिल्या नाहीत. ती खालमानेने जीवाचे कान करून ते गाणं ऐकत उभी राहिली आणि तिच्यासमोर तो सगळा जीव डोळ्यात आणून तिची प्रतिक्रिया बघत राहिला.

क्रमशः

Saturday 26 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (४)

ती - (पुन्हा) भाग १
........................

आज पंधरा दिवसांच्या अवकाशानंतर ती त्याच्या ऑफिसमध्ये जाणार होती. अवकाशानंतर असं म्हणणं खरं तर चुकीचंच होतं कारण खरंच त्या दोघांत काही अवकाश निर्माण झालेलं का? तर त्याचं उत्तर, नाहीच, असं द्यायला लागलं असतं. सेमिनारच्या दोन दिवसांनंतर ती पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये आली आणि त्या दिवसानंतर तसा काहीसा सिलसिलाच सुरू झाला. ती जेव्हा त्या भागात यायची तेव्हा हक्काने त्याच्याकडे यायची. तो कामात असेल तर थांबायची आणि त्याला वेळ होईल तसं थोड्या गप्पा मारून निघायची. पण ही अवस्था फार काळ टिकायचीच नाही. पहिल्याच दिवशी तिने त्याला आपला मोबाईल नंबर दिला आणि त्याचा नंबर तर तिला त्याच्या कार्डावरच मिळालेला होता. दिवसभरातून त्यांचे एकमेकांना आठ ते दहा फोन व्हायचे. पण तेव्हाही कधी वायफळ गप्पा झाल्या नाहीत. नेहमीच त्यांचं बोलणं कोणत्या ना कोणत्या विषयावरच्या चर्चेचंच व्हायचं. मग हिरहिरीने दोघेही आपापला मुद्दा मांडायचे, त्यांचं विवेचन करायचे, त्यांची उदाहरणं आणि अवतरणं द्यायचे. त्यांचं अगदी म्हणतात तसं, 'काव्यशास्त्रविनोदेन' काळाचं गमन व्हायचं. कुठेही उच्छृंखलता नाही, सूचक बोलणं नाही, अगदी निखळ मैत्रीच्या पातळीवर त्यांचं प्रत्येक संभाषण असायचं. पण यातही हळू हळू फरक पडत चाललेला तिच्या लक्षात येऊ लागला.

ती फारच मानी आणि हुशार मुलगी होती. बदलत्या परिस्थितीचा अंदाज तिला चटकन् यायचा आणि त्यातही तिचा स्वभाव सेल्फ क्रिटीसिझम करण्यात प्रवीण होता, किंबहुना ती स्वतःला अधिकाधिक चौकशीच्या पिंजर्‍यात उभी करत होती. कारण तिचं तिलाच कळत होतं की त्याला फोन केल्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं. दिवसाची सुरूवात त्याच्याशी बोलून झाली की तिचा दिवस फार प्रसन्नपणे सुरू व्हायचा आणि ती प्रसन्नता टिकून रहावी म्हणून दिवसभरातून स्वतः त्याला तीन - चार फोन करायची. आता त्याचेही तिला फोन येऊ लागले होते. कधी तो बिझी असेल तर काही वेळाने फोन करायचा किंवा ती बिझी असेल तर काही वेळाने ती फोन करायची. मग कॉल्सची संख्या वाढायची. आता रात्री झोपण्यापूर्वी दहा - बारा मेसेजेस करून दोन दोनदा गूड नाईट म्हणूनच ती झोपत असे. दिवसभरातल्या घडामोडी त्याच्याशी शेअर केल्याशिवाय तिला रहावतंच नसे. मग एखाद्या वेळी विशिष्ट परिस्थितीत ती त्याचा सल्लाही घेई, कधी आपला निर्णय आणि त्यामागचा विचार सांगायची. त्यांच्या चर्चांच्या विषयांनाही धरबंध उरला नव्हता. त्यात कला आणि संगीत यांचे दोघेही दर्दी रसिक असल्याने त्यांच्या इतर ठीकाणच्या गाठीभेटीही वाढल्याचं तिला लगेच जाणवलं होतं.

तिच्या इतक्या तिच्या मैत्रिणींच्या आवडी प्रगल्भ नव्हत्या, त्यामुळे जेव्हा त्याची ओळख झाली तेव्हा तिला समान शीलाच्या मित्राची प्राप्ती झालेली. त्याच्याबरोबर ती आवडीचे, उत्तमोत्तम चित्रपट आणि नाटकं बघायला जायला लागलेलीच पण त्याबरोबर ते दोघेच अनेक आर्ट गॅलर्‍यांमध्ये एकत्र चित्र-प्रदर्शनालाही जाऊ लागले. बर्‍याचदा तिला एखादे प्रदर्शन बघायचे असे तेव्हा ती त्याला हक्काने ऑफिसातून बाहेर काढायची आणि तिथे घेऊन जायची. मग उरलेला सगळा दिवस त्या प्रदर्शनातील चित्रांच्या रसग्रहणात आणि त्याच्या चर्चेत जायचा. कधी त्याला एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जायचे असेल तर तो तिचं तिकिट काढून तिला आमंत्रण द्यायचा. अर्थात तिला आता हे ही जाणवायला लागलेलं की हा सगळा प्रकार तिला आवडतोय आणि तशा वागण्याचं एक निराळंच आकर्षण तिला वाटतंय.

तिला तिच्यातला बदल कळत होता पण झालेला बदल तिला हवाहवासाही वाटत होता. त्याचवेळेला तिला असंही जाणवत होतं की झालेल्या बदलांवर आता तिला स्वतःला कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राखता येत नाही आहे. तिला सगळ्या बदलांचा संगतवार विचार करायचा होता पण भावनांच्या प्रवाहात ती इतकी वाहात चाललेली की ही अनियंत्रित परिस्थिती तिला घाबरवून टाकत होती. तिची हुशारीच तिला भावनांमध्ये वाहून जाण्यापासून अडवत होती. रात्री उशीरा कधी कधी ती जागी होई आणि मग या संबंधीच्या विचारांनी तिची झोप उडे. ती विचार करायची, तिच्या शिक्षणाचा, तिच्या कलोपासनेचा, तिच्या करिअरचा आणि तिच्या भविष्याचा. ती तिच्या आणि त्याच्या संबंधीही विचार करायची. त्यांच्या नात्याला कोणत्यातरी नावाचं कोंदण द्यायचा प्रयत्न करायची. तिच्या इतर मैत्रिणी आणि मित्रांची त्याच्याशी तुलना करून बघायची. त्यांच्या बरोबर असताना आणि त्याच्या बरोबर असताना, तिला काय फरक वाटतोय याविषयी विचार करूनही डोकं शिणवायची. तिला निश्चित करता येत नव्हतं की त्यांचं नातं केवळ मैत्रीचं आहे की त्यापलिकडचं काही, पण रात्रीच्या काही तासांचा विचार तिला पुरेसा होत नव्हता. तिला अधिक वेळ हवा होता आणि त्या परिस्थितीमध्ये तिला तो कसा काढावा हे सुचत नव्हतं.

मग त्या बाबतीत काही निर्णय घेण्याची संधी तिला मिळाली. तिच्या परात्पर गुरूंवरचा एक कार्यक्रम करण्याची तिला संधी मिळाली. त्या कार्यक्रमाची संकल्पना तिच्या गुरूंची असली तरी तो सादर करण्याची जबाबदारी तिच्याचकडे होती. या कार्यक्रमच्या तयारीसाठी तिने तिचे सगळे कार्यक्रम गुंडाळून ठेवले आणि सगळा वेळ या कार्यक्रमालाच दिला. तसं नसतं केलं तर हा कार्यक्रम सादरच करता आला नसता. याची तयारी करण्यासाठी म्हणून ती पूर्णवेळ त्याच कामात गढली आणि त्यामुळेच तिच्या बदलेल्या दिनचर्येतून तिने पंधरा दिवस विश्राम घेतला. कार्यक्रम ती एकटीच करणार असल्यामुळे तेव्हढा वेळ ती विद्यापीठातूनही सुट्टीवर होती आणि त्यालाही तिने याची कल्पना दिली होती. असं नव्हतं की तो तिच्याकडे काही स्पष्टीकरण मागत होता पण तिलाच ते दिलेलं योग्य वाटलेलं आणि त्यालाही तिचा कार्यक्रम यशस्वी व्हावा असंच वाटत होतं म्हणून याने त्या काळात त्याच्याकडून कोणतीही आडकाठी येणार नाही याची काळजी घेतलेली. यामुळे आता तिचं एकाच वेळी दोन आघाड्यंवर युद्ध चालू झालं होतं. एक म्हणजे तिच्या गुरूंचा विश्वास तिला सार्थ करायचा होता आणि तिच्या स्वतःच्या भावनांचा तिला अभ्यास करायचा होता.

आता तिचा अख्खा दिवस तिने व्यवस्थित मॅनेज करायला सुरूवात केली. सर्वप्रथम आपल्या गुरूंकडून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून घेतली आणि कार्यक्रमाच्या प्रेझेण्टेशनचा जुजबी आराखडा तयार केला. तो तिच्या गुरूंनी मान्य केल्याबरोबर तिचं जवळपास पन्नास टक्के काम पूर्णच झालं, ते ही अगदी दोन दिवसात! आता तिच्याकडे पुरे बारा दिवस होते. या बारा दिवसांचा तिने व्यवस्थित प्लान तयार केला. तिने ठरवल्याप्रमाणे दिवसभरातला आठ ते दहा तासांचा वेळ ती कार्यक्रमाच्या तयारीसाठी देत होती पण उरलेल्यातला खूपसा वेळ तिने स्वतःसाठी राखून ठेवलेला. तिचं स्वतःचं मन तिला स्वतःला समजून घ्यायचं होतं. तिनं ठरवलं होतं की या दिवसांत त्याच्याशी कितीही वाटलं तरी स्वतःहून संपर्क साधायचा नाही.

आता ती तिच्या स्वतःच्या खाजगी वेळात स्वतःलाच पारखून घेऊ लागली. तिला आठवत होती तिची त्याच्या ऑफिसातली पहिली भेट. त्याच्या स्वभावाची झालेली ओळख, कोसळून पडलेल्या तिच्या अहो-जाहोच्या भिंती, तिचं त्याच्याशी सुरू झालेलं मनमोकळं बोलणं आणि त्याच्या बरोबर हजेरी लावलेले वेगवेगळे कार्यक्रम. तिला आश्चर्य वाटत होतं की हा सगळा काळ उण्यापुर्‍या चार-सहा महिन्यांचा आहे. येवढ्या कमी काळात त्यांच्यात खूपच दाट मैत्री निर्माण झाली होती. सहाजिकच होतं, कारण तिला भरपूर मित्र-मैत्रिणी असले तरी एकूणच ती बरीच चूझी होती. तिच्या डोक्याने व्यवस्थित पारख केलेली व्यक्तीच तिच्या जवळ येऊ शकायची आणि त्याला बराच वेळ लागायचा. मग या चार-सहा महिन्यांच्या काळात काय झालं असावं याचा ती विचार करू लागली. तिने प्रत्येक भेटीचा माग काढायचा प्रयत्न सुरू केला.

तिला आठवलं, तिची त्याच्या ऑफिसातली दुसरीच भेट, पहिल्या भेटीनंतर आठवड्याने. तिने काहीशी अचानकच पूर्वसूचना दिलेली नसूनही ती ऑफिसमध्ये आल्यावर थोड्या वेळातच त्याने त्याची कामं हातावेगळी केली आणि तिच्यासोबत बोलायला लागला. बोलताबोलता तिने त्याला तिला हवं असलेल्या एका पुस्तकाची माहिती दिली जे सध्या बाजारात उपलब्ध नव्हतं. त्याने तिला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि तो बाहेर गेला. साधारण पंधरा मिनिटात तो परतला ते तिला हवं असलेलं पुस्तक घेऊनच. तिला कळलंच नाही की त्याच्याकडे ते पुस्तक आलं कसं? तेव्हा तिला पहिल्यांदा समजलं की त्याच्याकडे स्वतःचं चांगल्या चांगल्या विषयांच्या पुस्तकांचं कलेक्शन आहे आणि ते पुस्तक त्याचं स्वतःचं होतं.

तिची त्या नंतरची त्याच्याशी भेट नंतरच्या रविवारीच त्याच्या घरी झाली. त्याच्या ऑफिसपासून पाचच मिनिटांवर त्याचं घर होतं आणि ती त्याची पुस्तकं पहायला त्याच्या घरी आली होती. तिला त्याचं पुस्तकांचं कलेक्शन खूपच आवडलं. त्याने पुस्तकंही एखाद्या लायब्ररीतल्यासारखी व्यवस्थित ठेवलेली, अगदी विषयवार. त्यातही तिला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याने स्वतः ती पुस्तकं वाचलेलीही होती. त्याला खूपसे संदर्भ खुलासेवार माहित होते आणि हे तिच्या दृष्टीने जास्त अचंबित करणारं होतं कारण बरेचदा पुस्तक कलेक्टर्स सगळी पुस्तकं वाचतातच असं तिला जाणवलं नव्हतं. मग त्याने तिला संध्याकाळी त्याच्या आवडत्या पुस्तकांच्या दुकानात नेलं. अशा ठिकाणी ती त्या आधी कधीच गेलेली नव्हती. तिथे तिला खूप चांगली चांगली पुस्तकं हाताळायला मिळाली. त्यानेही पुस्तकांविषयी, वेगवेगळ्या लेखकांविषयी, त्याच्या आवडींविषयी, आवडत्या पुस्तकांविषयी बरीच माहिती दिली. त्यानंतर तो तिला जवळच्या चांगल्या उपहारगृहात घेऊन गेला. थोडी न्याहरी आणि गरम गरम वाफाळत्या कॉफीच्या कपाबरोबर तिथेही त्यांच्या गप्पा रंगल्या. तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात संस्मरणीय अशी ती संध्याकाळ होती आणि ती त्याने घडवून आणली होती. त्या रात्री तो तिला तिच्या घरापर्यंत सोडायला आला होता. त्या वेळी तिला पहिल्याने असं वाटलं होतं की तिच्या कुठल्याही अडचणीसाठी यापुढे अशी एक व्यक्ती निश्चित आहे जी काहीतरी तोड नक्की काढू शकेल.

त्यानंतरची त्यांची भेट एका नाटकाच्या निमित्ताने झाली. सकाळी सकाळी तिने फोन केला असताना त्याने एका चांगल्या नाटकाबद्दल सांगितलं आणि त्याचा प्रयोग त्याच दिवशी असल्याचंही कळवलं. मग विद्यापीठातले तिचे सकाळचे वर्ग आटोपून ती परस्पर नाट्यगृहात पोहोचली. तोपर्यंत त्याने तिकिटं काढून ठेवलेली होती. मग त्यांनी ते नाटक बघितलं. तिने आधीही नाटकं पाहिलेली, पूर्वी नाटकांमधूनही तिने स्वतः कामं केलेली पण तिचा तो अनुभव किती तोकडा होता याची तिला ते नाटक पाहिल्यावर जाणीव झाली. नाटकाची संहिता, संवाद, दिग्दर्शन आणि त्यातल्या नटांची कामं तिचं अनुभव विश्व फार व्यापक करून गेले होते. नाट्य या कलाप्रकारातल्या एका वेगळ्याच आयामाची, ताकदीची तिला त्या दिवशी ओळख झाली होती. तिला अशाप्रकारचा नाट्यानुभव देण्याचं संपूर्ण श्रेय तिने तेव्हा त्याला दिलेलं होतं. तिला पूर्ण कल्पना होती की हे केवळ त्याच्यामुळेच आज ती अधिक अनुभवसंपन्न झाली आहे.

नाटकाचा तो अनुभव घेतल्यानंतर ते दोघे जवळच्या रस्त्यावरून चालत जात असताना तीच बोलत होती. आपल्या मनामध्ये ते नाटक पाहिल्यानंतर निर्माण झालेल्या सगळ्या भावना ती त्याच्याकडे बोलून दाखवत होती. तिला त्या विषयावर काय बोलू आणि काय नको झालेलं. मग त्याने शक्य तेवढा तिच्या भावनांचा निचरा होऊ दिला आणि तिला तिच्या घरापर्यंत सोडलं होतं.

त्यापुढली त्यांची भेट तिनेच ठरवलेली. जवळच्या चित्रपटगृहात तिचा ज्या कलाप्रकाराशी संबंध होता त्यातील एका कलाकाराच्या जीवनावरचा चित्रपट लागला होता आणि तिला तो त्याला दाखवायचा होता. त्याप्रमाणे तिनेच ति़किटं काढून त्याला चित्रपटगृहाशी बोलावलं. पण तो चित्रपट इतका फालतू निघाला की त्यानंतर खूप वेळ ती आणि तो दोघेही त्या चित्रपटाच्या लेखन, संवाद, दिग्दर्शन आणि नटांच्या कामाची लक्तरं काढत बसले. तेव्हाही तिला त्याच्यातल्या कलाकाराची जाणीव झाली. एखादा साधा प्रसंगही तो अशा तर्‍हेने खुलवून सांगायचा की तिला त्यातलं नाट्य अगदी सहज समजून यायचं.

अशा सगळ्या भेटींचा गोषवारा तिने आपल्या मनाशी केला. तिला या कार्यक्रमाच्या नावाने मिळालेल्या वेळेचा तिने स्वतःच्या भावना समजून घेण्यात सदुपयोग करून घेतला. ती एका निश्चित मतापर्यंत येऊन पोहोचली होती की तिला त्याचा सहवास आवडत होता, तिच्या इतर मित्र-मैत्रिणींपेक्षा आता तो तिला जास्त जवळचा वाटत होता आणि दिवसभरातल्या गोष्टी त्याच्याशी शेअर केल्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं, त्याच्याशी मैत्र जुळल्यानंतर तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता, त्याच्यामुळे तिचं अनुभवविश्व अधिक समृद्ध झालं होतं आणि ज्याप्रकारचं आयुष्य तिला भविष्यात अपेक्षित होतं त्याचा काहीसा अनुभव तिला त्याच्याबरोबर आलेला होता. अखेर तिच्या मनाने कौल दिला ज्याची तिला भीती होती. तिला त्या दिवसांत पहिल्याने जाणवलं की तिला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटतंय. आपलं त्याच्यावर प्रेम जडलंय या कल्पनेने तिला अगदी मोहरून गेल्यासारखं वाटलं. आतमध्ये कुठेतरी काहीतरी वेगळंच झाल्यासारखं वाटत होतं. एक अवर्णनीय असा आनंद तिला झाला होता. ही जाणीव जेव्हा पहिल्याने तिला झाली तेव्हापासून दोन दिवस ती एका वेगळ्याच जगात वावरत होती.

इतकं सगळं होत असूनही तिने त्यावेळेला स्वतःवर व्यवस्थित नियंत्रण राखलं होतं. तिने केलेल्या निश्चयापासून ती ढळली नव्हती. तिने त्याच्याशी संपर्क साधला नव्हता. तिने स्वतःला शांत करून एकच प्रश्न विचारला. आज आपली जी ही भावना आहे, तशीच त्याची आहे का? त्याने कधी आपल्याला तशी एखादी तरी खूण दाखवलीय का? अजूनपर्यंत तरी त्याची भावना निखळ मैत्रीचीच आहे. इतक्या दिवसात त्याने कुठेही असभ्य वर्तन केलेलं नाही. मग आपल्याबद्दल त्याची काय भावना आहे हे आपल्याला कसं समजावं? तो स्वतः सगळ्यांशीच चांगलंच बोलतो. तसाच आपल्याशीही बोलत असेल तर? त्याप्रकारे तिने आपल्या मनाला चांगल्याप्रकारे आवर घातला. दरम्यान कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्याने तिला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. एकूणच ती वेळ गडबडीची असल्याने शुभेच्छांचा स्वीकार करून तिने चटकन् फोन बंद केला होता मात्र तत्पूर्वी कार्यक्रमानंतरच्या दिवशी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटण्याचं ठरल्याचं त्याला कळवलंच होतं. तिचा कार्यक्रम तिच्या गुरूंनी चांगल्यापैकी नावाजला. तिच्या कला-सर्कल मध्ये तिचं खूप कौतुक झालं. कार्यक्रमाचं स्वरूप काहीसं खाजगी असल्याने तिने इतर कुणालाच बोलवलं नव्हतं, पण त्याचा गोषवारा त्याला सांगावा असं मात्र तिला नक्की वाटत होतं.

आपल्या मनाची उत्फुल्लित अवस्था, मेहनतीने सादर केलेला आणि यशस्वी झालेला कार्यक्रम आणि त्याचं मन जाणण्याची जिज्ञासा अशा पार्श्वभूमीवर आज ती त्याच्या ऑफिसात त्याला भेटायला जात होती.

क्रमश:

फ्लाय मी टू द मून.... (३)

तो
-----

नुकतीच कामं त्याने हातावेगळी केलेली आणि थोडा रिलॅक्स बसलेला तर दारात चक्क तिला बघितलं. थोडा गडबडलाच होता तो! काहीसं अनपेक्षितंच होतं तिचं येणं त्याच्यासाठी. तरी सावरून उभं राहत त्याने तिचं स्वागत केलं. तिने येताना पिवळ्या जर्बेराच्या फुलांचा गुच्छा आणलेला. त्याने प्रश्नार्थक नजरेने, तिने आणलेल्या फुलांच्या बुकेकडे नि तिच्याकडे पाहिलं. त्यावर तिने हसून म्हण्टलं, "सेमिनारच्या दिवशी तुमचं कार्ड देऊन ऑफिसात यायचं आमंत्रण दिलेलं तुम्ही, ते विसरलात तर नाही ना? त्या दिवशी तुम्ही सकाळपासून इतकी मदत केलीत मला, पण एका शब्दाने साधं थँक्यूही म्हणू शकले नाही मी, त्याच्या थोड्याफार भरपाईचा प्रयत्न आहे हा." असं म्हणत तिने तो फुलांचा बुके त्याच्या हातात दिला. त्याने हसून ती फुलं फुलदाणीत नीट लावली आणि तिला म्हणाला, "अगं, फार कुठे काय मदत वगैरे केली? तुझं आपलं उगाच काहीतरी."

त्यानंतर चांगले तास-दिड तास ते दोघेही गप्पा मारत बसलेले. विषय तसे साधेच होते. त्याने स्वतःची पार्श्वभूमी सांगितली आणि तिने तिची. थोडीफार करीअरची चर्चा, थोडीफार त्यांचे अभ्यासाचे आणि इतर आवडीचे विषय आणि अर्थातच विद्यापीठाचा विभाग नि विभागातील शिक्षक. वेळ कसा गेला दोघांनाही कळलं नाही. अगदी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी भावना दोघांच्याही मनात आली. त्यामुळे तिची ही ऑफिस भेट पहिली आणि अखेरची ठरली नाही. जेव्हा जेव्हा ती त्या परिसरात यायची तेव्हा तेव्हा आधी फोन करून तो कामात नसेल तर ऑफिसात यायची. थोडा वेळ थांबायची. तो कामात असेल तर बरेचदा तो कामातून मोकळा होईपर्यंत काही पुस्तक वगैरे वाचत बसायची. मग त्याची भेट घेऊन निघायची. हळू हळू त्यांच्या ऑफिसबाहेरही भेटी होऊ लागलेल्या. कधी दुपारच्या जेवणासाठी तर कधी संध्याकाळच्या फुटकळ खाबुगिरीसाठीही त्यांचं भेटणं होऊ लागलं. आवडती नाटकं, आवडते चित्रपटही ते एकत्र बघायला जाऊ लागलेले. त्यांच्या मैत्रीची वीण जशी घट्ट होऊ लागल्याची जाणीव त्याला येऊ लागली कारण ती अहो-जाहो वरून अरे-तुरे वर उतरली होती आणि त्याच्याशी अनेकदा हक्काने काही गोष्टी बोलायची, सांगायची. आता त्याला जाणवू लागलेलं की त्याच्यात आणि तिच्यात केवळ मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक घट्ट नातं निर्माण झालंय. पण त्याचवेळी त्याला भीतीही वाटायची. त्याला जे तिच्याबद्दल वाटतंय ते तिला वाटत नसेल तर त्याच्या कोणत्याही आतेतायी कृतीमुळे, या क्षणाला जे एक सुंदर नातं तयार झालंय त्याचाच विध्वंस होईल.

गेले काही दिवस तो याच विचारात होता. एका कार्यक्रमामुळे आदला आठवडा ती खूपच व्यस्त होती आणि त्याआधी कार्यक्रमाची तयारी म्हणूनही ती व्यग्र होती. जवळपास पंधरा दिवसांनी ते भेटणार होते. त्याचं एक मन त्याला कृती करायला सांगत होतं तर एक मन संयमाने वागायला सांगत होतं. या द्वंद्वात जणु तोच धारातीर्थी पडत होता. त्याचा असा विचार चालू असतानाच ती आली. नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसातल्या सोफ्यावर पर्स टाकून पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. त्याने तिच्या कार्यक्रमाबद्दल विचारलं आणि मग बराच वेळ ती त्याबद्दल सांगत राहिली. अगदी डिटेलमध्ये, प्रत्येक बाबींचा व्यवस्थित विचार करून, अगदी अमूक एक निर्णय का घेतला त्याच्या पार्श्वभूमी आणि कारणमीमांसेसकट. त्या दिवशी तिने घरून दोघांनाही पुरेल असा डबा आणला होता. मग त्यांनी दुपारचं जेवण ऑफिसातच घ्यायचा निर्णय घेतला.

जेवता जेवता त्यांचं बोलणं अनाहूतपणे दोघांच्या आवडत्या विषयाकडे गेलं. संगीत. बोलता बोलता संदर्भ जॅझ आणि तत्कालीन स्विंग संगीताकडे आला आणि त्यातल्या कृष्णवर्णीयांच्या योगदानाकडे गेला. ती हिरहिरीने ते संगीत कृष्णवर्णीयांचच आहे आणि त्यात गौरवर्णीयांचं योगदान गेल्या ५० वर्षांपूर्वीपर्यंत अगदी कमी आहे, असं प्रतिपादन करू लागली. तिच्या सवयीने ती वेगवेगळ्या संगीतकारांचे संदर्भ देत होती, त्यांची गाणी सांगत होती, त्यांच्या कारकिर्दीची वर्ष सांगत होती. नेहमीप्रमाणेच तो तिचा अगदी शांतपणे प्रतिवाद करू लागला. जॅझ संगीत कृष्णवर्णीयांच्या अभिव्यक्तिचा स्रोत असलेलं हे संगीत असलं तरी त्यात कृष्णेतरांनीही योगदान दिलेलं आहे हे तो अनेक प्रकारे तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचं जेवण संपलं तरी चर्चा सुरूच राहिली.

या विषयावरच्या सगळ्या मुद्द्यांवर उहापोह झाल्यावर त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि एक एक कृष्णेतर संगीतकाराचं नाव घेऊन त्यांच्या जॅझ रचना तिला ऐकवू लागला. त्यातल्या काही तिला माहित होत्या तर काही नव्यानेच समजत होत्या. तरी तिचा मुद्दा ती मागे घेत नव्हती कारण तिच्यामते सिनात्रा जॅझपेक्षा पॉप संगीत जास्त गायला होता. मग त्याने त्याचा हुकुमाचा पत्ता टाकला. त्याने तिला फ्रँक सिनात्राची गाणी ऐकवायला सुरूवात केली. त्याबरोबर पूर्ण चर्चेचा नूरच पालटायला लागला आणि दोघेही जॅझ संगीताचा आनंद घेऊ लागले. पुढे जॅझच्या रसग्रहणाकडेच ते वळले. तासभर यातच गेला तेव्हा त्याने तिला म्हण्टलं, "बघ, हे सिनात्राचं गाणं काही जॅझ नाही पॉपच आहे पण गेले काही दिवस तुला ऐकवायचा विचार करत होतो. हे ऐकून तुला काय वाटतं ते मला अगदी स्पष्ट सांगायचं बरं का, सांगशील?" त्यावर ती म्हणाली, "अरे, आधी ऐकवशील तर खरं मग सांगते, ठीक?" "ठीक," असं म्हणून त्याने ते गाणं सुरू केलं आणि तो तिच्या प्रतिक्रिया बघू लागला.

क्रमश: 

Friday 25 November 2011

फ्लाय मी टू द मून.... (२)

ती - भाग २
---------------
आपल्या भिरभिरणार्‍या विचारांना सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच शेवटचं प्रेझेण्टेशन संपलं. त्याच्या टाळ्यांचा आवाज विरतोय न विरतोय तोच सूत्रसंचालकांनी विद्यार्थी-प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी तिला मंचावर आमंत्रित केलं. आपलं नाव ऐकताच कधी नव्हे ते तिला छातीत धडधडल्यासारखं झालं. अंगाला सूक्ष्मसा कंप सुटला आणि घशाला कोरड पडल्यासारखी झाली. तिची धास्ती वाढली. उपस्थित लोकांना तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत ते तिच्या नावाच्या उल्लेखाने झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटातून अधोरेखितच झालं होतं. हलक्याशा लटपटत्या पायाने ती मंचावर चढली आणि पोडियमजवळ उभं राहून तिने उपस्थित प्रेक्षकांकडे एक नजर टाकली. संपूर्ण प्रेक्षागाराचे डोळे तिच्यावर रोखले गेले होते अणि ते तिच्या बोलण्याची प्रतीक्षा करत होते पण तिचे शब्द मात्र घशातच अडकल्यासारखे झालेले.

काय करावं हेच तिला सुचत नव्हतं. मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या पोडियमजवळ उभी असलेली ती चेहर्‍यावर कोणताही ताण न दाखवता प्रेक्षकांकडे बघत असताना तिची, तिच्या उजव्या बाजूला सभागृहाच्या मागच्या रांगेतल्या टोकाच्या खुर्चीवर बसलेल्या त्याच्याशी नजरभेट झाली. त्याचं आश्वासक हसणं बघताच तिचा ताण कुठच्याकुठे निघून गेल्यासारखं झालं. तिने मनाशीच ठरवलं, आता जे काही सांगायचंय, समजवायचंय ते यालाच सांगायचं, समजवायचं. मी भले असेन विद्यार्थी प्रतिनिधी पण प्रेक्षक प्रतिनिधी हाच. ह्याला समजलं तर सगळ्यांना समजलं. तसा हा पण हुशारच आहे, त्याला समजलंय हे मलाही नक्कीच कळेल आणि आत्मविश्वासाने तिने बोलायला सुरूवात केली.

मुद्देसूद, संशोधकांच्या प्रेझेण्टेशनमधल्या वैशिष्ठ्यपूर्ण वाक्यांचा उल्लेख करून, नव्या कल्पनांचा आढावा घेऊन, काही ठिकाणी आक्षेप घेऊन, काही आक्षेपांचे निराकरण करून तिच्या मनोगताची वाग्गंगा प्रवाहित होत होती. त्याच्या चेहर्‍यावरून तिला सहजच कळत होतं की ती जे काही बोलत होती ते त्याला समजतंय आणि पटतंय. क्षणाक्षणाला तिचा आत्मविश्वास वाढत होता, विचार स्पष्ट होत होते, शब्दावरचा जोर वाढत होता, वक्तृत्वाला बहर येत होता, जणु आपल्या मत-प्रदर्शनाने तिने सगळं सभागृहच काबिज केलं होतं. पण तिच्या विचारांचा केन्द्रबिंदू तोच होता. ती तिची मतं फक्त आणि फक्त त्यालाच सांगत होती. भरलेलं सभागृह जणु अस्तित्त्वातच नव्हतं. आभारप्रदर्शनाचं शेवटचं वाक्य म्हणून तिने आपलं मनोगत संपवलं आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. तिने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलेलं आणि तिच्या प्रतिभेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं. मंचावरून खाली उतरताच तिचं अनेक पाहुण्या संशोधकांनी उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल अभिनंदन केलं. तिच्या शिक्षकांनीही तिचं कौतुक केलं. सेमिनारचा समारोप समारंभ सुरू झाला आणि ती शांतपणे दरवाज्याजवळच्या एका कोपर्‍यातल्या खुर्चीवर विसावली.

त्या कोपर्‍यात तिला आवश्यक ती विश्रांती मिळणार होती. तो जिथे बसलेला तिथे तिने मान वळवून बघितलं पण त्याची जागा रिकामी होती. एक छोटासा सुस्कारा सोडून ती खुर्चीवर मागे रेलली आणि तिने डोळे मिटले. समारोप समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार वगैरे कार्यक्रम सुरू होता, त्यात सध्या तिला काहीच रस नसल्याने ती आरामात होती. येवढ्यात तिला जाणवलं, कुणीतरी हलकेच तिच्या शेजारच्या खुर्चीमध्ये येऊन बसलेलं. तिने डोळे उघडून पाहिलं, तिच्या शेजारी हातात वाफाळता कॉफीचा ग्लास घेऊन तोच बसलेला. ती चटकन् नीट बसली आणि त्याच्याकडे बघून हलकसं हसली. ती काही बोलणार तोच तिच्या हातात गरम गरम कॉफीचा ग्लास देत तो हसून म्हणाला, "आत्ता या क्षणाला तुला ही कॉफीच आवडेल. घे! बाकी मस्त झालं तुझं भाषण. चक्क मलाही समजलं. मी विभागात तसा नवखाच आहे, डिप्लोमाला दाखल झालोय यंदा. हे माझं कार्ड. शहराच्या मध्यवर्ती भागातच माझं ऑफिस आहे. कधी त्या भागात येणं झालं तर नक्की माझ्या ऑफिसात तुझी पायधूळ झाड, काय? कॉफी गरम आहे, लगेच घे, घसाही शेकून निघेल छानपैकी!" प्रत्युत्तरादाखल ती थँक्स म्हणतेय तोवर तो समोर दिसलेल्या विभाग-प्रमुखांच्या दिशेने गेला.


विभाग-प्रमुखांशी बोलणार्‍या त्याच्याकडे बघतच ती कॉफीचा आस्वाद घेऊ लागली. विभाग प्रमुखांशी बोलून दरवाज्यातून बाहेर पडता पडता त्याने मागे वळून तिच्याकडे निरोपाचा हात दाखवला आणि त्यावर तिनेही प्रतिसाद दिला. तो निघून जाताच तिचं लक्ष त्याच्या व्हिझिटिंग कार्डाकडे गेलं. त्याचं नाव वाचता वाचता तिला लक्षात आलं, आज त्याने तिला खूपच मदत केली होती. सभागृहात सोडण्यापासून ते भाषणाच्या वेळेपर्यंत, पण तिने त्याबद्दल एकदाही त्याला धन्यवाद दिले नव्हते. कार्डावरचा पत्ता बघून येत्या काही दिवसात त्याच्या ऑफिसात जाण्याचा ती विचार करू लागली. आता कार्यक्रम संपलेला असल्याने ती पुन्हा आपल्या मैत्रिणींच्या गराड्यात होती पण तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. दिवसभरातल्या वेगवेगळ्या वेळेतला त्याचा चेहराच तिला सारखा आठवत होता. त्याची मदत, त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं आणि जाता जाता त्याचं निरोपाचं हात दाखवणं, सारं सारं पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यापुढे येत होतं. हातातलं कार्ड तिने आपल्या पर्स मध्ये ठेवलं आणि तिने निर्णय घेतला, आता त्याचे आभार मानायला त्याच्या ऑफिसातच जाऊन यायला हवं. असा निर्णय होताच ती नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सामील होऊन गेली कारण आता तिच्या कृतीचा आराखडा तिच्या डोक्यात तयार होता.

क्रमशः

फ्लाय मी टू द मून.... (१)

'तो' आणि 'ती'
------------------
प्रथितयश आणि दिडशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असणार्‍या विद्यापीठाचा परिसर आणि त्यातला तितक्याच वर्षांची परंपरा असणारा विभाग. विभागान्तर्गत सुरू असलेले अनेक विषयांचे पाठ्यक्रम आणि त्यांचे त्यांचे वर्ग. गजबजलेला माहौल आणि अशा गजबजलेल्या ठिकाणी असतात ती दोघं, 'तो' आणि 'ती'.
ती, विभागामधली टॉपर, आधीच्या सगळ्याच परीक्षांमध्ये अव्वल! एक्स्ट्राकरिक्युलर्स मध्येही आघाडीवर, वक्तृत्व-स्पर्धा, नाट्य-स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा यात बक्षीसं मिळवणारी. कुशाग्र बुद्धी असलेली, त्या बुद्धीचा योग्य उपयोग जाणणारी आणि तो तसा नेहमीच करणारी. स्वतंत्र विचारांची आणि ते विचार योग्य शब्दात आणि कृतीत व्यक्त करणारी. अत्यंत देखणी, विभागातच नाही तर विद्यापीठातही उठून दिसणारी. मैत्रिणींच्या गराड्यात वावरणारी ती होती मनस्वी कलाकार, पण कलेलाही शास्त्राच्या काटेकोरपणे जोपासणारी.
तो, तसा विभागात नवखाच. विभागाच्या विषयाशी संबंधित पण स्वतंत्र शास्त्राचा पदवीधर व्यावसायिक. स्वतःचा खाजगी व्यवसाय सांभाळून आवडत्या विषयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी छोटा, वार्षिक अभ्यासक्रम घेऊन विभागात दाखल झालेला. बहु आयामी व्यक्तिमत्त्व असलेला, व्यासंगी, वाद-विवादपटु आणि वक्ता. देखणा नाही म्हणता येणार पण सुदृढ आणि वर्षानुवर्षांच्या व्यामायाने कणखर, रफ-टफ बनलेला. सृजनशील, अगदी आपल्या शास्त्रालाही कलेप्रमाणे व्यवसायात योजणारा.

ती दोघं वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असल्याने एकत्र शिकायला नव्हते, त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष ओळख असायचेही कारण नव्हते पण एकाच विभागामध्ये विद्यार्थी असल्याने काहीशी तोंड-ओळख होती. त्यातही इतर विद्यार्थ्यांपेक्षा वयाने सिनिअर असल्याने 'तो' तसा कुणाच्याही लक्षात यायचाच. तिच्याबद्दल माहिती नसणारा विद्यापीठातही विरळाच!

..............................
ती - भाग १
----------------

असाच एक रविवार. विभागिय सेमिनारचा दिवस. विद्यापीठात शुकशुकाट पण विभागात भारी वर्दळ. दोन दिवसांच्या सेमिनारचा समारोपाचा दिवस. आज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सेमिनारमध्ये 'ती' मनोगत सादर करणार होती मग फारशी सवय नसतानाही 'ती' साडी नेसून आलेली. अधीच उशीर झालेला आणि विद्यापीठात येणार्‍या बसेस रविवारच्या बंद. गेट पासून चालत येताना साडी सांभाळून भरभर चालणं कठीण होत असताना तिची चिडचिड होत होती आणि त्यातच मनोगत सादरीकरणाचं दडपण होतंच. इतक्यात शेजारी बाईक येऊन थांबली. निर्मनुष्य परिसरामुळे तिची थोडी घबराटच उडाली पण तेवढ्यात हेल्मेटची काच वर उचलली गेली आणि तिला 'तो' दिसला. त्याने हसून विचारलं, "उशीर झालाय ना, चल बस, जाऊ पटकन!"

एरवीही पंधरा-वीस मिनिटं चालायला लागणार्‍या अंतराला आज साडीमुळे जास्तीच वेळ लागला असता म्हणून तिने त्याला होकार तर दिला पण साडीमुळे ती एका बाजुला पाय घेऊन बसली. एरवीची दोन्ही बाजूंना पाय सोडून बसण्यातली सुविधा तिला आज मिळाली नाही. मग तिला सतत पडण्याची भीती वाटत राहिली. ती पुरेशी व्यवस्थित बसल्याचं समजल्यावर त्याने सफाईदारपणे बाईक विभागाच्या दिशेने सोडली. वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताना मधूनच तिला तिचा बॅलन्स जातोय की काय असं वाटलं. आधारासाठी तिने त्याचा खांदा धरला. पण लगेच सोडला. बाईक वेगात पुढे जात होती. तिच्या मनात येऊ लागलं, आता पुढच्या वळणापासून स्पीड ब्रेकर्स आहेत. आत्ताच सावरून बसायला हवं. कुणास ठाऊक याच्या मनात काय आहे. स्पीड ब्रेकर आला आणि त्याने बाईकची गति हळूवारपणे नियंत्रित केली आणि पार झाला. पुढचे तिन्ही स्पीड ब्रेकर्स असे पार झाले जणु नव्हतेच ते तिथे. मग तिचा बाईकच्या मागे हँडलला धरलेला हातही सैलावला. आता तिला स्वतःलाही सैलावल्यासारखं वाटू लागलं. पुढच्या तीन-चार मिनिटात विभागाच्या सेमिनार हॉलच्या बाहेर बाईक थांबली आणि त्याच्या खांद्यांचा आधार घेत ती खाली उतरली.

साडी सावरून त्याच्याकडे बघत ती थँक्स म्हणतेच आहे की त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडताना तिने ऐकलं, छान दिसतेयस तू आज साडीत! पळ लवकर वाट बघत असतील तुझी. मी येतो स्टँडवर बाईक लाऊन, आणि झटक्यात एक वळण घेऊन तो गेला. तिला आलेलं बघताच तिच्या मैत्रिणींनी तिला गराडा घातला आणि सगळ्यांबरोबर ती सेमिनार हॉल मध्ये गेली. सेमिनार दरम्यान तिने दोन-तीनदा मागे वळून तो कुठे दिसतोय का ते पाहिलं पण गर्दीत तिला तो कुठे दिसलाच नाही. ती ही नंतर विविध संशोधन विषयांच्या प्रेझेंटेशन्समध्ये बुडून गेली.

प्रत्येक पेपरच्या प्रेझेन्टेशनदरम्यान अभ्यासूपणे तिने स्वतःचे असे मुद्दे काढले होते, तशी सवयच होती तिला. कुठलीही कृती करण्यापूर्वी तिच्या डोक्यात तिचा अ‍ॅक्शन-प्लान तयार असायचा. आज तर अख्ख्या विभागाच्या विद्यार्थ्यांना ती देशभरातील मातब्बर संशोधकांसमोर रीप्रेझेण्ट करत होती. त्यामुळे मनोगतात व्यक्त करण्याची वाक्यच्या वाक्य तयार करण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. आज चुकूनही चुकून चालणार नव्हतं. विभागप्रमुखांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या तिच्याकडून. या सगळ्यांचंच काहीसं दडपण आलं होतं तिला आणि ती ते कुणाशी शेअर करण्याच्या परिस्थितीतच नव्हती. तिच्या मैत्रिणी समारोपाच्या समारंभाची तयारी करण्यात व्यस्त असल्याने तिला या दडपणाला स्वतःच तोंड देणं भाग होतं.

क्रमशः

Friday 18 November 2011

अथातो प्राकृत जिज्ञासा। - ५


आता इंद्राने निश्चित केलेली भाषा हीच प्रकृति मानावी या माझ्या मताकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो. माझ्या या म्हणण्याला आधार देण्याच्या दृष्टीने काही विवेचन करण्याचा प्रयत्न करतो.
भाषिक दृष्टीने संस्कृत आणि प्राकृत यांचं पौर्वापर्य हा नेहमीच वादाचा विषय झालेला आहे. कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा तुलनात्मक अभ्यास केला जातो तेव्हा त्यातील शब्दांचं वर्गीकरण तीन प्रकारे केलं जातं. हे तीन प्रकार आहेत
१. तत्सम 
२. तद्भव आणि 
३. देश्य
१. तत्सम शब्द म्हणजे सामान्यतः जे दोन्ही भाषांमध्ये सारखेच असतात.
२. तद्भव म्हणजे सामान्यतः एका भाषेतून दुसर्‍या भाषेत गेलेले आणि त्या दरम्यान त्यांच्यात काही बदल झालेले. यामध्ये बहुदा एका भाषेतल्या त्या शब्दाचा मूळ दुसर्‍या भाषेतला शब्द ओळखणं सहज शक्य होतं.
३. देश्य म्हणजे सामान्यतः एकाच भाषेत असलेले पण दुसर्‍या भाषेत न सापडणारे.
तत्सम आणि तद्भव हे दोन्ही शब्द प्रकार सहज समजू शकतात. अडचण होते ती या देश्य शब्दांच्या बाबतीत. हे शब्द (नामे आणि धातु) यांना आदेश होऊन (नवं अक्षर वा शब्द जोडला जाऊन) तयार झालेले असतात असं साधारणपणे लक्षात येतं. प्राकृताच्या बाबतीत हे देश्य शब्द मूळ संस्कृत नाम आणि धातुंना आदेश लागून तयार झालेले आहेत असं सांगतात. या मतानुसार कोणत्याही भाषेचे या मार्गाने सुलभीकरण करून भाषा सोपी करण्याकडे मानवांची प्रवृत्ती असते असं प्रतिपादन केलं जातं. म्हणूनच संस्कृतचं सुलभीकरण होऊन प्राकृत झाल्याचं सांगितलं जातं. पण हे पूर्णसत्य नाही कारण देश्य शब्दांच्या बाबतीत हे समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही.
प्राकृत भाषेतील देश्य शब्दांची विपुल संख्या हे प्राकृताच्या अबंदिस्तपणाचे लक्षण आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येतं हे माझं वैयक्तिक मत आहे. देश्य हा शब्दच जो अर्थ दाखवतो त्याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं. देश्य म्हणजे देशविशिष्ट. ज्या देशामध्ये म्हणजे परिसरामधल्या मानव-समूहामध्ये एखादी भाषा बोलली जाते, त्या स्थानाशी आणि तिथल्या परिस्थितीशी निगडीत नवीन शब्दांची भर त्या भाषेत नेहमीच पडत असते. बोली भाषा स्वरूपामध्ये असे अनेक शब्द भाषांमध्ये दाखल होत जातात तसेच अनेक शब्द भाषेतून न वापरण्याने बाहेर काढले जात असतात. देश्य शब्दांचं आवागमन भाषेच्या प्रवाहीपणाचं लक्षण आहे. असं असल्यामुळे देश्य शब्द संस्कृत नाम-धातुंना आदेश होऊन बनण्याने ते संस्कृतोद्भव होत नाहीत आणि प्रत्येक देश्य शब्दाचं संस्कृतोद्भव शब्द म्हणून स्पष्टीकरण मिळत नसल्याने तो त्या प्राकृतातला मूळ शब्द बनत नाही जो संस्कृत भाषेच्या उद्भवापूर्वीही असेलच कारण तो तितका प्राचीन आहेच असं आपल्याला नेहमीच म्हणता येत नाही. देश्य शब्दांची निर्मिती ही एक सतत विकसित होणारी प्रक्रिया असल्यामुळे तिचा पौर्वापर्याशी संबंध लावणं अनावश्यक होईल असंच मला वाटतं.
या विवेचनानंतर संस्कृत-प्राकृत संबंधाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न अनुत्तरितंच राहतो. त्यामुळे याचं उत्तर शोधण्यासाठी अपल्याला पुन्हा एकदा अतिप्राचीन अशा वेद वाङ्मयाकडेच जावं लागतं. वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासकांचं असं मत आहे की मूळ वेदातल्या ऋचांमध्ये जी भाषा वापरलेली आहे, तिच्यात आणि प्राकृतात बरेच साम्य आहे. या साम्याच्या अनुषंगानेही प्राकृत भाषा अभिजात संस्कृत भाषेच्या पूर्वीची मानली जाते. परंतु हे म्हणनं किती योग्य आहे त्याचा उहापोह करण्यापूर्वी ही साम्यस्थळे पहाण्याचा प्रयत्न करू या.
१. वैदिक संस्कृत भाषेमध्ये प्राकृताप्रमाणेच संयुक्त व्यंजनांमध्ये स्वर घुसवलेला आढळतो.
जसं स्वर्ग => सुवर्ग, तन्व => तनुव, त्र्यंबक => त्रियंबक
२. तृतिया बहुवचनाची रुपं - देवेभि: ऐवजी देवेहि, ज्येष्ठेभि: ऐवजी जेट्ठेहि
३. चतुर्थी वापरण्याऐवजी षष्ठी विभक्ति वापरणं
४. विभक्तिप्रत्ययाचा लोप करणं - उच्चात् => उच्चा, नीचात् => नीचा आश्विनौ => आश्विना
५. 'ळ' चा उपयोग प्राकृताप्रमाणेच वैदिक भाषेत केलेला आढळतो - दुर्दभ => दूळभ, ईडे => ईळे
त्याचप्रमाणे अनेक प्राकृत रुपांचा वापर वैदिक भाषेमध्ये दिसतो.
अशाप्रकारे अतिप्राचीन अशा वैदिक संस्कृताशी प्राकृताचं जे साम्य दिसतं आणि त्याच वेळेला अभिजात संस्कृताशी जे वेगळेपण दिसतं हेदेखिल समजून घेणं गरजेचं आहे.
या संदर्भात वैदिक संस्कृत हे यजुर्वेदोक्त इंद्राने व्याकृत केलेल्या भाषेच्या, ज्याला यापूर्वी आपण 'प्रकृति' या नावाने संबोधलेलं आहे, तिच्या सर्वात जवळचं आहे. ही भाषा अभिजात संस्कृत, जी सध्या पाणिनीच्या व्याकरणाने बांधली आहे, ती नाहीच आहे. यामुळेच वैदिक संस्कृतचे व्याकरण निराळे शिकावे लागते. या व्याकरणाचा वापर केवळ वेदांमधलं संस्कृत समजून घेण्याकरिता होतो. त्यावरून कोणतेही नवे साहित्य निर्माण होत नाही कारण त्यासाठी पाणिनीय संस्कृत उपलब्ध आहेच की! एकदा का सद्य कालीन अभिजात संस्कृत आणि वैदिक संस्कृत निराळं झालं की प्राकृताचं वैदिक भाषेशी असलेलं साम्य, आपण आधी उल्लेखलेल्या 'प्रकृति' भाषेवरून सहजच स्पष्ट होतं.
अभिजातत्वाच्या कारणाने पाणिनी-पतंजलि आदिंच्या व्याकरणाद्वारे संस्कृत अधिकाधिक बंदिस्त झाली आणि त्यातही संस्कृत भाषेला जे धार्मिक महत्त्व मिळालं त्यामुळे ती पवित्र भाषा बनली. यामुळेच ती जशी आहे तशी जतन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिणामी तिच्यामधलं प्रवाहीपण संपुष्टात आलं. या उलट प्रकृति भाषा प्रवाही राहिली. त्यामुळे तिच्यामध्ये देश भेदाने नव्या शब्दांची भर होत राहिली आणि भारतातील वेगवेगळ्या स्थानानुसार महाराष्ट्री, शौरसेनि आणि मागधी अशा भाषांचा विकास झाला. पुढे याच भाषांपासून अर्वाचीन मराठी, हिन्दी, कन्नड अशा भाषा निर्माण झाल्या.
म्हणूनच आपल्याला असं म्हणता येतं की मूळ प्रकृति भाषेपासून वैदिक भाषा, वैदिक भाषेचे दोन विभाग, एक सद्य अभिजात संस्कृत आणि दुसरा जनसामान्यांच्या प्रकृति भाषेतून उद्भवणार्‍या प्राकृत भाषा. अभिजात संस्कृत व्याकरणबद्ध होऊन बंदिस्त भाषा बनली तर प्राकृत भाषा प्रवाहीपणामुळे सतत विकसित होत राहिल्या आणि म्हणूनच त्यांच्यातून पुढे आजच्या भारतीय भाषा उत्पन्न होऊ शकल्या.
या एकंदर विवेचनावरून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की संस्कृत आणि प्राकृत या दोघी प्रकृति भाषेपासून उत्पन्न झालेल्या सख्ख्या बहिणी आहेत आणि त्यांच्यापैकी प्राकृत भाषेचा प्रवाहीपणा टिकल्यामुळे वंशविस्तार होऊन आजच्या भारतीय भाषांची निर्मिती झाली तर संस्कृत अधिकाधिक बंदिस्तपणामुळे आपली सृजनशीलता वठवून बसली.
प्राकृत भाषेबद्दल जाणून घेण्यापूर्वी वरील प्रकारे प्रकृती भाषेचं निश्चितीकरण केल्यावर कोणत्याही उच्च-नीच अभिनिवेशाशिवाय आपण विविध प्राकृत भाषांचा आस्वाद घेण्यास मोकळे होतो.