Thursday 30 December 2021

सृष्टयुत्पत्ती-प्रक्रिया-दिग्दर्शन

पुरुष एकटाच स्वातंत्र्य उपभोगतो आहे. काही अंतरावर प्रकृती आहे. सुरूवातीला तिच्या मनाचा थांग लागत नाहीये. ती एकटीच नृत्य करतेय (इथे काहीतरी गातेय). प्रकृतीचं नृत्य पाहून (इथे गायन ऐकून) पुरुषाला तिच्याबद्दल कुतूहल वाटतं. तो ते कुतूहल शमवण्यासाठी तिच्याकडे बघतो (इथे बोलून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो) आणि पुरुष आपल्याकडे कुतूहलानं बघतोय (इथे बोलतोय) हे जाणताच प्रकृतीचे विभ्रम (इथे प्रमुख गीत) सुरू होतात. त्या अनेक कटाक्षयुक्त विभ्रमांनी बद्ध झालेला पुरुष प्रकृतीत अडकून तिच्यापाठोपाठ जाऊ लागतो, स्वतःच्याही नकळत...
सृष्ट्युत्पत्तीही अगदी अश्शीच झाली असावी का...?

Tuesday 8 June 2021

आटपाट नगरातील कहाणीच्या कवितेचं गुपित

"बुलबुल गवई कुणीं मारिला ?" चिमणा म्हणतो "मी !" "कां रे चिमण्या सांग मारिला बुलबुल तूं नामी ?" II १ II " कारण कसलें घेउन बसलां जगांत हरकामीं ? नवी धनुकली सहज पाहिली, आहे का नामी !" II २ II बोलुनि ऐसें हंसत उडाला निर्दय चिमणा तो !" "पकडुनि त्याला आणिल ऐसा कोण पुढें येतो ?" II ३ II म्हणे ससाणा, "पकडुनि त्याला घेउनि मी येतों !" आणि आणिला खराच त्यानें पकडुनि चिमणा तो !" II ४ II कबजामध्यें डोमकावळे घेती चिमण्याला, न्याय तयाचा करावयाला हंस पुढें आला II ५ II हंसें दिधली चिमण्यालागीं शिक्षा देहान्त, आणि आणिली बगळ्यानें ती क्षणांत अमलांत ! II ६ II नेउनि टाकी नदींत कवडा चिमण्याचें प्रेत सुसर माकुली ठाव तया दे अपुल्या उदरांत ! II ७ II मेलेल्या बुलबुलाभोंवतीं पक्षी मग जमले, अश्रूंनीं आपुल्या तयाला त्यांनीं भिजवीलें ! II ८ II सपक्ष गंधर्वास द्यावया शेवटला मान, सर्व विहंगां खगेश्वराचें सुटलें फर्मान II ९ II "प्रिय होतीं बुलबुलास अपुल्या फुलें गुलाबाचीं समाधि बांधा त्याच फुलांनीं प्रिय गंधर्वांची " II १० II "प्रमाण आज्ञा !" म्हणुनि उडाला पक्षिवृंद सारा, गुलाब घेउनि चोचीमध्यें आला माघारा II ११ II "तुला वाहिला ! आजपासुनी हा नोहे माझा !" बोलुनि अर्पी मुकुट बुलबुला पक्ष्यांचा राजा ! II १२ II वाहुं लागले इतर पक्षि मग फुलें गुलाबाचीं बुलबुलावरी उठे समाघी क्षणांत पुष्पांची ! II १३ II वर्षं झालीं हजार, तरिही समाधि ती अजुन ! आणि हजारों वर्षे पुढतीं राहिल ती टिकुन ! II १४ II [अनुष्टुभ] नकाशांत नका शोधूं समाधिस्थल तें कुणी ! बाळांनो ! ही आटपाट— नगरांतिल काहणी ! II १५ II — माधव https://balbharatikavita.blogspot.com/2017/10/blog-post_13.html ही कविता एकेकाळी बालभारतीमध्ये अभ्यासक्रमात होती हे वाचून मला धक्काच बसला. इतकी हिंसा असलेली कविता लहान मुलांना अभ्यासायला कशीकाय ठेवली, असा प्रश्न मला पडला आणि थोडा विचार करताच माझ्या डोक्यात व्यवस्थित प्रकाश पडला. ही कविता साम्यवादी रूपक आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या नकळत ही साम्यवादी मूल्ये रुजवण्यासाठी अशा कविता अभ्यासक्रमात घेतल्या गेल्या आहेत. विचार करा. चिमण्याकडे नवं धनुष्य आहे. तो त्याचा वापर करून बुलबुल मारतो आणि निगरगट्टपणे निघून जातो. हा बुर्झ्वा म्हणजे उच्चवर्गीय आहे. नव्या वस्तू घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे आहेत. तो श्रीमंत आहे म्हणून तो बेदरकार आणि बेमुर्वतखोर आहे. सर्व गरीबांनी मिळून संघर्ष करून त्याचं दमन केलंच पाहिजे. म्हणून ससाण्याकडून त्याला पकडलं जातं आणि सर्व गरीब नाडलेल्या पक्षीगणांकडून त्याला मृत्युदंड दिला जातो. तो या स्तरापर्यंत दिला जातो की त्या बुर्झ्वा चिमण्याची नामोनिशाणीही शिल्लक राहणार नाही. मग सुरू होतो गरीब, नीच वर्गीय मृत्यू पावलेल्या पक्षाच्या विभूतीकरणाचा कार्यक्रम. बुलबुलाबद्दल समाजात दुखवटे प्रदर्शित होतात. त्याचं गुणगान होतं. त्यावर मृत्यूलेख लिहिले जातात. त्यावर फुले चढवली जातात. त्याची समाधी बांधली जाते आणि वर्गीय संघर्षामध्ये कामी आलेल्या काॅम्रेडला जनमानसामध्ये प्रेरणादायक स्थिती प्रदान केली जाते. त्याचं स्मारक इतर नीचवर्गीयांना सतत संघर्षाची प्रेरणा देत राहिल यासाठी त्याच्या मृत्यूची खोटी कवनं गायली जातात आणि मुलांवर बिंबवलं जातं, बाळांनो, जग असंच आहे. श्रीमंत वाईटच असतात. खरा चांगला माणूस गरीबीतच योग्य असतो. लुळीपांगळी श्रीमती आणि धट्टीकट्टी गरीबी... किती फसवलंय आपल्याला आपल्याच सरकारने, आपल्याच प्रशासनाने की आपण हे षडयंत्र अजूनही ओळखू शकत नाही आहोत...! #दुःखद #संतापदायक

Friday 21 May 2021

सीतानवमीच्या निमित्ताने...

 आज सीतानवमी आहे. रामाची जन्मतिथी नवमी आहे म्हणून सीतेचीही जन्मतिथी नवमी असणार का? ठाऊक नाही पण रामासाठी सर्वाधिक पूरक व्यक्ती सीताच आहे. रामायणात जे राम भोगतो, तेच किंवा काकणभर अधिकच सीता भोगते. रामायण रामाचं पौरुष झळाळून सोडतं तर सीतेच्या स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतं. पण तिथेही ती स्वतःला त्रास भोगावा लागूनही रामाच्या कर्तृत्वात आपला आनंद शोधते. पतीवरच्या विश्वासावर ती वनवास पत्करते, त्याच विश्वासाचं लंकेतून सुटका झाल्यावर सार्थक झाल्याचं ती अनुभवते. रामाखेरीज कुणाचाही विचार न केलेली सीता खरं तर जेव्हा रामाकडून परित्याग केल्याचे कळताच क्षणी मृत्यूपंथालाच जायची पण अशा वेळीही उदरातील रामाचा अंश वाढवून त्यास जन्म देण्यासाठी जिवंत राहते. ती लव-कुशांना केवळ जन्मच देत नाही तर रघुकुलाला लायक अशा संस्कारांनी त्यांना वाढवते. दैववशात् अश्वमेध यज्ञासाठीही रामानं सपत्नीचा विचार केलेला नाही, हे जेव्हा ती जाणते, तेव्हा रामाच्या पत्नीनिष्ठेबद्दल तिची खात्री पटते. पुढे परिस्थिती तिला पुन्हा रामासंमुख उभी करते, तेव्हा मात्र ती लव-कुशांना होणा-या पित्याच्या प्राप्तीमध्ये सुखी होते. ज्या प्रजाजनांच्या मतामुळे रामाला सीतात्याग करावा लागतो, त्याच प्रजाजनांकडून जेव्हा तिला तिच्या चारित्र्याचं प्रमाणपत्रं मिळतं, तिथे ती स्वाभिमानी स्त्री रामासहित सर्व सुखाला त्यागून धरणीची कूस स्वीकारते. अशा रामाबरोबर आणि रामाप्रमाणे एकामागून एक त्याग आणि दुःखाच्या प्रसंगांना सामोरं जाणा-या पण तरीही अखेर स्वकर्तृत्वाने झळकून निघणा-या सीतेची जन्मतिथी नवमीच असावी, या लोकविश्वासावर मग आपलाही विश्वास बसू लागतो. 


जय हो सीता मैया की! 🙏🏼