Sunday, 25 December 2011

पुस्तक परिचय - २: 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' - प्रतिभा रानडे

मला असं वाटायचं की भारतात आणि विशेषत: मराठीत जागतिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण असं लेखन वृत्तपत्रांतील सदरापुरतंच मर्यादित असल्याचं जाणवतं पण याला छेद गेला प्रतिभा रानड्यांच्या 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' या पुस्तकाच्या वाचनातून!


आपल्याच देशाच्या जमिनीच्या एका तुकड्यातून जन्मलेल्या पाकिस्तानची ही गोष्ट! पाकिस्तान, ही भारताला चुकवावी लागलेली स्वातंत्र्याची किंमत आहे. आधी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान या स्वरूपात आणि नंतर त्यांच्यातून फुटून निघालेल्या बांगला देश या स्वरूपात. भारताबद्दल पराकोटीचा द्वेष असलेला हा देश आपल्याशी नेहमीच शत्रुत्व ठेवून वागलेला आहे. ४ वेळा प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग त्याने भारतावर लादलेला आहेच पण भारताशी पुढची हजारो वर्ष प्रत्यक्ष वा छुपे युद्ध करण्याची आत्यंतिक इच्छा त्याच्याकडून जाहीरपणे व्यक्त झालेली आहे. असं असूनही आपल्या या आक्रमक शेजार्‍याविषयी आपल्याकडे राजनैतिक माहितीची वानवा असते.


आपल्याला काही अंशी ऐतिहासिक ज्ञान असते पण सद्य परिस्थितीच्या आकलनासाठी ज्या राजकीय परिस्थितीची आपल्याला कल्पना असणे आवश्यक असते ती आपल्या कोणत्याही माध्यमातून एकत्रितरीत्या आपल्याला मिळत नाही आणि मग त्यामुळे ही राजकीय, सामाजिक आणि वैचारिक समस्या किती खोल रुजलीय हेच आपण निश्चित करू शकत नाही. यामुळे या समस्येचे समाधान शोधणे तितकेच कठीण बनते.


अशा महत्त्वाच्या विषयावरील पुस्तकासाठी प्रतिभा रानड्यांसारख्या लेखिकाच योग्य ठरतात. त्यांचा अशा राजनैतिक विषयांचा अभ्यास आहेच पण त्या बरोबरच त्या स्वत: अनेक वर्ष अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा देशात राहिलेल्या आहेत. तेथील समाज जीवनाचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केलेला आहे, तिथल्या लोकांशी त्यांचा गेली अनेक वर्ष संवाद आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून जवळपास २००९ पर्यंतच्या कालाचा आढावा त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. अनेक पुस्तके आणि वृत्तांकनांचा वापर करून, मुलाखतींचा आणि राजकीय व्यक्तिंच्या चरित्रांचा अभ्यास करून, त्यात स्वत:च्या संशोधनाची जोड देवून प्रतिभा रानडे यांनी पाकिस्तान ची ऐतिहासिक, राजनैतिक आणि सामाजिक कहाणी आपल्यासमोर उलगडलेली आहे.


पाकिस्तानची ही कहाणी आपल्या समोर येते ती तिथल्या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या माध्यमातून! झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक़, मोहम्मद खान जुनेजो, बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ, परवेझ मुशर्रफ आणि आसिफ झरदारी यांच्या कारकीर्दीचा आढावा घेत प्रतिभाताई आपल्याला 'पाकिस्तान' शिकवतात. पाकिस्तानात न रुजलेली लोकशाही, सतत पाठपुरावा करणारी लष्करशाही, पाकिस्तानात रुजलेला कट्टर इस्लाम आणि त्याचा तिथल्या समाजावर झालेला परिणाम या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीतून आपल्याला समजतो.


हिंदूंच्या द्वेषातून निर्माण झालेल्या देशाला स्वत:ची अस्मिता शोधण्यासाठी घ्यावा लागलेला इस्लामचा सहारा यातूनच आपल्याला स्पष्ट होतो. यामधून कोणताही राजकीय नेता सुटू शकलेला नाही. कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीत पाकिस्तानात तीनच हुकुमाचे पत्ते खेळले गेले आहेत.... Allah, Army आणि America! या तीन A's मुळे पाकिस्तानला जाणण्यासाठी परिस्थितीचा तीन स्तरांवर विचार करावा लागतो हे प्रतिभाताईंनी फारच वेचक आणि वेधकपणे या पुस्तकातून आपल्याला समजावले आहे.


आर्य चाणक्यांनी सांगितलेच आहे की शत्रूवर मात करण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. भारताच्या या परंपरागत शत्रू विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर प्रतिभा रानडे यांच्या 'पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात' या पुस्तकाला पर्याय नाही. 

No comments:

Post a Comment