Saturday 13 June 2020

लङ्घन-आयुर्वेदोक्त इण्टरमिटण्ट फास्टींग

सध्या निरनिराळ्या प्रकारच्या भोजनपद्धती लोक वापरात आणत आहेत. यामध्ये कोणती चांगली, कोणती वाईट, याचा निष्कर्ष ज्याने-त्याने स्वतः काढणं उत्तम पण एक आयुर्वैद्यकाचा अभ्यासक म्हणून माझी भूमिका मांडण्याचा प्रसंग आल्यामुळे या विषयीचं माझं चिंतन व्यक्त करतो.

आयुर्वेदाने जीवनातल्या आहार आणि विहार या दोन्ही गोष्टींचा प्राधान्याने विचार केला आहे. आयुर्वेदाचा असा विश्वास आहे की योग्य आहार-विहारामुळे व्यक्तीला रोग होण्याची शक्यता फारच कमी होते. अशा योग्य आहार-विहार-पालनानंतरही नैसर्गिक कारणांमुळे किंवा आघातादि बाह्य कारणांमुळे व्यक्तीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्या रोगावस्थेला दूर करण्यासाठी त्यावरील चिकित्सेचा विचारही आयुर्वेदामध्ये केलेला आहे.

आयुर्वेद शरीरातील अग्नीला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व देतो. किंबहुना शरीर रोगग्रस्त होण्यापाठी या अग्नीची विकृतावस्था कारणीभूत असते अशीच त्याची मान्यता आहे. शरीरात अनेक प्रकारचे अग्नी असले तरी मुख्य आणि आपल्या सद्य विषयाशी संबंधीत अग्नी म्हणजे पाचकाग्नीचा आपण विचार करू.

या पाचकाग्नीचं मुख्य कार्य म्हणजे अन्नाचं पचन करणं, या प्रक्रियेपासून अन्नरस तयार करणं आणि त्याद्वारे शरीराचं पोषण करणं. हा पाचकाग्नी जितका साम्यावस्थेत असतो, तितकं पाचनकार्य योग्य होतं आणि शरीराचं योग्य त्या प्रमाणात पोषण होतं. यामध्ये महत्त्वाचा भाग असा की या पाचकाग्नीचं स्वतःचं पोषण आपण खाल्लेल्या अन्नातून होत असतं, आणि आपण जे अन्न खातो, त्यातून हा अग्नी पोषित होत असल्यामुळे, त्या अग्नीमध्ये आपण सामान्यपणे जे अन्न खातो ते सहजपणे पचवण्याची क्षमता निर्माण होते. असं असल्यामुळे आपल्या सवयीच्या अन्नापेक्षा वेगळं अन्न खाल्यावर (जोवर आपल्या अग्नीला त्या प्रकारच्या अन्नाची सवय होत नाही तोवर) काही वेळा काहींना पोट बिघडल्याचा अनुभव येतो. एकदा का आपला अग्नी त्या नव्या प्रकारच्या अन्नाशी सामायिक झाला की तो त्या अन्नाचं पचन करण्यासही सक्षम होतो मात्र त्यासाठी काही काळ द्यावा लागतो. तो काळ व्यक्तीसापेक्ष असेल. त्यास निश्चित गणित नाही.

या अग्नीमध्ये नियमित अन्नपदार्थ पडत असल्यामुळे या अन्नपदार्थांतील घटकांचा त्यावर परिणाम होतो. हा परिणाम म्हणजे अग्नीची प्राकृत साम्यावस्था बदलून तो मन्द, तीक्ष्ण, विषम असा विकृतीयुक्त होतो आणि पुढे रोगास कारणीभूत होतो. साधारणपणे तेलकट, जड, अन्नामुळे अग्नी मन्द होतो आणि परिणामी पचनक्रिया बिघडून कफादि दोष वाढून निरनिराळे व्याधी निर्माण होतात.

बिघडलेल्या अग्नीला साम्यावस्थेत आणण्याच्या दृष्टीने आयुर्वेदोक्त लङ्घन कर्म हा चिकित्सेचा एक भाग आहे. अर्थात यासाठी व्यक्ती लङ्घन-कर्मासाठी योग्य अशी सुदृढ आणि लङ्घन सहन करण्याची शक्ती असलेली असावी लागते. लङ्घन कर्म म्हणजे एका अर्थी उपास. हा उपास करत असताना काही काळजी घ्यावी लागते. तो एकदम मोठ्याप्रमाणावर करू नये. उपवासासाठी शरीराला तयार करावं लागतं. सुरूवातीला हलक्या आहारातून अग्नीला लङ्घनासाठी तयार करावं लागतं, लङ्घन करत असतानाही त्याचं रक्षण करावं लागतं, तो फार कमी होणार नाही, विझणार नाही, हे बघावं लागतं. आवश्यक किंवा अपेक्षित काळ लङ्घन केल्यानंतरही अग्नीतील विकृती दूर झाल्याचं निश्चित करून अग्नी  सामान्य अन्नपदार्थांसाठी पुन्हा संधुक्षित करावा लागतो.

लङ्घन करताना आणि त्यानंतर अग्नी संधुक्षित करत असताना, चेतवत असताना, दोष विकृत होऊ नयेत, त्यांच्यावर नियंत्रण रहावं म्हणून गरम पाणी प्यावं. यामुळे कफ-पित्त नियंत्रणात राहून वाताचं अनुलोमन होतं. अग्नीच्या संपर्कात आलेले अपाचित, अर्धपाचित घटक या पद्धतीने चेतवलेल्या अग्नीसाठी इन्धनाचं काम करू लागतात आणि अग्नीची शक्ती वाढू लागते. हे पदार्थ पाचित झाल्यानंतर लङ्घन कर्म सुरू असलेला हा अग्नी आपल्याच शरीराच्या अयोग्य प्रमाणात वाढलेल्या धातूंकडे वळतो. अग्निमान्द्याचा परिणाम म्हणून शरीरात प्राधान्याने मेद धातू निर्मिती होत असल्यामुळे अग्नीची शक्ती वाढत असताना त्यासाठी इन्धन म्हणून अतिरिक्त प्रमाणात असलेला मेद धातू कार्यकारी होऊन त्यातून पुढल्या धातूंची निर्मिती किंवा पोषणव्यवस्था कार्यकारी होऊ लागते. परिणामी योग्य लङ्घन कर्मामधून अग्नीची साम्यावस्था, शरीराचं लाघव, पुढच्या धातूंची पुष्टी, शारीरिक बलवृद्धी आणि रोगनाशन असे प्रत्यक्ष उपयोग दिसतात.

लङ्घनकर्माने अग्नीची शक्ती वाढवून त्यास साम्यावस्थेत आणल्यानंतर वर उल्लेखल्याप्रमाणे तत्काळ सामान्य आहार घेऊ नये असं आयुर्वेद सुचवतो. मोठ्या काळाच्या लङ्घनानंतर अग्नीला अन्नरूपी इन्धन मिळालेलं नाहीये, याची जाणीव ठेवणं फार आवश्यक असतं. यासाठी या चेतवलेल्या अग्नीला आपल्या नेहमीच्या अन्नासाठी, ते पचवण्यासाठी सक्षम करावं लागतं. या प्रक्रियेला संसर्जन क्रम असं म्हणतात. संसर्जन क्रमामध्ये या संधुक्षित अग्नीला थोड्या थोड्या प्रमाणात अन्नरूपी इन्धन द्यावं लागतं. फळांचा रस, फळं, वरण, कढीसारखे पातळ, पचायला हलके, तूप टाकलेले मूगाच्या डाळीच्या खिचडीसारखे पदार्थ देत देत त्या अग्नीला द्रव अन्नापासून सुरू करून घन अन्नद्रव्यांसाठी तयार करावं लागतं, हाच संसर्जन क्रम होय.

हे काहीसं सामान्य वर्णन आहे. यातून सध्याच्या इण्टरमिटण्ट फास्टींग या पद्धतीचं मूळ असलेल्या लङ्घन कर्माची थोडीफार तोंडओळखच होईल. उपरोल्लेखिताप्रमाणे योग्य ती काळजी घेऊन आपल्या शक्तीचा विचार करून योग्य त्या संसर्जन क्रमाचा अंगिकार करून लङ्घन कर्माचा अवलंब करण्यात आयुर्वेद शास्त्राचा नक्कीच प्रत्यवाय नाही मात्र कोणत्याही प्रकारचा अतिरेक करू नये कारण अति सर्वत्र वर्जयेत्। हे सूत्रही आरोग्याच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं आहे.

No comments:

Post a Comment