Thursday 28 May 2020

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने...

खरं तर आपल्याकडे स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः। हे सूत्र फार पूर्वीपासून आहे तरी यातल्या धर्माला रिलिजनच्या पातळीत घेतलेलं नाही. तिथे धर्म म्हणजे वृत्ती, मनोवृत्ती अपेक्षित असते. माझ्या मनोवृत्तीविरोधी काम माझ्यासाठी मृत्यूसमानच आहे, असा त्याचा अर्थ होतो.

इसच्या 10व्या शतकात मुसलमानांच्या टोळ्यांशी युद्धात संबंध आल्यावर धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने आपल्याला ठाऊक झाला. तत्पूर्वी माझी उपासना पद्धती (धर्म) दुस-याला अमान्य असेल तर त्या दुस-याला जगण्याचा अधिकारच नाही, असा विचारच आपल्याकडे नव्हता. हीच सहिष्णुता. मुसलमानांशी संपर्क झाल्यावर त्यांची उपासनापद्धत (इस्लाम) एखाद्याने अमान्य केल्यास ते त्या व्यक्तीला ठार मारतात, हे पहिल्यांदा आपल्याला कळलं. तेव्हाच आणखी एक शब्द आपल्याला कळला, शहादत. इस्लाम ही उपासनापद्धत जगन्मान्य करण्याच्या प्रयत्नात झालेल्या युद्धात जो मरतो, त्याच्या या कृतीसाठी जो शब्द वापरला जातो, तो शहादत. जो ही कृती करतो तो शहिद. असं असल्यामुळे धर्मासाठी (आपल्या नियत वृत्तीसाठी) बलिदान ही संकल्पनाच आपल्याकडे नसल्याने त्या अर्थाचा शब्द आपल्या भाषेत नव्हता. मग भाषाशास्त्राच्या नियमानुसार स्वदेश, स्वजन आणि स्वधर्म (यात उपासनापद्धतीही अन्तर्भूत) यासाठी मृत्यू पत्करणा-यासाठी परकीय प्रकारचा शहिद हा शब्दच आपल्या भाषेत वापरण्यात येऊ लागला. मुसलमानांमध्ये मात्र इस्लामच्या प्रसारासाठी मृत्यू पत्करणा-यालाच शहिद म्हणण्याचा प्रघात आहे. इतर धर्मियांच्या या कृतीसाठी ते कधीही शहिद-शहादत हे शब्द वापरत नाहीत.

हे मर्म केवळ सावरकरांनी जाणलं आणि त्यांनी पर्यायी हुतात्मा हा शब्द बनवून प्रचलित केला. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। हे जाणणा-या सावरकरांनी हुत या म्हणजे आहुती या अर्थाने, प्राणार्पण हेतूने असलेल्या शब्दाला अमर, अजर, चैतन्यमय असा आत्मा शब्द जोडून बनवलेला हुतात्मा शब्द शहिद या शब्दाहून अधिक चपखल आणि मनोज्ञ आहे. यात आत्म्याच्या अमरत्वाला साद घालून स्वदेश, स्वजनांसाठी पुनःपुन्हा प्राणार्पण करण्याने प्राप्त होणा-या हतेषु भोक्षसि स्वर्गम्। या तत्त्वाचाही आधार घेतल्याचं कळतं. त्यादृष्टीने हुतात्मा आणि त्याचंच तद्धित रूप हौतात्म्य हे दोन अप्रतिम शब्द सावरकरांनी आपल्या संस्कृतीशी सुसंगत असे दिले आहेत. या आणि सावरकरांच्या स्वतंत्र प्रज्ञेने निर्माण झालेल्या शब्दांचा आपल्या भाषेमध्ये अधिकाधिक अंगिकार करणं हेच सावरकरांना योग्य अभिवादन ठरेल.

No comments:

Post a Comment