Thursday, 13 October 2011

कावळा, कडी आणि कॅमेरा

मुंबईसारख्या महानगरात राहिल्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणजे इथे मानव प्राण्याखेरिज इतर प्राणी आणि पक्षी सृष्टी अगदीच मर्यादित प्रमाणात बघायला मिळते. शेवटी खरी प्राणी-पक्षी सृष्टी सिमेंटच्या जंगलात थोडीच पहायला मिळणार आहे? पण असं असलं तरी थोडासाच का होईना, इथे आपल्याही भोवताली, छोट्यासा निसर्गाचा एखादा तुकडा उपलब्ध असतोच. गरज असते फक्त तो शोधण्याची. काही वेळेला असंही होतं, हा निसर्ग, त्याच्या एखाद्या घटकाच्या माध्यमातून अगदी आपल्या घरापर्यंत येऊन बसतो आणि एक प्रकारे आपल्याला त्याची दखल घ्यायला भाग पाडतो.
 
गेल्या रविवारी अशाच एका गोष्टीचा मी साक्षीदार झालो. 

आता असं आहे की मुंबईत आमचं घर अगदी मध्यवर्ती भागात आहे. जवळपासच्या इमारतींपेक्षा जराशी अधिक उंची आमच्या इमारतीची असल्याने आणि त्यातही वरच्या मजल्यावरचं घर असल्याने आमच्या गॅलरीमध्ये सकाळच्या वेळेला काही पक्षांचा राबता असतो. आता आमच्या इथे काही भारद्वाज, तांबट, पोपट आणि कोकिळ प्रकारचे सुंदर दिसणारे, सुंदर आवाजाचे पक्षी काही येत नाहीत. आमचं मैत्र आपलं कावळे-कबुतरं-चिमण्यांशीच आणि त्यातही कावळ्यांशी जास्तच. 

आमच्या आईची एक पद्धत आहे. सकाळी स्वयंपाक झाला की आधी त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर त्यातले पदार्थ आमच्या रोजच्या डब्यात पडता पडता एक पान गॅलरीत कावळ्यांसाठी ठेवलं जातं. आता हे बघायला आपण कशाला घरात थांबतोय? डबा भरलेला दिसला की आपल्याला ताबडतोब पळावं लागतं ना लोकल गाठायला. असो. पण गेले काही दिवस आई सांगत होती की कधी बाहेर पान ठेवायला उशीर झाला तर एक कावळा चक्क आईचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्या दाराची कडी ठोकतो. मी काही एकदम विश्वास ठेवला नाही कारण मला वाटलं की आईला काहीतरी भास होत असावा. 

मग गेल्या रविवारी अस्मादिक (दर रविवारप्रमाणे) घरात लोळत पडलो असताना (भल्या पहाटे) साडे नवाच्या सुमारास आमच्या मागच्या दाराची कडी वाजल्याचा आवाज आला. कोण आलंय हे बघण्यासाठी उठलो तर (खरंच) माझ्या आश्चर्याला पारच उरला नाही. एक कावळेबुवा आमच्या मागच्या दाराची कडी वाजवत होते आणि एक वेगळाच कण्ठरव करत होते. कावळ्याचा आवाज असा कधी ऐकू येईल यावर यापूर्वी माझा कधीच विश्वास बसला नसता पण मी स्वतःच्या कानानेच तो ऐकत होतो. थोड्या कबुतराच्या घुमण्यासारख्या वाटणार्‍या त्या आवाजात खूप अजिजी होती. आईने लगेच बोलून दाखवलं, "आता बसतोय ना विश्वास? भूक लागलीय तर कसा नरमाईने खायला मागतोय बघ! आवाजही ऐक! नाही तर तू, शिक जरा याच्याकडून!"
आता ऐकत थांबलो असतो तर आईचं उपदेशामृत थांबलंच नसतं म्हणून मग लगेच मोबाईलवर त्या कावळेबुवांचे फोटो घेऊ लागलो. एक दोन पोझेस दिल्यावर मी जरा जास्तच जवळून फोटो काढायला गेलो तर बुवा दाराच्या कडीवरून कठड्यावर जाऊन बसले आणि तिथूनच पुन्हा आईला त्यांच्या भोजनाची वेळ झाल्याची आठवण करू देऊ लागले. 

पुढल्या पाच मिनिटांत आईच्या हातचे भोजन जेवून कावळेबुवा आपल्या मार्गाने उडून गेले. 

मोबाईल कॅमेर्‍यातले फोटोही ठीकच आलेले तेव्हा म्हण्टलं भूकेच्या वेळेनुसार आमची कडी वाजवून भोजन मागवणारी आमच्या घराजवळची पक्षी-सृष्टी आपल्या मित्रांनाही दाखवावी म्हणून हा लेखन-प्रपंच!
No comments:

Post a Comment