Wednesday 12 October 2011

विश्वासाचं सार्थक

मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही. केवळ एवढंच नाही तर आजकाल अनोळखी लोकांच्या सुखाचीही अ‍ॅलर्जी व्हायला लागलेली आहे.

आता इतरांच्या दु:खाबद्दल ठीक आहे पण सुखाच्या अ‍ॅलर्जीचं हे कशावरून म्हणू शकतोय मी? तर बघा, मी आत्ता इथे बोर्डिंग पास घेऊन विमानात बसण्यासाठी रांगेत उभा आहे. म्हणजे तसं हे माझ्यासाठी नवीन नाही. फिरतीचंच काम माझं! शिक्षकाचं! पूर्वीच्या काळी लोकं शिक्षण घेण्यासाठी गुरूकडे गुरूगृही यायचे. पण आता शिक्षणाची क्षितिजं विस्तारली तशी गुरूची विद्यालयंही. आमच्या कंपनीची ही ढीगानं औषधं! प्रत्येक औषध हे आमचं प्रॉडक्ट. त्याची माहिती, अपेक्षित काम करण्याची पद्धती, कुणाला द्यायचं आणि कुणाला देणं टाळायचं, कधी द्यायचं, कोणत्या वेळी, कशा बरोबर द्यायचं, किती द्यायचं हे सगळं आमच्या सेल्स आणि मार्केटिंगच्या लोकांना शिकवावं लागतं. माझ्याकडून शिकून ते मग त्यांच्या त्यांच्या विभागातल्या डॉक्टरांना शिकवतात आणि मग ते डॉक्टर आमच्या औषधांची ऑर्डर देतात. अशी एकूण आमची पद्धत. त्यात आमची ऑपरेशन्स दुनियाभरातल्या दहा-बारा देशात. मग सध्या या कामासाठी सगळीकडेच फिरावं लागतं. पूर्वीच्या खलाशांसारखं, आज या तर चार दिवसांनी त्या बंदरावर नव्हे पण शहरात. कधी कधी ही शहरं एकमेकांपासून आंतरराष्ट्रिय सीमांनीही वेगळी केलेली असतात. आता अजून तरी त्या खलाशांसारखी माझी, प्रत्येक बंदरात घरं झालेली नाहीत पण तरी.....

...बघा, इथे उपटतो माझ्यातला शिक्षक! सांगत काय होतो आणि मध्येच शिकवूच काय लागलो. तर आत्ताही अशी चार देशांतली 'शैक्षणिक' सहल पूर्ण करून माझ्या मायदेशी परततोय. चांगला नऊ तासांचा प्रवास आहे. नेहमीप्रमाणे पोहोचेपर्यंत उत्तररात्र उजाडणार आहे. विमानाच्या वेळेपूर्वी चार तास येऊन थांबलोय. सामान चेक इन करून, बोर्डिंग पास घेऊन विमानात जाऊन झोपण्यासाठी उत्सुक होऊन गेल्या बावीस दिवसांच्या फिरतीचा परीणाम असलेल्या आंबल्या शरीराने गेली वीस-पंचवीस मिनिटं उभा आहे पण रांग सोडण्याऐवजी बोर्डिंग क्रू त्या मुलीला एकटीलाच आत घेऊन गेले होते. आठ-नऊ वर्षाच्या या मुलीचा मला प्रचंड हेवा वाटत होता. मला आत जायला अजून दहा मिनिटं नक्कीच लागणार होती आणि अकराव्या मिनिटाला मी झोपणार होतो. पण ही पठ्ठी मात्र दहा मिनिटं आधीच आत जाऊन झोपू शकणार होती. दुसर्‍याच्या सुखाचा मत्सर वाटतो असं मगाशी जे म्हण्टलं ना ते यासाठी!

असो. असतं काही जणांचं नशीब चांगलं, त्याला काय करणार? असा समस्त पुरुषी जगतात मान्य झालेला विचार करून पुढल्या बाराव्या मिनिटाला मी माझ्या खुर्चीत स्थानापन्न झालो. आजुबाजुला प्रवासी त्यांच्या त्यांच्या जागी विराजमान होत होते. काही वेळातच आमच्या पायलट शिरीष सावरगांवकरने आमचं विमानात औपचारीक स्वागत करून नऊ तासांच्या प्रवासाची पुन्हा एकदा सूचना दिली. त्या परीस्थितीतही आपल्या विमानाचा सारथी मराठी आहे हे ऐकून जरा बरंच वाटलं. हवामानाची माहिती देवून त्यांनी चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. हवाई सुंदरींनी त्यांची नेहमीची प्रात्यक्षिकं करून दाखवताच 'खुर्सीकी पेटी' बांधायची आज्ञा झाली आणि विमानानं धावपट्टीकडे कूच केलं. एक वळसा घेऊन विमानानं धाव घेतली आणि अलगद हवेत झेप घेऊन थोड्या वेळातच ढगांच्या दुलईत विसावलं. म्हणजे मला आपलं तसं वाटलं, कारण विमान हवेत स्थिर होतंय तोच माझ्या नेहमीच्या सवयीनुसार मी निद्रादेवीच्या कुशीत विसावलो होतो.
अचानक कुणी धक्का दिल्यासारखं होऊन मला जाग आली. मला झोपून किती वेळ झालेला ते पहिल्यांदा कळलंच नाही. घड्याळ बघितलं तर चांगले चार तास उलटलेले! थोडासा चक्रावलोच मी, कारण हवाई सुंदरी(?)नेही मला गेल्या चार तासात उठवलं नव्हतं. ना बेवरेजेससाठी, ना नट्ससाठी, ना नाश्त्यासाठी! तसाही मी विमानात फारसा खात नाही, आपल्या आवडीचं ते काही देतंच नाहीत आणि जे देतात ते आपल्याला आवडत नाही. त्यातही मी यावेळी आपल्या मायदेशाच्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होतो. या आमच्या देश-भगिनींकडून आगत-स्वागत करून घेण्याचा चांगला पूर्वानुभव असल्याने त्यात काही विशेष वाटलं नाही उलट माझी झोपमोड न करणार्‍या तिला मी धन्यवादच दिले.

माझ्या डोक्याच्यावर दिव्याजवळची कळ दाबून मी माझ्यासाठीच्या हवाई-सुंदरीला हाळी दिली. ती आल्यावर मी तिच्याकडे फळांच्या रसाची मागणी केली. पण काही काळासाठी ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आणि पाण्याची छोटी बाटली मला आणून दिली. इतक्यात उद्घोषणा झाली, "मी आपल्या विमानाचा पायलट शिरीष बोलतोय. अपरिहार्य कारणांमुळे काही काळासाठी कोणतीही ड्रिंक्स सर्व्ह होणार नाहीत. प्रवाशांनी कृपया सहकार्य करावं."

बाकी कोणत्याही ड्रिंक्ससाठी मी कधीच आसुसलेला नसतो आणि सुंदरीने पाणी दिलेलंच असल्याने मला फारशी अडचणच आली नाही. साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरून शिरीषचा आवाज ऐकू आला, "माझ्या सहप्रवाशांनो, मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आपल्या विमानाच्या मार्गामध्ये इथपासून सुमारे दहा मिनिटांच्या अंतरावर वादळी वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. हे असं वातावरण किती काळ असेल याची निश्चित कल्पना येत नाही पण या मार्गातून प्रवास करत असताना आपल्या विमानाला छोटे-मोठे धक्के बसण्याचा संभव आहे. कदाचित विमानातील हवेच्या दबावावरही परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व काही सुरळीत होईस्तोवर आपापल्या जागेवरच पट्टे बांधून बसावं. यामुळेच पुढला काही काळ जेवण सर्व्ह केलं जाणार नाही. कृपया सहकार्य करा."

त्याबरोबरच विमानातले दिवे थोडे मंद करण्यात आले आणि सुंदर्‍यांनीही आपापल्या जागा पकडल्या. साधारण दहा मिनिटांतच वातावरण बदलून गेलं. बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आणि विमानाच्या खिडक्यांमधूनही विजांचा लखलखाट दिसू लागला. विजेच्या कडकडाटात विमानाचा आवाजही ऐकू येईनासा झाला. बाहेर फारच जोराने वारे वाहत असावेत कारण आमचं विमान जोराने हेलखावे खाऊ लागलं. क्षणात वर, क्षणात खाली, कधी डावीकडे तर अचानक उजवीकडे कलंडायला लागलं. सुरूवातीला पायलटचं बोलणं कुणीच मनावर घेतल्यासारखं वाटत नव्हतं पण खिडकीतून दिसणारं निसर्गाचं रौद्र रूप बघून प्रवाशांना परीस्थितीची जाणीव झाली आणि विमानात एक भीतीची लहर सरसरत गेली. एका जोरदार धडाक्यासहित आमचं विमान वेगाने खाली जाऊ लागलं आणि आतला हवेचा दाब झपाट्याने कमी होऊन अलार्म वाजू लागला. त्यासरशी डोक्यावरून प्राणवायूचे मास्क खाली आले. आता विमानातली परीस्थिती अगदी बदलली. लोकांनी भीतीच्या अमलाखाली रडारड करायला सुरूवात केली. काही जण तर अगदी शॉक बसल्यासारखे झाले. विमानात अगदी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खरंतर इतका विमानप्रवास करणारा मी ही चांगलाच हादरलेलो, थरथरायलाच लागलेलो. केवळ कठीण परीस्थितीत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे यंत्रवत मी ऑक्सिजन मास्क चढवला आणि शरीरातला तणाव कमी करण्यासाठी मोठे मोठे श्वास घेऊ लागलो. लोकं ओरडत होती, रडत होती, आपापल्या सुहृदांची नावं घेत होती, त्यांची आठवण काढत होती. जे आपल्या सुहृदांबरोबर होते, ते एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेला समोर मृत्यु उभा असल्याच्या भावनेने रडत होते. काही जण हात वर करून देवाची प्रार्थना करत होते तर काही जण या परीस्थितीतून सुटका होण्यासाठी नवसही करत होते. हे सर्व होत असताना विमान हवेत भेलकांडतच होतं. वादळी वारे त्याला खेळणं असल्यागत वर-खाली उडवत होते. सगळीकडे हाहाक्कार उडालेला. काही हवाई सुंदर्‍या त्यातही लोकांना मास्क चढवून देण्यात मदत करत होत्या. आपापल्या परीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या पण विमान इतकं भेलकांडत होतं की सर्वांना याचा परिणाम काय होऊ शकतो याची जाणीव झालेली आणि त्यामुळे सर्वजण अगदी आतंकित झालेले होते.

हे सर्व बघत असताना माझं लक्ष अचानक मला समांतर असलेल्या पलिकडच्या रांगेतल्या खिडकीजवळच्या खुर्चीकडे गेलं. तिथे एक छोटीशी मुलगी शांत बसलेली दिसली. तिने मास्क चढवलेला, अंगात लाईफ-जॅकेटही चढवलेलं, भोवती विमानातल्या थंडीपासून बचावासाठी देतात ती चादर घेतलेली पण ती अगदी आरामात खुरमांडी घालून बसलेली. तिच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्या बिकट परीस्थितीतही ती ते पुस्तक वाचत होती. आजूबाजूला काय चाललंय आणि विमान कुठल्या अवस्थेतून जातंय याची तिला जाणीवच नव्हती असं नाही कारण त्याशिवाय ती जॅकेट आणि मास्क घालते ना! मधूनच ती पुस्तकातून डोकं वर करून विमानातल्या परीस्थितीचा अंदाज घेई आणि पुन्हा वाचनात दंग होई. तिने पुस्तकातून डोकं वर काढताच मी तिला ओळखलं. बोर्डिंग पास घेऊन विमानात शिरण्याच्या रांगेत सर्वांच्या आधी आत सोडलेली तीच ही चिमुरडी होती. तिला तसं शांत बघून मलाच खूप धीर आला आणि मीही हळू हळू शांत होऊ लागलो. जेव्हा जेव्हा विमानातली परीस्थिती अजूनच बिघडल्यासारखी व्हायला लागली तेव्हा तेव्हा मी तिच्याकडे बघून स्वतःवर नियंत्रण मिळवू लागलो. जणू तिच्या तशा स्थितीतल्याही धीर-गंभीर आचरणाने ती मला सावरण्यासाठी शक्ती देत होती.

वादळाचं तांडव सुमारे तासभर चाललं आणि यातल्या बहुतांशी वेळात तिच्यामुळेच मी स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकलो. सगळं शांत झाल्यावरही खूप वेळ कुणालाच काही सुधरत नव्हतं. पायलट शिरीषच्या धो़का टळल्याच्या घोषणेनंतरही तो टळल्याची जाणीव भीतीग्रस्त मनांना व्हायला वेळ लागत होता. काही वेळातच हवाई-सुंदरी आपापल्या कामाला लागल्या आणि खान-पान देऊ लागल्या पण कुणालाही त्यात स्वारस्य नव्हतं. शॉक मधून बाहेर पडायला प्रवाशांना खूपच वेळ लागत होता आणि ते सहाजिकच होतं, आपल्या भीतीचा सामना करत असताना त्यांना माझ्याप्रमाणे शांत शक्तीचा स्रोत गवसला नव्हता.

पुढच्या तीन-साडेतीन तासांत आमचं विमान मुंबईच्या आकाशावर घिरट्या घालत होतं आणि थोड्याच वेळात धावपट्टीवर उतरलं. पायलट शिरीषने उद्घोषकावर आम्हाला शुभेच्छा देऊन प्रवासातील अडचणींबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण हे ऐकायला कुणीच जागेवर बसून राहिलं नाही. विमान उतरताच प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेतली, जणू ते लवकर उतरले नाहीत तर पुन्हा वादळाचा धोका होता. इतर सर्व प्रवासी उतरेपर्यंत मी मागेच थांबलो. इतक्यात मला माझी शक्तीदायिनी तिच्या खुर्चीवर आधीच्याच शांतपणे बसलेली दिसली. मी तिच्या जवळ जाऊन तिला म्हणालो, "बाळ, काय नाव तुझं? कुठे फिरायला गेलेलीस का? घर कुठे आहे तुझं?"

तशी बरीच धीट होती ती! माझ्यासारखा अनोळखी समोर असतानाही हसून मला म्हणाली, "मी शर्वरी. माझं घर मुंबईतच आहे. शाळेच्या सुट्या आहेत ना म्हणून जरा बाबांबरोबर तिथे फिरायला गेलेले."

मला तिचं इतकं कौतुक वाटत होतं की मी तिला पुन्हा विचारलं, "अगं मग अशी इथे एकटी प्रवास करताना आणि मगाशी विमान वादळात गेलं असताना इतकी शांत कशी राहिलीस? मला स्वतःला इतकी भीती वाटत होती पण तू तर अगदी आरामात होतीस. हे कसं काय?"

यावर ती गोड शर्वरी उत्तरली, "अहो, मला कशाला भीती वाटेल? कारण मी एकटी थोडीच प्रवास करतेय? माझ्याबरोबर बाबा आहेत. माझे बाबा खूप स्ट्राँग आहेत, मग मी पण स्ट्राँगच असणार ना! या विमानाचे पायलट शिरीषच तर माझे बाबा आहेत आणि त्यांनी आईला सांगितलंय की काळजी करू नको, आपल्या शरूला मी नीट घरी घेऊन येईन. मला माहित होतं की माझे बाबा मला नक्की घरी नेणार आहेत."

तिने हे बोलल्या क्षणी मला तिच्या शांतपणाचं रहस्य समजलं. आपल्या माणसावरचा विश्वासच आपल्याला बिकट प्रसंगात धीर देण्यास आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रेरित करण्यास समर्थ असतो.
======================================================================
डिस्क्लेमर - ढकलपत्रातून आलेल्या कथाबीजावर आधारीत.

No comments:

Post a Comment