Monday, 10 October 2011

नियतीचा खेळ

यापूर्वी इथे प्रकाशित झालेली कथा, 'करतं कोण आणि भोगतं कोण?' लिहून झाल्यावर मनात एक विचार आला. आपण काही वेळा वस्तुस्थितीला फारच गृहीत धरतो. अनेक वेळा गोष्ट जशी आहे तशीच आपल्याला दिसते असं नसतं. मग तीच कथा वेगळ्या वस्तुस्थितीमध्ये कशी घडेल, या अनुषंगाने ही पुढची कथा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

"डॉक्टर, नेमकं काय झालंय हो? मला तर काहीच सुचत नाही आहे. पंधरा दिवसांपूर्वीच्या रविवारपर्यंतपर्यंत हे असं काहीच नव्हतं हो! त्यादिवशी रात्रीच तर आम्ही ट्रेकिंगहून परतलो. गेल्या तीन वर्षांत या माणसाला कधी गप्प म्हणून बसलेलं पाहिलेलं नाही. अगदी उत्साहाचा धबधबाच जणू. सतत काही ना काही सुरूच असायचं. मित्रांच्या गराड्यात तर नेहमीच. येवढं करून एक पैशाचं व्यसन नाही. दारू नाही, विडीकाडी नाही, अगदी सुपारीच्या खांडाचंही नाही. कुठल्या कुठल्याशा गोष्टीत भयानक रस घेऊन अगदी जीव तोडून ती गोष्ट समजून घेणार, आत्मसात करणार असा स्वभाव. दर आठ-पंधरा दिवसांनी कुठे ट्रेकिंग, कुठे रॅपलिंग तर कुठे जंगल दर्शनाचा कार्यक्रम करायचाच करायचा आणि आता हे असं. कशातच लक्ष नाही. माझ्याशीही धड बोलणं नाही, रात्र रात्र झोपणं नाही, पाच - दहा मिनिटं डोळे मिटलेत असं वाटतंय तोच दचकून उठून एकटक शून्यात नजर लावून बघत बसतो. मला तर आता फारच काळजी वाटायला लागलीय. तसं अजून कुणाला कळवलेलंही नाही. आणि आता माझ्याही अशा परिस्थितीमुळे मला फारच भीती वाटायला लागलीय. आईसुद्धा घरी बोलावतेय पण याला अशा स्थितीत सोडून कशी जाऊ मी?"

"कुमारला शारीरिक दृष्ट्या काहीच अडचण नाहीये पण त्याला कसला तरी धक्का बसलाय असं वाटतंय. दुखणं मानसिक आहे. त्याच्या मनावर कसलं तरी प्रचंड दडपण असल्याचं वाटतंय. मी पुन्हा काही नवीन औषधं देतो. आपण बघू याचा काय परिणाम होतो आणि दोन दिवसांनी ठरवू पुढे चिकित्सेची काय दिशा ठरवायची ते."

करुणा, माझी बायको, आमच्या डॉक्टरांशी बोलत होती. तिची अवस्था मला समजत होतीही आणि नाहीही. गेले दहा-बारा दिवस डॉक्टर कुठलं ना कुठलं औषध देत आहेत पण उपयोग शून्य आहे. कुठेतरी धक्का बसलाय हेच खरं होतं पण तो सहन करायचं सामर्थ्य मात्र मी गमावून बसलो होतो. माझ्या चित्तवृत्ती बधीर झालेल्या, डोकं सुन्न झालं होतं आणि आजुबाजुचे आवाजही पार दूरून आल्यासारखं वाटत होतं. कोणत्याही क्रियांना प्रतिक्रिया देण्याचंच मी विसरून गेलो होतो, किंबहुना कोणतीही प्रतिक्रिया देण्याला माझं मन धजावतच नव्हतं. मला ओरडावसं वाटत होतं, रडावसं वाटत होतं, कुणालातरी माझ्या हृदयावरच्या दडपणाबद्दल सांगावसं वाटत होतं, करुणाला तर खासच. तिच्याशिवाय आहे तरी कोण मला माझं मन मोकळं करण्यासाठी? पण माझ्या या मनाने जणु माझं काही ऐकायचच नाही असंच ठरवलेलं. गेल्या पंधरा दिवसात काय काय घडलं हे मला अजिबात आठवत नाहीये पण तो शनिवारचा ट्रेक मात्र मला स्पष्ट आठवत होता.
आमचं शहर तसं छोटसंच. अजूनही थोडं शहराबाहेर पडलं की शेतं सुरू होतात. ना कुठे फार गर्दी ना कुठे घाई. आमच्या कंपनीनं अशा छोट्या शहरात ऑफिस केलं ते स्वस्तात जागा मिळत होती म्हणून. तसं इथे यायला लोकं नाखूषच होती पण मी मात्र आनंदाने इथे आलो. एक तर नुकतंच करुणाशी माझं लग्न झालेलं. नवलाईनं नव्या संसाराची उभारणी आम्हा दोघांनाही करायची होती. ती अशा नव्या शहरात करण्याची कल्पना आम्हाला दोघांनाही आवडली आणि आम्ही इथे आलो. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे इथपासून ८०-८५ किलोमीटरवर असलेलं हिल-स्टेशन आणि त्याच्या भोवतीचं जंगल. दर आठ-पंधरा दिवसांनी आमची तिथेच चक्कर व्हायची. आम्ही म्हणजे मी आणि माझे कंपनीतले सहकारी मित्र. सुरूवातीला बाकीचे सगळेच सडे होते पण हळू हळू त्यांची लग्नं होऊन आमचा एक छानसा ग्रूपच झालेला. आम्ही तर पहिल्यापासून एकत्र होतो पण आता आमच्या बायकाही एकमेकींच्या मैत्रिणी झालेल्या. एक छानसं कुटुंबच तयार झालेलं आमचं. त्यातच गेल्या महिन्यात करुणाच्या गुडन्यूजची मोठ्ठी पार्टीही झालेली.

चार महिने पूर्ण झाल्याशिवाय डॉक्टरनेही कुठे सांगायला मनाई केलेली. ते पूर्ण झाल्यावर रक्त, सोनोग्राफी वगैरे चाचण्या समाधानकारक आल्यावरच आम्ही आमचं गुपित सर्वांना सांगितलेलं आणि त्याचीच पार्टी माझ्या मित्रांनी आयोजित केलेली. आमच्या ग्रूपमध्ये आमचं बाळ हे पहिलंच असणार होतं. त्या पार्टीतच तर शनिवारचा ट्रेक ठरला. खरं तर आम्ही मित्रंच जाणार होतो पण मग अर्चनाने, अरुणच्या बायकोने म्हण्टलं की करुणाला नंतर काही कुठे जाता येणार नाही तर आपण सगळेच जाऊ. तुम्ही एक गाडी घेऊन पुढे जा आणि आम्ही बाकीच्या तीन गाड्या घेऊन मागावून रविवारी येऊन थांबू. संध्याकाळी आपापल्या गाड्या घेऊन बॅक होम. प्लान वाईट नव्हता. अरुण-अर्चनाची गाडी आरामदायक आणि अर्चनाचं ड्रायविंग स्मूथ असल्याने मलाही करुणाची काळजी नव्हती आणि येताना आम्ही बरोबरच येणार होतो.

शनिवारी पहाटेच आम्ही माझी गाडी घेऊन निघालो. एरवी सुनसान रस्त्यावरून जातानाही मी फार वेगाने गाडी चालवत नसे. माझं ड्रायविंगही तसं सेफच समजलं जात असे, सेफ कसलं अरुण तर मला कासवच म्हणायचा. तरी त्या शनिवारी, सकाळच्या वार्‍याने मला अगदी ताजंतवानं वाटत असल्याने मीही एक्सिलेटरवर जरा जोरातच पाय दाबलेला. हा हा म्हणता आम्ही शहराच्या वेशीपर्यंत आलो. आमच्या या छोट्याशा शहराच्या सीमेवर असलेल्या वस्तीपर्यंत गेलो तर नुकतंच झुंजुमुंजु झालेलं. वस्तीमध्ये हळू हळू जाग येताना दिसू लागलेली. सुट्टी आम्हाला होती पण त्या वस्तीतील कित्येक जणं सुट्टीच्या नावानेही घाबरून थरथरंत असतील. कारण तिथे एक सुट्टी म्हणजे एक खाडा आणि एक खाडा म्हणजे एक दिवसाचा पगार नाही. त्यांना रोजच्याप्रमाणे उठून रोजगारासाठी बाहेर पडणं आवश्यकच होतं. संपूर्ण वस्ती पार होईपर्यंत माझे विचार चालूच होते. इतकी गच्च वस्ती असूनही रस्ता खूपच मोकळा होता, एरवी तिथे कुणी रस्त्यावर येत नाही आणि त्या दिवशीही कुणीच रस्त्यावर नव्हतं. मला लगेच आमच्या महानगराची आठवण झाली. तिथे अशा वस्तींमध्ये जवळ जवळ सगळा संसार झोपडीबाहेरच वाढतो. इथे सहसा तसं दिसत नसल्याने मीही निश्चिंत होतो. माझ्या नेहमीच्या वेगाने सुमारे २ तासातंच आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोहोचलो.

हिल स्टेशनवरच्या होटेलमध्ये सामन ठेऊन गाडी घेऊनच आमच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजे जोगताई देवीच्या हेमाडपंती देवळाजवळ पोहोचलो. गाडी तिथेच लाऊन आम्ही पाचही मित्र देवळामागच्या देवराईत घुसलो. देवराईतून पुढे बारमाही कातकडी धबधब्यातून गेलो. मनसोक्त भिजून वर एको पॉईण्टवर चढून तिथे पोटपाणी केलं. एको पॉईण्ट वरून सनसेट पॉईण्टला डोंगरांच्या माथ्या-माथ्यावरूनच पोहोचलो. तिथेच थोडावेळ फिरून झाल्यावर सूर्यास्त बघितला आणि घाईने डाव्या अंगाने पुन्हा देवराईत उतरून जोगताईच्या देवळात येईतो साडेसात झालेले. दमायला तर झालं होतं पण पोटात कावळेही कोकलंत होते. तेव्हा सगळ्यांना तसंच गाडीत ढकलून हॉटेलवर आलो आणि फ्रेश होऊन तिथल्या जेवणावर ताव मारला.

जेवणं झाल्यावर मी हॉटेलच्या छज्ज्यावर बसून रात्रीचं जंगल बघत होतो तर साईने रम प्यायचा बूट काढला. त्याला अरुण आणि नितीनने ताबडतोब अनुमोदन दिलं. माझी नापसंती फाट्यावर मारून हे तिघे साईच्या मामाने त्याला पाठवलेल्या कडक रमचा फडशा पाडायला बाहेर पडले. साईने त्याचा स्टॉक आधीच गाडीत ठेवला असल्याने माझ्याकडून चावी घेऊन हे वीर गेले. मी नेहमी प्रमाणे झोपलो तर पार उत्तररात्री हे तिघे परतल्याचं मला समजलं. त्यांची विमानं पार चंद्रावर पोहोचलेली कारण मर्चण्ट नेव्हीतली रम सॉलिड स्ट्राँग असते असं रात्रीच साईने नितीनला सांगितल्याचं ऐकलेलं. त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या कडक वासाने माझी झोप जी उडवली ती मी उरलेला वेळ बालकनीतल्या वार्‍यात बसल्यानेच थोडीफार परत मिळाली.
दुसर्‍या दिवशी मी लवकरच तयार झालो पण बाकी तिघे काही उठण्याच्या मूड मध्ये नव्हते. त्यांना तसं सोडून मी थोडा वेळ बाहेर फिरून आलो आणि लॉबीमध्येच बसलेलो की करुणा, अर्चना, लक्ष्मी आणि नीला आल्याच. लक्ष्मी साईची तर नीला नितीनची बायको. आल्या आल्या करुणा माझ्याजवळ बसली आणि बाकी तिघी आपापल्या नवर्‍यांना जागं करायला गेल्या त्या उगवल्या चांगल्या तासा-दिड तासाने. तोपर्यंत माझी नि करुणाची कॉफीची एक राऊण्ड झालीही होती. आल्या आल्या अरुण, साई आणि नितीनसाठी कडक काळ्या कॉफीची फर्मानं गेली कारण तसाही त्यांचा हँग-ओव्हर उतरायला त्याची फारच गरज होती. त्यांच्याबरोबरच आम्ही ब्रंच घेऊन फिरायला बाहेर पडलो. करुणाला जास्त फिरणं कठीण असल्याने जवळपासच थोडा फेरफटका मारून आम्ही रूमवर परतायचं ठरवलं. बाकी तिघांना मात्र आपापल्या बायकांच्या आज्ञेने मोठा पिट्टा पडला. परतताना मर्केटमधल्या एकमेव थिएटर मध्ये अमिताभचा शराबी लागलेला पाहिला आणि मी करुणाला म्हणालो, "आज हा पिक्चर बघूनच जाऊ, काय म्हणतेस?" अमिताभ तिचा आवडता नट, त्यामुळे ती नाही म्हणणं शक्यच नव्हतं. सहाच्या खेळाची तिकिटं मिळाली. विचार केला ९ वाजता पिक्चर संपला की लगेच निघू की २ तासांत परत घरी पोहोचू. आमच्याखेरीज कुणालाच त्या पिक्चरसाठी थांबायचा मूड नव्हता मग हॉटेलमधून चेक आऊट करून बाकी मंडळी साडेपाचलाच परतली आणि मी नि करुणा सिनेमा बघायला गेलो.

सिनेमा संपताच आम्ही गाडीकडे गेलो. गाडी उघडली मात्र आणि घात झाला. बहुतेक रात्रीची पार्टी त्या तिघांनीही गाडीत बसूनच साजरी केली होती याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. दिवसभर गाडी बंदच राहिल्यामुळे सगळीकडेच तो रमचा कडक वास भरून राहिलेला. गाडीच्या सर्व खिडक्या मी उघडून दिल्या तरी वास काही कमी झाला नाही. करुणाला तर उमासेच यायला लागले. गाडी मधलं एअर फ्रेशनरही कुचकामी झालं. रात्री नऊ नंतर नवीन एअरफ्रेशनर तरी मला कुठे मिळणार होतं? मार्केट तासाभरापूर्वीच बंद झालेलं. काय करावं सुचतंच नव्हतं मला! शेवटी दहाच्या सुमारास करुणा गाडीमध्ये बसू शकली आणि मी घराच्या दिशेने गाडी भरधाव सोडली. एव्हाना साडे दहा वाजून गेल्यामुळे रस्त्यावर वाहतुक नव्हती आणि खिडक्या उघडून ठेवलेल्या असल्याने वेगामुळे गाडीतला वास जाण्यासही हातभार लागत होता. उमाशांनी बेजार झालेली करुणा माझ्याशेजारी डोळे मिटून पडलेली. थोडाजरी रमचा वास आला तर तिचे उमासे पुन्हा ट्रिगर-ऑन होतील की काय अशी शंका मला वाटत होती. जितक्या लवकर घरी पोहोचता येईल तितक्या लवकर मला पोहोचायचं होतं. पहिल्या चार महिन्यांतही करुणाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास झाला नव्हता आणि ती चांगली गोष्ट होती. करुणाही मूळची नाजुक प्रकृतीची असल्याने डॉक्टरांनी तिला कोणते त्रास होणं टाळावं याची उत्तम माहिती आम्हाला दिलेली. पहिल्या महिन्यापासून तिचा रक्तदाब वर-खाली होत असल्यामुळे आणि तिचं हृदयही जरा कमजोर असल्यामुळेच त्यांनी पाचव्या महिन्यातच ही माहिती लोकांना सांगावी, तो पर्यंत नाही असा सल्ला दिलेला. मला आपलं उगाचंच वाटायला लागलेलं की या उमाशांनी तिला त्रास तर होणार नाही ना, आमच्या बाळाला तर त्रास होणार नाही ना? याच धुंदीत मी गाडी चालवत होतो. आमचं शहर जवळ येत होतं. थोड्या वेळातच आम्ही शहरात प्रवेश करणार होतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात घरी. माझ्या एक्सिलेटरवरच्या पायातला जोर आणखी वाढला. एव्हाना एक वाजत आलेला. तीस-पस्तीस फुटांवर एक मिणमिणता दिवा असणारा तो रस्ता सुनसानच होता. आता थोड्याच वेळात शहराची वेस येणार होती. तिथली ती वस्ती पार केली की झालं, आलंच मग घर, माझे विचार चालूच होते. इतक्यात मला पुन्हा रमचा थोडा वास आला. करुणाही डोळे मिटल्या अवस्थेत चुळबुळ करायला लागली. माझी नजर इकडे तिकडे शोधू लागली आणि अचानक माझ्या आणि तिच्या सीटच्या मध्ये गाडीच्या तळाशी मला एक रमची बाटली दिसली. मी पटकन खाली वाकलो ती उचलायला. त्याचवेळेला माझ्या पायाचं एक्सिलेटरवरचं प्रेशरही वाढलं. रस्त्यावरचं लक्ष उडून बाटली काढण्याकडे केन्द्रित झाल्याने गाडी हेलकावे खाऊ लागली, रस्ता सोडून जाऊ लागली. सुनसान रस्ता असणार या विचाराने मी ही निश्चिन्त होतो. मी खाली झुकून बाटली उचलली आणि प्रतिक्षिप्त क्रियेने उजव्या हाताने बाहेरच फेकून दिली. डाव्या हाताने बाटली उचलून उजव्या हाताने बाहेर फेकण्याइतक्या छोट्या काळासाठी माझ्या हातात गाडीचे काहीच कंट्रोल नव्हते. रस्ता सोडून सरकणार्‍या गाडीला सांभाळण्यासाठी मी समोर पाहिलं तर गाडीच्या हेड लाईट्स मध्ये अगदी वीस-बावीस हातांच्या अंतरावर मला एक बाई चालत येत असल्याचं दिसलं. तिला मी आधी पाहिलंच नव्हतं आणि तिचंही लक्षच नव्हतं बहुतेक गाडीकडे, तिच्या हातात काहीतरी गाठोडं असल्यासारखं वाटतंय तोच तिच्या अंगावर जाणार्‍या गाडीची दिशा मी जोराने बदलण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या गाडीचा वेग इतका होता की मी ब्रेक्सवर जोराने पाय मारला पण माझ्या या प्रयत्नांमुळे गाडी गर्कन् फिरली आणि डाव्या बाजुच्या मागच्या दरवाज्याच्या भागाचा ओझरता धक्का त्या बाईला बसला. तिच्या हातातलं गाठोडं निसटलं आणि माझ्या गाडी मागच्या बाजूला उडाल्यासारखं वाटलं. गाडीला बसलेल्या हिसक्यांमुळे आणि ब्रेकच्या आवाजामुळे करुणा एकदम जागी झाली. तिने बघितलं की मी प्रयत्नाने गाडी सरळ ठेवतोय पण गाडीने कशाला तरी धक्का दिलाय. माझा वेग त्या स्थितीतही फार कमी झाला नव्हता. मी थांबायचा विचार करत होतो तितक्यात धडक बसलेली बाई उठलेली मला रिअर ग्लासमध्ये दिसली. तिने गाठोडं उचलून घेतलेलंही मी पाहिलं. करुणाही वळून बघत म्हणाली की तिला फार जोराने लागल्यासारखं दिसत नाहीये. मग मीही थांबण्याचा विचार बदलला आणि पुढे निघून आलो. शहरातही रात्रीची वेळ असल्याने रहदारी नव्हतीच त्यामुळे पुढच्या पंधरा-वीस मिनिटांत घरी पोहोचलो. गाडी घराशेजारच्या आड-रस्त्यावरच पार्क करून ठेवली. येवढं सगळं होऊनही सव्वा वाजेपर्यंत घरी पोहोचल्याने आणि करुणाही आता नॉर्मल झाल्याने माझाही जीव भांड्यात पडला.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मी पहाटे जॉगिंगसाठी उठून जाऊ शकलो नाही. झोपायलाच इतका उशीर झालेला की लवकर उठणंच शक्य झालं नाही. एरवी ६ वाजता जॉगिंगला जाणारा मी आज आठ वाजता निघालो. तासाभराच्या जॉगिंग नंतर नेहमीच्या वर्तमानपत्राच्या टपरीवर एक्स्प्रेस आणि ईटी घेऊन निघतंच होतो की सकाळी नऊलाच येणार्‍या एका दुपारच्या दैनिकातील छोट्याशा बातमीकडे माझं लक्ष गेलं. शहराबाहेरच्या वस्तीमधल्या हमरस्त्यावर झालेल्या अपघाताची ती बातमी होती. त्यात एका तान्ह्या बालकाचा मृत्यु झाल्याचं म्हण्टलेलं.

माझ्या डोळ्यासमोरून झर्कन् आदल्या दिवशीचा प्रसंग सरकला. माझ्या पाठीतून एक शिरशिरी गेली. हाता-पायांना कापरं भरल्यासारखं वाटायला लागलं. मी त्याच अवस्थेत तिथून निघून घराकडे येऊ लागलो. माझी पावलं कशी पडत होती ते माझं मलाच कळत नव्हतं. कसा बसा चालत घराजवळ पोहोचलो तर माझं आधी लक्ष गाडीकडे गेलं. मी गाडीच्या मागच्या डाव्याबाजूला बघू लागलो. आदल्या दिवशी रात्रीच्या अंधारात मला काहीही दिसणं अशक्यच होतं. तेव्हा जे दिसत नव्हतं ते मला दिसलं. डाव्या बाजूला मागच्या दरवाज्यावर पत्र्यावर एक छोटासा पोचा आलेला. जरा मागच्या दिशेने गेलो तर टेल-लाईटच्या जवळही एक पोचा होता पण त्याबरोबरच तिथे खाली मागच्या गार्डमध्ये काहीतरी अडकलेलं दिसलं. ते काय आहे ते बघायला मी वाकलो मात्र तर माझ्या पायाखालची जमीनच निसटली. तो एका लहान बाळाच्या झबल्याचा तुकडा होता. काल काय घडलेलं त्याची तेव्हा मला नेमकी कल्पना आली. माझ्या सर्वांगाला घाम आला. डोक्यात घणांचे घाव बसू लागले. घशाला कोरड पडली, डोळ्यासमोर अंधारी येऊन चक्कर येतेय की काय असं वाटू लागलं. मला तिथे उभा बघून करुणाने हाक मारली. मी तिच्याकडे पाहिलं तिच्या दिशेने जाण्यास सुरूवात केली. ती हसून काहीतरी बोलत होती पण मला ते काहीच समजत नव्हतं.

मी स्वतःवर ताबा ठेऊ शकलो नाही आणि तेव्हापासूनच कुठेतरी काहीतरी प्रचंड बिघडून गेलं. माझ्या संवेदनाच थिजून गेल्या. माझी झोप उडून गेली. सतत डोळ्यासमोर त्या रात्रीचा प्रसंगच येऊ लागला. जे घडलं त्यात कुणा कुणाला दोष द्यायचा याचा विचार करून करून माझ्या डोक्याचा भुगा होत होता. मला येवढंच कळत होतं की जी नियती करुणाच्या उदरात माझं बाळ वाढवत होती त्याच नियतीने माझ्याच हातून एका बाळाची जीवनयात्रा संपवलेली.

No comments:

Post a Comment