Saturday 8 October 2011

करतं कोण आणि भोगतं कोण?

आज या वेळेला त्या माऊलीचा आक्रोश ऐकायला तिथे कुणीच हजर नव्हतं. तशी ती जागा एरवीही निर्मनुष्य म्हणूनच ओळखली जायची. एका छोट्याश्याच शहराच्या बाहेरचा तो भाग. तिथलाच हमरस्ता पण रस्त्यावर चिटपाखरू दिसणंही मुष्किल. रस्त्यावर असावेत म्हणून दोन-चार मिणमिणते दिवे होते पण त्यांच्यामुळे रस्तातरी दिसत होता की नाही अशीच शंका यावी.

पण मग अशा या निर्जन रस्त्यावर राधाक्का काय करत होती? राधाक्काचं घर जवळ जवळ शहराबाहेरच्या वस्तीमध्ये होतं. शहराने शहराबाहेर ठेवलेल्यांची ती वस्ती. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपड्या आणि त्या झोपड्यांमध्ये दाटीवाटीने राहिलेली माणसे. राधाक्काला वाटायचं, यापेक्षा गोठ्यातल्या म्हशी बर्‍या राहत असतील. तिला तिच्या गावाकडच्या घराची सवय. तिथे घर लहानच होतं पण आजूबाजूचं मोकळं आवार तिला जास्त आवडायचं. बहुदा ती तिथेच असायची. का नसावी? घरात तिला धरून बारा चिल्लीपिल्ली, त्याशिवाय तीन काका, तीन काकू, तिचे आई-वडिल, आजी-आजोबा मोठ्ठं प्रकरण होतं. वाढत्या वयात तिच्या घरच्यांनी शहरातला एक मुलगा बघून घरातलं एक खातं तोंड कमी केलं नि ती घनश्यामबरोबर, आपल्या नवर्‍याबरोबर या वस्तीच्या आश्रयाला आली.

वस्तीतलं घर बघून आणि तिथली दाटी बघून तिला धक्काच बसला आणि आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव झाली. हळू हळू सगळ्याची सवय होत राधाक्का संसारात रमली. घनश्याम गरीब होता पण वस्तीमधल्या इतर पुरुषांपेक्षा बरा होता हीच तिची त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. तरीही खूपदा तिला वस्तीवर कोंदटल्यासारखं होऊन तिथं राहणं कठीण होई मग घनश्याम तिला बरोबर घेऊन मोकळ्या रस्त्यावर फिरायला जाई. तिचंही मन तेव्हढ्या फिरण्याने जरा मोकळं होई. वर्षभरातच राधाक्काला आर्यन झाला आणि तिचा खूपसा वेळ त्याच्या सरबराईत जाऊ लागला. खूप लहान असला तरी ती आंगडं टोपडं चढवून त्यालाही आपल्या नि घनश्याम बरोबर फिरायला नेई.

त्यादिवशीही ती दोघं अशीच बाहेर पडली. शिळोप्याचं बोलत बोलत मोकळ्या रस्त्यावरून चालत होती. इतक्यात घनश्यामला त्याच्या गावाकडचे पाहुणे भेटले नि तो त्यांच्याशी बोलत थांबला. राधाक्का आपल्याच विचारात होती. तिला तिच्या आर्यनमध्ये तिच्या भावी भविष्याची स्वप्न दिसत होती. आपला आर्यन मोठा होईल, शाळेत जायला लागेल, शिकेल, शिकून मोठ्ठा ऑफिसर होईल, तो शहरात कामाला लागेल मग वस्तीमधलं घर सोडून आपण त्याच्याबरोबर मुख्य शहरातच राहायला जावू अशी अनेक स्वप्न ती उघड्या डोळ्याने पहात होती. आपल्याच विचारात, आपल्याच नादात, घनश्यामला पार मागे सोडून ती त्या वळणदार रस्त्यावर खूपच पुढे निघून आली. आणि त्यात तरी काय अडचण होणार? तसा तिचाही तो रोजचाच रस्ता होता ना!

पण एरवी निर्मनुष्य असणार्‍या त्या रस्त्याने आज काही आक्रितच होताना पाहिलं. रात्रीच्या अंधारात आपल्याच नादात लेकाला छातीशी धरून चालणार्‍या राधाक्काला समोरून भरधाव येणारी काळी गाडी दिसूनही दिसलीच नाही. दारु पिऊन झोकांड्या देणार्‍या माणसासारखी झुलत येणारी गाडी चालवणार्‍याच्या ताब्यात वाटत नव्हती आणि वाटेल तरी कशी कारण ती चालवणाराही स्वतःच्या ताब्यात कुठे होता? त्याचा ताबा तर अंगूरकी बेटीने केव्हाच घेतलेला. काही अंतरावर खिडकीतून फेकलेल्या बाटलीने मोठ्ठा आवाज करूनही राधाक्काच्या उघड्या डोळ्यांत उलगडणार्‍या स्वप्नांच्या लडीमुळे तिने ते काहीच पाहिलं नाही की ऐकलं नाही.

अचानक पुढे आलेल्या दिव्याच्या प्रकाशात राधाक्काल पहिल्यांदा समोरून येणार्‍या गाडीची जाणीव झाली. ती आर्यनल घेऊन थोडं बाजूला सरकणार तोच ती गाडी गिरकी घेऊन तिला जोरदार धक्का देऊन पुढे निघून गेली. बसलेल्या धक्क्यानिशी राधाक्का एका बाजूला फेकली गेली. तिला वाटत होतं की तिने तिच्या आर्यनला छातीशी घट्ट धरून ठेवलेलं. यातून ती जरा सावरत असताना तिच्या लक्षात आलं की आर्यन तिच्या हातात नाही आहे. तिने आजुबाजुला पाहिलं. तिला स्वतःला साधं खरचटलंही नव्हतं. आर्यनचं दुपटं तिच्या हातात होतं पण आर्यन कुठे होता? तिच्या छातीत धस्सं झालं. ती तिरमिरीत उठून आर्यनच्या नावाने हाका मारू लागली जणू ते छोटंसं बाळ तिच्या हाकांना प्रतिसाद देणार होतं. इकडे तिकडे बघताना तिला रक्ताचा एक ओहोळ दिसला.  

त्या ओहोळाचा माग काढत राधाक्का सरकली आणि तिच्या पयाखालची जमिनच निसटली. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला. तिच्या आर्यनचा गाडीखाली पार चोळामोळा झालेला, त्याचा श्वास तर केव्हाच थांबलेला. आर्यनचं कलेवर उराशी घेऊन ती माऊली प्रचंड आक्रोश करत होती पण तो ऐकायला त्यावेळीतरी जवळपास कुणीच नव्हतं.

कुणाच्या तरी मद्यपानाच्या आनंदाने एक जीव लोळागोळा झालेला, अनेक स्वप्नांची राख झालेली आणि एक आई उध्वस्त झालेली! घनश्यामला कळेपर्यंत तरी राधाक्काला एकटीलाच हे सहन करायला लागणार होतं.

जीवनाचंही कसं असतं बघा, करतं कोण आणि भोगतं कोण?

No comments:

Post a Comment