Wednesday 25 January 2012

पहिली मिपा-ओरिगामी कार्यशाळा (२२ जानेवारी २०१२, देनावाडी, गिरगाव) - वृत्तांत

कोणत्याही मिपा-इव्हेन्टच्या वेळचे नारायण (किसन शिंदे) यांच्या पुढाकाराने आणि 'मु. पो. ब्राझील' फेम विलासरावांच्या सहकार्याने गेल्या रविवारी म्हणजे दिनांक २२ जानेवारी २०१२ रोजी मिपा सदस्यांची पहिली ओरिगामी कार्यशाळा देनावाडी गिरगाव इथे संपन्न झाली. कार्यशाळेमध्ये मिपावर ओरिगामीकलेचा ध्वज फडकत ठेवणार्‍या सदस्य सुधांशू नूलकर यांनी मार्गदर्शन केलं. सुधांशू नूलकरांनी आपल्या भूमिकेला साजेसा ओरिगामी मित्र असं लिहिलेला टी-शर्ट परिधान केलेला. तसले टी-शर्टस् पुढच्या वेळी कार्यशाळेमध्ये भाग घेणार्‍यांसाठी उपलब्ध करून देण्याची (तेव्हा न केलेली) विनंती आम्ही इथे करून ठेवत आहोत. या पहिल्या कार्यशाळेमध्ये उपरोल्लेखित तीन सदस्यांव्यतिरिक्त श्री. विश्वनाथ मेहेंदळेकाका आपला पेटंट झब्बा-लेंगा-शबनम पिशवीचा युनिफॉर्म न घालता जीन्स-टीशर्टाच्या बॅचलरी कपड्यात (इस अधोरेखित शब्दसे निर्माण होनेवाले पॉइन्टको नोट किया जाय, मिलॉर्ड!) हजर होते. शिवाय ठाणेकर जोशी'ले', प्रास यांच्यासह सदेह उपस्थित होते. सदेह येवढ्यासाठी की आधी कार्यशाळेला येणार असं घोषित केलेले दुसरे ठाणेकर रामदासकाका विदेहावस्थेत उपस्थित आहेत असं तिसरा ठाणेकर असलेल्या किसनद्येवांचं म्हणणं होतं.

नमनाला घडाभर तेल पुरे करून आता प्रत्यक्ष कार्यशाळेच्या वृत्तांतावर येतो. सुधांशु गुरूजींनी ओरिगामी कलेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगून प्रत्यक्ष शिकवण्यास सुरूवात केली. त्यांनी शिकवल्याप्रमाणे घातलेल्या पहिल्या काही घड्यांचा असा काही परिणाम झाला की त्यातून अनपेक्षितपणे कागदी कप तयार झाला. असा कप की ज्यातून पाणी, चहा, कॉफीही सहज पिता येईल. (अर्थात त्यासाठी वापरलेला कागदही दर्जेदार होता.) पहिल्याच प्रयत्नात कार्यशाळेतील विद्यार्थी यशस्वी झाल्यामुळे उत्साहाला उधाण आलं. मग ते कोणतेही चिकटवण्याची साधन न वापरता कागदातंच सेल्फ लॉकिंग पद्धत वापरून करता येणारे कागदी फूल आणि आपल्या ए-फोर कागदावर लिहिलेल्या पत्राचंच इन्व्हलप बनवायला शिकले. यानंतरचा क्रमांक जमिनीवर सोडताच कोलांटी घेणार्‍या कागदी खेळण्याचा आला. कार्यशाळेतील प्रत्येकाच्या खेळण्याने कोलांटी मारून शाबासकी मिळवली. याच खेळण्याचा मोठा भाऊ मानावा, असा उडी मारणारा बेडूक बनवून मिपाकर विद्यार्थ्यांनी आपापल्या बेडकाला भरपूर उड्या मारायला लावल्या.

आपापल्या बेडकांना उड्या मारण्यास लाऊन दमलेल्या मिपाकरांच्या श्रमपरिहारासाठी विलासरावांनी ब्रेक घ्यायला लावला आणि समोर सामोसे, फरसाण आणि पेढ्यांच्या न्याहरीची व्यवस्था केली. दरम्यान मिपाकरांनी मिपावरच्या विविध सदस्यांचा, धाग्यांचा आणि घटनांचा मागोवा घेऊन आपला 'अभ्यास वाढवला'.

ब्रेकनंतर गुरूजींनी बेसिक ओरिगामी तंत्राची माहिती दिली. यामध्ये सुरूवातीच्या दोन प्रकारच्या घड्यांची माहिती करून देण्यात आली. मग त्यापैकी एका घडीने सुरूवात करून विद्यार्थ्यांनी फूल बनवलं तर दुसर्‍या घडीने सुरूवात करून (चुकत माकत का होईना पण चक्क) क्रेन पक्षी बनवला. कागदापासून क्रेन पक्षी निर्माण होणं हा आमच्या ओरिगामी कार्यशाळेचा हायपॉईन्ट होता. यानंतर मात्र वेळेच्या अनुपलब्धीमुळे कार्यशाळा आवरती घेण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान नेहमीप्रमाणेच मिपाकरांनी विलासरावांचं ऑफिस तथा अख्खी देनावाडीच दणाणून सोडली होती कारण सुधांशू गुरूजींनी अगोदरच मुभा दिलेली की गप्पा करा कारण हाताने ओरिगामी सुरू असताना त्यात कसलीही अडचण येत नाही. हे सांगण्यात आपण फार घाई केली असंच त्यांना नंतर वाटलं असेल इतका दंगा मोजक्या लोकांनी घातला. एकूणच ओरिगामी हा प्रकार इतका मस्त आहे की जाता जाता (इतरांना चुकवून) किसनद्येव आणि विमेकाका सुधांशू गुरूजींकडून गुपचूप कागदाचा बॉक्स बनवायला शिकले (हे इथे नोंदवून ठेवत आहे).

एरवी 'श्री' समर्थ होतेच तरीही वेळात वेळ काढून ओरिगामी कार्यशाळेच्या सिद्धीसाठी आलेले सुधांशू गुरूजी, कार्यशाळेचे प्रणेते (नारायणराव) किसनद्येव, कार्यशाळेसाठी जागा आणि न्याहरी उपलब्ध करणारे विलासराव आणि दोन वेळा वाफाळत्या चहाची व्यवस्था करणारे त्यांचे पुतणे पंडितराव यांच्या एकत्रित श्रमाचा परिणाम म्हणून पहिल्या मिपाकर ओरिगामी कार्यशाळेची सुफळ आणि यशस्वी सांगता झाली असं म्हणण्यात काहीही प्रत्यवाय नाही.

पहिल्या मिपा-ओरिगामी कार्यशाळेतले विद्यार्थी आणि त्यांचे काही कलाविष्कार


 मिपा-ओरिगामी कार्यशाळेत शिकवताना डाव्या हाताला सुधांशू गुरूजी आणि त्यांच्यासमोर बसून शिकत असलेले मिपाकर (डाव्या बाजूने) प्रास, किसनद्येव, जोशी'ले', विमेकाका आणि विलासराव.



 कार्यशाळेत मार्गदर्शक सुधांशू गुरूजी (ओरिगामी मित्र लिहिलेला टी-शर्ट नोट करावा) आणि पण्डितराव.


 कागदी कप



 सेल्फ लॉकिंग पद्धतीने बनवलेली कागदी फुलं


 वेगळ्या प्रकारची रंगीत कागदी फुलं



 उड्या मारून दमलेला (कागदी) बेडूक


 विमेकाका आणि किसनद्येवांनी गुपचुप शिकून घेतलेला कागदी बॉक्स, विमेंच्या कलाकृती पोटात घेतल्या अवस्थेत



 कार्यशाळेचा हायपॉइण्ट - उडते क्रेन पक्षी


 पण्डितरावांच्या हातच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेताना (डावीकडून) प्रास, विलासराव, विमे आणि जोशी'ले'




अशाप्रकारे संपन्न झालेल्या पहिल्या मिपा-ओरिगामी कार्यशाळेमध्ये पुढच्या तशाच कार्यशाळेच्या आयोजनाची बीजे रोवली गेली हे नक्की!

No comments:

Post a Comment