Wednesday 22 February 2012

माझी बल्लवगिरी : सडाफटिंग पाकसिद्धी - भाग २

रात्री साडे तीनापर्यंत गप्पा मारत बसल्यामुळे दुसर्‍या दिवशी अंमळ उशीराच म्हणजे साडे सातला जाग आली. गवि आधीच उठून आपल्या माळीबुवांना वेतन प्रदान करत होते. काल सर्वात आधी टपकलेले विमे मात्र अजूनही दुलईत पहुडलेले. नेहमी प्रमाणे आटोपून मी आपला तयार होतोय तर गविंनी गावातून मागवलेला चहा आणि न्याहरीचा वडापाव घेऊन माणूस आला. विमेंना बहुतेक झोपेतच वडापावाचा गंध आला असावा कारण तोपर्यंत त्यांना चांगलीच जाग आलेली. मग व्हरांड्यातच यथावकाश गरम गरम चहा घेऊन वडापावाचा नाश्ता केला गेला. वड्याच्या तिखटाने तोंड चांगलेच पोळले पण मजा आली. चहा पिता पिता आमच्या गप्पांचा पार्ट टू सुरू झाला, जणू काही आदल्या रात्री त्या थांबल्याच नव्हत्या.

बाहेर ओट्यावरच बसल्यामुळे गविंच्या घराच्या कंपाऊण्डमध्ये माझं लक्षं गेलं. आता घासफूसचाच सतत संबंध आलेला असल्याने आमचा वनस्पती सृष्टीवर भारी जीव! त्यात त्या निर्मनुष्य जागी विविध प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या दिसत होत्या. मग काय, गवि आणि विमेंची एक वनौषधी आकलन कार्यशाळाच घेतली गेली. गविंच्या घराजवळच एक नाही दोन नाही तब्बल दहा - बारा वनौषधी मिळाल्या. मग आमच्या वाक्गङ्गेला पूर आला. हातासरशी आयुर्वेदावरही एक व्याख्यान देण्यात आलं. एकूण कार्यशाळेमध्ये घडलेल्या चर्चेचा परिणाम असा झाला की बोलून बोलून माझे आणि ऐकून ऐकून गवि-विमेंचे खाल्लेले वडापाव पचून गेले.

कार्यशाळेदरम्यान सारिवाच्या मूळापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात

मग आता दुपारच्या जेवणासाठी काय बेत करावा यावर विचार सुरू झाला (आणि गवि-विमेंना हुश्श झालं कारण माझी आयुर्वेदिक बडबड बंद झाली.) आधी गविंच्या मनात आता बाहेरच कुठेतरी चांगल्या ठिकाणी खाऊ असं आलं पण विमेंनी त्याला कडाडून विरोध केला आणि घरातंच आदल्या दिवशीप्रमाणे काही तरी बनवून, ते खाऊन दुपारनंतर मुंबईकडे निघू असं त्यांनी ठासून प्रतिपादन केलं. विमे जिंकले हे वेगळं सांगायला नकोच!

मग आता आमच्याकडे जे जिन्नस होते त्यावरून गविंची त्यांच्या बॅचलरहूडमधली पेटंट डीश 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी' बनवायची ठरली. अर्थात माझीही त्या प्रकारची डिश आवडतीच असल्याने मी तात्काळ अनुमोदन दिलं. विमेंकडे पर्यायच नव्हता. आमच्याकडच्या वाणसामानाच्या आणि भाज्यांच्या पोतडीतून जिन्नस बाहेर काढले -

१. तांदूळ - साधारण २०० ग्रॅम
२. मुगाची डाळ - साधारण १०० ग्रॅम
३. तूरीची डाळ - साधारण १०० ग्रॅम
४. टॉमॅटो - ४ मध्यम आकार
५. भोपळी मिरची - २ मोठी (साधारण २०० ग्रॅम)
६. फ्लॉवर - १ छोटा (साधारण २५० ग्रॅम)
७. बटाटे - ३ मध्यम आकार
८. हिरवी मिरची - ३ मध्यम आकार
९. आलं - अर्धा इंच
१०. कडीपत्ता - आवडीनुसार
११. कोथिंबीर - आवडीनुसार
१२. मीठ - आवडीनुसार
१३. साखर - आवडीनुसार
१४. एवरेस्ट बिर्याणी मसाला - ४ चहाचे चमचे
१५. हळद - ३ चहाचे चमचे
१६. मोहरी - ३ चहाचे चमचे
१७. जिरं - ३ चहाचे चमचे
१८. हिंग - अर्धा चहाचा चमचा

आज वरकामाला मी आणि विमे होतो आणि मास्टर शेफ गवि होते. मग (नेहमीप्रमाणे गुरूवर्यांना वंदन करून) मी आणि विमेंनी पटापट बटाटे, भोपळी मिरच्या, टॉमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतले. फ्लॉवर मोकळा करून मिठाच्या पाण्यात घेतला आणि 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी'ची जय्यत तयारी केली.

गविंच्या मास्टर मार्गदर्शनाखाली केलेली कृती अशी होती -

एक स्वच्छ कुकर मंद विस्तवावर चढवून त्यात शेंगदाण्याचं तेल तापत ठेवलं. तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, आलं आणि हिरव्या मिरच्या टाकून फोडणी तयार केली. तयार फोडणीमध्ये कापलेले टॉमॅटो टाकून परतले. टॉमॅटोंना पाणी सुटायला लागल्यावर त्यात भोपळी मिरची, फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे सोडून परतून घेतले. दरम्यान गविंनी डाळी आणि तांदूळ धुवून घेतले होते, ते ही त्यात टाकून परतून घेतले. त्यात आवश्यक त्या प्रमाणात साखर-मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आणि त्यामध्ये खिचडी शिजायला लागेल तितके पाणी घातले. या मिश्रणामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर भुरभुरवून त्यातलं पाणी जरा गरम होताच कुकरचं झाकण लावून टाकलं. कुकरच्या तीन शिट्ट्या काढल्या आणि नंतर गॅस बंद करून तो निववंत ठेवला.

'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी'ची फोडणी

रंगीबेरंगी वेजिटेबल कंटेन्ट्स

ते रंगीत कंटेन्ट्स फोडणीत परतले जात असताना

रंगीत कंटेन्ट्समध्ये एक पांढरी अ‍ॅडिशन (फ्लॉवर)

डाळ-तांदळासकट जिन्नस परतल्यावर मिश्रणात मीठ घालताना मास्टरशेफ

पाणी, कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला टाकल्यावर

एका बाजूने खिचडी तयार होत आली असतानाच तिच्याबरोबर तोंडी लावायला गविस्पेशल 'बेडेकरी अचारी वांगी-काप' बनवण्याचं गविंनी ठरवलं. मग आमच्या पोतडीतून आम्ही आणखी काही जिन्नस बाहेर काढले -

१. भरताची वांगी - ३ मोठी
२. डाळीचं पीठ - १०० ग्रॅम
३. बेडेकर लोणच्याचा मसाला - १०० ग्रॅम
४. मीठ - चवीनुसार
५. शेंगदाण्याचं तेल - आवश्यकतेनुसार

पुन्हा मास्टर शेफ गवि आणि मी त्यांचा असिस्टंट. आम्ही केलेली कृती पुढीलप्रमाणे -

आधी तीनपैकी एक भरताचं वांग घेतलं आणि सुरीने त्याचे काप करून घेतले. काप साधारण १ सेमी रुंदीचे कापण्याचा प्रयत्न केला गेला. एकाच वांग्यापासून मिळालेल्या कापांची संख्या बघता बाकीची वांगी बाजूला ठेवून दिली. मग डाळीचं पीठ आणि बेडेकर लोणच्याचा मसाला यांचं २:१ प्रमाणात मिश्रण करून घेतलं. लोणच्याच्या मसाल्यात थोड्याप्रमाणात मीठ असल्याने त्या हिशोबाने त्यात आवश्यकतेनुसार मीठ घालून ते एकत्र केलं. त्यानंतर वांग्यांच्या कापांना हे मिश्रण चोपडलं. वांग्याला पाणी सुटल्यामुळे थोड्याच वेळात मिश्रणाचा कापांवर एक थर बसला. अशाप्रकारे पीठात लडबडलेल्या वांग्याच्या सर्व कापांना तव्यावर शेंगदाण्याचं तेल सोडून ते तापल्यावर त्यात शॅलो फ्राय करून घेतलं.

'बेडेकरी अचारी मसाला' बनवताना आमचे 'मुख्य आचारी'

वांग्याचे काप सुरीनेच केलेले आहेत

मसाला आणि वांगी-काप यांच्या दिलजमाईच्या प्रयत्नात

दिलजमाई झालेल्या कापांची अशी तव्यावरच्या गरम तेलावर रवानगी झाली

वांग्याचे काप बनत होते तोवर आमचा कुकर पडला आणि आम्हाला दिसलं की आम्ही बनवलेली सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ३ - तांदळाची खिचडी आणि आता सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ - वांग्याचे काप व्यवस्थित तयार झालेले होते. मग विमेंनी या दोन्ही पाकसिद्धींची एकाच प्लेटमध्ये कलात्मक मांडणी करून त्यांचे फोटो काढले. आम्ही मात्र तोपर्यंत प्रचंड भूक लागल्याने मिळेल त्या प्लेटमध्ये पटापट व्यंजनं घेतली. एकूणच दोन्ही डिशेस् इतक्या मस्त दिसत होत्या की तोंड भाजत असूनही आमचे खाण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यावर गविंनी फार सुंदर मखलाशी केली, "शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही.." पण तरीही हे दोन्ही पदार्थ चवीला अप्रतिम झालेले आणि व्यक्तिशः मी खिचडी उरणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली.

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ३ - 'मिक्स वेजिटेबल मसाला खिचडी' आणि सोबत सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ - 'बेडेकरी अचारी वांगी-काप' (कलात्मक मांडणी सौजन्य - वि मे)

'बेडेकरी अचारी वांगी-काप' खाताना विमे आणि गवि, कुठल्याशा घोळू का काय माशाचे काप चवीला डिट्टो असेच लागतात असं सारखं म्हणत होते. गविंनी त्यांच्या वडिलांचा एक किस्सा सुनावला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या एका शुद्ध शाकाहारी मित्राला असेच वांगी-काप खिलवले. त्या मित्राने ते वांगी-काप समजूनच फार आवडीने खाल्ले पण थोड्यावेळाने खाता खाता गविंचे वडिल त्या मित्राला म्हणाले, "काय, घोळूचे काप अगदी वांग्याच्या कापांसारखे लागतात नाही?" हे ऐकताच त्यांचा तो मित्र एकदम स्टन् झाला आणि त्याच्या पोटात ढवळून येऊ लागले. शेवटी स्वयंपाक घरात मासे नाहीत आणि काप वांग्याचेच होते हे जेव्हा त्या मित्राला त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा कुठे त्यांच्या मित्राची खात्री पटली. यावेळी पाकसिद्धीच्या वेळेसच मी असिस्टंटकी केलेली असल्याने बिनघोर बेडेकरी अचारी वांगी-कापांचं सेवन केलं. खरंतर ते इतके चविष्ट झाले होते की आणखी एखादं वांगं कापलं असतं तरी त्याचे कापही स्वाहा झाले असते, हे निश्चित!

सडाफटिंग पाकसिद्धी क्र. ४ 'बेडेकरी अचारी वांगी-काप'

जेवून होतंच आहे तर आता परतीचे वेध लागले. गविंचा मुलगा त्यांना फोन करून परतण्याची जणू आठवणच करून देत होता. विमेंनी झपाट्याने पुन्हा एकदा भांडी-प्रक्षालनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि पूर्णतेला नेला. त्या बरोबरच मी आणि गविंनी आणलेल्या वाण सामान आणि भाज्यांची योग्य ती वाटणी पुन्हा आमच्या आमच्या पिशव्यांमध्ये करण्यातही त्यांनी हातभार लावला. आम्ही घर व्यवस्थित आवरून घेतलं, जेणे करून पुढच्या वेळेला सहकुटुंब तिथे आल्यावर आमच्या सडाफटिंग पाककौशल्याबद्दल आणि नंतरच्या कचर्‍याबद्दल गविंना बोल लागणार नाही, याची खबरदारी घेतली.

शेवटी घराच्या दाराला कुलूप लावताना मनात खूप समाधान दाटलं होतं. समाधान एका स्वयंपाकी कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाचं होतं, समाधान सडाफटिंग पाकसिद्धींचं होतं, समाधान एका नव्या मैत्रीच्या नात्याच्या जन्माचं होतं, समाधान नव्या जिव्हाळ्याच्या निर्मितीचं होतं आणि समाधान इतक्या वर्षात जे गमावल्याची भावना झालेली ते काही प्रमाणात नक्कीच कमावल्याचंही होतं.

परतीच्या वाटेत पुढचा सडाफटिंग कट्टा कुठे करता येईल याची जोरदार चर्चा झाली. थोडं लांबचं ठिकाण ठरवण्याचा विचार होत आहे, कोकण, कदाचित गोवादेखिल! कुणी सांगावं, नव्याने तयार झालेल्या या मैत्रीच्या नात्याला इतका विश्वास तर नक्की वाटतोय की जगाच्या पाठीवर कुठेही जायला सांगा, आता जिथे जाऊ तिथे स्वतःची आनंदाची खाण निर्माण करू.

अशा प्रकारे मिपाकरांच्या सडाफटिंग पाकसिद्धी कट्ट्याच्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

सडाफटिंग पाकसिद्धी करणारे थ्री मस्केटीयर्स (गवि, मी नि विमे)



1 comment:

  1. surekh!! So you have culinary skills too! All rounder aahes! All the best for other such adventured trips!

    ReplyDelete