Thursday 31 December 2015

कवी मंगेश पाडगावकरांना आठवताना....

मला आजही कविता फारशी कळत नाही. 27 वर्षांपूर्वी तर अजिबात कळायची नाही. यांत्रिकपणे घोकंपट्टी करायची आणि परिक्षेत कवितांवरच्या निर्बुद्ध प्रश्नांची उत्तरं लिहायची, इतकाच माझा आणि कवितेचा संबंध. कवीला कवितेत काय म्हणायचंय हे शिक्षकांनी सांगितलं ते आणि तेवढंच लिहून काढायचो. सांगितलं असेल कधीतरी कवीने शिक्षकांना त्याचं वा तिचं मनोगत, आपून को क्या? असंच असायचं माझं! मग कधीतरी असं कळलं की शिकलेलं कवीचं मत हे शिक्षकांइतकंच गाइडांचंही असतं. या सा-यामुळे कविता उमजणं तर सोडा समजणंही दुरास्पद होत गेलं. या काळात आमच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेने आमच्या भेटीला कवी मंगेश पाडगावकरांना बोलावलं.

शाळेच्या सभागृहात आमची अख्खी बॅच बसलेली आणि समोर पाडगावकर. शाळेच्या क्रमिक पुस्तकात ज्यांच्या कविता असतात अशा कवींना बघण्याचा तो तसा माझा पहिलाच प्रसंग. स्वतःची ओळख करून देत, त्या दिवशी पाडगावकरांनी माईकचा आणि त्याचवेळी सभेसहित सभागृहाचा ताबा घेतला. त्यानंतर बोलगाणी, उदासबोध, कबीरवाणी, जिप्सी अशा त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांच्या ठाशीव आणि नाट्यपूर्ण सादरीकरणात पुढचे दोन तास आम्ही सगळे डुंबत होतो. यात कवितेचं कवीच्या दृष्टीकोनातलं अंतरंगच मला दिसतंय की काय असं वाटायला लागलं.

कविता आजही मला नीटशी उमजत नाही पण कवितेचं सामर्थ्य मला निश्चितपणे दाखवलं पाडगावकरांनी. आज पाडगावकरांच्या देहावसानाची बातमी ऐकली आणि डोळ्यासमोर त्या दिवशीचे, आम्हा मुलांकडे त्यांच्या जाड भिंगांच्या चष्म्यातून मिष्किल डोळ्यांनी बघत, 

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं'

म्हणणारे पाडगावकर उभे राहिले.

माझ्यासारख्या कविता समजण्यात 'ढ' असणा-याला काव्यानंदाचा आणि कविता-सामर्थ्याचा अनुभव देणा-या मंगेश पाडगावकर या मनस्वी कवीला माझ्याकडून ही भावपूर्ण शब्दाञ्जली....

No comments:

Post a Comment