Friday 1 May 2015

मिस्टिसिझम - एक चिंतन - २

आधी म्हण्टल्याप्रमाणे 'मिस्टिसिझम' या शब्दाच्या व्युत्पत्तीमधून आपल्या हाती फारसं काही लागत नाही पण येवढं नक्की की या शब्दाचे सामान्यतः दोन अर्थ लागतात. यातला पहिला अर्थ अनुभवात्मक आहे तर दुसरा जीवनपद्धतीविषयक. हा जो दुसरा जीवनपद्धतीविषयक अर्थ आहे तो निस्संशय अनुभवात्मक अर्थावर अवलंबून आहे म्हणून आपण सुरूवातीला या अनुभवात्मक अर्थाचाच विचार करू.

आता प्रश्न असा आहे की हा 'अनुभव' नेमकं काय प्रकरण आहे? सामान्य भाषेमध्ये व्यक्त करायचं झालं तरी आपल्याला लक्षात येतं की आपण याबद्दल काही फारसं सांगू शकत नाही. आपण इतकंच म्हणू शकतो की मी यापूर्वी जे भोगलेलं आहे, ते म्हणजे अनुभव. पूर्वीपासून असलेल्या ज्ञानाला अनुभव म्हणता येईल. पण पूर्वीपासून असलेलं सगळंच ज्ञान अनुभव होईल का? हे ज्ञान कुठे होतं? कुणाला होतं? कसं होतं? गुंतागुंत वाढत जाते आहे. याची सोडवणूक करण्यासाठी आपण 'ज्ञान' म्हणजे काय, याबद्दल भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या उहापोहाबद्दल आधी पाहू.

भारतीयांच्या मते ज्ञान हे बुद्धीचं साध्य आहे. बुद्धी असेल तर ज्ञान होईल आणि बुद्धी नसेल तर ज्ञान होणार नाही, इतकं त्यांचं साहचर्य मानण्यात आलेलं आहे. किंबहुना या गृहितकावरच त्यांनी बुद्धीची व्याख्या केलेली आहे.

'सर्वव्यवहारहेतुर्ज्ञानं बुद्धि:।'

अर्थात, आहार-विहारादि सर्व प्रकारच्या व्यवहारांचे निमित्त वा कारण असे जे ज्ञान आहे, त्याला बुद्धी असं म्हणतात. एका अर्थाने बुद्धी आणि ज्ञान यांच्यात एकात्मताच मानली गेली आहे. आता ही बुद्धी किंवा ज्ञान किती प्रकारचं असतं, तर त्याबद्दल सांगतात -

'सा (बुद्धि / ज्ञानम्) द्विविधा। स्मृतिरनुभवश्च।'

अर्थात, बुद्धी किंवा ज्ञान दोन प्रकारचे आहेत. एक स्मृति आणि दुसरे अनुभव.

स्मृति म्हणजे काय, तर

'संस्कारजन्यं ज्ञानं स्मृति:।'

अर्थात, संस्कारांद्वारे निर्माण होणारे ज्ञान म्हणजे स्मृति. आपल्या ज्ञानेन्द्रियांच्या साहाय्याने ग्रहण केलेल्याचा जो ठसा बुद्धीवर, ज्ञानावर उमटतो, त्याला संस्कार म्हणता येईल. हा ठसा सकारण-विनाकारण, सहेतु-निर्हेतु आपलं अस्तित्व बुद्धीवर दाखवत असतो, त्यालाच स्मृति म्हण्टलेलं आहे.

'तद्भिन्नं ज्ञानमनुभव:।'

तर या उलट ज्ञान जे आहे त्यास 'अनुभव' असे म्हणतात. म्हणजे संस्काररूपी ज्ञानापेक्षा भिन्न ज्ञान म्हणजे अनुभव.

आता असं बघा, स्मृति आणि अनुभव ही दोन्ही ज्ञानच आहेत. संस्काररूप ज्ञानाची बनते स्मृति आणि त्याहून भिन्न तो अनुभव. म्हणजे पूर्वी घडून संस्काररूप झालेले ज्ञान म्हणजे स्मृति आणि पूर्वी न घडलेले, त्यामुळे संस्काररूप न झालेले, केवळ वर्तमानकालीन ज्ञान हा अनुभव, अशी थोडक्यात मांडणी करावी लागते.

हा सगळा उहापोह करण्याचं कारण म्हणजे आपण ज्या विषयाचा विचार करत आहोत, मिस्टिसिझम, हा एक अनुभवाचा भाग आहे, असं आपण यापूर्वी अनेकदा उद्धृत केलंय. जोपर्यंत अनुभव म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट होत नाही, तोपर्यंत याबद्दलचा भारतीय दृष्टिकोण स्पष्ट होऊच शकणार नाही.

भारतीय दर्शनशास्त्रज्ञांच्या मते, स्मृति आणि अनुभव यांच्यात व्यवस्थित भेद आहे. याचं स्पष्टिकरण करताना ते म्हणतात की "मी स्मरतो" आणि "मी अनुभवतो", हे दोन भिन्न भिन्न प्रत्यय आहेत. स्मृति पूर्वानुभवाने होणारी असते आणि ही फक्त अनुभवजन्य संस्कारापासून होते (स्मरण) तर अनुभवाचा विषय हा प्रत्यक्ष आणि केवळ वर्तमानकालीन असतो (अनुभव). आता आपण निश्चितपणे म्हणू शकतो की पूर्वी कधीही नसलेल्या, नव्याने झालेल्या ज्ञानाचा संबंध मिस्टिसिझमशी आहे.

भारतीय शास्त्रज्ञ अनुभवाबद्दल अधिक विवेचन करताना म्हणतात,

'स (अनुभवः) द्विविधः। यथार्थोSयथार्थश्च।'

अर्थात, हा अनुभव दोन प्रकारचा असतो. एक यथार्थ आणि दुसरा अयथार्थ.

याचं स्पष्टिकरण देतात,

"तद्वति तत्प्रकारकानुभवो यथार्थः। यथा रजतं इदं रजतं इति ज्ञानम्। सैव प्रमेत्युच्यते।"

अर्थात, पदार्थ जसा आहे तसाच त्याचा अनुभव होणे याला यथार्थ अनुभव असं म्हणतात. जसं चांदीला पाहिल्यावर चांदीचंच ज्ञान होणं. या यथार्थानुभवाला शास्त्रामध्ये 'प्रमा' असे म्हणतात.

"तदभाववति तत्प्रकारकानुभवोSयथार्थः। यथा शुक्तौविदं रजतमिति ज्ञानम्।"


पण पदार्थ ज्या प्रकाराने युक्त नसतो त्याचे त्याच प्रकाराने ज्ञान होणे, याला अयथार्थ अनुभव असं म्हणतात. जसं, शिंपल्याच्या ठिकाणी (त्याचा रंग, चकाकी यामुळे) ही चांदी आहे असं ज्ञान होणं.

आत्तापर्यंत अनुभवाचा शास्त्रीय दृष्टिकोणातून विचार केल्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे परतू. आपण पहिल्या भागात जे पाहिलेलं त्यात असामान्य विलक्षण अनुभवाला आपण 'मिस्टिक' असं संबोधलं होतं. मग आत्ता केलेल्या ज्ञान आणि त्यातही अनुभवाच्या विवेचनाचा विवेचनाचा विचार करताना असा प्रश्न निर्माण होतो की 'मिस्टिक' अनुभवाला आपण यथार्थ श्रेणीत ठेवावं की अयथार्थ? उदाहरणांत सांगितलेले मिस्टिक अनुभव, हे ज्ञानाचे, चांदीच्या उदाहरणाप्रमाणे जसे आहे तसे जाणण्यासारखे यथार्थ अनुभव नाहीत पण त्याच वेळेला शिंपल्याऐवजी चांदी वाटण्यासारखे अयथार्थही नाहीत. मिस्टिक अनुभव हे तात्कालिक अर्थात कालसंबद्ध असतात आणि ते अनुभवकर्त्यासाठी त्या काळापुरते यथार्थ असतात. मग अशा परिस्थितीत या अनुभवांसाठी आपल्याला अनुभवाचा एक तिसरा प्रकार मानावा लागतो.

दर्शन शास्त्रात न सांगितलेल्या या तिसर्‍या प्रकारच्या अनुभवाबद्दल बोलण्यापूर्वी अनुभव किंवा मूळात ज्ञान होण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ पण ते पुढील भागात.....

No comments:

Post a Comment