Sunday, 20 October 2013

संवादिका : १ - मंगल कार्यालय

"अहो, तो विजुताईंचा मुलगा ना?"
"कोण हो?"
"अहो तो काय, त्या छोटीला कडेवर घेऊन उभा आहे, तो."
"तो होय, हो हो, तो विजुताईंचा मुलगाच नि ती छोटी त्यांची नात."
"हं, म्हणजे केलं वाटतं याने लग्न."
"छे हो, ती छोटी विजुताईंची नातच पण म्हणजे त्यांच्या मुलीची, ज्योतीची मुलगी."
"म्हणजे अजून नाहीच केलंय का याने लग्न?"
"हो ना!"
"इतका चांगला मुलगा आहे, स्वभाव, शिक्षण, नोकरी. मग करत का नाहीये लग्न?"
"कुणास ठाऊक?"
"तसं कधी, कुठे प्रकरण वगैरे काही?"
"ऐकलं नाही कधी तसं. पण आजकालच्या मुलांचं काय, कसं, ते काही कळतंच नाही. येवढा चांगला मुलगा आहे पण चांगली मुलगीच कोणी सांगून आली नाही तर काय करेल?"
"अहो मंदाताई, तुमची मोठी मुलगीपण लग्नाची आहे ना? तिच्यासाठी का तुम्ही...?"
"कसं शक्य आहे ते, सुलूताई? आम्हाला तो आमच्या मुलींचा, मीनू-तनुंचा भाऊच वाटतो. तनु तीन वर्षाची असताना मला भाऊ पाहिजे म्हणून हट्टाने त्याला राखीही बांधली होती."
"मंदाताई, मीनू बरोबर त्याचा जोडा छान दिसेल हो, तुम्ही का प्रयत्न करत नाही?"
"तुमचं आपलं काहीतरीच. सुलूताई, अहो, तो पण आमच्या मुलींना बहिणच मानतो. अरे, शैलाताई बोलावतायत वाटतं. जरा, त्यांच्याकडे जाऊन बघते हं."
"काय मंदाताई, तुमच्या ओळखी भरपूर, याचा पुरेपूर प्रत्यय आला बघा. अगदी इथेही तुमच्या ओळखीच्या मैत्रिणी भेटल्याच की तुम्हाला."
"तसं काही नाही हो शैलाताई, अगदी जुजबी ओळखच आहे पण भारी ढालगज भवानी आहे ती! काय काय विषय सुचतात तिला, मग बसते टोचत..."
"मग? आत्ता काय टोचत, आपलं, विचारत होती म्हणे?"
"काही नाही हो, विचारत होती विजुताईंच्या मुलाबद्दल."
"काय ते?"
"त्याचं लग्न झालंय का? का करत नाही? हल्ली चांगल्या मुली मिळत नाहीत का? वगैरे वगैरे..."
"अरे, म्हणजे समाजसेविकाच की ती! कुणी मुलगी आहे का त्यांच्या डोळ्यासमोर?"
"अहो, विचारत होती, तुमच्या मीनूसाठीच तो का बघत नाही? दोघांतलं वयही योग्य आहे. मुलगा ओळखीतला आहे, चांगला स्वभाव आहे, शिक्षण आहे, नोकरी आहे, वगैरे वगैरे..."
"भारीच भोचक की हो! मग तुम्ही काय म्हणालात?"
"शैलाताई, अहो, सांगून पाहिलं, आमच्या मुलींना तो भावासारखा आहे, त्यांनी राखी बांधलीय, पण ऐकतच नव्हत्या. बरं झालं बाई, तुम्ही दिसलात आणि त्यांना तिथेच सोडून तुमच्याकडे आले पळून. अहो कसं आहे, आपल्या मुलींचीच काही गॅरेंटी आहे का? मुलगा चांगला आहे पण यांचं काही सांगता येतंय का?
"हो ना! आमच्या आशूचंच बघा ना, तिला आता लग्न नाही करायचं. आधी करीयर, नोकरी हवीय. यांची कामं, कामाच्या वेळा, सगळं सगळं वेगळंच!"
"मग आपण कुणाशी बोलायचं आणि यांनी नकारघंटा लावायची. अशानं आपण तोंडघशी पडू त्याचं काय?"
"हे बाकी खरंय मंदाताई, पण मग हे त्यांना का सांगत नाही?"
"त्यांच्याशी आपण आपल्या मुलींबद्दलच कसं बोलणार असं? तशी जुजबीच ओळख म्हणजे..."
"हो ना, ते ही खरंच! पण काय हो मंदाताई, येवढं जर त्यांना विजुताईंच्या मुलाबद्दल वाटतंय, तर त्या त्यांच्याच मुलींसाठी का बघत नाहीत त्याचं स्थळ?"
"हुं! सटवीला गरजच नाही, तिला दोन्ही मुलगेच ना!"

1 comment: