Monday 11 June 2012

बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट - 'बिग फिश'

मानवी जीवनशाळेमधला सर्वात जास्त कठीण विषय कोणता असेल तर तो आहे नात्यांचं व्यवस्थापन. कदाचित मी जे काही लिहितोय ते सगळं कुणाला पटेल की नाही याची मला कल्पना नाही पण मला स्वतःलाही, आपल्याला नात्यांचं योग्य व्यवस्थापन करता आलंय की नाही याची शंका सतत भेडसावत राहते. मूळात एकत्र कुटुंबात वाढलेल्याला नाती आणि त्यांच्या व्यवस्थापनामधलं ज्ञान मिळण्याची सोय घरातच मिळालेली असते. विभक्त कुटुंबामध्ये मात्र अशी परिस्थिती नसते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गोष्टी-वेल्हाळ असेल तर त्याने सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातल्या गोष्टींमधून त्याला ओळखण्याची वेळ आपल्यावर येते. अशा वेळी आई-वडिलांच्या तुटपुंज्या सहकार्याने आपल्याला त्या व्यक्तीला समजून घ्यावं लागतं. पण अशी गोष्टी- वेल्हाळ व्यक्ती आपल्या आई-वडिलांपैकीच एखादी असेल तर असं नातं समजून घेणं फारच अवघड होऊन जातं.

अशाच परिस्थितीशी झगडावं लागलेलं असतंय विल् ब्लूमला. विल् म्हणजे विल्यम ब्लूमचे वडिल एडवर्ड ब्लूम हा एक प्रचंड गोष्टी-वेल्हाळ माणूस! आपल्या आयुष्यातल्या घटनांची अनेक अतार्किक बाबींशी सांगड घालून त्या गोष्टी रूपाने सतत सगळ्यांना सांगणं हा त्याचा स्वभाव. त्याची गोष्टी सांगण्याची पद्धत इतकी परिणामकारक असते की ऐकणारा कधी त्यात गुरफटून जातो हे त्यालाही कळत नाही. आपल्या बालपणापासून या गोष्टी ऐकणारा विल् जाणत्या वयात आपल्या वडिलांपासून दूर जातो कारण वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी, सांता क्लॉज आणि इस्टर बनी इतक्याच खोट्या आहेत असं त्याला वाटतं. आपले वडिल मूळात कसे आहेत, त्यांचं आयुष्य कसं गेलंय, हे त्याला त्यांच्या गोष्टींमधून ओळखता येत नाही. आपल्या वडिलांना, त्यांनीच सांगितलेल्या गोष्टींमधून जाणण्याचा प्रयत्न करणार्‍या विल् ची गोष्ट आपल्या पुढे सादर करतो, मूळ डॅनियल वॉलेसच्या कादंबरीवर आधारित चित्रपट, 'बिग फिश'. विल् ने एडवर्डच्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकल्यात. त्याला त्या अगदी पाठ झाल्यात, त्यातल्या प्रत्येक पंच लाईन सकट. तो त्या गोष्टी एडवर्ड इतक्याच सफाईदार आणि परिणामकारक करून सांगू शकतोय पण गोष्टींच्या या जंजाळात आपले वडील कुठेतरी हरवले आहेत नि आपण त्यांना ते जसे आहेत तसं जाणू शकत नाहीये, हे त्याचं दु:ख आहे. एडवर्ड आपल्या गोष्टी-वेल्हाळ स्वभावाला बदलू शकत नाही आणि परिणामी बाप-लेकांमधली दरी रुंदावत जाते. या सगळ्याचा कडेलोट होतो, विल् च्या लग्नाच्या वेळी. विल्-जोसेफीनच्या लग्नाच्या पार्टीत एडवर्ड आपल्या स्वभावानुसार विल् च्या जन्माच्या वेळची नदीतला सगळ्यात मोठा मासा आपल्या लग्नाची सोन्याची अंगठी गळाला लाऊन पकडल्याची गोष्ट सांगत असतो आणि उपस्थित मंडळी त्याची गोष्ट तल्लीन होऊन ऐकत असतात. पण शेकडो वेळा ऐकलेली गोष्ट विल् ऐकू शकत नाही आणि पार्टी सोडून जातो.

त्या रात्री बाप-लेकांमध्ये वाद होतो. विल् जोसेफीन बरोबर फ्रान्सला जातो. तो तिथेच एका प्रथितयश प्रकाशन संस्थेमध्ये लेखक असतो. दरम्यान बाप-लेकांमधलं माध्यम बनते विल् ची आई सॅण्ड्रा. पत्रांमध्ये आणि फोनवरून ती दोघांना एकमेकांची ख्याली-खुशाली कळवत असते. अशीच तीन वर्ष जातात. आता विल् स्वतः बाप बनण्याच्या अवस्थेत आहे. जोसेफीनला सातवा महिना सुरू आहे आणि अचानक त्याला त्याच्या आईचा फोन येतो. त्याच्या वडलांची केमो थेरपी थांबवल्याची आणि त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती ती त्याला देते. विल् ताबडतोब अमेरिकेत परतण्यासाठी निघतो तर जोसेफीनही त्याच्याबरोबर येते.

इथे आपल्याला चित्रपटाची नाडी गवसायला लागते. एक मुलगा, ज्याचे वडील आपल्या आयुष्यातल्या घटना त्याच्या लहानपणापासून सतत गोष्टीरूपाने त्याला सांगत आहेत, पण त्या गोष्टी न पटल्याने, त्याचे वडील नेमके कसे आहेत हेच त्याला कळेनासं झालेलं आहे. तो वडीलांनी सांगितलेल्या गोष्टींमधून त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व शोधू पाहतोय पण त्याला ते गवसतच नाही आहे. प्रयत्न करूनही आपले वडील नेमकं कसं आयुष्य जगले त्याबद्दल अनभिज्ञ असलेला विल् आता स्वतःच वडील होतोय. आपल्या स्वतःच्या वडीलांबद्दल, त्यांनी व्यतीत केलेल्या आयुष्याबद्दल कोणतीही माहिती न समजू शकलेला विल् आपण स्वतःच बाप बनण्याच्या योग्यतेचे झालेलो आहोत का या विचाराने सुन्न झालेला आहे. आपण आपल्या वडीलांना जाणू शकलो नाही आहोत तर आपण आपल्या होणार्‍या मुलासाठी योग्य बाप बनू शकू का नाही हा त्याला प्रश्न पडलाय. त्यात आता वडीलच मृत्युशय्येवर असल्यावर त्याचा धीर अधिकच खचतो. तो आपल्या वडीलांना जाणण्याचा आणखी एक प्रयत्न करतो.

एडवर्ड ब्लूम एक सख्त माणूस आहे. जीवनाच्या अंतापर्यंत तो बदलण्याचं नाकारतो. आपण आत्तापर्यंत नेहमीच स्वतःची जशी आहे तशीच प्रतिमा रंगवलेली आहे आणि त्यात कोणतीही गोष्ट खोटी नाही हे तो विल् ला ठणकावून सांगतो. विल् त्याला म्हणतो की तुमच्या गोष्टींमधून तो खर्‍या एडवर्ड ब्लूमपर्यंत पोहोचू शकत नाही आहे, तेव्हा एडवर्ड त्याला सांगतो की तू योग्य प्रयत्न करत नाही आहेस. तो विल् ला असंही सांगतो की मूळात मी आणि तू, आपण दोघेही गोष्टीच सांगतो, मी बोलून सांगतो तर तू लिहून सांगतोस. आजपर्यंत मी जसा आहे तसाच मी सांगितलेल्या माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींमध्ये आलोय. त्या गोष्टींमधून मला जाणण्याचे तुझे प्रयत्न कमी पडतायत तर तो काही माझा दोष नाही. आणि यानंतर विल् पुन्हा एकदा आपल्या वडीलांना त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आयुष्याच्या गोष्टींमधून जाणण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न आपल्यासमोर उलगडतो, 'बिग फिश'.

एडवर्ड ब्लूमच्या आयुष्याची ही गोष्ट खरोखर पडद्यावर 'बघण्याच्या' लायकीची आहे. ती इथे सविस्तर सांगची खरंच गरज वाटत नाही. प्रत्येकाने ती जरूर बघावी अशी मी विनंती करतो. एडवर्डचा जन्म, त्याच्या गावातली एक डोळा काचेचा असलेली जिप्सी चेटकीण, त्याचं वाढत्या शरीराशी सराईत होण्यासाठी तीन वर्ष झोपणं, त्यांच्या गावात आलेला राक्षस, त्या राक्षसाबरोबर त्यानं अ‍ॅस्टन गाव सोडणं, स्पेक्ट्रेत पोहोचणं, स्पेक्ट्रेत भेटलेला त्याच्या गावचा कवी नॉर्दर विन्स्लॉ, नंतर त्या राक्षसाला सर्कसमध्ये लावलेली नोकरी, तिथेच तो प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या मुलीची माहिती मिळवण्यासाठी त्यानं सर्कशीत केलेलं बिनपगारी काम, त्याचं सैन्यात जाणं, सयामी जुळ्यांना अमेरिकेत आणणं, सैन्याने त्याला मृत घोषित करणं, अमेरिकेत परल्यावर त्याने ट्रॅवलिंग सेल्समनची नोकरी करणं, सॅण्ड्रा टेम्पल्टनबरोबर केलेलं लग्न, त्याचं स्पेक्ट्रे गावात परतणं, आर्थिक विवंचनेतून विन्स्लॉच्या आर्थिक मदतीने त्याने गावाला बाहेर काढणं अशी अनेक घटनांनी भरलेली ती गोष्ट, टीम बर्टन नावाच्या हॉलीवूडच्या जादुगार दिग्दर्शकाने जॉन ऑगस्टच्या अप्रतिम पटकथेनुसार ज्या पद्धतीने आपल्यासमोर सादर केली आहे, त्याला तोड नाही. एडवर्डच्या गोष्टींमधील सगळी पात्र इतकी ठसठशीतपणे एखाद्या परिकथेसारखी आपल्या समोर उभी राहतात की आपणही त्यात गुंगून जातो. आपण पडद्यावर जे पाहतो त्यात इतके गुंततो की जितकी विल् ची अगतीकता जाणवते तितकाच त्याच्या कथेमधला एडवर्डही खराच वाटतो.
या चित्रपटाचा प्राण आहे, त्यातले संवाद. विशेषतः एडवर्ड आणि विल् मधले संवाद. त्यांच्यातले दोन खटकेबाज संवाद वानगीदाखल -

१. Senior Ed Bloom: You are in for a surprise.
Will Bloom: Am I?
Senior Ed Bloom: Havin' a kid changes everything. There's burping, the midnight feeding, and the changing.
Will Bloom: You do any of that?
Senior Ed Bloom: No. But I hear it's terrible. Then you spend years trying to corrupt and mislead this child, fill his head with nonsense, and still it turns out perfectly fine.
Will Bloom: You think I'm up for it?
Senior Ed Bloom: You learned from the best.

२. Senior Ed Bloom: People needn't worry so much. It's not my time yet. This is not how I go.
Will Bloom: Really?
Senior Ed Bloom: Truly. I saw it in the eye.
Will Bloom: The old lady by the swamp?
Senior Ed Bloom: She was a *witch*.
Will Bloom: No, she was old and probably senile.
Senior Ed Bloom: I saw my death in that eye, and this isn't how it happens.
Will Bloom: So how does it happen?
Senior Ed Bloom: Surprise ending. Wouldn't want to ruin it for you.

एडवर्ड ब्लूमची स्वतःची काही वाक्यही झकास उतरली आहेत. त्यातली काही -

Senior Ed Bloom: There's a time when a man needs to fight, and a time when he needs to accept that his destiny is lost... the ship has sailed and only a fool would continue. Truth is... I've always been a fool.

किंवा

Young Ed Bloom: There comes a point when any reasonable man will swallow his pride and admit he made a mistake. The truth is... I was never a reasonable man.

आणि

Senior Ed Bloom: Sometimes, the only way to catch an uncatchable woman is to offer her a wedding ring.

आणि हे तर चित्रपटात ज्या प्रसंगानंतर येतं ते बघता मला पार क्लासिक वाटलं,

Senior Ed Bloom: They say when you meet the love of your life, time stops, and that's true. What they don't tell you is that when it starts again, it moves extra fast to catch up.

चित्रपटाचा शेवटही अतिशय सुंदर झालाय. एडवर्डने आपल्या कथेत सांगितलेलं असतं की त्याचा मृत्यु कसा होणार आहे ते त्याने चेटकीणीच्या काचेच्या डोळ्यात पाहिलंय. तो विल् ला ती गोष्ट सांगायला सांगतो. विल् त्याला म्हणतो की ती गोष्ट त्याला माहितीच नाहीये कारण एडवर्डने कधी त्याला आधी ती सांगितलेलीच नाहीये. तरी एडवर्ड विल् ला ती सांगायचा आग्रह करतो. विल् आपल्या मनानेच ती गोष्ट बनवायला सुरूवात करतो. एडवर्ड ब्लूमच्या मृत्युची गोष्ट. जशी एडवर्डला हवीय तशीच गोष्ट विल् सांगतो आणि आपल्याला लक्षात येतं की नेमकं एडवर्डला विल् ने काय समजून घ्यायचंय ते. हा प्रसंग बघताना मला तरी घशात काहीतरी अडकल्याची फार भावना झाली होती. चित्रपटाच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये हा चित्रपट जितका आपल्याला कळतो त्यासाठी आधी खर्च केलेला वेळ सार्थकी लागल्याची भावना निर्माण होते.

बाप-लेकाच्या नात्याला हळूवारपणे उलगडणारा हा चित्रपट प्रत्येकाने नक्की बघावा असं माझं सांगणं आहे.

पात्र परिचय -
अल्बर्ट फिनी - एडवर्ड ब्लूम (वयस्कर)

इव्हन मॅक् ग्रूगर - एडवर्ड ब्लूम (तरुण)

जेसिका लँग - सॅण्ड्रा ब्लूम (वयस्कर)

अ‍ॅलिसन लोह्मन - सॅण्ड्रा ब्लूम (तरुण)

बिली क्रुडुप - विल्यम ब्लूम

डॅनी डी'विटो - अ‍ॅमोस कॅलोवे (सर्कशीचा रिंगमास्टर - मालक)

स्टीव ब्युशेमी - नॉर्दर विन्स्लॉ

मॅथ्यू मॅक् ग्रोरी - कार्ल (राक्षस)

मॅरियन कॉटीलार्ड - जोसेफीन

आणि इतर..... 
'बिग फिश'ची एक झलक -

छायाचित्रे आंतरजालावरून, झलक यू ट्यूब वरून

No comments:

Post a Comment